श्रीनाथ त्रिपाठी उर्फ एस.एन.त्रिपाठी यांची धार्मिक आणि पौराणिक चित्रपट अधिक संख्येने वाट्याला येऊन देखील सातत्याने श्रवणीय गाणी देणारे संगीतकार म्हणून ओळख होती.
त्यांचा जन्म १४ मार्च १९१३ रोजी झाला. पौराणिक चित्रपट संगीताचा बादशाह म्हणून ते प्रसिद्ध होते.
एस.एन.त्रिपाठी यांचे आजोबा पंडित गणेशदत्त त्रिपाठी काशी येथील संस्कृत विद्यापीठाचे प्राचार्य, तर वडील पंडित दामोदरदत्त त्रिपाठी हे काशीच्याच सरकारी विद्यापीठाचे प्राचार्य. त्यामुळे श्री नाथजींचं शालेय शिक्षण वाराणसी येथे, बी.एस्सी. झाल्यावर अलाहाबाद विद्यापीठातून संगीतविशारद एन.व्ही. भातखंडें यांच्या विद्यालयातून, संगीत प्रवीण प्रयाग संगीत समितीतून तर लाइट क्लासिकल शिक्षण लखनौ येथील मैना देवींकडे झालं. या शिदोरीवर त्यांनी थेट मुंबई गाठली अन बॉम्बे टॉकीजला येऊन मिळाले. व्हायोलनिस्ट म्हणून पगार होता १००/-.
त्यांना गायक म्हणून संधी मिळाली ती ‘जीवननैया’ मध्ये. ‘ऐरी दैया लचक लचक चलो..’ हे पहिलं गाणं. चित्रपटाचे दिग्दर्शक फ्रँझ ऑस्टिन. बाँबे टॉकीज सोडल्यावर पहिला ब्रेक मिळाला संगीत दिग्दर्शनासाठी तो १९४१च्या ‘चंदन’साठी. पहिलं गाणं- ‘नन्हासा दिल देती हूँ..’ हे राजकुमारीबरोबर त्यांनी स्वत: गायलेलं युगलगीत होतं. पण पहिले यश मिळालं १९४३च्या ‘पनघट’मध्ये. प्रथम अभिनय केला ‘रामभक्त हनुमान’मध्ये हनुमानाच्या भूमिकेमध्ये! दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा १९५७चा ‘राम हनुमान युद्ध’.
मुळात शास्त्रीय संगीताची बैठक असलेल्या त्रिपाठींनी स्वत: दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील ‘रानी रूपमती’ (१९५९) आणि ‘संगीतसम्राट तानसेन’ (१९६२) हे महत्त्वाचे चित्रपट. त्यांतील शास्त्रीय संगीताला नौशाद सारख्यांनी देखील दाद दिली. जसा नौशाद यांचा ‘बैजू बावरा’ तसा त्रिपाठींचा ‘तानसेन’. त्यात शास्त्रीय संगीत गायकांनादेखील त्यांनी आग्रहाने गायला बोलावलं. ‘रानी रूपमती’तदेखील त्यांनी तसा प्रयोग केला.
एस.एन.त्रिपाठी यांनी आपल्या प्रदीर्ध कारकिर्दीत अनेक प्रकारे चित्रपट विश्वात काम केले. संगीत दिग्दर्शक, गायक, नट, कथा आणि पटकथा लेखक आणि निर्माते म्हणून काम केले.
एस.एन.त्रिपाठी यांची पौराणिक चित्रपटांमधे मात्र मक्तेदारी कुणीच मोडू शकलं नाही. पौराणिक चित्रपट हे तसे पाहिले तर लो बजेटचे. त्यामुळे त्यांचा दर्जाही दुय्यम समजला जायचा. पण तरीही एकेकाळी अशा चित्रपटांची लाटच होती. बी ग्रेडच्या चित्रपटांचं संगीत देऊन एखादा खचून जाईल, पण एस.एन.त्रिपाठी यांनी या चित्रपटांवर आपली अनोखी मोहोर उमटवली. आणि ती ही संगीताच्या सुवर्णयुगात, म्हणजेच एकोणीसशे पन्नासच्या दशकात!
‘सप्तसूर तीनग्राम..’ (मन्ना डे), ‘सुधबिसर गयी आज..’ (मन्नाडे-रफी), ‘अब आयी बरखा बहार.’ (मन्नाडे-रफी), ‘टूट गयी रे मनकी बीना..’ (पंढरीनाथ कोल्हापुरे- पूर्णा सेठ), ‘सखी कैसे धरू मैं धीर..’ (लता मंगेशकर), ‘दीपक जलाओ, ज्योती जगाओ..’ (रफी), ‘प्रथमशांतरस जाके..’ (मन्नाडे, मूळ तानसेनची रचना), ‘हे नटराज..’ (महेंद्र कपूर- कमल बारोट, मूळ रचना तानसेन) ही गाणी असलेला ‘संगीतसम्राट तानसेन’ हा कृष्णधवल चित्रपट. त्यातील एक गाणं ‘घिर घिर के आयो रे मेघा.’ हे रंगीत चित्रित केलं होतं. (जसं ‘मुगल-ए-आझम’ १९६० मधील ‘प्यार किया तो डरना क्या..’ हे नौशादचं गाणं. पन्नास वर्षांनी संपूर्ण ‘मुघल-ए-आझम’ डिजिटली कलर्ड झाला. तर ‘संगीतसम्राट तानसेन’ विस्मृतीत गेला.)
‘रानी रूपमती’ या रूपमती आणि सुलतान बाजबहादूर यांची प्रेमकहाणी मांडणाऱ्या चित्रपटातदेखील अव्वल शास्त्रीय बाज असलेली गाणी होती- ‘बात चलत नई चुनरी रंग डारी..’ (कृष्णराव चोणकर- रफी), ‘उडम् जा माया कमलसे..’ (मन्नाडे), ‘सुन बगीयां में बुलबुल बोले..’ (लता मंगेशकर). या चित्रपटातीलच ‘आ लौट के आजा मेरे मीत..’, ‘संगीतसम्राट तानसेन’मधील ‘झूमती चली हवा..’ अथवा ‘पिया मिलन की आस रे..’ (लता- पिया मिलन की आस- १९६१) या त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील गाण्यांचं संगीत देताना शास्त्रीय बाज सांभाळला होता. कदाचित ही त्यांची शास्त्रीय संगीताची बैठकच तत्कालीन सामाजिक आधुनिक चित्रपटांसाठी मर्यादा ठरली असावी.
१९४१ ते १९८५ अशी पंचेचाळीस वर्षांची कारकीर्द (‘चंदन’ ते ‘महासती तुलसी’) असूनही तसे चित्रपट अभावानेच मिळाले. उत्तम गुणवत्तेला योग्य कोंदण लाभणं, हा नशिबाचा भाग. जे लक्ष्मी-प्यारेंना लाभलं. ‘सती-सावित्री’, ‘हरिश्चंद्र तारामती’, ‘संत ज्ञानेश्वर’, ‘पारसमणी’, ‘आया तूफान’ वगैरे चित्रपटांबरोबर ताराचंद बडजात्यांचा ‘दोस्ती’ मिळणं हे नशीब. त्या संधीची उत्तम गुणवत्तेशी सांगड घालून त्यांनी कुठल्या कुठे झेप घेतली.
अशी कित्येक लोकप्रिय गाणी देणारे त्रिपाठी चित्रपटाच्या ग्रेडची पर्वा न करता या क्षेत्रात भरपूर रमले. सव्वाशे ते दीडशे चित्रपटात विविध भूमिका त्यांनी केल्या. ९० वर चित्रपटांचं संगीत, २३ चित्रपटांचं दिग्दर्शन, त्यातील काही स्वनिर्मित, कथा-पटकथा-संवादलेखक, गायक, अभिनेता अशा विविध भूमिकांतून वावरले.
एस.एन.त्रिपाठी यांचे २८ मार्च १९८८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ प्रभाकर बोकील
संगीतकार एस.एन.त्रिपाठी यांची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=ThuSY1LVJnw
Leave a Reply