नवीन लेखन...

अमेरिकेतील “यु. एस. रुट नंबर ६” – भाग १

My US Route Number 6 - Part 1

यु.एस. रूट नंबर ६ हा अमेरिकेतील एक प्रसिद्ध रस्ता! मॅसेच्युसेट्स राज्यातल्या केपकॉड पासून ते कॅलिफोर्नियातल्या लॉंग बीच पर्यंत जाणारा. अटलांटिक आणि पॅसिफिक अशा दोन महासागरांना जोडणारा. ५१५८ कि.मी. (३२०५ मैल) लांबीचा आणि १४ राज्यांतून जाणारा. खर्‍या अर्थाने देशव्यापी किंवा खंडव्यापी असा रस्ता! (तुलनाच करायची झाली तर, भारतातील सर्वात मोठा हायवे, म्हणजे नॅशनल हायवे नंबर ७. हा उत्तर प्रदेशातील वाराणसी पासून तामीळनाडूतील कन्याकुमारी पर्यंत जातो आणि त्याची लांबी आहे २३६९ कि.मी.)

हा यु.एस. रूट नंबर ६ मॅसेच्युसेट्स राज्यातून सुरू झाला की र्‍होड आयलंड, कनेक्टिकट, न्यू यॉर्क, पेनसिल्व्हेनीया, ओहायो, इंडियाना, इलीनॉय, आयोवा, नेब्रास्का, कोलोरॅडो, यूटाह, नेवाडा अशा राज्यांतून जात जात कॅलिफोर्नियात जाऊन संपतो. या चौदा राज्यांपैकी, पाच राज्यांच्या राजधान्यांमधून (प्रॉव्हिडन्स – र्‍होड आयलंड, हार्टफोर्ड – कनेक्टिकट, द मॉईन – आयोवा, लिंकन – नेब्रास्का आणि डेन्व्हर – कोलोरॅडो ) जाण्याचा मान त्याला लाभला आहे.

ह्या यु.एस. रूट नंबर ६ ला “ग्रॅंड आर्मी ऑफ रिपब्लिक हायवे” असं देखील एक मोठं भारदस्त नाव आहे. अमेरिकेचा हा सर्वप्रथम खंडव्यापी आणि सर्वात लांब रस्ता! आता जरी हे त्याचं प्रथम स्थान (लांबीच्या दृष्टीकोनातून), इंटरस्टेट नंबर २० ने बळकावलं असलं, तरी देखील यु.एस. रुट नंबर ६ चा दिमाख आणि सौंदर्य थोडं देखील कमी झालेलं नाही. आपल्याकडे कशी शताब्दी आली, इंटरसिटी एक्सप्रेस आली तरीही डेक्कन क्वीन ती डेक्कन क्वीनच! १९८७ साली हारले – डेव्हीडसन या मोटरसायकलींसाठी जगप्रसिद्ध असलेल्या कंपनीने, ह्या यु.एस. रुट नंबर ६ ला, अमेरिकेच्या ५० सर्वोत्कृष्ट रस्त्यांच्या यादीमध्ये स्थान देऊन सन्मानित केलं होतं. तसंच ह्या यु.एस. रुट नंबर ६ चा पेनसिल्व्हेनीया राज्यातून जाणारा जो भाग आहे, त्याची “Car and Driver” ह्या मासिकाने, अमेरिकेतल्या १० सर्वोत्कृष्ट सृष्टीसौंदर्याने नटलेल्या रस्त्यांमध्ये गणना केली आहे.

नवीन इंटरस्टेट हायवेज प्रमाणे यु.एस. रूट नंबर ६ हा काही सहा किंवा चार पदरी नाही, निदान मी फिरलेल्या भागात तरी तो दोन पदरीच आहे. त्याचं रूपही तसं जुन्या वळणाचं. सर्वसाधारण इंटरस्टेट हायवे प्रमाणे याच्यावर मोठमोठे फलक नाहीत किंवा Exit च्या मोठमोठ्या पाट्या नाहीत. हा आपला बर्‍यापैकी भारतीय रस्त्याचा भाऊबंद शोभेल असा आहे.

नवीन इंटरस्टेट हायवेज जितके प्रशस्त, आखीव आणि काळजीपूर्वक जपलेले आहेत, तितकाच हा यु.एस. रूट नंबर ६, गरीब आणि बापुडवाणा! नवीन इंटरस्टेट हायवेज म्हणजे आपल्याच तोर्‍यात असणारे, कोरडे, काटेकोर, अलिप्त आणि रुक्ष; तर यु.एस. रूट नंबर ६ म्हणजे गबाळा, दिलखुलास आणि अघळपघळ. एखाद्या शिष्ठ माणसाने कपड्याची घडी मोडू नये म्हणून पोरांपासून दोन हात दूर रहावं तसे इतर इंटरस्टेट हायवेज, शक्यतो वस्तीपासून दूर, शहराला वळसे घालून जाणारे. तर एखाद्या आजीने दोन चार शेंबडी लेंबडी नातवंडं अंगाखांद्यावर खेळवावीत तसा यु.एस.रूट नंबर ६, छोट्या छोट्या गावांना, वस्त्यांना अल्लाद कुरवाळत जाणारा!

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..