लहानपणापासून मला पुस्तकवाचनाची आवड लागली आणि उत्तरोत्तर ती वाढत गेली. कथा,कादंबऱ्या, कविता, भयकथा, रहस्यकथा, नाटकं,प्रवासवर्णने आणि असंख्य प्रकारची पुस्तके असा माझा वाचनाचा जबरदस्त कॅनव्हास आहे. पु ल देशपांडे यांच्यापासून ते दया पवार ,अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या असंख्य अभिजात साहित्यिकांची आणि लेखकांची अगणित पुस्तकं वाचताना मी झपाटून गेलो.विविध लेखकांच्या प्रतिभाविलासाने मी थक्क होऊन गेलो. मराठी साहित्याविषयाच्या माझ्या जाणिवा समृद्ध होत गेल्या आणि माझं भावविश्व समृद्ध होत गेलं.माझ्या आवडत्या पुस्तकांत अक्षरशः शेकडो उत्तमोत्तम पुस्तकांचा समावेश होतो. पण माझ्यावर ज्या पुस्तकाने सर्वात जास्त गारुड केलं आणि जवळजवळ ७ वेळा वाचूनही अद्याप उतरलं नाही ते पुस्तक म्हणजे नामवंत लेखक श्री शिवाजी सावंत यांची ज्ञानपीठ पारितोषिक विजेती महारथी कर्णाच्या जीवनावरील अद्भूत कादंबरी…”मृत्युंजय ” जवळजवळ 700 पृष्ठांची…!!
कर्ण हा एक शापीत राजहंस होता यात कुठलाही संशय नाही.कर्णाकडून त्याच्या जीवनात काही अक्षम्य चुका झाल्या हे मान्य करूनही त्याच्या काही अलौकिक गुणांकडे डोळेझाक करून त्याची सरसकट नराधमांमध्ये गणना करणे मूर्खपणाचे आहे !
सुर्यपूत्र कर्ण याच्यावर अगदी त्याच्या जन्मापासूनच घोर अन्यायाला सुरवात झाली. कुमारी मातेचा पुत्र हा नियतीचा शिक्का लागून त्याचा तो जन्मल्याबरोबर त्याग करण्यात आला ! हा भोग अर्जुनाच्या किंवा अन्य पांडवांच्या वाट्याला आला असता तर काय झालं असतं ? त्यानंतर पुढे सुताच्या (सारथ्याच्या) घरी वाढलेल्या कर्ण याच्या कपाळावर सुतपुत्र म्हणून कायमचा शिक्का बसून त्याच्या वाट्याला जी दारुण अवहेलना वाट्याला आली ती कशी विसरता येईल ? महापराक्रमी असूनही सुतपुत्र म्हणून त्याची अवहेलना करण्यात आचार्य द्रोण, सर्व पांडव, द्रौपदी आणि अनेक ‘मान्यवर’ महाभाग अग्रेसर होते हे विसरून कसं चालेल ? या सततच्या अवहेलनेत केवळ आणि केवळ दुर्योधनानेच त्याला साथ दिली..स्वार्थासाठी का होईना त्याला मानसन्मान दिला आणि कायम त्याला आपल्या उपकारात मिंधा करून ठेवले. या उपकारापोटी त्याला दुर्योधनाच्या तंत्राने वागण्याखेरीज पर्याय राहिला नाही. हे समजून घेतले पाहिजे. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी त्याच्या वागण्याचा आक्षेप घेतला जातो. पण स्वतःच्या धर्मपत्नीला जुगारात पत्नीला पणाला लावणारे आणि नंतर तिची घाणेरडी विटंबना कुठलाही प्रतिकार न करता उघड्या डोळ्यांनी नामर्दपणे सहन करणारे पांडव कुठल्या कसोटीवर पुण्यशील आणि धार्मिक ठरतात हे कुणी सांगू शकेल का ? खर तर हे महापातक आहे हे कुणीही सुबुद्ध माणूस सांगेल !
दानवीर म्हणून तर कर्ण याची तुलना कुणीच करू शकत नाही ! केवळ या एका गुणावरही कर्ण हा भारी ठरतो ! असंख्य गरजूंना तर त्यानं अगणित दान दिलंच पण साक्षात अर्जुनाचा पिता इंद्रदेखील याचक म्हणून कवच कुंडलांची भीक पदरात घेऊन गेला ! देवांचा राजासुद्धा भिकारी म्हणून ज्याच्या दारात उभा राहतो त्याची पात्रता कुणीही सांगण्याची गरजच नाही. प्रत्यक्ष युद्ध ठरण्यापूर्वी श्रीकृष्ण त्याला तो पांडवांचा जेष्ठ बंधु असल्याचे उघड करून “तू जर पांडवांना मिळालास तर सर्व पांडव जेष्ठ बंधु म्हणून तुझी सेवा करतील.द्रौपदीही पती म्हणून तुझी सेवा करील.” हे भरजरी स्वप्न त्याच्यासमोर ठेवतात. पण खाल्ल्या मिठाला जागत असल्याने मित्रद्रोह करण्याचे तो नाकारतो ! कुंतीला दिलेल्या वचनाप्रमाणे अर्जुन सोडून इतर चार पांडवांना ठार करण्याची संधी येऊनही तो त्यांना जिवनदान देतो ! त्यांना जर मारलं असत तर अर्जुन कदाचित हतबल होऊन शरणही आला असता ! सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो निःशस्त्र असताना श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने त्याचा वध केला ! कारण त्याच्या हाती शस्त्र असत तर त्याचा वध करणं अर्जुनाला त्यावेळी केवळ अशक्य होतं ! अर्जुन लौकिकदृष्टया जिंकलेला दिसला तरी हा ‘रडीचा डाव’ जिंकल्याबद्दल त्याची पाठ बिल्कुलच थोपटावीशी वाटत नाही !
कर्ण निशस्त्र असताना अर्जुनाने त्याचा बाण मारून त्याचा कंठवेध केला. घायाळ होऊन कर्ण धारातीर्थी पडलेला असताना एका गरीब ब्राह्मणाला आपल्या मुलाच्या अंत्यविधीसाठी धनाची गरज असल्याचे कळताच त्या घायाळ अवस्थेत त्याने आपल्या पुत्राकरवी स्वतःच्या तोंडावर दगडाचे आघात करवून घेऊन तोंडातला सोन्याचा दात पाडवून घेतला आणि रक्ताने माखलेला तो दात आपल्याच अश्रूंनी स्वच्छ शुचिर्भूत करून ते अलौकिक दान त्या गरीब ब्राह्मणाच्या पदरात घातले…! या असीम अलौकिक दातृत्वाला या भूतलावर तोड नाही…! स्वतः च्या प्राणांची,हिताची यत्किंचितही पर्वा न करता पृथ्वीवरच्या या महान दानवीराने आपल्या सर्व आयुष्यात वेळोवेळी अनेकांच्या पदरात जी विविध दाने टाकली आहेत त्या अलौकिक कर्तृत्वाने कर्ण खरं तर कुठल्याही पांडवापेक्षा श्रेष्ठ ठरतो. जन्मापासूनच दुर्दैवाच्या, शापाच्या आणि अवहेलनेच्या धारदार काट्यांनी त्याच्या आयुष्याच्या भरजरी राजवस्त्राची लक्तरे केली असं वर वर भासत असलं तरी अलौकिक पराक्रम, सामर्थ्य आणि दातृत्व या गुणांनी जन सामान्यांच्या मनात त्याने घर केलं यात शंका नाही.
विविध दुर्दैवी प्रसंगांत शापग्रस्त असल्याने महापराक्रमी असूनही त्याच जीवन झाकोळलं गेलं ! जन्मापासून मृत्यूपर्यंत दुर्दैव, अवहेलना, शाप यांचा धनी ठरलेला महापराक्रमी, महादानवीर हा एक शापग्रस्त राजहंसच होता यात शंका नाही….!
” मृत्युंजय” या अजरामर कादंबरीत शापित कर्णाच्या जीवनातले काही पैलू मी मांडले.ही कादंबरी वाचणे हा अतिशय भारावून टाकणारा आणि सदगदीत करणारा एक दिव्य अनुभव आहे….ज्याची मोहिनी आज या पुस्तकाला ५५ वर्षे उलटून गेली तरी रसिकांच्या मनावरून उतरलेली नाही…उतरणार नाही….!
शिवाजी सावंत यांनी लिहिलेली ही अजरामर कादंबरी १९६७ साली प्रकाशित झाली. त्या आधी झपाटून गेलेल्या शिवाजी सावंत यांनी बरेच दिवस कुरुक्षेत्रावर मुक्काम ठोकला. अनेक पुस्तकांचा आणि तपशिलाचा सखोल अभ्यास केला आणि मग त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून सर्वांवर गारुड करणारी ही अजरामर कादंबरी उतरली…!
अनेक भाषांत तिचा अनुवाद झाला. मी जवळ जवळ ७ वेळा ही ७०० पानांची कादंबरी वाचली आहे…अजूनही वाचीन म्हणतो….!!
– संजीव मांद्रेकर. (२३/०४/२०२३)
Leave a Reply