हिंदी चित्रपट संगीतात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रभावी वापर करणाऱ्या संगीतकार नौशाद, यांनी लहान वयात वाद्याचे दुकानात नोकरी करताना वादनात हुकमत मिळवली तेव्हा दुकानाच्या मालकांनी – गुरबत अलींनी तिथली एक उत्तम हार्मोनियम त्या मुलाला भेट दिली. हाच मुलगा पुढे ‘संगीतकार नौशाद अली’ म्हणून नावारूपाला आला!
त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांवर सहज दृष्टिक्षेप टाकला तर दिसून येईल की, त्यांचे जवळपास प्रत्येक गाणे कोणत्या ना कोणत्या रागावर आधारित आहे. उदाहरणादाखल आपण ‘बैजू बावरा’मधली गाणी बघू. ‘मोहे भूल गये सावरिया..’ या गीतातील आर्त भाव आणि विरहवेदना व्यक्त करण्यासाठी त्यांनी राग भैरव वापरला. तर ‘तू गंगा की मौज मैं..’ला त्यांनी राग भैरवीची डूब दिली. ‘ओ दुनिया के रखवाले..’साठी त्यांनी भारदस्त अशा राग दरबारी कानडाचा वापर केला, तर ‘मन तडपत हरी दर्शन को आज..’मधली व्याकुळता व्यक्त करण्यासाठी राग मालकंसचे सूर वापरले. ‘दूर कोई गाये..’ हे लोकगीताचा बाज असलेले गीत त्यांनी राग देसमध्ये बांधले. ‘आज गावत मन मेरो झूम के..’ या तानसेन आणि बैजू यांच्या जुगलबंदीसाठी, देसी या गोड रागाचा वापर त्यांनी केला. ‘घनन घनन घन..’साठी राग मेघ, तर ‘बचपन की मुहब्बत को..’साठी त्यांनी राग मांड वापरला. ‘झूले में पवन की आयी बहार..’ या युगुलगीतावर त्यांनी राग बसंत पिलू या जोडरागाचा साज चढविला.
‘बैजू बावरा’चं संगीत प्रचंड लोकप्रिय ठरलं. १९५२ मध्ये नुकतीच ‘बिनाका गीतमाला’ सुरू झाली होती. ३ डिसेंबर १९५२ रोजी सादर झालेल्या ‘बिनाका’ कार्यक्रमात पहिलं वाजलेलं गीत होतं- ‘बैजू बावरा’मधील ‘तू गंगा की मौज मैं जमुना का धारा..’!
‘बैजू बावरा’नंतर १९६० मध्ये मोठय़ा थाटामाटात प्रदर्शित झालेल्या के. असिफच्या ‘मुघल-ए-आझम’चं संगीतही प्रचंड लोकप्रिय ठरलं. त्यातील ‘मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे..’ या ठुमरीसाठी त्यांनी राग ‘गारा’चा वापर केला. या गाण्याच्या म्युझिक पीसमध्ये केवळ एकच सतार वाजत नाही, तर अनेक सतारी झंकारतात. आणि लताबाईंच्या आवाजाबद्दल काय बोलावं! ‘कंकरिया मोहे मारी गगरिया फोर डाली..’नंतरची छोटीशी तान त्या इतकी सुरेख घेतात, की पुन:पुन्हा ती ऐकत राहावी. ‘ये दिल की लगी कम क्या होगी..’ हे ‘मुघल-ए-आझम’मधील आणखी एक वैशिष्टय़पूर्ण गाणं! जयजयवंती रागातील या गाण्याचा प्रत्येक अंतरा वेगळ्या चालीत आहे. ‘बेकस पे करम कीजिए..’मधली आर्तता त्यांनी राग केदारच्या सुरांतून साकारलीय, तर ‘खुदा मेहेरबाँ हो तुम्हारा..’साठी यमन! नौशादजींनी संगीतबद्ध केलेल्या ‘मधुबन में राधिका नाचे..’ या ‘कोहिनूर’मधील राजदरबारातल्या गीतासाठी त्यांनी राग हमीर या जोशपूर्ण रागाचा वापर केला. ‘दिल दिया दर्द लिया’ या चित्रपटातलं ‘सावन आये या न आये..’ हे युगुलगीत त्यांनी राग वृंदावनी सारंगमध्ये बांधलं, तर ‘कोई सागर दिल को..’ या गाण्यातली उद्विग्नता व्यक्त करण्यासाठी त्यांनी राग कलावतीचा वापर केला. ‘दिल दिया दर्द लिया..’साठी सदाबहार अशा यमनची सुरावट त्यांनी वापरली.
मारवा हा खरं तर हुरहूर लावणाऱ्या कातरवेळेचा राग. पण ‘साज और आवाज’मधील ‘पायलिया बावरी..’ हे सुंदर नृत्यगीत मारव्यामध्ये त्यांनी छान खुलवलंय. याच चित्रपटातलं ‘साज हो तुम आवाज हूँ..’ हे रफीसाहेबांनी गायलेलं आणखी एक सुंदर गीत पियानोच्या सुरात सुरू होतं. त्रितालात बांधलेलं हे गाणं राग पटदीपमध्ये आहे. पण ‘प्रेम तराना रंग पे आया..’ या दुसऱ्या अंतऱ्यात सुरावट बदलते, आणि ती मधुवंती-काफीच्या अंगाने पुढे जात पुन्हा पटदीपमध्ये येते. चित्रपटाचे शीर्षकच ‘साज और आवाज’ असल्याने यातल्या गाण्यांत नौशादसाहेबांनी जवळजवळ सर्व वाद्यांचा बहारदार वापर केलेला आहे. त्यांनी संगीत दिलेल्या ‘रतन’, ‘अंदाज’, ‘दीदार’, ‘उडन खटोला’, ‘गंगा जमुना’, ‘कोहिनूर’, ‘मेरे मेहबूब’, ‘साज और आवाज’, ‘बैजू बावरा’, ‘मदर इंडिया’ आणि ‘मुघल-ए-आझम’ या चित्रपटांतली सगळीच्या सगळी गाणी हिट् झाली. उस्ताद बडे गुलाम अली खाँ, उस्ताद आमीर खाँ आणि पं. डी. व्ही. पलुस्कर या शास्त्रीय संगीतातल्या दिग्गज गायकांकडून चित्रपटांसाठी गाऊन घेण्याची किमया नौशादजींनी ‘बैजू बावरा’ आणि ‘मुघल-ए-आझम’मध्ये करून दाखविली. नौशादजींनी चित्रपट संगीतकारास प्रतिष्ठा मिळवून दिली. ते उत्कृष्ट पियानिस्ट होते. पाश्चात्य स्वरांचंही त्यांना उत्तम ज्ञान होतं. ते वापरत असलेल्या प्रत्येक वाद्याची त्यांना सखोल माहिती होती. कोणत्या म्युझिक पीससाठी कोणतं वाद्य उचित ठरेल, हे त्यांना अचूक समजे. १९४९ मध्ये पडद्यावर आलेल्या ‘अंदाज’ या चित्रपटातील नायक दिलीपकुमार ‘तू कहे अगर जीवनभर..’, ‘हम आज कहीं दिल खो बैठे..’, ‘झूम झूम के नाचों आज..’ आणि ‘टूटे ना दिल टूटे ना..’ ही चारही गाणी पियानोवर बसून म्हणतो.
जन्म : २५ डिसेंबर १९१९
मृत्यू : ५ मे २००६
— अनिल सांबरे
Leave a Reply