काही बाण खूप खोलवर, जिव्हारी लागतात
भरलेल्या भासूनही जखमा विव्हळत रहातात
काही क्षण अश्वत्थाम्याची जखम होतात
आयुष्य सरल्यावरही वेदनांना जिवंत ठेवतात
एकाकीपण झाकायला आपल्या सावल्या पसरत जातात
नि शरमेची टांगती शवं सारायला हात तोकडे पडतात
हातांनी झाकला तरी चेहेरा स्वतःला खिजवत रहातो
स्वत:पासून पळायचं असूनही पाय थिजवून ठेवतो
वास्तवाची नग्नता रहाते सारं आभाळ व्यापून
‘सुखी माणसाचा सदरा’ विरविरतो लक्तरं होऊन
हर एक सकाळी जिवंत असणं असावं का हे वरदान
का लिखिताच्या अभिशापाने असावं फर्मावलेलं दंडविधान
जळजळता अनाहूत, कलंक भाळी लेवून
जीवनाला सामोरं जाणं मान वर करुन
भार शिक्षेच्या कवचकुंडलांचा अंगावर धारुन
खूप आतून यावा लागतो निर्धार हुंकार होऊन!
सोनं होणं नशीबी नसलं तरीही
आगीतून जाणं क्रमप्राप्त होतं
आपल्या सजेचा खलिता गळ्यात टांगून
पाय ओढत रहाणं आपल्याला भाग असतं
वावटळीने विखुरलेल्या मनाची जुळव चिवटपणाने करतो
आश्वासित आत्म्याला तो, माझ्या अस्तित्वाचा पुनः शोध असतो
खंतेच्या खळग्यांवर आठवणींचे दगड ठेवून
कालच्या काळोखाकडे मी जेव्हा पाठ फिरवतो
उद्याच्या उष:कालाच्या किरणांवर चालत रहाणं
हा एकच मार्ग तेव्हा मला खुला असतो
-यतीन सामंत
Leave a Reply