वादक, संगीतकार बाबला शहा यांचा जन्म २० नोव्हेंबर १९४२ रोजी झाला.
“बाबला” हे नाव उच्चारताच गाण्यातला ‘ रिदम’ कानात गुंजारव करतो. त्या काळचा तरुणांचा आयडॉल. दिलखुलास माणूस. सच्चा कलावंत. मराठी माणसांची ‘डिस्को दांडिया’शी जानपहचान करून दिली ती याच बाबला शहा यांनी. दोन काठ्या घेऊन तलवारबाजी केल्यागत नाचणाऱ्या तरूण पिढीला नवरात्रीत दांडियात शिस्तबद्ध कसं नाचायचं याचं बाळकडू मिळालं या बाबलांच्यामुळे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीनी बाबला शहा यांना ‘रिदम किंग’ अशी सन्माननं उपाधी दिली होती.
बाबला शहा हे संगीतकार कल्याणजी आनंदजी यांचे धाकटे बंधू. त्यामुळे त्यांच्याभोवती आपसूक वलय होते. ७० आणि ८० च्या दशकांत ‘ऑर्केस्ट्रा’चा मंत्रमुग्ध करणारा हा आविष्कार संगीतप्रेमींना मनोमन भुरळ घालत होता या मध्ये ‘बाबला ऑर्केस्ट्रा’चे नाव घ्यावेच लागेल. बाबला यांचा ‘बाबला ऑर्केस्ट्रा’ त्या काळी खूप गाजला होता. या ऑर्केस्ट्रात लता मंगेशकर, आशा भोसले, किशोरकुमार यांच्या उत्तमोत्तम गाण्यांवर भारतीय रसिकांची सांस्कृतिक भूक पोसली जात होती.
बाबला स्टेजवर सहा, आठ अशा संख्येतले रोटो घेऊन बसायचे. त्या काळी स्टेजवरील अंधारात स्पॉट लाइटमध्ये आठ पीस रोटो वाजवणाऱ्या बाबला यांना पाहण्यासाठी दर्दी रसिकांची तुफान गर्दी व्हायची. नंतर नवरात्रीत या प्रकारच्या वादनाचा ट्रेंड चांगलाच रुजला आणि लोकप्रियही झाला.
बाबला शहा यांच्या पत्नी गायीका कांचन शहा. बाबला शहा आणि त्यांची पत्नी कांचन शहा या दोघांनीही उत्तम प्रकारे ऑर्केस्ट्रा जपला. १९६५ पासून सुरु झालेला त्यांचा हा गायनाचा प्रवास त्याची पत्नी कांचन यांच्या निधनापर्यंत,म्हणजे २००४ पर्यंत अखंड चालू होता. कांचन शहा यांचे २६ जुलै २००४ रोजी निधन झाले.
बाबला यांनी अनेक चित्रपटांना संगीत सुद्धा दिले. बऱ्याच संगीतकारांना सहाय्यक म्हणून काम केले. बाबला शहा पती, पत्नीने आफ्रिकन,केरेबियन देशात व इतर देशात बाबला ऑर्केस्ट्रा नावाने मोठे मोठे स्टेज शोज केले. बाबलाच्या संगीत निर्दशनात चटणी सारख्या सुपरहिट अल्बम चा समावेश आहे. तसेच त्यांनी अनेक गाजलेली गीते आपल्या हिंदी सिनेमा सृष्टीला दिली आहेत,त्यात कुरबानी चित्रपटातील सुपरहिट गाणं ”लैला में लैला’…,किंवा डॉन मधील खैके पान बनारसवाला व येह मेरा दिल अशी सुपरहिट गाणी बाबला शहा यांनी आपल्याला दिली आहेत.
संगीत वाद्यांचे अनेक प्रकार भारतात आणण्याचे श्रेय सुद्धा बाबला यांनाच जाते. शिवमनी सारखा आजचा प्रसिद्ध ड्रमर त्यांचा चाहता आहे,ए आर रहमान हा दिग्गज संगीतकार पण बाबलाच्या योगदानाबद्दल बोलत असतो.
बाबला यांना दोन अपत्य आहेत,एक मुलगा व एक मुलगी निशा अन वैभव त्यांची नावे आहेत. त्यांची कन्या निशा आईची गाणी म्हणतात व वैभव बालपणापासून ड्रम वाजवत आहे.
बाबला यांच्या गाण्यांची झलक
https://www.youtube.com/watch?v=J5k682RQS-0&list=PL9bk1lb28B_Viz2fPgCp-wiFaaXYFX2uz&index=2
https://www.youtube.com/watch?v=Ysnip-5ijxo
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply