या भागातल्या यु.एस.रूट नंबर ६ वर वाहतूक देखील तशी तुरळकच. ट्रॅफिक जॅम वगैरे प्रकार नाही. सारा प्रदेशच डोंगराळ असल्यामुळे, दगडांच्या खाणी खूप. रस्त्याच्या बाजूला, दोन-चार ठिकाणी, मोठ्या जागेमध्ये, फोडलेल्या दगडांच्या ओबडधोबड लाद्या हारीने रचून ठेवलेल्या दिसतात. झाडांची वानवा नसल्यामुळे वृक्षतोड देखील भरपूर चालते. पण ती सारी आत चालत असावी, कारण रस्त्यावरून जातांना तशी काही कल्पना येत नाही. रस्त्यावर लाकडांच्या दोन वखारी मात्र आहेत. त्यांच्या प्रशस्त आवारांमध्ये, लाकडांचे सरळसोट ओंडके रचून ठेवलेले असतात. क्रेन्सच्या सहाय्याने ते ओंडके उचलून त्यांचे निरनिराळ्या ठिकाणी ढीग करणे किंवा ट्रकमध्ये भरणे अशी कामे सारखी चाललेली दिसतात.
सगळा ग्रामीण आणि शेतीप्रधान भाग असल्यामुळे, रस्त्यांवरून जाणार्या वाहनांमधे दुधाचे टॅंकर्स, झाडांचे ओंडके रचून घेऊन जाणारे ट्रक्स आणि खाणीतून काढलेले दगड वाहून नेणारे ट्र्क्स यांची संख्या खूप. कधी कधी फार्मस् वरचे ट्रॅक्टर्स आपल्या संथ गतीने रस्त्यावरून जातात. त्यावेळी त्यांच्या मागे कूर्म गतीने जावं लागल्यामुळे थोडीफार गाड्यांची रांग तयार होते, तेव्हढाच काय तो ट्रॅफिक जॅम!
माझ्या लॅबच्या कामाचे स्वरूप आणि त्यामुळे कामाचे तास वेगळे आहेत. माझं काम रात्री खूप उशीरापर्यंत चालतं त्यामुळे घरी परतण्याची वेळ रात्री ९ ते पहाटे २ पर्यंत कधीही असू शकते. संध्याकाळी ६-७ वाजतां घरी जायला मिळणं म्हणजे पर्वणीच. फक्त सोमवारी काम संपवून ४-५ वाजे पर्यंत घरी जाता येतं. सकाळी लॅबला जायची वेळ देखील तशीच अनिश्चीत – सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत – कामाच्या स्वरूपाप्रमाणे. त्यात कधी कधी वीकएन्डला देखील काम असतंच. पण ह्या सगळ्या विचित्र कामाच्या वेळांमुळे एक फायदा असा झाला की वर्षाचे बाराही महिने, दिवसाच्या प्रत्येक वेळेला (सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री) मी ह्या यु.एस.रूट नंबर ६ वरून ये – जा केली. चारही ऋतुंमधलं निसर्गाचं बदलतं रूप, दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेला पाहिलं. ऊन, पाऊस, धुकं, बर्फ यांचा खेळ बघितला. कधी गाडीचा हीटर चालू करून फूट फूट बर्फातून आणि निसरड्या रस्त्यावरून गाडी चालवली तर कधी त्याच रस्त्यावरून गाडीच्या खिडकीच्या काचा खाली करून भणाणता वारा तोंडावर घेतला. वळणावळणाच्या रस्त्यावर, रात्रीच्या अंधारात, टेकड्यांच्या रांगांमधे आणि झाडांच्या दाटीतून चाललेला चंद्राचा लपंडाव पाहिला आणि सकाळच्या कोवळ्या उन्हात, गुलाबी रंगाने माखून गेलेले बर्फाच्छादीत डोंगर बघितले.
रात्री लॅबमधून घरी परततांना, यु.एस.रूट नंबर ६ वरनं माझा प्रवास पश्चिमेकडून पूर्वेकडे असा होतो. त्यामुळे बर्याचदा आकाश निरभ्र असलं, की रात्री लॅबमधून बाहेर आल्यावर, गाडीत बसताना नकळत नजर वर जाते आणि पूर्वेच्या आकाशात चंद्राचं दर्शन होतं. कधी नाजुकशी कोर तर कधी पौर्णिमेच्या जवळपासचा गोलाकार. पण रस्ता टेकड्यांतून, दर्यांतून वळणावळणाने जात असल्यामुळे, सबंध ३० मैलभर चंद्र नाकासमोर कधीच दिसत नाही. अचानक रस्त्याचं एखादं वळण येतं आणि आतापर्यंत समोर दिसत असणारा चंद्र एकदम डाव्या किंवा उजव्या बाजूला दिसायला लागतो.
सूचिपर्णी वृक्षांच्या टोकदार शिखरांवर अडखळत अडखळत तो पाठशिवणीचा खेळ खेळत राहतो. टेकड्यांवरून घसरगुंडीसारखा रस्ता खालीवर जात असतो आणि त्याबरोबर चंद्राचा लपंडाव रंगात यायला लागतो. हिवाळ्यात आणि वसंताच्या सुरवातीपर्यंत, जेंव्हा झाडांची पानं झडून गेलेली असतात तेंव्हा उंच फांद्या आणि काटक्यांच्या जाळीदार पडद्यातून चंद्राचं दर्शन थोडं अधिक वेळ मिळतं. पण एकदा का झाडं पानांनी भरून गेली, की गच्च झाडीच्या उंचच उंच भिंती रस्त्याच्या दुतर्फा उभ्या राहतात आणि मग चंद्रदर्शन दुर्मिळ होऊन जातं.
पौर्णिमेच्या आसपासच्या रात्री, चंद्राच्या पिठूर चांदण्यात गाडी चालवताना काही वेगळीच मजा येते. विशेषत: पौर्णिमेचा नारींगी रंगाचा पूर्णगोल चंद्र बघत रहावा एवढा सुरेख दिसतो. आणि जर बर्फ पडलेलं असलं तर त्यावर चंद्रप्रकाशाचं गारूड काय वर्णावं? एखाद्या डोंगरमाथ्यावर रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून तो निस्तब्ध आसमंत बघत उभं रहावं. टेकड्यांच्या रांगा समुद्राच्या शुभ्र फेसाळ लाटांसारख्या एकामागोमाग उठत असतात. झाडांच्या गर्दीत कुठे एखादं छोटंस घर, मंद उजेड टाकत आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतं. अंगावर शिरशिरी आणणार्या आणि हाडांपर्यंत पोहोचणार्या थंडीत, त्या घरातून आलेल्या छोट्याश्या दिव्याचा प्रकाश देखील उबदार वाटायला लागतो. झाडं, घरं, जमीन सारं काही पांढर्या शुभ्र बर्फाने झाकून गेलेली असतात. भुसभुशीत बर्फातून चालताना, केवळ आपल्या पावलांचा आवाज यावा एवढी नीरव शांतता असते. अशावेळीं ढगांआडून एकदम चंद्र बाहेर आला की त्याचा पांढरा पिवळसर प्रकाश चहूबाजूंनी ओसंडायला लागतो. शुभ्र हिमावर मोत्यांची बरसात होते. मन शांत आणि तृप्त करून टाकणारा असा हा अनुभव असतो.
Leave a Reply