नवीन लेखन...

माझी कोकणची सहल – कोकणचं ‘जरा हटके’ रुपडं

गेल्या महिन्यात दोन-तीन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरायला गेला होतो. सिंधुदुर्गातले समुद्रकिनारे नितांत सुदर असले तरी यावेळी कोकणचं थोडं वेगळ आणि रांगड स्वरूप अनुभवायचं म्हणून समुद्र किनारे आणि गर्दीची ठिकाण मुद्दामहून टाळली होती. यासाठी आम्ही निवड केली होती कणकवली नजिकच्या हरकुळ खुर्द व कुडाळ जवळच्या पावशी गावाची..

मुंबईहून मी, राजेश जाधव, विनय कदम व महेश चाफेकर असे आम्ही चार मित्र सकाळी ७ च्या सुमारास निघालो व रात्री ८ च्या दरम्यान हरकुळ खुर्द गावी पोहोचलो..

मुक्काम पहिला –
हरकुळखुर्दच्या तलावातली मंतरलेली एक रात्र –

आमचा पहिला मुक्काम कणकवली पासून १७-१८ कि.मि. अंतरावर असलेलं हरकुळखुर्द या गावात होता. या गावातील बहुसंख्य लोक ‘रासम’ या आडनावाचे असल्याने हे गाव ‘रासमाचे हरकुळ’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. कणकवली तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत शांतपणे पहुडलेल्या ह्या गावावर निसर्गाने आपलं वैभव हातच काहीही न राखत उधळेल आहे. निसर्गाने उधळलेल्या ह्या वैभवाला दिशा दिलीय ती याच गावाचे सुपुत्र असलेले श्री. तुकाराम रासम आणि त्यांचे बंधू श्री. एकनाथ रासम ह्यांनी.

आम्ही रात्री ८च्या सुमारास हरकुळात पोहोचलो. अंगावर सरसरून काटा येईल एवढी मस्त थंडी पडली होती. दिवसभराच्या प्रवासाचा शिण घालवण्यासाठी प्रथम कडकडीत गरम पाण्याने आंघोळ केली व नंतर रासमांच्या घरातील रामचंद्र नावाच्या कुकने पहिला गरम गरम वाफाळता चहा हातात दिला व आमच्या गप्पा सुरु झाल्या. एवढ्यात तुकाराम रासमानी आम्हाला बाहेर चलायची अज्ञावजा विनंती केली. खरतर मुंबईहून जवळपास ५०० किमीचा प्रवास करून गेल्यानंतर बाहेर पडायची इछाच होत नव्हती परंतु ते ऐकायलाच तयार नव्हते.

आम्ही आपले होतो त्या कपड्यात बाहेर पडलो. नाहीतरी त्या किर्र जंगलात कपडे बघायला होत कोण? बाहेर तर मरणाची थंडी पडली होती. त्यांच्या जीप मध्ये बसून पाचेक मिनिटांचा प्रवास केला असेल-नसेल आणि गाडी थांबली. आणि काही हासभास नसताना जे अद्भुत नजरेसमोर उभं होत ते बघून भान विसरायला झालं. गर्द झाडीत लपलेला चंदेरी अथांग तलाव समोर पसरला होता. शुक्ल पक्षातल्या अष्टमीच्या चंद्राचं आवघ चांदणं त्या पाण्यात विरघळून चांदिचा रस होऊन उतरल होत. कतीतरी वेळ आम्ही तसेच दिग्मूढ होऊन उभे राहिलो आणि तुकारामाच्या हाकेने भानावर आलो. रासम बंधूनी आमच्यासाठी खास त्या चांदण्याने माखलेल्या तलावात बोटीची सैर आखली होती. आम्ही सात-आठ जन त्या छोट्याश्या मोटार बोटीतून त्या सोन्या-चांदीच्या रसात निघालो आणि मध्यावर जाऊन बोटीचं इंजिन बंद करून टाकलं आणि पुढचा अर्धा-एक तास केवळ शांततेचा ‘आवाज’ ऐकत वाऱ्यासोबत त्या थंडगार चांदणं ओतलेल्या रसात विहारात होतो. कोणीही कोणाशी बोलत नव्हत..श्वासाचा आवाजही कर्णकर्कश वाटावा एवढी निरव शांतता..! लहानपणी गोष्टीत चांदण्या रात्री गंधर्व, यक्ष, अप्सरा आदी देवपक्षातले लोक एखाद्या तळ्याकाठी जलक्रिडा करत त्याची वर्णनं वाचली होती. त्या क्षणी आम्हालाही आम्हीही असेच कोणीतरी देवलोकीचे पुत्र आहोत असं वाटत होतं. अप्सरा दूर, तिकडे चंद्रासोबत चमकत होत्या हाच काय तो फरक..!!

कोणताही पाणवठा रात्रीच्या वेळेस असाही गुढगर्भ वाटतोच परंतू हरकुळ खुर्दच्या ह्या तलावास देवाधर्माने भारलेल्या कोकणाची पार्श्वभुमी असल्यामुळे या जलाशयास एक वेगळेच परिमाण मिळाले होते..सर्वांचीच समाधी लागली होती..हा आनंद शब्दात नाही उतरवता येत.

पुन्हा घरी आलो आणि तांदळाच्या ऊन ऊन भाकरी, काळ्या वाटण्याची (चिकनचा मसाला घालून केलेली) भाजी, वरण आणि भात खाऊन निवांत झोपी गेलो. हे आणखी एक वैशिष्ट्य. रासमांकडे प्राधान्यांने केवळ कोकणी पदार्थच रसदार कोकणी मसाल्यांमधे करून दिले जातात.

पहाटेच पक्ष्याच्या सादीने जाग आली. इथे पक्षांना पाहण्यासाठी जंगलात नाही जाव लागत कारण पक्षीच इथे आलेले असतात. आता आम्हाला पोपट, कावळा किंवा चिमणी ह्या व्यतिरिक्त पक्षी ओळखता येत नाहीत म्हणून नाहीतर नावंही सांगितली असती.

रासमांनी आपल्या घराशेजारी काही शेतजमिन मोकळी ठेवलीय. ज्यांना मातीत मनसोक्त लोळायचंय, शेतीकरण्याचा प्रातिनिधीक अनुभव घ्यायचाय, त्यांच्यासाठी ही खास सोय आहे. अर्थात याचा आमंद घ्यायचा तर इथं पावसाळ्यात यायला हवं. रासम सांगत होते, “या मातीत मोठमोठी अधेड उम्रची लोकं अक्षरक्ष: बाळं होऊन लोळतात आणि दोन दिवसांत दोन वर्षांचं आयुष्य रिचार्ज करून घेऊन जातात. पाॅवर ट्रिलर (हाताने चालवायचा लहान ट्रॅक्टर) चालवतात, काय नी काय करतात”..! खरंय, मला तर केवळ कल्पनेनंच आयुष्य वाढल्यासारखं वाटतंय..!

वर उल्लेख केलेल्या तलावाचं एक वेगळेपण सांगायचंच राहीलं. या तलावात मधोमध एक पाऊण एकराचं नैसर्गिक बेट आहे. इथं रात्री आम्हाला जाता आलं नाही म्हणून सकाळी मुद्दाम गेलो. पुढे मागे या बेटावर वाॅटर स्पोर्ट्स, अॅडव्हेन्चर स्पोर्ट्स, पर्यटकांना पोहोण्यासाठी सेफ काॅर्नर व खाण्या-पिण्यासाठी व्यवस्था करण्याचा मानस आहे. तलावाचं सकाळचं रुप आणखीणच वेगळं होतं. आणि ते अनुभवण्यासाठी इथं यायलाच हवं..

आता थोडंसं एकनाथ-तुकाराम या संतांची नांवं धारण करणाऱ्या रासम बंधूंबाबत. श्री. तुकाराम रासम हे व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट. मुंबईत रग्गड चालणारी प्रॅक्टीस, सर्व ऐश्वर्य असुनही गांवाची ओढं का स्वस्थ बसू देत नव्हती. कोकणी माणूस असाही ‘गाववेडा’ असतोच परंतू शहरात एकदा का स्थिरस्थावर झाला की ती ओढ फक्त सण-समारंभ, जत्रा नि उत्सवापुरती उरते. संतांचंच नांवच नव्हे तर वृत्तीही धारण केलेल्या तुकाराम रासमांनी तसं केलं नाही. त्यांनी गांवचा व पर्यायाने त्या गांवातील हातांना कायमस्वरूपी रोजगार मिळवून देण्याचे ठरवले व पदरची बरीच मोठी रक्कम टाकून गावाकडे वर लिहिलेलं सर्व उभं केलं. आज त्यांच्या विविध उपक्रमातून सुमारे ४० जणांना थेट तर आणखी तेवढ्याच माणसांना इन डायरेक्ट रोजगार मिळाला आहे.

तुकारामाना तेवढीच खंबीर साथ मिळाली ते त्यांचे बंधू असलेल्या एकनाथ रासमांची. रेल्वेत नोकरीला असलेला एकनाथ माझा जवळचा मित्र. कोकणी माणसाचा, तो ही सिंधुदुर्गातील कोकणी माणसाच्या, अस्सल आपुलकीचा स्वभाव पाहायचा असेल तर या एकनाथाला पाहावं. मी पाहावं असंच म्हणेन कारण याला भेटणं येरा गबाळ्याचं काम नाही. हा भेटत नाही, थेट आपल्या आतच घुसतो.. गावाच्या विकासाची एवढी असोशी व आवड, तळमळ असलेला दुसरा माणूस माझ्या माहितीत नाही. राहायला मुंबईत परंतू एक डोळा आणि एक पाय कायम हरकुळात. सरकारी योजनांच्या मागे लागून, लोकप्रतिनिधींना सळो की पळो करून या एकनाथाने गांवात बरीच सुधारणा करून घेतली आहे. तुकाराम रासमाना मनापासून साथ दिली ती या एकनाथाने. संतांनी शिकवणीतून लोककल्याण साधलं तर या एकनाथ-तुरारामानी प्रत्यक्ष करणीतून..!

आणि या दोघांचा तिसरा साथीदार अमित राणे. तो कायम हरकुळात स्थाईक. हरकुळासारख्या सह्याद्रीच्या कुशीत एका बाजुला वसलेल्या गांवात ‘अमित राणे ग्रुप आॅफ इंडस्ट्रीज’चं आॅफिस व त्वरचं दिमाखदार नांव वाचून हरकुळ लवकरच ‘टाटा ग्रुप आॅफ इंडस्ट्रीज’च्या बाॅम्बे हाऊसची छोटी आवृत्ती होणार यात नवल काहीच नाही..आता आवश्यकता आहे त्यांच्या धडपडीला आपला हातभार लावायची..अमिताभच्या चालीवर म्हणायचं तर, “दो राते जरूर बिताईए हरकुळ खुर्द मे”..!

दोन-तिन दिवसांची ही गम्मत अनुभवायची असेल तर मुंबई-पुण्याहून काही तासांचा प्रवास म्हणजे काहीच नाही. आमचा पुढील मुक्काम कुडाळ मधल्या ‘पावशी’ गावात एका जंगलातील तंबूत होता. त्या मुक्रामात आमच्या साथीला होता डाॅ. बापू भोगटे नांवाचा आमचा रानवेडा मित्र, त्याची हकिकत पुढच्या भागात.

— नितीन साळुंखे
9321811091
salunkesnitin@gmail.com

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..