एक काळ होता की हिची भारीच ऐट असायची. भलेभले हिला ‘एंगेज’ करायचा जीवापाड प्रयत्न करायचे..हिच्या मागे धावत सुटायचे आणि ही मात्र त्यांना वाकुल्या दाखवत म्हणजे ‘हमको नय आना’ म्हणत आपल्याच तोऱ्यात फणकऱ्याने निघूनही जायची..असतात बाबा असतात एकेकाचे दिवस..हा हा म्हणता काळ बदलला. हीच्या तरुण, देखण्या, शिडशिडीत बांध्याच्या ‘कूल’ बहीणी रस्त्यावर अवतरल्या आणि मुंबईकर नादावले..आता वय गेलेल्या ‘त्या’ मुंबईकरांच्या मागे लागल्यात, पण इश्काचे वय निघून गेलेल्या या सुंदरींना आता कोण विचारणार..असतात बाबा एकेकीचे दिवस..!!
टॅक्सी सेवेची सुरुवात मुंबंईत १९११-१२ च्या सुमारास झाली. सन १९०१ साली मुंबईच्या रस्त्यावर जमशेदजी टाटा या अचाट कर्तुत्वाच्या भारतीय माणसाची पहिली मोटरकार धावली आणि मुंबईच्या समाजजीवनाने हळूहळू वेग पकडायला सुरुवात केली.. मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या मोटरगाड्यांची संख्या आस्ते आस्ते वाढू लागली आणि त्यावेळच्या मुंबईकरांना सार्वजनिक वापरासाठी टांगा आणि ट्रामपेक्षा वेगवान वाहन हवंस वाटू लागलं..लोकांची इच्छा ओळखून सन १९११ च्या आसपास ब्रिटीश सरकारने सार्वजनिक वापरासाठी टॅक्सी परवाने द्यायला सुरुवात केली आणि मुंबईच्या रस्त्यावर टॅक्सी धावू लागल्या..एकेकाळी हिच्या मागे मुंबईकर आणि आता ही ह्यांच्या सर्व सेवेला, हे म्हणतील तिथे हजर एवढा अप साईड डाऊन ट्रेंड पाहिलेल्या मुंबईच्या या सुप्रसिद्ध मोटराईज्ड टॅक्सी सेवेला १०० वर्षांपेक्षा जास्त वर्ष होऊन गेलीत.
सुरुवातीला मुंबईतल्या मोटर गाड्या म्हणजे टांग्याच्या केबिनची थोडी सुधारित आवृत्ती होती. सगळ्यांचा रंग एकजात काळा. या गाड्यांना वरून पक्का टप नसायचा तर दुमडता येण्यासारखे मेण कापडाचे अथवा कॅनव्हासचे छत असायचे. तेंव्हा पक्के टप( हार्ड टॉप ) असलेल्या गाड्या अगदी दुर्मिळ आणि किंतीलाही महाग असायच्या (अश्या टप असलेल्या गाड्यांना तेंव्हा ‘लॅन्डोबॉडी’ गाडी म्हणायचे). टॅक्सी सेवेमधेही याच गाड्या आल्या आणि मग सगळ्याच गाड्या सारख्या वाटत असल्यामुळे खाजगी गाडी कोणती आणि टॅक्सी कोणती हे चटकन कळणं अवघड होऊ लागले..झाले, गोंधळाला सुरुवात होऊ लागली आणि मग कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून शक्कल निघाली, की जी टॅक्सी असेल त्याने मीटरच्या दांडीवर.. पिवळा कपडा गुंडाळायचा आणि जर ती टॅक्सी एंगेज असेल तर त्याच कपड्याने मिटर गुंडाळून टाकायचा..त्याकाळात टॅक्सी सह सर्वच गाड्या उघड्याच असल्याने गाडीतले ‘पिवळे फडके’ लांबूनही दिसायचे आणि लोकांना टॅक्सी लांबूनही ओळखता येऊ लागली..या एवढ्या एका आयडीयेने लोकांना टॅक्सी दुरूनही चटकन ओळखता येऊ लागली आणि त्यांचा गोंधळ संपला..
या पिवळ्या रंगावरून लोकांना टॅक्सी ओळखणे सोप्पे झाले आणि पुढे जेंव्हा हार्ड टॉप कार्स व टॅक्सी येऊ लागल्या तेंव्हा हा पिवळा फडका पिवळ्या रंगाच्या रुपात टॅक्स्यांच्या टपावर जाऊन पक्का झाला तो अगदी आत्ता आत्ता पर्यंत..खालचा काळा रंग मात्र तोच राहीला..!
आता मात्र हळूहळू काळी-पिवळी आपली ओळख गमावत अस्तंगत होत चाललीय.. कालाय तस्मै नमः आणखी काय..!!
-गणेश साळुंखे
9321811091
‘मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा’ लेखमाला
लेख १९ वा
संदर्भ –
‘स्थल-काल’ – श्री. अरुण टिकेकर २००४
‘माय मुंबाई’ – वा.वा.गोखले- १९९१
Leave a Reply