प्रांत आणि भाषेची बंधने संगीताच्या सुरेल स्वरावर ओलांडून हिंदी, मराठी, तेलगु, मल्याळम, कन्नड भाषिक रसिकांची लोकप्रियता मिळवणारे अशी संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांची ओळख आहे.
भारतीय चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन करणाऱ्या शंकर एहसान लॉय यातील ते एक सदस्य आहेत. त्यांचे ब्रेथलेस साँग तर पुन:पुन्हा ऐकावेसे वाटते. मन उधाण वाऱ्याचे हे ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटातील गाणे शंकर महादेवन यांच्या जादुई आवाजामुळे मनाला भिडते. ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटात सूर निरागस हो, घेई छंद मकरंद, मनमंदिरा ही एकापेक्षा एक सरस गाणी त्यांनी गायली.
संगीतकार व गायक शंकर महादेवन यांचा जन्म ३ मार्च १९६८ रोजी झाला. केरळमधल्या तमिळ अय्यर कुटुंबात मुंबईत जन्मलेल्या महादेवन यांची मातृभाषा तमिळ असली तरी त्यांची कर्मभूमी बालपणापासूनच महाराष्ट्र राहिली. मराठी भाषेवर आणि मराठी मातीवर प्रचंड प्रेम असलेल्या महादेवन यांनी बालपणीच ख्यातनाम संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याकडे संगीताचे आणि गायनाचे धडे घेतले. शास्त्रीय गायनाचे प्रशिक्षणही घेतले. पं. भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांनी गायिलेल्या “राम का गुनगान गाईयेगा’ या देशभर गाजलेले गीत श्रीनिवास खळे यांनी एचएमव्हीसाठी संगीतबध्द केले. त्या वाद्यमेळ्यात वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी महादेवन यांनी सतारीची साथ केली होती. वीणा, सतार आणि अन्य वाद्यांच्या वादनाचे प्रशिक्षण, रियाज सुरू असताना, त्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. मुंबई विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनियरिंगची बी. ई. पदवी मिळवल्यावर ओरॅकल व्हर्शन ६ या कंपनीत त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनियरिंगचीही नोकरी केली. ख्यातनाम सॉफ्टवेअर कंपन्यातही त्यांनी काही काळ नोकरी केली.
संगीतकार ए. आर. रेहमान यांच्यासह देशातील ख्यातनाम संगीतकारांच्याकडे त्यांनी तमिळ, तेलगु, कन्नड, मराठी, हिंदी चित्रपटांसाठी गीते गायिली आहेत. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेल्या आणि अजय-अतुल यांनी संगीतबध्द केलेल्या “मोरया मोरया’ या लोकप्रिय गीताचे गायक शंकर महादेवनच आहेत.
१९९५ पासून चित्रपटात पार्श्वगायन करणाऱ्या महादेवन यांनी गायिलेल्या कंडुकोदायन या तमिळ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. हिंदी, तेलगु, कन्नड चित्रपटांना त्यांनी संगीतही दिले आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या कट्यार काळजात घुसली ह्या चित्रपटामधून शंकर महादेवन अभिनय क्षेत्रात पण पदार्पण केला आहे. आतापर्यंत दोनशेच्यावर चित्रपटात गीत गायन करणाऱ्या शंकर महादेवन यांना केरळ, तमिळनाडू, आंध्र सरकारने अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे. पाच राष्ट्रीय पुरस्कारांचेही ते मानकरी आहेत. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाबद्दल चार फिल्मफेअर पुरस्कारही त्यांना मिळाले. त्यांचा आशा भोसले जीवन गौरव पुरस्कारानेही सन्मान केला आहे. शंकर महादेवन हे नवी मुंबई महानगर पालिकेचे स्वच्छता ब्रॅण्ड ऍम्बेसेडर म्हणून अभियानात सहभागी झाले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट
Leave a Reply