वासुदेव गंगाराम भाटकर उर्फ स्नेहल भाटकर यांचा जन्म १७ जुलै १९१९ रोजी मुबंईत झाला. भाटकर यांच्या आईला संगीताची आवड होती त्यामुळे घरात लहानपणापासून त्यांच्यावर संगीताचे संस्कार झाले . त्यानंतर त्यांनी दादरच्या श्रीकृष्ण संगीत विद्यालयात संगीताचे शिक्षण घेतले आणि सुरवातीच्या काळात ते भजनाचे कर्यक्रमही करू लागले. त्यावेळी एच. एम . व्ही. कंपनीने त्यांना हार्मोनियम वादक म्ह्णून ४० रुपये पगारावर नोकरीला ठेवले. ही नोकरी त्यांना वयाच्या विसाव्या वर्षी मिळाली. हे काम करत असताना त्यांना केसरबाई केरकर, मल्लिकार्जुन मन्सूर , बडे गुलाम अली खा यांच्यासारख्या मोठ्या कलाकारांना साथ करण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांची संगीताची समज वाढत जाऊन त्यांना स्वतःला गाण्याच्या दृष्टीने समृद्ध होत आहोत हे जाणवले. त्या कंपनीमध्ये त्यांना बढतीही मिळाली आणि ते त्या कंपनीमध्ये १९४९ पर्यंत कार्यरत राहिले.
नोकरीच्या काळात सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक केदार शर्मा यांनी एच .एम. व्ही. कडे उत्तम हार्मोनियम वादकासाठी विचारणा केली कारण त्यावेळी केदार शर्मा ‘ कलिया ‘ नावाचा चित्रपट बनवत होते. कंपनीने स्नेहल भाटकर यांचे नांव सुचवले. केदार शर्मा यांनी त्या चित्रपटाचे संगीतकार सी. एस. चिश्ती यांची आणि केदार शर्मा यांची भेट घडवून आणली. त्या चित्रपटाची गाणी चार-पाच मिनिटाची झाली होती आणि ग्रामाफोन ध्वनिमुद्रका काढण्यासाठी ती गाणी तीन मिनिटाची करणे आवश्यक होते. भटकरांनी चिश्ती यांच्या गाण्यात बदल करून ती गाणी तीन मिनिटाची केली. त्यांचे हे काम बघून केदार शर्मा यांनी त्यांच्या पुढच्या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन करण्यासाठी विचारले. मात्र कंपनीने याला आक्षेप घेतला कारण भाटकर कंपनीमध्ये नोकरी करत होते. आपण नोकरी करायची की चित्रपटामधील आर्थिक सुबत्ता मिळवायची. नोकरी म्हटली की वेळेवर पगार मिळतो आणि चित्रपट म्हटले तर आज आहे तर उद्या नाही . अशा व्दिधा मनस्थितीत असताना त्यांचा निर्णय होत नव्हता. मग कुणाच्या तरी सांगण्यावरून त्यांनी ‘ वासुदेव ‘ या टोपणनावानी १९४६ मध्ये प्रदीप पिक्चरच्या ‘ रुक्मिणी स्वयंवर ‘ या हिंदी आणि मराठी चित्रपटाला सुधीर फडकेयांच्यासोबत संगीत दिग्दर्शन केले. त्यानंतर १९४७ मध्ये केदार शर्मा यांच्या ‘ नील कमल ‘ या चित्रपटाला ‘ बी. वासुदेव ‘ या नावाने संगीत दिले. त्यानंतर त्यांनी एच .एम. व्ही. कंपनी सोडली. १९४८ मध्ये केदार शर्मा यांच्या ‘ सुहाग रात ‘ या चित्रपटाला संगीत दिले परंतु ह्यावेळी त्यांनी त्यांचे नाव बदलले आणि त्यांची मुलगी स्नेहलता हिच्या नावावरून ‘ स्नेहल भाटकर ‘ हे नाव घेतले. काही वेळा त्यांनी ‘ व्ही.जी. भाटकर ‘ या नावाने देखील संगीत दिले.
स्नेहल भाटकर यांनी हमारी बेटी , भोला शंकर , गुनाह , आज की बात , बिंदिया , डाकू , दिवाली की रात , आज कि बात , जलदीप . सुहाग रात , नील कमल यासारख्या अनेक चित्रपटांना संगीत दिले. १९४८ साली प्रभातच्या ‘संत तुकाराम ‘ या चित्रपटाची हिंदी आवृत्ती केली तेव्हा त्यालाही स्नेहल भाटकर यांनी संगीत दिले.
१९६१ साली स्नेहल भाटकर यांनी ‘ हमारी याद आयेगी ‘ या चित्रपटाला संगीत दिले याच चित्रपटातील मुबारक बेगम यांनी गायलेले ‘ कभी तनहाईयोंमे यूं हमारी याद आयेगी ….’ हे गाणी खूपच गाजले , या गाण्याची जादू आजही रसिकांच्या मनावर आहे.
स्नेहल भाटकर यांनी मराठी चित्रपटांना , नाटकांनाही संगीत दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘ शिवायन ‘ या संगीतिकेचेही त्यांनी अनेक प्रयोग केले. मायामछिंद्र , नंदकिशोर , संत बहिणाबाई , तुका झालासे कळस , चिमुकला पाहून , मानला तर देव , बहकलेला ब्रम्हचारी , प्रभातच्या शेवटचा चित्रपट ‘ मी गुरुदेव दत्त ‘ अशा अनेक मराठी चित्रपटांना स्नेहल भाटकर यांनी संगीत दिले. १९९४ साली त्यांना ‘ कंठसंगीत ‘ पुरस्कार देण्यात आला , २००५ साली महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा ‘ लता मंगेशकर ‘ पुरस्कार त्यांना देण्यात आला. नाटक-चित्रपट क्षेत्रापासून दूर गेल्यानंतरही त्यांनी आकाशवाणीवर गीताचे , भजनाचे कार्यक्रम केले. त्यांचे चिरंजीव रमेश भाटकर हे ख्यातनाम अभिनेते होते, नुकतेच त्यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले.
२९ मे २००७ रोजी वृद्धपकाळामुळे त्यांचे मुबंईत निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply