लिहायला वाचायला शाळेत असताना शिकलो. पण वाचनात आनंद असतो हे मात्र सर्व प्रथम बाबुराव अर्नाळकरानच्या ‘रहस्य’ कथांनी शिकवलं. त्यांचे पुस्तक माझ्या हाती देवून शारददादानी (माझे मोठे भाऊ )अनंत उपकार केलेत.
अर्नाळकरांचे नायक आजही स्मरणातून जात नाहीत. निधड्या छातीचा बंडखोर झुंजार आणि आनंदराव यांची जुगलबंदी वाचताना मी रंगून जायचो. झुंजारने रूप पालटले कि तो हमखास ‘ झम्पुराव तंबूवाले’ नाव धारण करून, ज्या गमती करायच्या त्या त्यांचे वाचकच जाणो !
मला त्या कथा वाचायचे इतक वेड होत कि जेवताना सुद्धा पुस्तक डोळ्या समोर असायचे.
“मेल्या,जेवताना तरी ती खपट बाजूला ठेवा. ताटातली पोळी उंदर घेवून गेली तर कळायचं नाही!”आई वैतागून म्हणायची .
“हु, हु ,वाढ एक “मी माझ्याच नादात .
“काय ?”
“उंदीर!— नाही पोळी!”
धनंजय आणि त्यांचा सहकारी छोटू,हे प्रकरण मात्र झुंझार सारखे विनोदी नसायचे, तर मामला गंभीर असायचा. रहस्यभेदा साठी त्यांच्या प्रवासात मात्र ते वाचकांना पहिल्या प्रकरणा पासून सामील करून घेत . हिरे चोरी, त्याचा छडा लावताना ‘काळापहाड ‘ समोर उभाठाकलेली आव्हाने ,आपल्याच समोर आहेत असे वाटायचे . रात्रीच्या किर्र अंधारातला रिमझिम पाऊस ,काळी फेल्ट हॅट -नाकापर्यंत ओढलेली -,काळा ओव्हर कोट आणि चपळ हालचाली म्हणजे काळापहाड! आज पन्नास पंचावन वर्षा नंतरही ,पावसात कोणी तो जड शीळ ओव्हर कोट घातलेला दिसला कि काळापहाडची आठवण होतच.
अर्नाळकरांची एक अनोखी शैली होती. त्यांचे व्यक्ती चित्रण अफलातू असायचे. कमीत कमी वाक्यात नव्हे तर शब्दात ते त्यांचे पात्र वाचकांच्या डोळ्या पुढे उभे करायचे. ते मला खूप भावायचे. ‘ कुबडा टाकणदास ‘ या दोनच शब्दात , क्रूर , कुरूप , कुबडा खलनायक साकारला जायचा!किवा ‘ त्याचे नाक एकीकडे टोचल्या सारखे होते ! ‘ वाचले कि वाकड्या नाकाचा माणूस दत्त म्हणून समोर यायचा. शिवाय त्यांचे काही खास शब्द होते . त्यांनी कधी ‘ कंगवा ‘ हा शब्द वापरला नाही. ‘त्याने खिशातून फणी काढून केस विंचरले!’ हे किवा असे एखादे वाक्य त्यांच्या कथेत असायचेच. त्यांच्या कथा वाचल्या म्हणण्या पेक्षा ‘ दिसल्या ‘ म्हणणेच मी पसंत करीन!कारण त्यांनी शब्दांकन केलली घटना मनाच्या पडद्यावर दिसायची ! हि किमया नंतर गुलशन नंदाच्या पुस्तकात जाणवली. कारण ते खूप बारीक सारीक गोष्टींचे वर्णन करायचे.
हजाराहून अधिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या (१०४२ ). गिनीज बुकानी त्याची नोंदहि घेतली. पण साहित्यिक या उपाधी पासून दूरच राहिले. त्यांच्या लेखनाचे एक गरुड होते. त्यांच्या पुस्तकांची वाट पहाणारे माझ्यासारख्या वाचकांचा एक वाचक वर्ग होता. लता मंगेशकर आपल्या बिझी शेदुल्ड मध्ये सुद्धा त्यांचे पुस्तक सोबत ठेवत आणि सवड मिळाली कि वाचत. १९६२ साली महाराष्ट्र शासनाने त्यांच्या पाचशे कथा लिहल्या म्हणून त्यांच्या गौरव केला. तो काळ ना. सी. फडक्यांच्या रोमांटिक कादंबरीचा,पण विद्यार्थी अभ्यासाच्या पुस्तकात त्यांची पुस्तके वाचत.ते खऱ्या अर्थाने ‘ वाचकांचे लेखक ‘ होते. हल्ली ‘ प्रकाशकांचे ‘ लेखक असतात . त्यांच्या नंतर गुरुनाथ नाईक, काशिनाथ काशीकर वगैरे मंडळी या क्षेत्रात अवतरली पण ती लज्जत नाही आढळली —- असो.
शेवटी एक छोटासा रहस्यभेद. बाबुराव अर्नाळकर हे त्यांचे टोपण नाव.खरे नाव – चंद्रकांत सखाराम चव्हाण!त्यांचे चष्म्याचे दुकान होते.
ते ‘ साहित्यिक ‘असो, नसो. त्यांचे लेखन ‘सकस आणि दर्जेदार ‘नका का असेना पण मी मला वाचनाची गोडी लावल्याबद्दल आयुष्य भर ऋणी राहीन.
— सु र कुलकर्णी
आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye .