अनिल कृष्ण विश्वास म्हणजेच संगीतकार अनिल विश्वास यांचा जन्म ७ जुलै १९१४ रोजी पूर्व बंगालमधेल बारीसाल येथे झाला , आता ते बांगला देशात आहे. त्यावेळी बारीसाल गावात ते रहात , घरची गरीबी होती . वयाच्या १४ वर्षी ते उत्तम तबला वाजवत होते . लहानपणीच त्यांनी लहान मुलांच्या नाटकातून भूमिका केल्या होत्या. त्या गावात इंग्रज हटाओ यासाठी लढा सुरु होता त्यात ते हिरीरिने भाग घेत . त्यामुळे त्यांच्या शिक्षणात अनेक वेळा अडचणी निर्माण झाल्या .
१९३० साली त्यांच्या वडिलांचे निधन झाले .एका मित्राने त्यांना सांगितले की पोलीस तुझ्या मागावर आहेत. हे कळताच त्यांनी त्यांचे घर सोडले आणि पाच रुपये घेऊन कोलकता गाठले . तेथे त्यांचा मित्र रहात होता तो बासरी वादक होता. शाळेत असताना दोघांनी एकत्र कार्यक्रम केला होता. त्यांना नोकरीची गरज होती ती मिळाली. त्यांना खानावळीत म्हणजे ढाब्यावर नोकरी मिळाली. तेथे वाढणे , भांडी घासणे अशी कामे करायला लागायची. भांडी घासता घासता ते खुल्या आवाजाने लोकगीते गात असत . त्यातील एकाने त्यांचे गाणी ऐकले ती व्यक्ती होती जादूगार मनोरंजन सरकार . त्यांनी अनिल विश्वास यांना एक बंगल्यात आणले त्या बंगल्यात रहात होते संपूर्ण बंगाल राज्याचे इन्स्पेक्टर जनरल . तिथे संगीत सभा चालू होती. मनोरंजन सरकाराने अनिलचे नाव घेतले आणि तो गाऊ लागला . गाणे संपले , टाळ्यांचा कडकडाट झाला . इन्स्पेक्टर जनरलने आपल्या नातवाला गाणे शिकवण्यासाठी त्याला ठेवून घेतले. मात्र काही काळाने तेथे पोलीस येऊन त्यांना घेऊन गेले . चार महिने तुरुंगात काढले, खूप मारझोड झाली. तेथून सुटल्यावर मॅगाफोन रेकॉर्ड कंपनीत काम मिळले. ते गाण्यांना चाली लावणे , गाणी तयार करणे असे काम करत होते. तेथे ते उर्दूही शिकले. ख्याल , दादरा , ठुमरी ते उत्तमपणे गात.
पुढे हिंदुस्थान कंपनीत गेल्यावर तेथे दुसऱ्यासाठी संगीत रचना बनवल्या . एक गाणे बनवल्यावर पाच रुपये मिळत . सतराव्या वर्षी ही मोठी कमाई होती. याच हिंदुस्थान कंपनीने तीन मोठी माणसे चित्रपटसृष्टीला दिली कुंदनलाल सैगल , संचित देव बर्मन आणि अनिल विश्वास. बंगालचे कवी काझी नसरुल इस्लाम यांनी अनिल विश्वास याना खूप कामे दिली. १९३१ मध्ये रंगमहाल या नाट्यसंस्थेत सहाय्यक संगीतकार म्ह्णून रुजू झाले , पगार होता ४० रुपये . पण कामे अनके. गीतकार , संगीतकार , गायक , नृत्य , आणि अभिनय. त्यांनी अनेक वाद्ये कोलकत्याच्या रंगभूमीवर आणली. १९३४ मध्ये न्यू थिएटरचे संगीतकार हिरेन बोस नाटक पहायला आले आणि अनिल विश्वास यांना सहाय्यक दिग्दर्शक संगीतकार म्ह्णून मुंबईला घेऊन आले तेव्हा त्यांचा पगार झाला २५० रुपये. त्यांनी सुरवातीला सागर मूव्हीटोनच्या चित्रपटात संगीतकार अशोक घोष याच्याबरोबर सहाय्यक संगीतकार म्ह्णून काम केले .
पुढे सहाय्यक म्ह्णून काम करताना १९३४ मध्ये ‘ प्रेमबंधन ‘ या चित्रपटाला संगीत देण्याची संधी चालून आली परंतु यासाठी जोडीला संगीतकार झंडेखान होते. मात्र लवकरच त्यांना इस्टन आर्ट्सच्या ‘ धरम की देवी ‘ ला संगीत देण्याची संधी चालून आली. यावेळी अनिल विश्वास यांचे वय होते फक्त २१ वर्षे. या निर्मात्याने संगदिल समाज , प्रेममूर्ती , प्रतिमा , बुलडॉग आणि जंटलमेन डाकू हे चित्रपट बनवले. अनिल विश्वास यांनी कोलकत्यातून ऑर्गन, पियानो मागवून घेतली आणि मुंबईच्या सिनेसंगीतात वेगळाच रंग भरला. हळूहळू त्यांचे संगीतकार म्ह्णून नाव होत होते. बॉंबे टॉकीजच्या देविकाराणीने अनिल विश्वास यांना करारबद्ध केले. या कंपनीबरोबर पहिला चित्रपट होता ‘ किस्मत ‘ . हा चित्रपट खूप चालला . बॉंबे टॉकीजचा चित्रपट ज्वार भाटा यालाही संगीत अनिल विश्वास यांनी दिले होते. महान गायक मुकेश आणि तलत मेहमूद यांना प्रथम गाण्याची संधी अनिल विश्वास यांनी दिली होती . मुकेशने गायलेले ‘ दिल जलता है तो जलने दे ‘ हे ‘ पहेली नजर ‘ मधील अमर गाणे कोणीही विसरणार नाही. त्यावेळी मुकेश रेकॉर्डिंगला वेळेवर न आल्यामुळे अनिल विश्वास यांनी त्याला जी शिक्षा दिली त्याची आपण कल्पनाच करू शकरणार नाही. संगीतकार वसंत देसाई आणि सी . रामचंद्र त्यांना गुरूप्रमाणे मानत असत. लता मंगेशकर नेहमी म्हणतात गाताना माईक समोर श्वास कसा रोखून धरणे , केव्हा सोडणे ही सर्व तंत्रे ती अनिल विश्वास यांच्याकडून शिकली.
अनिल विश्वास यांचा विवाह आशालता म्हणजेच मेहरुनिसा यांच्याशी झाला त्या अभिनेत्री होत्या शिवाय व्हरायटी पिक्चर्सचा मालकीण होत्या . त्यांच्या पासून त्यांना तीन मुले आणि एक मुलगी झाली . पुढे त्याच्याशी त्यांचा १९५४ मध्ये घटस्फोट झाला. आशालता बिस्वास यांचे १९९२ मध्ये निधन झाले. त्याआधी मीनाकपूर १९४८ मध्ये ‘ अनोखा प्यार ‘ च्या वेळी त्याच्या आयुष्यात आली. मीना कपूर म्हणजे अभिनेता विक्रम कपूरची मुलगी . अनिल विश्वास यांनी तिच्याशी विवाह केला . मीना कपूर ही गायिका होती. १९९६ साली अनिल विश्वास आणि मीना कपूर एका कार्यक्रमात मुबंईला आले होते तेव्हा मला त्यांना भेटता आले.
अनिल विश्वास यांनी ‘ धरम की देवी ‘ पासून १९६५ पर्यंतच्या छोटो छोटी बाते ‘ पर्यंत अंदाजे ७८ ते ८० चित्रपटांना संगीत दिले . त्यात प्रेमबंधन , कोकिळा , हम तुम और वो , पूजा , औरत , किस्मत , ज्वार भाटा , लाडली , दिल-ए -नादान , आकाश , हमदर्द , तराना , वारिस , नाज , फरार , चार दिल चार राते , परदेसी , सौतेला भाई असा अनेक चितपतना संगीत दिले . १९६१ मध्ये त्याच्या मुलाचे प्रदीपचे विमान अपघातात निधन झाले आणि हळू हळू त्यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. त्यांना बरेच मोठे काही संगीतक्षेत्रात करायचे होते परंतु ते लाल फितीत अडकवून पडले. कारण प्रत्येक ठिकाणी त्यांची अडवणूक व्हायची. ते १९७५ मध्ये आकाशवाणीतून निवृत्त झाले. पुढे त्यांच्या अमर-उत्पल या मुलांनी म्हणजेच ‘ अमर-उत्पल ‘ या जोडगोळीने अभिताभ बच्चन याच्या ‘ शहेनशहा ‘ ला संगीत दिले होते.
अनिल विश्वास यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देऊन त्यांचा १९८६ साली सन्मान केला .
विदेशी संगीताला कधीही जवळ न करणारा , त्यासाठी तडजोड न करणारा , अस्सल-भारतीय शास्त्रीय संगीताचा सतत ध्यास धरणारा संगीतकार अनिल विश्वास यांचे ३१ मे २००३ रोजी दिल्ली येथे निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply