१९८० साली जगातील उत्कृष्ट रेल युरेल (युरोप रेल्वे) ने प्रवास करीत असताना उत्तम रेल्वे काय असू शकते याचा ‘याची देही याची डोळां’ अनुभव आला. जर्मनीतील म्युनिक येथील जगप्रसिद्ध म्युझियममधील रेल्वेदालन ही त्याचीच छोटी प्रतिकृती आहे.
विस्तीर्ण जागा, त्यात रूळ, बोगदे, नद्या, पूल, स्टेशनं, लेव्हल क्रॉसिंग्ज, सिग्नल्स्… तिथे एका वेळी निरनिराळ्या मार्गांवरून विविध तऱ्हेची इंजिनं लावलेल्या प्रवासी गाड्या, मालगाड्या, लाल-पिवळ्या-हिरव्या रंगांच्या सिग्नल्सच्या उघडझापीप्रमाणे थांबत होत्या, सुरू होत होत्या. अनेक गोष्टी सेकंदा-सेकंदाला बदलत होत्या. अर्धा तास खिळून राहिलेले प्रेक्षक अनेक गोष्टी पाहण्यात दंग झाले होते. ‘हे संपूर्ण मॉडेल आहे’ हेच विसरायला झालं होतं. थोडीफार अशाच तऱ्हेची छोटी म्युझियम्स् अनेक रेल्वेप्रेमींनी आपल्या घरातही बनविलेली आहेत.
२०१० साली युरोस्टार या लंडन-पॅरिस प्रवासानं तर मी चकितच झालो होतो. त्या सहलीमध्ये अॅमस्टरडॅम (हॉलंड) जवळ वसवलेलं मदुरोडॅम म्युझियम पाहण्याचा योग आला. तिथे मिनी हॉलंडची प्रतिकृतीच आहे. त्यातील एक विभाग संपूर्ण मिनी-रेल्वेमॉडेलचा म्हणजे इंजिनीअरिंग कल्पकतेचा उत्कृष्ट नमुना आहे. अनेक रेल्वे मार्ग, त्यांवरून वेगानं जाणाऱ्या विविध तऱ्हेची इंजिनं असलेल्या प्रवासी गाड्या व त्या स्टेशनातून बाहेर पडताना बदललेला त्यांचा रुळाचा मार्ग हे सर्वच त्या दालनात पाहताना डोळ्यांचं पारणं फिटतं.
पुण्यातील श्री. भाऊसाहेब जोशी यांनी बनविलेलं रेल्वे म्युझियम विशेष लक्षणीय आहे. गाडीच्या डब्यांच्या आकाराचा प्रेक्षकांना बसण्याचा हॉल आणि अन्य सर्वच गोष्टी अतिशय कल्पकतेनं व प्रचंड मेहनत घेऊन दाखविलेल्या आहेत. दिल्ली रेलभवन येथील म्युझियमही आवर्जून बघण्यासारखे आहे.
१० ते १५ डब्यांच्या गाडीत विविध विषयांवर तयार केलेली प्रदर्शनं भारतातील अनेक शहरांत, मोठ्या गावांत नेण्याचा अभिनव उपक्रम भारतीय रेल्वे सातत्यानं करत असते. एका प्लॅटफॉर्मवर ३-४ दिवस ही गाडी उभी असते. यांमध्ये भारतीय रेल्वेचा इतिहास, त्याचबरोबर कारगिल युद्ध, कॅन्सर, AIDS, आरोग्य विषयातील विविध विषयांबाबतची माहिती, तक्ते, फोटो इत्यादी गोष्टी मॉडेल्ससह ठेवलेल्या असतात. एका वर्षी विविध तऱ्हेच्या इंजिनांवर आधारित प्रदर्शन छत्रपती शिवाजी स्टेशनमध्ये भरविलं होतं. त्यावेळी प्रेक्षकांना इंजिनमध्ये आत नेऊन सर्व यंत्रणा समजावून सांगितली गेली होती, त्याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता.
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त संपूर्ण वातानुकूलित गाडीमध्ये त्यांच्या जीवनावर आधारित फोटोंचं प्रदर्शन साकारलं होतं. सर्व डब्यांत हजारोंनी कृष्णधवल फोटो, त्यासंबंधितची माहिती असलेली त्या काळातील वर्तमानपत्रं, रवींद्रनाथांचे प्रसिद्ध झालेलं साहित्य, सुप्रसिद्ध नोबेल पुरस्कार मिळालेल्या ‘गीतांजली’ या पुस्तकाची प्रत, टागोरांनी स्वत: रंगविलेली तैलचित्रं, इत्यादींनी सजलेली! संपूर्ण गाडीच अक्षरशः रवींद्रमय झालेली होती. शेवटच्या डब्यात शांतिनिकेतनची माहिती होती. सोबत तिथे तयार होणाऱ्या विणकाम व हस्तकलेच्या विविध वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या होत्या. या प्रदर्शनास मुंबईकरांनी प्रचंड उत्साहाने प्रतिसाद दिला होता. कलकत्त्याहून आलेलं हे फिरतं प्रदर्शन नाशिक, मनमाड, या गावांत थांबणार होतं.
भारतीय रेल्वेच्या १६० वर्षांच्या इतिहासातील अनेक घटनांवरचं १०० हून अधिक छायचित्रांचं प्रदर्शन मुंबईतील एन.सी.पी.ए. कलादालनामध्ये १० ते १२ दिवस भरलं होतं. भारतीय रेल्वे आपल्या देशाच्या इतिहासाची व संस्कृतीची खऱ्या अर्थाने साक्षीदार आहे ह्याची प्रचिती ते प्रदर्शन पाहताना जागोजागी येत होती. ‘रेल्वे अर्काइव्ह्ज’मधील (रेल्वे संग्रहालय) कृष्णधवल व काही रंगीत फोटो कॅनव्हास प्रिंटमध्ये असल्याने पेंटिंग केल्यासारखे वाटत होते. प्रत्येक फोटोबरोबरची माहिती आपल्याला त्या त्या काळात घेऊन जात होती.
उदाहरणार्थ, १८६० मध्ये दबोअ ते मायागंज या नॅरोगेज मार्गावर इंजिनाऐवजी बैल व खेचरे गाडी ओढण्यासाठी वापरीत. १८९१ मध्ये केवळ ब्रिटनच्या राजाचे दिल्लीत शाहीपद्धतीनं रेल्वे स्टेशनवर स्वागत करावयाचं म्हणून हॅमिल्टन नावाचं नवीन स्टेशन खास बांधण्यात आले होतं.
रेल्वेडब्याच्या खिडकीजवळ बसलेल्या रवींद्रनाथ टागोरांचं दर्शन एका फोटोत अत्यंत जिवंत वाटत होतं. रवींद्रनाथांनी ‘गीतांजली’ काव्यातील ६ कविता रेल्वे प्रवास करताना लिहिलेल्या होत्या. त्याची आठवण ते प्रदर्शन पाहताना होत होती.
हत्तीच्या मदतीने मालगाडीचे डबे बरोबर रुळांवर ठेवले जात. तेही अशा फोटोंतून समजतं. धुरांच्या रेषा हवेत सोडणारी वाफेची इंजिनं, डिझेल व इलेक्ट्रिक इंजिनं, त्यांमध्ये होत गेलेले बदल, अशा रीतीने संपूर्ण इंजिन विश्वच फोटोंमधून प्रतीत होत होतं. ‘खडकपूर रेल्वे प्लॅटफॉर्मवर एका रेषेत उभे असलेले पाणी वाटपे’ हे छायाचित्र विशेष दुर्मीळ आहे. सौराष्ट्रातील मिठागरात मालगाडीच्या डब्यात भरलं जाणारं मीठ, सभोवार पसरलेले शुभ्र मिठाचे डोंगर हे फोटोंत पाहताना अगदी सैबेरियातील बर्फाच्या राशींसारखे वाटतात. भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, नेहरू कुटुंबीय, लाल बहादूर शास्त्री, राजेंद्रप्रसाद, महात्मा गांधी, अशा अनेक राजकीय पुढारी मंडळीचा प्लॅटफॉर्मवरचा, रेल्वेच्या गाडीच्या डब्यात, वा इंजिनमध्ये उभे असलेल्या स्थितीतला दुर्मीळ फोटोंचा अनमोल संग्रह या म्युझियममध्ये पाहावयास मिळाला. हावरा, हरिद्वार, हैदराबाद, दिल्ली, मुंबई, या स्टेशनांचे स्वातंत्र्यपूर्व काळातील फोटो पाहताना आपण थक्कच होतो. त्या काळातील मद्रास स्टेशनची भव्य इमारत पाहण्यासारखी आहे.
१९४७ साली झालेल्या फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या गाडीचा एक फोटो पाहावयास मिळाला. गाडीच्या टपावर, दारांत, खिडक्यांशी लोंबकळणारे पुरुष व स्त्रिया आणि तितक्याच खचाखच गर्दीनं भरलेला अंबाला स्टेशनचा प्लॅटफॉर्म हे सर्व विदारक दृश्य पाहून अंगावर काटाच उभा राहतो.
त्या काळातील प्रसिद्ध पुढारी नाना शंकरशेट यांचा मुंबई शहरामध्ये सामाजिक, शैक्षणिक संस्था उभारण्याबरोबरच भारतीय रेल्वे सुरू करण्याच्या कामातदेखील सिंहाचा वाटा होता. गिरगाव भागातील आपल्या प्रशस्त घरातील काही खोल्या त्यांनी रेल्वेचं ऑफिस उघडण्यासाठी दिल्या होत्या. या प्रदर्शनात मात्र त्यांची दखलही घेतली गेली नव्हती, ही एक खेदाची गोष्ट होती. या विषयी मराठी दैनिकांतून आयोजकांवर झोड उठवली गेली. एक गोष्ट मात्र खरी, की या रेल्वे प्रदर्शनाने १६० वर्षांचा रेल्वेचा उत्तरोउत्तर झालेला उत्कर्ष आजच्या पिढीसमोर उलगडला.
अशा प्रदर्शनाचे फिरत्या रेल्वेगाड्यांतून आयोजन करण्यासाठी अतिशय मेहनत घेतली जाते, आणि जनतेकडून मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामुळे त्या श्रमांचे नक्कीच चीजही होते. हे एक जनजागृतीचं उत्तम माध्यम आहे व ते यशस्वी करण्यात रेल्वे संचालकांचा सिंहाचा वाटा आहे.
नॅशनल रेल्वे म्युझियम, नवी दिल्ली
भारतीय रेल्वेचा जवळजवळ १६० वर्षांचा बोलका इतिहास एका ठिकाणीदाखविणारं हे ‘राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय’ १० एकर परिसरात पसरलेलं आहे. येथे पुरातन वाफेची इंजिनं, विजेची इंजिनं, रेल्वेचे अति-जुने डबे, वाहतुकीची छायाचित्रं अशा हजारो गोष्टी एकत्रित ठेवण्यात आल्या आहेत.
१९०८ ते १९२७ या काळातील पंजाबमधील ‘पतियाळा मोनो-रेल’ हे संग्रहालयाचं प्रमुख आकर्षण आहे. या गाडीचं इंजिन एकाच वेळी लोहमार्गावरही असतं, आणि आधारासाठी असलेल्या चाकांच्या साहाय्यानं रस्त्यावरही असतं. त्या काळात पतियाळा शहराच्या रस्त्यांतून वाहतुकीची अन्य साधनं व मोनो-रेल दोन्हीही एकाच वेळी धावत असत. आजही ही गाडी संग्रहालयाच्या भोवती काही वेळ चालविली जाते.
ब्रिटिशांविरुद्ध भारतीयांनी पुकारलेल्या १८५७ च्या बंडाचा बीमोड करण्यासाठी ब्रिटिश सैन्य व शस्त्रास्त्रं ज्या रेल्वे इंजिनानं वाहून नेली होती ते रेल्वे इंजिनही पुरातन वास्तूचा दर्जा म्हणून ठेवण्यात आलेलं आहे.
पर्यावरण सांभाळण्याचा त्या काळातही प्रयत्न केला जात असे. पिवळ्या रंगाचं फायरलेस इंजिन हे लोहमार्गावरील सांधे बदलासाठी वापरलं जात असे.
२३४ टन वजनाचं विजेवर चालणारं जगातलं सर्वांत मोठं इंजिन घाटात वापरलं जात असे. त्याच्याच बाजूला २ फुटी नॅरो गेज इंजिन उभं केलेलं आहे.
सलून ऑफ प्रिन्स ऑफ वेल्स या शुभ्र पांढऱ्या रंगातील बोगीवर लाल रंगाचं आच्छादन; सलून ऑफ महाराजा बडोदा बोगीचं छत पूर्ण हिरव्या रंगाचं व सजावटीसाठी सोनं आणि हस्तिदंत. अशा मौल्यवान वस्तूंचा वापर केलेला; अशी इंजिनं व खास शस्त्रास्त्रे वाहून नेणारे डबे, शेळ्या-मेंढ्या घेऊन जाणाऱ्या शिप-बोगींनी सजलेलं संपूर्ण संग्रहालय पाहून रेल्वेप्रेमी प्रेक्षक थक्क होतो. मनभरून समाधान पसरून राहतं.
-डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply