इथे हरणं खूप. रस्त्याच्या कडेला, मोटारींच्या धडकेने मरून पडलेली हरणं हे तर कायमच दिसणारं दृश्य. संध्याकाळी, रात्री गाडी चालवताना त्यांचं भान ठेवावं लागतं. बहुतेक सारा रस्ता दाट झाडीतून आणि माळरानांतून जाणारा. त्याला काही ठिकाणी रस्त्याच्या कडेचं कुंपण, पण बराचसा भाग कुंपणाशिवायचा. त्यामुळे हरणांना रस्त्त्यावर यायला काहीच अडचण नसते. संध्याकाळच्या उतरत्या उन्हात, एखाद्या टेकडीच्या उतारावर, चार-पाच हरणांचा कळप चरतांना बरेचदा नजरेस पडतो. चरता चरता बरेचदा हरणं रस्ता ओलांडून पलीकडे जातात. कधी कधी गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशात, एखादं चुकार हरीण अवचीत् रस्त्यात उभं असलेलं दिसतं. अचानक आलेल्या प्रकाशझोतामुळे आंधळं झालेलं ते हरीण, कावरंबावरं होऊन गोंधळल्यासारखं जागच्या जागी उभं रहातं आणि मग अचानक भानावर येऊन लांब उडी मारून बाजूच्या अंधारात मिसळून जातं. काही वेळा रस्त्याच्या कडेला, गाडीच्या दिव्याच्या झोताच्या किनार्याशी, काजव्यासारखे डोळे चकाकतात आणि अंधारात हरणं स्तब्ध उभी आहेत असं लक्षात येतं. बहुतेक ड्रायव्हर्स सावधपणे गाडी चालवत असतात आणि हरणांना रस्ता ओलांडू देतात; पण कधी कधी गाडी पटकन थांबवता येत नाही किंवा बावचळलेलं हरीण नेमकं गाडीवर येऊन थडकतं. माझ्याच गाडीवर दोनदा अशी हरणं येऊन थडकली होती; सुदैवाने दोन्ही वेळां फारशी दुखापत न होता, ती हरणं उठून पळून जाऊ शकली.
बहुतेक वेळां कळपांमध्ये फक्त माद्या आणि पिल्लंच दिसतात. एकदा मात्र मला एक एकांडा नर दिसला होता. सकाळी १०-१०॥ च्या सुमारास मी लॅबला चाललो होतो. रस्ता मोकळा होता. अचानक माझ्या पुढ्यात सुमारे १०० फुटांवर, बाजूच्या झाडीतून एक चांगला डौलदार, शिंगवाला नर बाहेर आला आणि रस्त्यावर चालूं लागला. त्याची पाठ माझ्याकडे होती. मी गाडी हळू केली. त्याने एकवार मागे वळून माझ्या गाडीकडे पाहिलं मग दोन्ही बाजूला मान वेळावून अंदाज घेतला आणि एक मोठी झेप घेऊन, जसा आला तसाच तो बाजूच्या झाडीत नाहीसा झाला.
**
तब्बल तीन वर्षं या यु.एस.रूट नंबर ६ वर मी आठवड्यातले पाच-सहा दिवस ये जा केली. दिवसा रात्रीच्या बहुतेक सर्व वेळा आणि ऋतुचक्राच्या सार्या चाकोरीतून या यु.एस.रूट नंबर ६ची सारी रूपं बघीतली. रोज बघून बघून, रस्त्यावरचे चढ उतार, वळणं, आजूबाजूचा परिसर, ठरावीक झाडं, शेतं, सारं काही परिचयाचं होऊन गेलं. तरी देखील हा इतका ओळखीचा झालेला रस्ता, रोज नव्या वळणावर एक नवं रूप सादर करून मला विस्मीत करून सोडायचा. त्याच्या नित्य नव्या अविष्कारानं शेवटच्या दिवसापर्यंत मला मोहीत करून सोडलं.
मोठाल्या शहरांतल्या रस्त्यांवर आपण कधीच एकटे नसतो. सहप्रवाशांची गर्दी, वाहनांची झुंबड़, एकंदर कोलाहलाने आपलं आणि रस्त्याचं असं नातं कधी फारसं जुळतच नाही. किंबहुना रस्ता म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाण्याचं निर्जीव साधन असतं. गर्दीच्या लोंढ्याबरोबर तो निर्जीव रस्ता शेअर करून आपण नुसते यंत्रासारखे पळत असतो. परंतु यु.एस.रूट नंबर ६ वर माझ्या गाडीतून प्रवास करताना, रोजचा दीड तास मी एकट्याने या रस्त्याच्या सहवासात घालवला. तुरळक वाहतूक, गर्दीचं नामोनिशाण नाही, कर्कश्श कोलाहल नाही आणि आजूबाजूला बघावं तिकडे निसर्गाचं नित्य नवं रूप! त्यामुळे यु.एस.रूट नंबर ६चा, हा ३०मैल लांबीचा छोटासा तुकडा मला माझा वाटावा, यात काही नवल नाही.
३२०५ मैल लांबीच्या, १४ राज्यांतून जाणार्या आणि अटलांटिक महासागरापासून ते पॅसिफिक महासागरापर्यंत जाणार्या, ह्या यु.एस.रूट नंबर ६ वर, कधी तरी या टोकापासून त्या टोकापर्यंत गाडीने प्रवास करण्याची माझी जबरदस्त इच्छा आहे. माझ्या माहितीतल्या त्या छोट्याश्या ३० मैलाच्या तुकड्यासारखाच सारा यु.एस.रूट नंबर ६ सुंदर आहे का, हे जाणून घेण्याचं मला मोठंच कुतूहल आहे. पण तो प्रवास करेपर्यंत, माझ्या परिचयाचा हा “माझा यु. एस. रूट नंबर ६”, मला “मर्मबंधातल्या ठेवीसारखा” जपून ठेवायचा आहे.
Leave a Reply