नवीन लेखन...

मुर्खाचं नंदनवन कुठं बरं आहे?

मानवता की मूर्खपणा चिरस्थायी ठरेल,असा सवाल अल्बर्ट आइनस्टाइन यांना कुणीतरी विचारला. त्यावर तत्काळ उत्तर देताना ते म्हणाले,मानवाचा मूर्खपणाच चिरस्थायी टिकेल.

माणसाच्या मूर्खपणावर आईनस्टाईन सरांचा किती विश्वास होता बघा. हे सर म्हणजे एकदम बाप माणूस हे आपणास ठाऊक आहेच. सगळया मानवांपेक्षा या सरांचा मेंदू अधिक विकसित झाल्याचं नंतर सिध्द झालं.इतर मानवांपेक्षा हुषारीच्या बाबतीत अनेक पावलं समोर असलेलं सर असं म्हणतात म्हणजे ते सत्यच असलं पाहिजे,नाही का?

पण,मानवाचा मूर्खपणा म्हणजे नेमके काय?आपल्यापैकी प्रत्येकाला आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर तू मूर्ख आहेस असं ऐकावच लागतं. याची सुरुवात आपले आदरणीय फादर करतात.त्यांचेही फादर त्यांना कधी ना कधी तू मुर्ख आहे असं म्हणालेच असतात.आपल्या फादरचे फादर चुकून-माकून आपल्या घरी राहत असतील  आणि त्यांची व आपली मैत्री झाली असेल तर,लेका तुझा बाप सुध्दा मुर्खासारखाच वागायचा,हे पवित्र बोल आपल्या कानी नक्कीच गेले असणार.

आपल्या फादरच्या फादरच्या फादरला सुध्दा त्यांचा फादरानी असंच भादरल असण्याची शक्यता आहे. याचा अर्थ आपल्या पहिल्या पूर्वजापासून आतापर्यंत मुर्खाची परंपरा अव्याहत सुरुच आहे.औरंगजेबाच्या अब्बाजनाला तो मूर्ख आणि त्याचे जेष्ठ भ्राता,दारा शिकोव शहाणा वाटायचा. कोणे एकेकाळी जगाचे इन्स्पेक्टर जनरल असलेले जार्ज बुश-सेकंड यांना तर आपल्याकडील अनेक संपादक मूर्खशिरोमणींच्या अग्रभागी ठेवतात. श्रीमंत रावण सरांनासुध्दा त्यांचे बंधुराज श्रीमंत बिभिषण मूर्खच वाटायचे. स्वयंघोषित किंग ऑफ गॉड राजेश्री इंद्रसेन महाराज हे,द ग्रेटेस्ट गॉड ब्रम्हाजी-विष्णूजी आणि महेशजी हे त्यांसी कयमच मूर्ख समजायचे,असे नक्किच कोणत्यातरी वेदात /उपनिषेदात नमूद असलच पाहिजे.राम गोपाल वर्मा हे गृहस्थ जे चित्रपट काढतात ते मुर्खासारखे असतात,असे करण जोहर नावाचे दुसरे गृहस्थ एकदा म्हणाले होते.त्याची परतफेड राम गोपाल वर्मांनी,मी जर मूर्ख तर तू महामूर्ख असं म्हणून केली होती.या दोघांचेही चित्रपट पाहणारे आपण मग सवाई मुर्ख ठरत नाही का?

अमर अकबर अँथोनी नामे एका चित्रपटात या तीन हिरोंचे रक्त एकाच वेळेला त्यांच्या आईला देण्याचे महादृष्य रसिकांनी टाळ्या पिटत पिटत बघितले होतं.दिग्दर्शक आपणास आणि वैद्यकीय शास्त्रासही मुर्खाच्या पलिकडे पोहचवतोय हे कुणाच्याच लक्षात आलं नाही.

कुणाला तरी मुर्खाचे नंदनवन अशी कल्पना सुचलेली आहे.प्रत्येकजण दुसरा मुर्खाच्या नंदनवानातच राहतो असं बहुतेक वेळा समजत असतात.हे नंदनवन नेमके आहे तरी कसे,याचा मात्र अद्याप शोध लागलेला नाही.मुर्खाचीही परफेक्ट व्याख्या काही कुणी केलेली दिसत नाही. आजच्या काळात जो शहाणपणे वागतो तो मूर्ख,अशी एक साधी व्याख्या आपणास करता येते.

कोर्टाची पायरी शहाण्याने चढू नये हे ब्रम्हवाक्य आपणास कळू लागतं तेव्हापासून कानावर पडत असतं.यातला दडलेला अर्थ असा की जे कोर्टाची पायरी चढतात ते सारेच मूर्ख.निवडणूक मतदानाची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जे मतदानास बुट्टी मारतात ते शहाणे आणि जे मतदानास जातात ते मूर्ख अशीही एक अदृष्य व्याख्या गेल्या काही वर्षात हुषार मतदारांच्या मुळे तयार झालीच आहे.शहाणी माणसं घरं बांधतात आणि मूर्ख त्या घरात (भाड्याने) राहतात.हे प्रसिध्द वचन कोणत्या शहाण्यांनं जन्मास घालावं वाटलं कुणास ठाऊक? अब्राहम लिंकन नामे एक श्रेष्ठ मानव कधीतरी म्हणाले होते की,तुम्ही सर्व लोकांना काही काळ मूर्ख बनवू शकता.काही लोकांना कायम मूर्ख बनवू शकता.पण तुम्ही सर्व काळ सर्व लोकांना मूर्ख बनवू शकत नाही. कदाचित त्यांच्या काळी जाहिरात कला इतकी विकसित झाली नसावी.या कलेतील माहीर आणि शातीर मंडळी सर्वकाळ सर्व लोकांना मूर्ख बनवण्यात वाकबगार झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं असतं आणि त्यांनी आपलं वचन सुधारलं असतं.

द मॅरेज ऑफ हेवन ऍ़ण्ड हेल या ग्रंथाचा जनक विल्यम ब्लेक यांनी लिहून ठेवलय की शहाण्यास जे झाड जसं दिसतं,ते तसं मुर्खास दिसत नाही.खरच नाही का ते.शहाण्यास पैशाचं झाड दिसत नाही.मुर्खास मात्र पैशाचं झाड अचुक दिसतं.एखादा कागद, एखादी फाईल पैशाच्या झाडात रुपांतरीत करण्याची किमया तो करु शकतो. सरळ मार्गाने जाणाऱ्या शहाण्यास ते झाड दिसत नाही.

विल्यम ब्लेक खरच दूरदृष्टिचा होता नाही का?

— सुरेश वांदिले 

Avatar
About सुरेश वांदिले 11 Articles
श्री. सुरेश वांदिले हे महाराष्ट्र शासनाच्या जनसंपर्क विभागात संचालकपदावर आहेत. महाराष्ट्र शासनाच्या “लोकराज्य” या मासिकाचे ते संपादक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..