श्रावण कृष्ण षष्ठी अर्थात २३ आॅगस्ट २०१६, वार मंगळवार. संध्याकाळी मला महाराष्ट्र राज्याचे घटनात्मक प्रमुख, म्हणजे माननीय राज्यपाल महाशयांच्या वाळकेश्वरातील ‘राजभवना’ला भेट देण्याची संधी मिळाली.
निमित्त होतं राज्यपालांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. उमेश काशिकर यांची आणि माझी आगाऊ ठरलेली भेट. माझे इतिहासप्रेमी स्नेही श्री. अनिल पाटील यांना सोबत घेतले आणि संध्याकाळी ४ वाजता राजभवनावर थडकलो. सर्व सोपस्कार पार पडून ४.१५ वाजता राजभवनाच्या परिसरात प्रवेश मिळाला. खरं सांगू, असं भव्य, खानदानी रुबाब मिरवणारं, राजस निवासस्थान देशात अन्यत्र क्वचितच असेल..प्रचंड मोठी हिरवळ, समोरचा क्षितिजाला भिडलेला अथांग सागर आणि जलभूषण, जलचिंतन, जललक्षण आणि जरविहार अशी नांवं धारण करणारे आलिशान राज महाल..! या राजभवनाचा रुबाब शब्दात पकडणं कठीण..! प्रत्येकाने संधी मिळाल्यास या ठिकाणी अवश्य भेट द्यावी..हल्ली हा राजमहाल लोकांना बघण्यासाठी खुला करण्यात आला आहे. आगाऊ आॅनलाईन बुकींग करून काही नियम आणि अटींचं पालन करून कोणालाही तिथे जाता येते.
आमच्या भेटीचं निमित्त होतं राजभवनात नुकताच सापडलेला ब्रिटीशकालीन बंकर पाहाणे आणि त्या बंकरशी सबंधीत असू शकेल अशी माझ्याकडे असलेली माहिती मा. राज्यपालांना त्यांच्या जन संपर्क अधिकाऱ्यांच्या (PRO) माध्यमातून देणे..
नेमकं आमच्या भेटीच्या वेळेस तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री राजभवनावर आलेले असल्याने PRO श्री. काशिकरसाहेब गडबडीत होते आणि त्यामुळे त्यांचे सहाय्यक श्री. रमेश पाटील यांनी, माहिती ठेऊन द्या, साहेब मागाहून निवांतपणे वाचतील आणि मग आपण मिटींग करू असं केलं तर चालेल का, अशी विचारणा केली. आम्हाला पर्यायच नव्हता. मी त्यांना माहिती कशाबद्दल आहे ते तोंडीच एका मिनिटात सांगीतलं आणि तेवढ्यात श्री. काशिकर साहेब येत असल्याचा फोन आला. आणि आमची जी मिटींग अचानक राजभवनात आलेल्या व्हिआयपी पाहुण्यांच्या भेटीमुळे एका मिनिटात आटोपती घ्यावी लागत होती, ती पुढे एक-दिड तास चालली.
मा. राज्यपाल आणि त्यांचे PROसाहेब केवढे इतिहासप्रेमी आहेत, हे ते ज्या कुतुहलाने मला प्रश्न विचारत होते त्यावरून लक्षात येत होतं. इतिहासाविषयी प्रेम असल्याशिवाय का बंकर सापडले..? PRO साहेबांनी त्यांची सर्व व्हिआयपी कामं त्यांच्या सहाय्यकांमार्फत व फोनवरून सुरू ठेवून पुढचा एक-दिड तास ते आमच्याशी चर्चा करत होते. मी दिलेली माहिती, त्या माहितीचा सोर्स, त्याचा खरेपणा सर्व त्यांनी व्यवस्थीत नोंद करून घेतला आणि इतकी माहिती मान. राज्यपालांच्या कानावर घालून पुढे कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं..आवश्यकता भासल्यास तुम्हाला पुन्हा बोलावतो असंही त्यांनी सांगीतलं..मी ही यासाठी माझं संपूर्ण सहकार्य २४x७ उपल्बध असल्याचं सांगीतलं..
ती माहिती काय होती हे मी तुम्हाला येत्या काही दिवसांत सांगेन.
राजभवनाच्या गेटवरील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यापासून ते चहा देणाऱ्या शिपायापर्यंतच्या कडक इस्त्रीच्या युनिफाॅर्ममधल्या कर्मचाऱ्यांची वागणूक अतिशय सौहार्द्रपूर्ण आणि अगत्याची होती. सरकारी माणसाच्या अंगात त्याच्या नकळत येणारी एक विशिष्ट बाॅडी लॅंग्वेज त्यांच्या आसपासही नव्हती हे मला नमूद केल्याशिवाय राहावत नाही..आपले राज्यपाल हे अतिशय विद्वान असून भारताचा इतिहास आणि संस्कृती याबद्दल ममत्व असल्याचं ऐकून होतो, त्याची प्रचिती आज त्यांच्या कर्मचाऱ्यांचा वागणूकीतून प्रत्यक्ष घेतली.
साहेब जसे वागतात तसे त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी वागतात ही सर्वत्र दिसणारी बाब आहे..राज्यपालांना असणारी इतिहास, संस्कृतीतली रुची त्याच्या अधिकाऱ्यापासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यापर्यंत झिरपलेली प्रत्यक्ष अनुभवायला आली आणि राजभवनावर इतिहास/संस्कृतीचा आदर करणारे लोक वास्तव्य करतात हे बघून उर भरून आला..! हा आनंद तुमच्याशी वाटावा म्हणून हे लिखाण..
राजभवनाकडून मला दोन अप्रतिम पुस्तकं भेट म्हणून मिळाली..!!
राजभवनावरील भेट हा एक न विसरता येणारा अनुभव होता..!!
— गणेश साळुंखे.
Leave a Reply