नवीन लेखन...

माय रेट्रो… व्हॅलेन्टाईन

अनघा दिवाळी अंक २०२० मध्ये सुनील जावळे  यांनी लिहिलेली ही कथा.


ही कथा सुरू होत आहे १९७२-७३ च्या काळात… तो काळ हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या राजेश खन्नाचा. तो त्या काळचा सुपरस्टार आणि जोडीला चटपटीत गोल चेहऱ्याची मुमताज ही जबरदस्त हीट जोडी! ‘कटी पतंग,’ ‘आराधना’, ‘अमर प्रेम’, ‘सफर’, ‘आनंद’, ‘अपना देश’, ‘दो रास्ते’ सारखे जबरदस्त हिट सिनेमे देणारा आमचा हिरो राजेश खन्ना. जणू आमचे दैवतच! अपऱ्या नाकाची, फुगीर गोबऱ्या गालांची मुमताज साथीला आल्यावर सिनेमात प्रेमसरिता खळाळून वाहू लागायची. मग आमचा अवतारही काही वेगळा नव्हता…

आमच्या हिरोशी साम्य साधत कानावर ओघळायचे केस (बिट्ल कट म्हणायचे त्या वेळचे न्हावी लोक) डोक्यावर समोरून फुगा पाडलेला, प्लेन फेंट रंगाच्या शर्टवर जाड काळ्या धाग्याचे डबल शिलाई, बेलबॉटम ढगळ पॅट. राजेश खन्नाच्या एकेका सिनेमाने मनावर अक्षरश: गारूड केलेलं! ओठांवर अगदी सहजपणे ‘ये रेशमी जुल्फे… ये शरबती आँखे…तुम्हे देखकर जी रहे है सभी!’ गाण्याच्या ओळी येत असत. आता आता कुठे आम्हाला शिंगे फुटू लागली होती. एक वेगळीच असीम आनंदाची भावना हृदयात ओसंडून वाहू लागली होती, सारे जग कसे सुंदर सुंदर वा हवेहवेसे वाटू लागले होते. आता सोळाव्या वर्षी प्रेमाचा अर्थ हळूहळू कुठेतरी उमगत होता. सारे जीवनच बदलून गेले होते. सुंदर संगीताने नटलेल्या चंदेरी दुनियाची मोहिनी पडून एक अनामिक ओढ मनाला लागलेली होती. जमिनीवरून चार बोटे उंचावरून चालत असल्यासारखे हलके हलके वाटायचे. सिनेमात स्लो मोशनमध्ये असते तसे दृश्य डोळ्यासमोरून तरंगून जायची. परत या सर्वांना गरज होती एका लेटलाईनची… एका नकट्या नाकाच्या हेल्दी मुमताजची! तिची छबी डोळ्यासमोर आणताच हृदयात प्रेमाच्या उर्मी समुद्राच्या लाटांप्रमाणे धाडधाड उसळून यायच्या…

मनाला उंच उभारी देणारे ते कॉलेजमधील ते सोनेरी दिवस! खरं तर व्हॅलेंटाईन शब्दाचा अर्थही त्यावेळी माहित नसायचा. कारण तो शब्द प्रचलितच नव्हता. तर इतर रोज डे, हग डे, किस डे इत्यादी डेजचे नामोनिशाणही नव्हते. अगदी म्हणजे कॉन्व्हेंटमधून आलेल्या ख्रिश्चन तरुणीही यापासून बेखबर होत्या. हल्लीच्या सारखी बेधडक लव्हाळ क्रेज नव्हतीच. सारखे सारखे किंचाळून अंगावर झुरळ चढल्यासारखे उड्या मारून मुला-मुलींनी एकमेकांना धडाधड हग (आलिंगन) करणे, किस करणे इत्यादी वाह्यात प्रकार चालणे व कॉलेजमध्ये असल्या निरनिराळ्या छचोर संधीसाधू डेजच्या नावाखाली खपवून घेणे तेव्हा अजिबातच मान्य नसणार होते. मुलीदेखील हातभर सुरक्षित अंतर राखूनच बोलायच्या आणि त्यात एक शिस्त होती. एक संयम होता. हग करणे म्हणजे आलिंगनबद्ध करणे, चुंबन घेणे तेही सरळ खुलेपणे लोकांसमोर! अर्थात हे प्रकार तर त्याकाळी आमच्यापासून कोसो दूर होते. मुला-मुलींच्या नात्यातील मुक्तपणा त्याकाळात नव्हताच. शाळा संपवून अकरावीनंतर टी.वाय. मोठ्या कॉलेजमध्ये प्री डिग्रीला प्रवेश घेऊन झाले. त्याकाळात पहिल्या वर्षात पी.डी. म्हणजे धमाल मस्तीचे रेस्ट इयर… कॉलेजची परीक्षा असायची आणि सर्वच विद्यार्थी विनासायास पास होऊन इंटरला जाणार होते. दुसऱ्या वर्षाला इंटर व नंतर पुढील तीन वर्षे एफ.वाय., एस.वाय. आणि टी.वाय. असा परंपरागत पुणे युनिव्हर्सिटी निर्धारित अभ्यासक्रम असायचा. अकरावीपर्यंत सर्व इयत्तांच्या मुली दिवसाला व मुले दुपारच्या शाळेला असायची. मुला-मुलींची भेटच काय पण साधी ओळख व्हायलाही चान्स नव्हता. शाळेच्या चलाख मॅनेजमेंटने कटकटीला वावच ठेवलेला नव्हता. तसल्या भग्न प्रेम मंदिराच्या रूक्ष वास्तूत शिक्षण घेत असताना तरुण भावभावना पार कोमेजून गेलेल्या. त्याकाळी असलेले मुला मुलीविषयीचे नैसर्गिक आकर्षण, प्रेम, फ्लरटींग वगैरे याला तिथे काही स्कोपच नव्हता! सगळेच कसे बडवलेले बैल. माझ्या शाळेतील सिनीअर मुले कम मित्र आमच्या गावाच्या कॉलेजात असत. त्यांच्या तोंडून कॉलेजमधल्या गंमतीजमती, अॅन्युअल गेम्स, गॅदरिंग, सिटी बसमधील धमालमस्ती, लायब्ररी/कँटीनमधली मजा वगैरे ऐकून मत्सर वाटायचा. तेथील स्वच्छंदी वातावरणाचा मला हेवा वाटायचा. कुठल्या तरी तरुणीने आपल्याकडे पहावे, बोलावे अशी सुप्त इच्छा मनात बाळसे धरू लागली होती. नुकतेच कॉलेज सुरू झाले होते. त्यावर्षी प्रवेश नव्हता कारण आमची ज्युनिअर गंग अकरावीला ना! कॉलेजमध्ये आकर्षक ड्रेसेस. घातलेल्या कल्पनेतील फ्यांचे घोळके थट्टामस्करी वगैरे वगैरे सारेच मनात नुसत्या कल्पनेने अंगावर रोमांच, उभे राहत असत… सारेच कसे मोहवीत होते. मनावर दगड ठेवून सर्व इच्छा मनातच दाबून ठेवत संयम ठेवून अकरावी चांगल्या मार्काने म्हणजे मेरीटमध्ये सुटलो. आता काय गगनच ठेंगणे झाले होते. या चालू वर्षी कॉलेजात दाखल झालो. मनाला पंख फुटले होते. प्रेमग्रंथाची पाने चाळायला मन आतुरले. बस्स… मग काय मिशन लव्हेरिया सुरू… त्यासाठी शोधमोहीम हाती घेतली. तसे शाळेतून सोबत कॉलेजात पोहोचलेली मित्रमंडळी आपापले सावज हेरत, जाळे टाकत, प्रसंगी थापा मारीत फिरत होती… पण अजून कोणाला यश मिळालेले नव्हते. नवोदित मुलांचे तांडे नव्या नव्या फॅशनचे नवे कपडे, जीन्स, टीशर्ट, पायात स्पोर्ट शूज, हातात नावापुरत्या दोन चार वह्या मिरवून कॉलेजमधील व्हरांडे अडवून ‘मेरी सपनोंकी रानी कब आएगी तू, तेव्हाचे सूपरडूपर हिट आराधनाची गाणी गुणगुणत बसू लागले. पण हायरे… कर्मा! सगळे प्रयत्न फोल ठरत होते. प्रत्येक आघाडीवर तोंडावर आपटून सर्वच कसे विपरीत घडत असल्याचे दिसत होते. तंग कपडे घालून कॉलेजात मिरविणाऱ्या पऱ्यांचे अंग-प्रत्यांगाचे उठाव उठून दिसत होते. त्यांच्या गोऱ्यागोमट्या कोमल अंगी देहावर फिट पंजाबी ड्रेस, त्यावर भडक प्लेन रंगाच्या तंग लेगीन्स, कानात मोठाल्या इयरिंग्ज, खांद्यावर लांबच्या लांब सुळसुळीत ओढणी पिनअप केलेली, केसांना समोरून रिबन बांधून बॉबकट केलेल्या मोकळ्या केसांच्या मुमताजसारख्या, लांब मोकळ्या केसांच्या शर्मिला, आशा पारेख सम तरुणी पाहिल्या म्हणजे काळजाचा ठोका चुकत होता. हसतखेळत वावरणाऱ्या तरुणींचे थवे समोरून पास झाल्या म्हणजे हृदयातून कसलीशी अनामिक कळ उठून थंडगार शिरशिरी डोक्यापासून पायापर्यंत बिजलीसारखी सळसळत जात, अंगावर शहारे उठायचे इथपर्यंत सर्वच ठीक म्हणायचे. पण सजा प्रेमाचा माहोल दिसायला हवा तसा कुठेच बघायला मिळत नव्हता, सगळाच कसा भ्रमनिरास झालेला. स्वप्नातील सृष्टीच्या तुलनेत वास्तवातील जग खरेच वेगळे असते याचा प्रत्यय येऊ लागला होता. शाळेतून कॉलेजपर्यंत पोहोचलेल्या आकर्षक व शोडषी तरुणी यांचे आपापसातील रूक्ष संदर्भहीन बोलणे कानावर पडून अक्षरश: मेंदूत भरून राहिलेल्या सोनेरी स्वप्नांचा चुराडा होतो… वाटायचे येथून कुठेतरी दूर पळून जावे. कॉलेजमध्ये नजरेने इतरत्र झाडी मारताना पंचाहत्तर टक्के मुलींनी गावच्या बोलीभाषेत हेल काढून बोललेले संवाद कानाला टोचू लागले होते. सिनीअर मुलींच्या वाटेला आम्ही जात नसू. पण समवयस्क मुली अजूनही बाळबोध वळणात वावरत असायच्या. वाटायचे… प्रेम म्हणजे काय हे यांच्या गावीही नाही. गप्पा काय तर म्हणे… कालच्या माईनं बिबड्याचा रस ठेवल हाये… तं घाटाखायले येसान का?… नाहीतं संध्याकाळी ओले बिबडे खायला ये जा सगळ्याजणी! मी तर घरीच राहीन ना… आन् असा बी शनिवारच हाये… गेलं काय नि नाही गेलं काय कॉलेजले! दोन दिवसानं त्या शालिनीचं लग्न हाये तं पुरा दिवस तडीच मोडीन… बरं जाऊ दे ते…तंडब्यामंदी काय आनेल हाये तुम… मी नं भेड्याची भाजी… तूनं?’ असले बोलीभाषेतले संवाद कानावर पडून अक्षरश: वैताग यायचा… कधी शिकतील या गावच्या पोरी शुद्ध भाषा बोलायला… आम्ही नाही का गावचे? मग शालेय जीवनात सतत वाचन करून व वक्तृत्व स्पर्धा गाजवून आम्ही नाही का प्रमाणभाषेत बोलायला शिकलो… जाऊ द्या आपल्याला काय पण!… या कॉलेजात बोलायच्या गोष्टी आहेत? म्हणजे कसं ना आपण कॉलेजात आहोत याचे भान ठेवून निदान ‘चला गं बोअर झाले, कँटीनमध्ये जाऊ या… आपली हिरो कंपनी असेलच तिथे… जरा भंकस करून येऊ या… नंतर लायब्ररीत कुठली पुस्तके आली आहेत ते ते बघू या. आता पुढचा पिरीएड अकौंटसचा… खत्रूड स्वाती जोगचा… जाऊ द्या मस्तपैकी बंक टाकू या… सायन्सच्या वर्गावर एक चक्कर टाकू या…तो हँडसम गबरू शशिकांत काय भारी दिसतोय ना… अगदी धर्मदाचा पुत्तर जसा… सिक्स पॅक बॉडी… जिमला जात असेल का ग तो… अगं हो.. ना! पण खूप भाव खातो. काय त्याच्यावरच पाणी पडले आहे तसा तो मिलींदही छान आहे बरं… गोरा गोरा, केस किती छान आहेत ना… एकदम कुरळे, दुसरा तो पंकज चौधरी… आहाऽऽ कमल हसनच जसा…बटाट्यासारखा डोळ्यांचा… सावळा आहे पण आहे बरं देखणा!’ आता मला राजेश खन्ना म्हणतील काय असा भास होत मी चमकलो. शॉक बसल्यासारखा स्वप्नातून बाहेर पडलो. त्या कंपूचे पापड, लोणची, शेवया, गप्पासंबंधीचे बोलणे अजूनही थांबलेले नसायचे. मर्जीत आल्यासारखा मी माघारी वळायचो. वाटायचे कॉलेजच्या अभ्यासक्रमात प्रेम हा विषय ठेवायला पाहिजे होता. इथे तर कॅटरिंग उघडलेले… बरं सोबत असलेले बरेचसे मित्रही त्याच पठडीतले ना… शुद्ध मराठी प्रमाणभाषा कानावर पडायची सुतराम शक्यता नव्हती. हां… पण वर्गामध्ये मुली मात्र छान छान बोलताना ऐकू यायचे. काही मुली तर कॉन्व्हेन्ट क्लासमधून आलेल्या. फाडफाड इंग्लिश बोलून त्यांचा दबदबा सिद्ध करीत होत्या. बऱ्यापैकी फॉरवर्ड वाटणाऱ्या. या मुली जरा गविष्ठ होत्या… गावच्या मुलींशी बोलायचे त्यां टाळायच्या… म्हणजे त्यांचा ग्रुपच मुळी वेगळा होता. नाही म्हणायला गोयगोमट्या ब्राह्मण मुली मोकळेपणाने बोलायला यायच्या तेवढ्या एका थंडगार झुळूक येऊन गेल्यासारखे वाटायचे. हिंदी सायडर मुलींशी बोलताना लय भारी वाटायचे… जणू सिनेमातील राजेश खन्नाचे डायलॉग्ज असावेत अशा सुरात मानेला झटका देऊन केस उडवण्याचा त्या केविलवाणा प्रयत्न करीत बोलण्याचा आव आणीत असू. अंगाअंगात राजेश खन्ना भिनलेला होता पण मुमताजचा नवा अवतार अजून कुठे समोर येत नव्हता. “अरे सुहास, ती ग्लायकोडीन भेटली बाजारात आईसोबत होती.” मन्याने माहिती पुरवित म्हटले. “म्हणजे ती दमेकरी आणि जरा लंगडत चालणारी रेखा देशपांडे! सतत खॉक… खॉक करीत असते…बरं मग पुढे?

“अरे काय सांगू यार… तिने चक्क आईलाच सांगितले ना की आपण ग्लायकोडीन म्हणतो तिला…’ “बरं पुढे… आईनेआरती ओवाळली असेल ना तुझी?”

“छे रे… पण समजुतीच्या स्वरात म्हणाली, तुम्ही सगळे भाऊ बहीण ना… कॉलेजमध्ये असलात म्हणून काय झाले… असं व्यंगावरून नाव ठेवू नये बाळ.

“मग सांगायचे होते ना… रक्षाबंधनाला येऊ सगळे राखी बांधून घ्यायला.”

“कसंच काय रेऽऽ… कसं तरी मान डोलावून पळ काढला मी…’ मन्याने आम्हाला सांगताच आम्ही खोऽऽ खोऽऽ हसत मन्याला दाद देत पाठीवर थोपटले. तरी रेखा देशपांडे ही तरुणी दिसायला अगदी सालस पण आकर्षक होती. पण ती ग्लायकोडीन बोलायला लागली की खोकल्याची उबळ येऊन तोंड उघडून पंप मारत असे. जरा वैताग यायचा पण आम्ही ती मैत्रीण म्हणून कधीच नावावर काट मारली होती. मेधा नावाची एक मुलगी होती रोल नंबर ७२! तिला सेव्हन्टी टूचे मॉडेल म्हणत असू. तिला याची खबर लागलीच आली ना… मुलांच्या अंगावर वसकन ओरडत… ‘हे बघा माझ्या बाबाला घेऊन येईन आणि मग बघाच तुम्हाला प्रिन्सिपलकडे उभे करते की नाही.’ आम्ही तिला पुन्हा छेडणार नसल्याचे आश्वासन दिले तेव्हा कुठे गेली बया तरा तरा निघून, दुसरी एक होती फोन लिस्टमध्ये… गोरीगोमटी, सुंदर, आकर्षक चेहरामोहरा लाभलेली मीना देशमुख! बघता क्षणीच काळीज लक्कन हलायचे… छातीत धडधड होत प्रचंड भीती वाटत असली तरी नुसतं तोंडाला पाणी सुटायचं. तिच्या आईचा घरी देशी तूप विकायचा घरगुती उद्योग होता. तिच्याशी ओळख वाढवायला विक्याने मस्त शक्कल शोधून काढली. तास संपल्यावर विक्या लगटपणे तिच्या बेंचकडे गेला आणि म्हणाला,

“तूप घ्यायला यायचं आहे घरी… उद्या येऊ का?” संप “अरे विचारायचे काय त्यात…ये ना डबा घेऊन… आईला सांगून ठेवते ती काढून ठेवेल बाजूला. तसं लवकर संपून जात असतं… गावाकडून येतं ना म्हणून खुप डिमांड असते. ये तू!” मीनाने दिलखुलास हसत म्हटले. विक्याच्या मागे उभ्या असलेल्या आमच्या कंपूच्या मुलांची हृदये धडधडू लागली होती. शरीरात कंप सुटला होता श्वास थांबतो की काय असे भासून तिच्या मोहक चेहऱ्यावर नजर खिळून होती. तिचं हसणं जणू अनेक लहान घंटा किणकिणत असल्यासारखे वाटत राहिले. अंगावरच्या गुलाबी रंगाच्या सलवार कमीजमध्ये अगदी डिट्टो बाळसे धरलेल्या सुकुमार देहाची लीना चंदावरकरच भासली.

दुसऱ्या दिवशी रविवार. विक्यासोबत थोडाथोडका नव्हे तर चक्क सात-आठ जणांचा कंपू एकत्र जमून तूप घ्यायला तिच्या घरावर धडकला. दरवाजाबाहेर आमचा कल्ला ऐकून ती लगबगीने बाहेर आली. नुकतीच न्हाऊन डोक्याला टॉवेल गुंडाळून बाहेर आली होती. ओल्या केसांतून मोत्यासारखे जलबिंदू चेहऱ्यावरून ओघळून टपटप खाली पडत होते. सुंदर अप्सरेसमान दिसणारी लोभस मीना आकाशी तलम गाऊन घालून दरवाजात आली तर एवढा मोठा घोळका बघून ती चपापलीच… आश्चर्यचकित होत तोंडाचा चंबू करीत विचित्र नजरेने डोळे मोठाले करून पाहत तिने आतमध्ये आईला आवाज दिला. तिची आई बाहेर येऊन आमचा घोळका बघून हबकलीच.

“कितीजणांना घ्यायचे आहे तूप?

“या विक्याला… पावशेरभर हवे आहे.” आम्ही दबक्या सुरात म्हणालो. खरंतर तिचा संतापाने लालबुंद झालेला चेहरा पाहताच आमची हवा गुल झाली होती पण मन घट्ट करून आम्ही उद्गारलो.

“काय फक्त पाव किलो… मेल्यांनो, तेवढे एक निमित्त काढून मीनाला भेटायला आलात काय? लाजा नाही वाटत काय रे… तुम्हाला! थांबा तुमच्या घरीच येऊन सांगते तुमचा आगाऊपणा… सुंदर मुलगी दिसली की लागले मागे तिच्या… लाळघोटू मवाली कुठले. चला पळा इथून नाहीतर मीनाच्या बाबांनाच बोलावते आता. आमची सिट्टीपिट्टी गूल होत आम्ही गडबडीने मागे वळून गेटकडे धूम ठोकली तर ती खदाखदा हसून जीभ दाखवत हसत होती. तिच्या आईने हाताने खसकन धरून तिला आत ओढले व दरवाजा धाडकन लावून घेतला. विक्या आम्हाला शिव्यांची लाखोली वाहत स्टीलचा रिकामा डबा नाचवत होता. दुसऱ्या दिवशी मीनाने कॉलेजात आमच्या फटफजितीची कथा तिच्या मैत्रिणींना सांगितली तर सर्वजणी आमच्याकडे बघून दात दाखवून खिदळत होत्या. आमच्या कंपूला मेल्याहून मेल्यासारखे झाले. खाली माना घालून आम्ही लेक्चरमध्ये मन गुंतविण्याचा प्रयत्न करू लागलो पण मध्येच मुलींच्या बाकावरून हसण्याची दबकी लाट उठून खदाखदा हसण्याचा आवाज मोठा होत मोठा हास्यध्वनी कानी पडत होता. पाटील सरांनीही लेक्चर थांबवून मुलींच्या अशा हसण्याबद्दल विचारणा केली.

“काही नाही हो सरऽऽ पावशेर तुपाला दहाजण आले होते काल माझ्या घरी.” मीनाने महत्प्रयासाने हसू दाबत सांगितले. सर खो खो हसू लागले. सर्व वर्ग एकदमच खिदळून उठला तेव्हा वाटलं जमीन दुभंगून पोटात घेईल तर बरे. पहिलाच प्रयत्न फसून जाम फियास्को झालेला. कसलं प्रेम नि कसलं काय? पण मित्रपण कसले दुष्ट ना… खरंतर मी आणि विक्याच जाणार होतो… पण विक्याचा करिश्माच असा होता की तिच्या ओढीने ऐनवेळी सगळा कंपू हजर झाला ना… दटावून नाही म्हटले… ऐकतील तर मित्र कसले? नाइलाज होऊन सर्वजण डेरेदाखल झालो… वाटलं निदान मीना घरी सर्वांना ओळख करून देईल. वर्गमित्र म्हणून तरी… कदाचित तिथे चहापाणी होईल पण… इतकेच म्हणायचे तो मीना दुष्टपणे आमच्याकडे पाहत गालातल्या गालात खुदखदू हसत होती. पिरीयड संपताच आम्ही वर्गामधून धूम ठोकली. झाशीच्या राणीचा वारसा चालवणाऱ्या मराठी मुलींचा नाद सोडून हिंदी सायडर मुलींवर मोहनास्त्र डागायचे मी ठरवले.त्याचाही एक स्वतंत्र ग्रुप होता. बहुतांशी ज्वेलर्स व कापड व्यापाऱ्यांच्या श्रीमंत मुली होत्या.

“नीताजी… अरी सुन ना… तुम्हारा फिजिक्सका जर्नल पूरा है ना… जरा दोगी मुझे… वो क्या है की मेरी बहुत दांडी पडी थी ना… गये हफ्ते में…” ती माझे हिंदी ऐकून हसायलाच लागली.

“दांडी?… मतलब? तो मैं क्या करूं…ये तो वह क्या कहते? हां… दांडी मारते समय सोचना था ना भय्या!”

“देख यार, जर्नल नही देना तो मत दे लेकिन क्लासमें भैय्या तो मत बोलो ना…’

‘हां बाबा!… हां! दूंगी मैं जर्नल लेकिन बुधवार के पहले वापस करना…

“हां… हां जरुर… फिकर नॉट.”

‘ओके देन.’ तिने जर्नल काढून हातात ठेवले. मी विजयी मुद्रेने दोस्त कंपनीकडे पाहिले तर त्यांनी अंगठा उंचावून डन केलेले नीतानेही पाहिले.

“कोई बेट लगी है क्या… दोस्तों के साथ?”

राजस्थानी बांधणीचा सलवार कुडता घातलेल्या नीना जैनने भुवया उंचावून गोरे गाल अधिकच फुगवून विचारले.

“अरे नही… ऐसा कुछ भी नही.” मी सहजपणे म्हटले.

अरे सुन तो…. ये जर्नल तो तेरी पार्टनर ज्युलिया भी दे सकती थी ना?” नीता मोठाल्या पापण्या फुलपाखराच्या पंखासारख्या मोहकपणे फडफडवीत म्हटले व हातातील तिचे जर्नल हळूच काढून घेतले. म्हणाली, “आप तो जानते है ना ये ख्रिश्चन लडकियाँ कितनी खुशमिजाज होती है… वैसे भी उस को आताभी क्या है? खालीपिली शायनिंग मारती है और हम मराठी लडके जैसे उन्हे नोट्स लगती हैजैसा ब्रिटिश राजमें समझा जाता था।”

‘ओहऽऽ माय गॉड! कहाँ ब्रिटिशराज तक पहुंच गये तुम तो… हां जरा खुदगर्ज तो है ही वो हायफाय ग्रुप… पता नही तुमने प्रैक्टिकल के लिए उसे पार्टनर कैसे चुन लिया?”

“अरे नाही नीता… उल्टा उसने ही एचओडी से शिकायत कर के पार्टनर बदलने की रट लगायची थी… लेकिन मैने भी जिद नहीं छोडी… मराठी लोग क्या अस्पृश्य है कि जिनका साथ टाला जाए.” मी आपले खास सिनेमे बघून कमावलेले हिंदी पेश करीत म्हटले.

‘अस्पृश्य नही रेऽऽ अछूत कहते!” तिने दुरुस्ती केली.

“हां… वो हीच रेऽऽ लेकिन अब वो खुश सब रेडी फिड मटेरिअल मिल जाता है और एक्सपिरियमेंट का केमिकल पावडर की आयडेंटिफिकेशन होकर जर्नल भरकर हो जाता है । केमिस्ट्री का पूरा है मेरा जनल चाहिये क्या?”

‘जी… नहीं बहुत शुक्रिया! हां… चल ठीक है । यह फिजिक्स का जर्नल वापस करने बुधवार को खुश है….आ जाना बिना भुले ।”

“जी… जी मिल जाएगा!” मी हा संवाद नंतर कितीतरी वेळ मनाला घोळवत राहिलो. तशी नीता सुंदर म्हणण्यासारखी नव्हती पण मैत्रिण म्हणून नक्कीच सांगता येणार होते पण आमची संस्कृती अगदीच भिन्न होती.

अजूनही एक शलाका जोशी नावाची मुलगी. थोडीफार कह्यात आली होती म्हणजे झालं असं की मी कॉलेजच्या लायब्ररीतून चंद्रकांत काकोडकरांची एक नवीनच आलेली कादंबरी मोठ्या मुश्कलीने शोधून काढून आणली होती. शलाकाच्या नजरेस ती कशी पडली ते कळले नाही. शलाकाने गळ घालून ती कादंबरी वाचण्यासाठी मागून घेतली. मीही आनंदाने तिच्या हाती सोपवली व पुस्तक दोन दिवसात वाचून परत करायचे बजावले होते.

दुसऱ्याच दिवशी शहरातील बसस्टॉपवर कॉलेज बसची वाट पाहत थांबलो होतो. अचानक शलाकाचा हात धरून एक वयस्कर गृहस्थ पांढरा शर्ट, खाकी हाफपँटवर इन करून कमरेला जाडजूड लेदर बेल्ट व डोक्यावर गांधी टोपीसारखी संघ संस्कृती दर्शविणारी काळी वुलनची टोपी घालून तरातरा समोरून येताना दिसला. माझे तर होशच उडाले… समोरील परिसर गरागरा फिरत असल्यासारखे भासत गरगरायला लागले. पोटात भीतीने खड्डा पडला.

“काय रेऽऽ टोणग्यांना असली पुस्तके वाचता तुम्ही कॉलेजात… अभ्यास करायला जाता का छचोरपणा? शलाकाला का दिलेस असले अश्लील पुस्तक?” तो गृहस्थ जवळ येत बरोबर तणतणत म्हणाला, “अहो काका… झाले तरी काय एवढे? कॉलेज तरुणांनी वाचायची नाहीतर काय?…” मी हिमतीनं मुकाबला करीत उसने अवसान आणून म्हटले. तोच त्याचा हात संतापाने चढून वर गेला. मी सावध होतोच… पटदिशी चार पावले मागे हटलो. शलाकाने तिच्या बापाचा हात धरून ठेवत गयावया करीत थांबवले. “बरं ठीक आहे… यापुढे नाही देणार…. आय अॅम सॉरी! परत देताय ना पुस्तक?” मी शांतपणे खाली मान घालून म्हणालो.

“आता तुझ्या बापाला घेऊन ये मगच देतो तुला हे पुस्तक!”

‘अहोसऽ कॉलेजच्या लायब्ररीचे आहे ते माझे नाही… परत करावेच लागणार… द्या मुकाट्याने!’ मी जरा जोश चढूनच म्हटले. डोळ्यासमोर पुस्तक गहाळ झाल्याने दंडाची रक्कम दिसत होती. दोघे तिघे माझे मित्र मदतीला धावून आले अगदी देवासारखे!

“अहो काका… कॉलेजातील मुलामुलींसाठीच काकोडकर लिहितात अशा कादंबऱ्या… कुठल्या जमान्यात वावरत आहात तुम्हीपण… ते वाचून काय लगेचच काय तुमची शलाका सुहासचा हात धरून पळून जाणार आहे का? चला मांडवली करून टाकू…तेवढं कॉलेजचे पुस्तक वापस द्या!

‘अरे काय छचोर लिहिले आहे… कळतंय का?… कायतर म्हणे तिचा गोरापान चेहरा आरक्त झाला… जणू काय गोबऱ्या गालावर गुलाब उमटले… विनयने शालूला बहुपाशात घेऊन तिच्या लालचुटूक रसरशीत ओठांवर… शी सांगताही येत नाही! कोंबडीच्यांनो हा अभ्यास करताय हो… प्रिन्सीपलकडे कम्प्लेन्टच करतो…” तो म्हातारबाबा न थांबता बडबडत होता. शलाका रडवेल्या चेहऱ्याने माझ्याकडे पाहत डोळ्यांनी खुणवून माफी मागत तिच्या वडिलांच्या मागे उभी होती, मीही डोळ्याने इशारा करून काळजी करू नको म्हणून खुणावले. “अहो ते कॉलेजच्या लायब्ररीतलेच आहे ‘ त्यात काय असते ते माहीत आहे सरांना पण. द्या पाहू ते पुस्तक!”

“घ्या शिंच्यानो… पुन्हा कधी शलाकाच्या वाटेला गेलात तर तंगड्या तोडून हातात देईन!”

“सॉरी… सॉरी काका आणि हो क्यूसुद्धा बरं का! चला बस आली आमची!’ आमचे मित्र पुस्तक खाकोटीला मारून बसकडे धावत सुटले. शलाकाही पळतच बसकडे निघाली. मी जड पावलाने चालत खुनशी डोळ्यानी ढुढ्ढाचार्यांना रोखून बघत बसमध्ये चढलो. घंटी ऐकताच ड्रायव्हरने बस चालू करीत पुढे दामटली. शलाकाच्या डोळ्यातून अश्रूधारा थांबायचे नाव घेत नव्हत्या. डबडबलेल्या डोळ्यांनी पाहत तिने कंपूला थेंक्स म्हणून हात जोडले व खाली मान घालून सीटवर बसून राहिली. तो एका होऊ घातलेल्या प्रेमकथेचा अध्याय इथेच संपला.

पुढील टार्गेट सोडत कॉमर्सच्या वर्गाकडे आमचा कंपू वळला होता. पी.डी. कॉमर्सच्या वर्गात एक विभावरी कोलते नावाची एक सुंदर, गोरीपान, तलम गुलाबी-लालसर कांती असलेली, कमरेपर्यंत लांब केसांचा शेपटा मांडीवर रूळत असायचा. तिचे भावगंभीर मोठाले डोळे, कमानदार मत्स्याकृती पातळ भुवया, नाजूक जिवणी, गोबरे गुलाबी गाल, लालचुटूक ओठ, तरतरीत सरळ नाक… कोणीही बघताक्षणी प्रेमात पडेल अशी सुस्वरूप स्वर्गातील अप्सराच जणू. सर्वांनाच तिने मोहिनी घातली होती. प्लेन गडद रंगाचे टॉप व तंग लेगीन्स ती नेहमी घालत असे व ते तिच्या गोऱ्यापान रंगाला खुलूनही दिसायचे. सुळसुळीत ओढणी खांद्याला पिनअप केलेली असायची. बघताच ती बाला कलिजा खलास झाला असे कोणीही गुणगुणायला लागेल असे लाघवी सौंदर्य लाभलेली विभा चक्क आमचा एक वर्ग सोडून पुढच्याच वर्गात होती. आश्चर्य वाटत होते. वाटले विचारावे एवढे दिवस ही होती तरी कुठे? मग काय सायन्सचे लेक्चर बंक करून कंपू कॉमर्सच्या वर्गात हजेरी देऊ लागला. तिच्या आसपासच्या बेंचवर अगोदरच जाऊन बसत होतो आम्ही. वर्ग भरायच्या वेळी मैत्रिणींसोबत बोलत ती वर्गात शिरली म्हणजे गात्रागांत्रातून आनंद लहरी उसळ्या घेऊ लागायच्या. पोटात अनामिक भीतीने खड्डा पडायचा. कॉमर्सचे प्राध्यापकही आमच्याकडे बघून जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असत. आम्ही शिस्तीत गप्प बसत असू. अधूनमधून वर्ग लेक्चर ऐकत शांत असताना कागदीबाण तिच्यावर सोडत होतो. ती मागे हसून पाहत आमचा बाण उचलून बॅगेत ठेवून द्यायची.आमची डोमकावळ्यासारखी नजर व अचानक सुरू झालेली उपस्थिती तिच्या लक्षात येत असावी बहुतेक! ती कुतूहलाने आमच्यावर नजर फिरवून आमचा हेतू ताडत असावी बहुतेक पण नजर चोरून हसत दुसरीकडे पाहण्याचा बहाणा करीत टाळत असल्याचे दाखवीत होती. एकदा एक नामी संधी चालून आली. तिचे सोने करायचे ठरविले. वर्गाबाहेरच्या कॅरिडॉरमधून विभा खाली मान घालून घाईघाईने एकटीच जात असताना अचानक समोर आली.खरंतर टक्करच होणार होती. आम्ही दोघेही हसायला लागलो. मी केसांची झुलपे उडवून हाताने केसांचा फुगा फोडत शेर पेश केला, “उलझने है बहुत सुल्जा लिया करता हूँ,

आप सामने आते वक्त मैं अक्सर मुस्करा लिया करता हूँ

क्यूं नुमाईश करू मैं अपने माथेपर शिकन

की

मैं अक्सर मुस्करा के इन्हे मिटा दिया करता हूँ क्यूंकी

जब लढना है खुदको खुदिसे ही

हार-जीतमे इसलिए कोई फक्र नही रखता

हूँ

हारू या जितू कोई रंज नही

कभी खुदको जिता देता हूँ कभी खुदसे जित

जाता हूँ

खरं तर कुठेतरी वाचलेला शेर ज्याचा पूर्ण अर्थही कळलेला नव्हता मला! पण विभा शेर ऐकून हसून दाद देत एक वळसा घेत पुढे निघून गेली. विन्याने लांबवरून शिट्टी मारली, मीही साळसूदपणे काही घडले नसल्यासारखे दर्शवून पाठी कलटी मारली.

असे एक-दीड आठवडे लहानसहान गमती घडतच होत्या… पण आमच्या ग्रुपने तिची विशेष अशी कुरापत काढली नव्हती. तरीसुद्धा तिला आमची तिच्या वर्गातील उपस्थिती डाचत असल्याचे तिच्या नाराज चेहऱ्यावर कळत होते.

एका दिवशी एस.पी.चे लेक्चर संपल्यावर ती आमच्या बाकाकडे हळूहळू पावले उचलत चालत येऊ लागली, आता श्वास बंद पडतो की काय असे आम्हाला वाटू लागले. संपूर्ण शरीर कंप पावत होते. हातापायांच्या तळव्यांना घाम फुटला. भीतीची थंडगार. शिरशिरी ताडकन शरीरभर उठत विजेचा शॉक बसल्यासारखा झटका देहाला बसला. गात्रे स्फुरण पावत नसा ताडताड उडू लागल्या. ती जवळ येऊन थांबली. “तुम्ही सारे डी.एस.चे विद्यार्थी आहात ना?… मी ओळखते सर्वांना! पप्पांनी तुम्हाला भेटायला घरी बोलावले आहे. तर याल ना?” ती मंजूळ लहान घंट्या किणकिणल्या आवाजात सुरेल बोलत होती.

“अरे हो पण… एकदम घरी म्हणजे? चोप द्यायचा विचार आहे की काय तुझ्या पप्पांचा? पण आम्ही केले तरी काय?… आणि हो एक गोष्ट… आम्ही तुझ्यासाठी नाही येत क्लासमध्ये… कॉमर्सला अॅडमिशन फिरून घ्यायची आहे… झेपत नाही हो ती सायन्स… मारो कल्टी! झेपत नाही हो सायन्स.”

“उगाच थापा मारू नका… मी ओळखून आहे पुरेपूर बरं का… अचानक हे असे कॉमर्सप्रेम का उतू जात आहे? एनी वे, हा पत्ता घ्या आणि संध्याकाळी येऊन जा घरी. पप्पा वाट बघतील तुमची. आणि हो सर्वजण या! मुलगी बघण्याचा कार्यक्रम नाही आहे घरी. पप्पांच्या गुडबुकमधील तुम्ही शाळेत असतानाचे विद्यार्थी आहात म्हणून घरी बोलावते आहे! सो बाय…अँड सी यू! पत्ता सोपा आहे आणि तुम्ही यायचे घरी आमच्या.’ तिने जबरदस्त गुगली आमच्यावर टाकला होता. आमची बोलती बंद झाली होती. मी पत्ता लिहिलेला कागद उलगडून तो वाचला तर आश्चर्याचा जबरदस्त धक्काच बसला: ती शाळेतील आमच्या फिजिक्स व मॅथ्स शिकविणारे शिक्षक व्ही. एन. कोलते सरांच्या सिव्हील लाईन्समधील पत्ता होता. एस.एस.सी. परीक्षेच्या एक महिना आधी सरांनी माझ्यासहीत निवडक हुशार विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर खाजगी पण स्वेच्छेने क्लासेस घेतले होते म्हणजे ही सुंदर दिसणारी विभा कोलते सरांची कन्या आहे? दिसली नव्हती कधीच… दिसणार कशी ना… ती तर सकाळी शाळेत असायची आणि आम्ही सकाळी आठ ते नऊ तिच्या चरी असायचे. पण सरांनी आमच्यावर जबरदस्त मेहनत घेऊन आम्हाला मेरीटमध्ये चमकावले होते. मी तर फिजिक्समध्ये टॉपर होतो. अशा उपकारकर्त्याच्या मुलीवर आम्ही दोरे टाकायचे… छट कधीच नाही. पण आता काय करून बसलो होतो. सर काय विचार करीत असतील… विचारांनी लाजिरवाणे होत आम्ही वर्गातून उठून बाहेर आलो. विभा आमच्याकडे पाहून मंद हसत होती. आम्हाला बरोबर करंट लागल्याचे तिला कळले होते.

“अरे काय रे मुलांनो… आमच्या विभाला का छळता आहात तुम्ही? तिनेच नाईलाज होऊन सांगितले बघा.

आता तुम्ही मला परके नाही आहात, म्हणून म्हटले आपणच बोलावे प्रत्यक्ष!…” कोलते सरांच्या घरी आम्ही संध्याकाळी जाऊन पोहोचलो होतो, ट्यूशन घेण्याच्या स्वतंत्र रूममध्ये सर आमच्याशी संवाद साधत होते. “सर चूक झाली आमच्याकडून. आधीच जर विभा तुमची मुलगी आहे हे माहिती असते तर कधीच वाटेला गेलो नसतो. हवेतर कान पकडतो सर, पण माफ करा आम्हा सर्वांना!

“ओके… रिलॅक्स जंटलमेन! चालायचंच रे नाहीतर कॉलेज तरी ते कसले? आम्हीसुद्धा आमच्या जमान्यात असेच करीत होतो, वेलऽऽ तुम्हाला त्यासाठी नाहीच बोलावले मी… म्हणजे माफी मागायला! तरी बाळांनो असे आहे, तुम्ही कॉलेजमधून शिकून खूप खूप मोठे व्हा… एम.एससी., करा पीएच.डी. करा, किंवा यूपीएससी सारख्या स्पर्धात्मक परीक्षा देऊन आयएएस, आयपीएस ऑफिसर व्हा… मोठ्या पगाराच्या सन्माननीय नोकऱ्या पटकवा. त्यानंतर मी स्वत: आमच्या विभाचा हात तुमच्या हाती देईन मग तर झाले ना! मला उच्चपदस्थ जावई हवा आहे आणि तुमच्यात ते कॅलीबर आहे…ते तुम्ही नक्कीच उच्च अधिकारी व्हाल, पण तोपर्यंत आमच्या विभाला त्रास देऊ नका!” सर मनापासून बोलत होते. दाराच्या पडद्याआड विभाही उभे राहून सारे ऐकत होती. आम्ही माफी मागत सरांच्या पायावर पडलो. सरांनीही उठवून आम्हाला छातीशी लावून एकेकाला आशीर्वाद दिला. विभा आणि तिची आई स्वत: चहा व नाश्त्याचे ट्रे घेऊन दाखल झाल्या. हसतखेळत जुन्या आठवणींना उजाळा देत मस्त मैफल जमली. आम्ही विभाला कॉलजमध्ये निर्धास्त राहण्यास सांगितले व सरांचा निरोप घेऊन बाहेर पडलो. मनात पुटपुटत होतो… छेऽऽ आपल्या नशिबी प्रेमयोग लिहायला ब्रह्मदेव विसरला बहुतेक..

महिन्यामागून महिने उलटत होते. कॉलेजमध्ये गॅदरिंग पार पडले. कॉलेज गावाबाहेर असल्याने सिटीतच एका कल्चरल हॉलमध्ये गॅदरिंग पार पडले.आम्ही ज्यु. कंपनीने त्यात भाग घेतला नव्हता. फक्त क्रिकेट आणि व्हॉलीबॉलच्या स्पर्धेत उतरलो होतो व नाकावर आपटलोही होतो. अजून बराच अनुभव यायचा होता. कॉलेजच्या रूटीन वातावरणात आम्ही चांगलेच रूळलो होतो. दुश्मन बनलेली गाववाली गर्ल्स कंपनी आता जर्नल मागायला, नोट्स व क्वेश्चन सेट मागायला येऊ लागली होती. आपल्या मतलबासाठी उसने हसू चेहऱ्यावरआणत गोड बोलून गळ घालत होती. तसे आम्ही अभ्यासात सिनीअरच होतो. संपूर्ण टर्मभर वेळेआधी पूर्ण व्हायचे व ट्युटोरिअलच्या टेस्टमध्येही दणकून मार्कस् घ्यायचो. एकंदरीत आमच्या विषयीची मुलांच्या मनातील प्रतिमा बदलत जात होती. आमच्या मागे मुलींचे ग्रुप्स गोंडा घालायला लागले होते.

माझी पॅक्टीकलची पार्टनर मिस ज्युलिया वर्गीसही आता बरीच निवळली होती. तिचा तो ताठा, गर्विष्ठपणा कधीच संपला होता, पॅक्टीकलच्या वेळी खूपच धांदल करीत असायची, एखाद दुसरी तरी केमिकलची बाटली फुटलेली असायची. टेस्टट्यूब तर किती फोडायची. रिकव्हरी रजिस्टरमध्ये लॅब असिस्टंट पाटीलसर चोखपणे नोंद करीत असत. बायॉलॉजीच्या पॅक्टीकल्सला ज्युलिया पटदिशी झुरळाचे डिटेक्शन करून आतील अवयव उघडून ठेवायची सरांना दाखविण्यासाठी. पण उंदराचे डिटक्शन करायचे म्हटले तर मला पुढे करायची व घाबरून डोळे बंद करून घ्यायची. तिला उंदराची खूप भीती वाटायची तर मला झुरळाची! ती खूपच खादाड होती. सकाळी केमिस्ट्रीचे पॅक्टीकल चालू असताना टेबलावर जेवणाचा डबा उघडून गुपचूपपणे खाऊन घेत असायची आणि दुपारी कॅन्टीनमध्ये वडापाव हादडायची. गोरीपान साधारण माझ्यासारखीच. पाच फूट आठ इंच ऊंच, सडपातळ बांध्याची ज्युलिया नेहमीच शर्टपँट घालून कॉलेजला यायची. कधीकधी प्रिंटेड टॉपवर स्कर्ट घालायची. तिला बघून आमच्या मराठी मुली नाके मुरडत असत. सुरुवातीला खाष्ट वाटणारी ज्युलिया स्वभावाने खरोखरच मायाळू होती.

एक चांगली मैत्रिण ती माझी बनलेली होती. ती नेहमी जास्तीत जास्त इंग्लिशमध्येच बोलत असे. तिच्यामुळे माझे इंग्लिश उच्चार सुधारले होते. मी देखील बऱ्यापैकी इंग्लिश बोलायला लागलो होतो अगदी न अडखळता! मी तिच्या मैत्रिणी जेनिफर, डायना, दोरोथी इत्यादी सोबत अस्खलितपणे इंग्लिश बोलू शकत होतो. आमची गावची गर्ल्स कंपनी त्यामुळे नाराज झाली होती. मला म्हणायच्या त्या किरिस्ताव मुलीच्या डब्यातले खाऊ नको बरं… त्या मुली ना बीफसुद्धा खातात म्हणे. खरंतर ज्युलिया शंभर टक्के व्हेजिटेरियन होती, तिला नॉनव्हेज आवडत नसे. या ख्रिश्चन ग्रुपच्या अंगी मॅनर्स, एटिकेट्स कमालीच्या बाणलेल्या होत्या. मी ज्युलियासोबत राहून बरेच काही शिकलो होतो. आताच्या सारखा व्हॅलेंटाईन डे त्याकाळी असता तर मराठी मुली सोडून ज्युलिया आणि कंपनीने रंगवून सोडलं असतं आणि बायगॉड सांगतो, ज्युलियाने हग देखील केले असते आणि केक, चॉकलेट्स, गुलाबाचे बुके देखील नक्कीच आणले असते. त्यामुळे ती मैत्रिण आहे हीच भावना पुरेशी ठरली होती. त्यामुळे व्हॅलेंटाईन डे बनविण्यासाठी प्रेयसी शोधण्याची गरज पडत नसते हेही खरंच आहे. आणि याच नियमानुसार मला तर वर्गातल्या निम्म्या मुली माझ्यासाठी मैत्रिणी कम व्हॅलेंटाईनच झाल्या होत्या जणू! प्रेम करणे, प्रेमाच्या आणाभाका देणे, आयुष्य तिच्यासोबत बांधून घेणे यापेक्षा मैत्रीण बनवून सर्वांदेखत राजरोस मिरविणे यालाच व्हॅलेंटाईन म्हणावे असेच म्हणतो मी. तुम्ही काय म्हणाला ऑफकोर्स… खयाल अपना अपना! पसंद अपनी अपनी…!!

-सुनील जावळे


डोंबिवली
मो. ९७०२३३४४६५
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०२० मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..