नवीन लेखन...

स्वातंत्र्यवीरांचे मुंबईतील वास्तव्य – सावरकर सदन

शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या निवासाने पावन झालेली इमारत इतिहासाची आजही साक्ष देते. ही वास्तू म्हणजे महाराष्ट्राचं नव्हे तर साऱ्या देशवासियांचे श्रद्धास्थान आहे. ७५ वर्षे पूर्ण झालेल्या या वास्तूला तसा इतिहास आहे आणि ही वास्तू म्हणजे हिंदुस्थानवासींना नवविचारांसह दिशादर्शन करणारे प्रेरणास्थान ठरले आहे.

व्यास क्रिएशन्स द्वारा प्रकाशित “चैत्र पालवी” या नियतकालिकाच्या “सावरकर परिवार विशेषांक” मध्ये अमेय गुप्ते यांनी लिहिलेला लेख


मुंबईच्या मध्यवर्ती असलेल्या दादरमधील काही इमारती तेथील परिसराची ओळख बनल्या होत्या. त्यामध्ये दादर पूर्वेकडील डॉ. आंबेडकरांचे निवास ‘राजगृह’, तर पश्चिमेकडील महापौर जावळे यांचा बंगला, मोडक बंगला, संगीतकार सी. रामचंद्र यांचे ‘साईसदन’, आचार्य अत्रे यांचे ‘आपटे हाऊस’, ग. दि. माडगूळकर व सुधीर फडके यांचे ‘शंकर निवास’, प्रबोधनकार ठाकरे यांचे शिवाजी पार्क येथील घर. या इमारतींना त्यांच्या लौकिकासह इतिहास आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. त्याचप्रमाणे शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या निवासाने पावन झालेली इमारत इतिहासाची आजही साक्ष देते. ही वास्तू म्हणजे महाराष्ट्राचं नव्हे तर साऱ्या देशवासियांचे श्रद्धास्थान आहे. ७५ वर्षे पूर्ण झालेल्या या वास्तूला तसा इतिहास आहे आणि ही वास्तू म्हणजे हिंदुस्थानवासींना नवविचारांसह दिशादर्शन करणारे प्रेरणास्थान ठरले आहे. शिवाजी पार्क येथे गेल्यावर डॉ. मधुकर बी. राऊत मार्गावर ‘बालमोहन विद्यामंदिर’ शाळेच्या बाजूला गेल्यावर पांढऱ्या रंगाची इमारत आपल्याला समोर दिसते. सावरकरांच्या अक्षरांची पाटी आपल्या नजरेसमोर येते. १० मे १९३७ रोजी सावरकरांची रत्नागिरीतील स्थानबद्धतेतून सुटका झाली व ते मुंबईला आले. मुंबईला आल्यावर प्रथम ते १९३७ साली दादर येथील गणेश पेठ लेन येथील ‘सावरकर भुवन’ येथील आपल्या स्वत:च्या घरात सर्व कुटुंबासमवेत राहिले. त्यानंतर त्यांनी आपले ‘सावरकर भुवन’ विकून शिवाजी पार्क वसाहतीत प्लॉट नं. ७१ वरील जागेवर १९३७ साली इमारत बांधण्यास सुरुवात केली. इमारतीचे बांधकाम सुरू असेपर्यंत लेडी जमशेटजी रोडवरील ‘भास्कर भुवन’ या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर काही काळ कुटुंबासमवेत त्यांनी वास्तव्य केले. त्या वेळेस त्यांनी रु. ७५४८ या किमतीला सदर प्लॉट नगरपालिकेकडून घेतला. सुरुवातीस तळमजला व पहिला मजला, वर गच्ची अशी इमारतीची रचना होती. या इमारतीचे बांधकाम हिंदू कॉलनी येथील इंजिनीअर श्री. सुळे यांनी केले.

जून १९३८ मध्ये ‘सावरकर सदन’ या वास्तूत सावरकर, त्यांच्या पत्नी यमुनाबाई (माई), कन्या प्रभात, पुत्र विश्वास, मोठे बंधू बाबाराव, धाकटे बंधू डॉ. नारायणराव, त्यांच्या पत्नी शांताबाई व त्यांची मुले राहावयास आले. हे सदन त्यांच्या स्वामित्वाचे होते. या ठिकाणी त्यांचे शेवटपर्यंत वास्तव्य होते. येथूनच त्यांनी हिंदुमहासभेच्या व्यासपीठावरून आपल्या ध्येयाच्या प्रचारार्थ हिंदुस्थानभर दौरे काढून प्रचार केला. त्यांनी घराभोवती फुलझाडे, शोभेची झाडे लावून फुलबाग बनवली होती. त्यांच्या पत्नी माई या सुवासिक फुलांचे हार करणे, दारात रांगोळ्या काढणे मोठ्या हौसेने करत असत. गुढीपाडवा व दसऱ्याच्या दिवशी घरावर कुंडलिनी कृपाणांकित भगवा ध्वज उभारून माई त्याची पूजा करत असत. वरील ध्वजाची व शस्त्रांची पूजा करावी असा सावरकरांचा दंडक असे. दररोज सायंकाळी स्वतः सावरकर बागेत येत असत व फुलझाडांची निगा राखत असत. समोर पायऱ्या चढल्यावर एक प्रशस्त हॉल आहे. येथे सावरकरांचे कार्यालय असून महत्त्वाच्या पाहुण्यांची भेट ते तिथे घेत असत. तिथेच त्यांचे सहकारी बाळाराव सावरकर बसत.

सन १९३८ ते १९४२ पर्यंत या इमारतीत सावरकरांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर व धाकटे बंधू डॉ. नारायण (बाळ) सावरकर यांचे वास्तव्य होते. त्या प्रशस्त हॉलच्या बाजूला डावीकडील खोलीत श्री. भिडे व उजवीकडील खोलीत श्री. दामले हे भाडेकरू त्या वेळी राहत होते.

उजवीकडे वर जाण्यासाठी एक लाकडी जिना असून आतील बाजूला आहे. याचे कारण स्वातंत्र्यसंग्रामाच्या वेळी हल्ले होत असत. म्हणून इमारतीचा जिना कोणालाही दिसू नये म्हणून त्यांनी इमारत बांधताना तशी रचना केली. वर पहिल्या मजल्यावर जिना चढून गेल्यावर समोर सावरकरांची खोली दिसते. या खोलीत आत गेल्यावर मोठा दिवाणखाणा व त्याला लागून बाल्कनी होती. उजव्या बाजूला सावरकरांची खोली, त्याच्या बाजूला त्यांच्या पत्नी- माईंची खोली व समोर स्वयंपाकघर अशी रचना होती. दिवाणखाण्यातून स्वयंपाकघर समोर दिसत असल्याने तेथे मध्ये पार्टिशन घातले होते. दारे-खिडक्या लाकडाच्या असल्याने मजबूत व भक्कम होत्या.

भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी सावरकरांनी तिरंगी ध्वज व कुंडलिनी कृपाणांकित भगवा ध्वज इमारतीच्या गच्चीवर फडकवला. १९४८ साली गांधीजींच्या हत्येनंतर सावरकर सदनावर हल्ला झाला होता. तळमजल्याला उजव्या बाजूला इमारतीचा गुरखा व पहारेकरी राहत असे. इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी लोखंडाचे गेट लागते. १९६३ साली माई सावरकरांच्या निधनानंतर अंगणात तुळशीचे वृंदावन बांधण्यात आले. या वृंदावनावर माई सावरकर, सरस्वतीबाई सावरकर (येसूवहिनी) व ‘आत्मनिष्ठ युवती समाज’ या संस्थेच्या कार्यकर्त्या महिलांची माहिती असलेली कोनशिला बसवली आहे.

या इमारतीला अनेक मोठमोठ्या व्यक्तींनी भेटी दिल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोळवलकर गुरुजी, आचार्य अत्रे, सरदार आंग्रे, पां. वा. गाडगीळ, रँग्लर परांजपे, मामा वरेरकर, मास्टर तारासिंग, मोरारजी देसाई, डॉ. पुरुषोत्तमदास टंडन, सेनापती बापट, निर्मलचंद चटर्जी, प्रबोधनकार ठाकरे, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल श्रीप्रकाश, असे अनेक मान्यवर तात्यांच्या भेटीस येत असत.

२६ फेब्रुवारी १९६६ रोजी सावरकरांचे निधन झाले त्या वेळेस खालच्या मोठ्या दिवाणखान्यात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. लाखो लोकांनी सावरकरांचे अंत्यदर्शन घेण्यास त्या वेळी गर्दी केली होती.

या इमारतीत सध्या सावरकर कुटुंबातील त्यांच्या सून सुंदरबाई सावरकर या राहत असून इतर भाडेकरूही राहतात. कालांतराने इमारतीत बदल होत गेला. सावरकरांच्या मृत्युपत्रानुसार जागेची वाटणी झाली. सध्या त्यांच्या कार्यालयाच्या जागी स्मारक असून तेथे त्यांना मिळालेली मानपत्रे, त्यांच्या वापरातील वस्तू, त्यांची पुस्तके, जुने फोटो अशा महत्त्वाच्या वस्तू आहेत. सुमारे २८ वर्षे सावरकरांचे या इमारतीत वास्तव्य होते.

अमेय गुप्ते.

व्यास क्रिएशन्स द्वारा प्रकाशित “चैत्र पालवी” या नियतकालिकाच्या “सावरकर परिवार विशेषांक” मध्ये अमेय गुप्ते यांनी लिहिलेला लेख

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..