नकळे कुणास काही अंतरमन
वेदना अबोध काही वेढल्या,
नकळे भाव मनीचे नाजूक
कुणास नकळे खऱ्या जाणिवा..
त्यात अंतरी विरले भाव कितीक
सोडल्या साऱ्या वेल्हाळ भावना,
त्याच वळणावर तू भावाला अचानक
नकळे काही मी मोहरले एकांता..
घेतलेस तू भाव स्वप्न मिठीत
गुंतल्या तेव्हाच गोड भावना,
विसरुन जावे त्याच वळणावर सारे
परी न विसरल्या मधुर त्या भावना..
चाहूल चांदण्यात एक तारका
तुझा बहर हृदयी रंगून गेला,
जीव साठवणीत रेंगाळता असा
तुझ्या आठवणी न आता पुसल्या..
ओढ लागली तुझ्या आरक्त मिठीची
तुला न भाव अवखळ कळला,
अल्लड अबोध वाटले मी तुजला
खेळ जिव्हारी माझ्यात मिटला..
परतून कधी मी आठवली
एकांत क्षणी सहज तुला,
आठवेल तुज तेव्हा व्याकुळ
माझ्या मधुर खऱ्या भावना..
न कळली तुला मी अशी
तुझ्यात गुंतल्या अलवार भावना,
आठवशील तू मला कधी अवचित
तेव्हा कळतील मिटल्या वेदना..
न भेट तुझी न गाठ तुझी
परी जीव कातर व्याकुळला,
तप्त मोहर तुझ्या मिठीचा
तू अलिप्त कोरडा राहिला..
स्वप्न झुला हा झुलतो मजसवे
झोके माझे झुलले एकांता,
वाट तुझी पाहता अबोल अशी मी
चांदण्या सोबती तरी चंद्रही मजसवे सुना..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply