जिल्हा परिषदेत मास्तरांच्या बदल्यायचं वारं जोरात वाव्हू लागलं.जे ते आपापल्या पद्धतीनं बदलीसाठी प्रयत्न करू लागलं.शहरापासून जवळच्या शाळतं बदली मिळावी मनून सगळेचं जनं वेगळाले हातखंडे आजमाऊ लागले. बदलीपात्र मास्तरांच्या संध्याकाळच्या बैठकाबी रंगू लागल्या.संद्याकाळी बारवरं समुपदेशनं व्हवू लागलं.बदल्या समुपदेशनानं असल्या तरी त्यात आर्थिक गणितबी व्हतीच. अशातच ना.नी गबाळे मास्तर त्याच्या बदलीसाठी प्रयत्न करू लागला.ना.नी. गबाळे म्हणजे नारायण निवृत्ती गबाळे…! पण सगळेजण तेह्यलं नानी नावानचं वळखायचे. ना. नी.गबाळे गुरुजी नावाप्रमाणेच गबाळे व्हते.. अंगाकाठीनं ते जेमतेमच व्हते.अंगात ढगळं ढवळं आंगड, ढगळा ढवळा पैजामा अनं वरून जॅकेट आसा तेह्यचा आवतार व्हता.नानीचि सभाव एकदम एकलकोंडा व्हता.त्याह्यचे फारसे मित्र कंपनीपण नवती.घर आणि शाळा याशिवाय तेह्यलं काहीच माहित नवतं. नाकासमोर पाहून चालणारे गबाळे गुर्जी विद्यार्थ्यांत मात्र प्रिय व्हते. आयुष्यभर मुलांयलं नैतिकतेचे पाठ देणारे मास्तरचं आता बदलीसाठी लाच द्यायलं विवश झालते.
बदल्यायचं वारं जोरात वाहत असल्यानं हालचाली वाढल्या व्हत्या.लग्गेबाजी व राजकीय हस्तक्षेपालं ऊतं आलता. त्यातच गबाळे मास्तरनं आपला हुकमाचा एक्का मणून जिल्हा परिषदेमधील स.दा.फसाटे नावाच्या एका शिपायाला हाताशी धरलं होतं. स.दा.फसाटे जरी शिपुरडा व्हता तरी पण त्याची वळख वरपर्यंत व्हती.त्याचा भाऊ मागच्या दहा-पंधरा वर्षापासून जिल्हा परिषदेत मेंबर व्हता.त्याच बळावर सदा फसाटेचं दुकान चाललं व्हतं.सायबांच्याबी त्यो लय मर्जीतला व्हता. त्यामुळं एकदा फसट्याने शब्द दिला मंजे तो अंतिमच असायचा.तर गबाळे गुरुजींना फसाट्याच्या घराचे उंबरे झिजवायलं सुरुवात केली. स.दा. फसाटे एकदम बेरकी व्हता. गोड गोड लाघवी बोलनं अन् समोरच्यालं विश्वासात घेणं यात त्याचा हातखंडा व्हता.उंचापुरा,धिप्पाड, गिड्या बांध्याचा फसाटे एकदा का कोणी त्याच्या तावडीत फसलं की त्यालं चांगलाच पिळून काढायचा. मागच्या सहा-सात वर्षात मास्तरन कवा हॉटेलचा उंबरठा वलांडला नवता मात्र आता बदलीसाठी फसाट्याच्या बलवण्यावून तेह्यलं रोज बारच्या वार्या माराव्या लागू लागल्या. नानी गुरुजीलं या सगळ्या प्रकाराची किळस यायची. पण गरजवंताला अक्कल नसते याप्रमाणे नाणी गुरुजी सगळं सहन करत गुमानं बसायचे. तिथे येणारे सगळे गुर्जीकडं पाहायचे आणि विचारायचे,” गुर्जी तुम्ही पण इकडं कव्हापसनं यालेत.”तव्हा नाणी मास्तर ओषाळून हसायचे अन् काय नाय मित्रालं जेवायलं आणलं मणून वेळ मारून नेयाचे. त्या वातावरणात आणि तिथल्या त्या धुरकट आनं उग्र वासानं नानी मास्तरचा जीव गुदमरून जायचा. फसाटेचं जेवण होवोस्तोर ते मुकाट्यानं चोरून लपून आंग आकसुन बसायचे.बीलं देऊन बाहेर मोकळ्या हवेत पडलं की तव्हा कुठं तेह्यच्या जिवालं बरं वाटायचं.कव्हा एकदा बदली व्हते अन या फसाट्याच्या तावडीतून आपण सुटतो असं नानी गुर्जीलं वाटायचं.
अखेर बदल्यायचा दिवस आला. नानीने ठरल्याप्रमाणे आर्थिक व्यवहार केला व्हता. त्यालं पायजे तिथं पोस्टिंग पण मिळाली व्हती.फसाटेनं नानीची ऑर्डर स्वतःकडं ठुवून घेतली व्हती. फसाटेनं ज्या ज्या मास्तरायचं गुत्त्तं घेतलं व्हतं त्याह्यच्याकडून आज जंगी पार्टी घ्यायचं ठरवलं व्हतं. गावाच्या बाजूला जंगल व्हतं.जंगलाच्या पलीकडं कोल्हाटनीयचा अड्डा होता. तिथं नाचं-गाणं,दारू,मटन आण इतर बर्याचं काही प्रकारची व्यवस्था असायची.नानी मास्तरला हे कबूल नव्हतं पण काय करावं इलाज नवता. बाकीच्या मास्तरायसंग नानीबी तयार झाला.
मागच्या काही दिवसांपासून दरोडेखोरायनं गावात धुमाकूळ घातला व्हता. रामज्या रामोशी आनं त्याची टोळी सध्या जोमात व्हती.लुटमारीच्या घटना बरोबरच एक दोन मुडदेबी पडले व्हते.त्यामुळं पोलीसायच्या गुप्तचर यंत्रणेसगट सगळी सिसटीमचं हाय अलर्टवर होती.दरोडेखोर गनिमी काव्यानं क्षणार्धात लूटपाट करायचे आण जंगलात पळून जाऊन डोंगराच्या कड्या कपाऱ्यातं गुडूप व्हयाचे.त्यामुळं तेह्यलं पकडणं हे पोलीसांसमोर मोठचं आव्हान व्हतं.रामज्या रामोश्यालं पकडायसाठी पोलिसांनी वीरा राठोड नावाच्या पोलीस निरीक्षकालं नेमुन त्यांच्या अंतर्गत एका टास्क फोर्सची निर्मिती केली होती. वीरा राठोड हा अतिशय शुर आनं धाडसी पोलीसवाला व्हता.आत्तापर्यंत त्यांनं भल्या भल्या गुन्हेगारायलं जेरबंद केलं व्हतं.खास रामज्या रामोशाच्या बंदोबस्तासाठी डिपार्टमेंटनं तेह्यलं पाठवलं व्हतं.
आजच नाणी गुर्जीच्या बायकोचा वाढदिवस व्हता. त्यानिमित्त तीनं घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली व्हती.तिकडं फसाट्यानंबी आजचं पार्टीचा बेत आखला व्हता.नानी मास्तर धर्म संकटात पडले.पण तरीबीक यातून मार्ग काढूया या विचारांनं तेह्यनं आपली एम एटी गाडी काढून घराबाहेर पडले. निघतांनी मास्तरीन बाईनं तेह्यच्या हातात काही सामानाची यादी देली व्हती यादी घेऊन ते बाजारात गेले.बायकोनं सांगीतलेले कुंकू, विड्याचे पानं, नारळ, सुपार्या, पाढरा दोरा आदी सामान घेऊन नानी मास्तर साड्यायच्या दुकानावर गेले.त्यांनी मास्तरीनबाईसाठी एक छानशी साडी घेतली.नंतर सोनाराच्या दुकानात जाऊन मास्तरीन बाईसाठी घुंगरायचे पैंजण पण घेतले.आन तिथून सॉरी थेट कोल्हाट्याच्या आड्ड्याकडं निंघाली. तिथं दोन चार मास्तर आन फसाटे आंधीपासूनच दारू ढोसतं बसले व्हते. मास्तरनं बाप जन्मी कव्हा कोल्हाटणीचा उंबरा चढला नवता.आज नाईलाजास्तव चोरून लपून का होईनं पण त्याह्यलं यावचं लागलं.फसाट्या तिथंचं तेह्यलं बदलीची आर्डर देणारं व्हता.बाकीच्यांप्रमाणचं त्यांनी आपण कुठं चाललो हे घरी सांगितलं नवतं. संगीत बारीचा कार्यक्रम चालू झाला. फसाट्यानं हेरलेल्या दोन-चार पोरी तिथं बैठकीत येऊन नाचू लागल्या. फसाटे अन् बाकीच्या एक दोन मास्तरायला चांगलाच रंग चढला व्हता. दारूच्या नशेत आता ते बी त्या पोरींसंगट नाचतं लगटं करू लागले.पार्टी चांगलीच रंगात आली व्हती.इकडं मात्र राहून राहून नानी मास्तरचं लक्ष सारखं घड्याळाकडं जात व्हतं.त्यांच्या बायकोचा वाढदिवस व्हता मणून ती घरी वाट पाहत असेल याची त्याह्यलं सारकी चिंता वाटू लागली.तेह्यची तळमळ वाढली.नानी गुर्जी फसाटेलं काकुळतीनं मनले की,“मी तं काही खात पीत नाही.तुमचं तुम्ही चालू द्या, मह्या बायकोचा वाढदिवस आसल्यानं मलं आज लवकर घरी जावं लागतय. जे काय बिल असलं ते मी पेड करतो.” असं म्हणून नानी मास्तर निघायलं लागले.जातांनी नानी मास्तरनं त्याह्यच्या वाट्याचं बिल भरलं.आणि आपल्या एम.एटी ला किक मारूनं घराकडं निघाले.
घराकडे जाणारा सगळा रस्ता जंगलातून जातं व्हता.त्यातच एम.एटीचा हेडलाईट शाट झालता. अंदाज अंदाज घेत घेत नानी मास्तर रस्ता काढत व्हते. आंधारी रात असल्यानं वातावरण भयानक वाटत व्हतं. तेवढ्यात त्यांच्या पुढून रोह्यांचा एक कळप धाड धाड पळत गेला. मास्तरच्या अंगावर शहारा उठला. काळजात धसकण झालं.नानी मास्तर डोस्क्यावर हात ठेवून मटकण खाली बसले. तेह्यचं अंग घामानं लथपथ झालं व्हतं. मास्तरचा श्वास वाढला व्हता .तिथं खाली बसून मास्तर थोडे स्थिरस्थावर व्हायला लागले. अचानक समोरून गेलेल्या रोह्यांमुळं नानी मास्तरच्या काळजात धडकी भरली व्हती. त्यामुळे तेनला जोराची लगीबी लागली व्हती.मास्तर उठलं आण तिथच फळफळ मुतलं. एक जोराचि लांब उसासा टाकला,आण पुढं जाणारा रस्ता चेक करू लागले.अचानक त्यांच्या पियावरून थंडगार कायतरी सळसळत जातांनी दीसलं नानी चपापले.तेह्यनं त्या आंधारातबी ध्यानं देऊन पाह्यलं भलि मोठा आग्यापरोड तेह्यच्या पुढून जातं व्हता. मास्तरलं आजूखच ईचित्तर वाटायलं लागलं व्हतं.त्या जंगलात जंगली प्राण्यांचा सुळसुळाट व्हता. त्यातच वावधन सुटल्यानं झाडांतून वारा घोंगावत व्हता.कड्या कपाऱ्यातून घोंगावणार्या त्या वार्यामुळं चित्र-ईचित्र आवाज येत व्हते. प्राणी पक्षाची एखादीबी हालचाल झाली तं त्याचा आवाज यायचा आणिक काळजात अजूनच धसकन व्हयाचं. नानी मास्तर च्या हाता पायालं कंप सुटला व्हता. भीतीनं त्याची घाबरगुंडी उडाली व्हती.तरीबीक उसनं आवसनं आणुनं ते पुढचा रस्ता धुंडू लागले. तेवढ्यात मास्तरलं पुढं काही अंतरावर जंगलात चुळबुळ जाणवली.गावातल्या दरोड्यायबद्दलं आतापर्यंत मास्तराच्या कानावर आलं व्हतंच.नानी मास्तर सावध झालं.तेह्यनं गाडी बंद केली. त्या रामोशायलं कोणतरी रस्त्यानं येत आसल्याची कव्हाचीचं चाहुलं लागली व्हती. त्यामुळं ते सगळे दरोडेखोर सावधपणे सावजाच्या मागावर व्हते.आता चुळबुळ आणिखच वाढली मनुन नानी मास्तरानं गाडी तशीचं बाजूलं पडू देऊनं एका झाडाच्या आडुशालं आश्रय घेतला.त्या झाडाखाली खूप मोठा पालापाचुळा पसरलेला व्हता. दरोडेखोराय पसून वाचायसाठी नानी मास्तरच्या डोस्क्यात नाना ईचार घुमत व्हते.मास्तरानं बायकोसाठी आणलेले पैजन काढुन दंडालं बांधले साडी काढुन कंबरल गुंडाळली व पदर डोस्क्यावर घेतला.सामानातलं कुंकू काढून कपाळावर मळवट भरलं.आशा अवतारात नानी मास्तर झाडाच्या आडुशालं बसला.बसल्या बसल्या तीथं पडलेला झाडाखालचा पालापाचुळा गोळा करून त्यानं एक ढीगारा केला.
इकडे घंट्याकभरात घरी येतो असं सांगून गेलेले मास्तर दोन तीन घंटे झाले तरी घरी आले नवते मून मास्तरीन बाई तूळतुळ करत व्हत्या.त्यांनी शेजारच्या मारूत्यालं बलवून मास्तर कुठे गेलं ते शोधायलं सांगितलं. मारत्या दुसऱ्या मास्तरच्या घरी गेला तं त्यालं कळलं की मास्तर फसाट्यालं पार्टी द्यायसाठी कोल्हाट्याच्या वस्तीवर गेले हायेत मून. मारत्या धावत पळत शॉर्टकटनं कोल्हाट्याच्या वस्तीवर गेला.तिथं तो जाऊन पाहतो तं फसाट्या व त्याच्यासोबत चे दुसरे एक दोन मास्तर पिऊन टुन्न झालते. मारत्यानं तेह्यलं नानी मास्तर बद्दल विचारलं.ते मनले की नानी मास्तरं कव्हाचाचं घरी गेला मून.पण नाणी घरी पोहोचले नवते हे समजल्यावर मंग सगळ्यांलच काळजी वाटू लागली.
कोल्हाट्याच्या वस्तीवरचे पाच दहा माणसं ,फसाटे आन त्याच्या संगचे मास्तर आसे सगळे मिळूनं कंदील घेऊन नानी मास्तरलं शोधायलं निंघाले.इकडं नाणी मास्तर जंगलात अंगाभवती साडी नेसुन अन द़डालं पैंजन बांधून गुपचूप झाडाच्याआड लपला व्हता.त्यालं अंधारात काळ्या आकृत्यायची हालचालं जानवत व्हती. त्यांनं दोन-चारदा दंडातील पैंजण वाजवले.छूंनऽऽछुंनऽऽ पैंजन वाजले की त्या आकृत्या भुतं खेतं हाय का काय मनुन बावचळतं व्हत्या.मणून मंग नाणी मास्तरनं त्यांच्या घाबरटपणाचा फायदा घ्यायचं ठरवलं. झाडाखालचा गोळा केलेल्या पालापाचुळा नानी मास्तरनं स्वतःच्या अंगावर घेतला अन त्याच्या खाली तो लपला.इकडे पैंजणाचा आवाज बंद झाल्यामुळे धीट झालेल्या त्या आकृत्या हळूहळू पुढं येऊ लागल्या.तिकडून फसाटे अन वस्तीवरचे कोल्हाटी जंगलात शोधा शोधं करत जवळ येतं व्हते. तेह्यच्या चाहुलीनं रामज्या रामोशी अन त्याची टोळी सावध झाली.कोल्हाट्यायच्या वस्ती कडून यायलेले दोन चार कंदील पाहून रामोशी अजूनच सावध झाले.ते सावधपणे झाडायमागं लपून सावज टप्यात येण्याची वाट पाहत बसले.कोल्हाटी अधून मधून आरूळ्या देत व्हते.पण दूरवरून आवाज येत असल्यामुळं मास्तरलं काही बोलता येत नवतं.इकडे रामोशी आज मोठा डल्ला मारायला भेटणार या हिशोबाने खुश व्हते.नानी मास्तरलं ढुंडत ढुंडत फसाटे,संगचे मास्तरं अन कोल्हाटी नानी मास्तरापसुनं हाकंच्या अंतरावर आले.मास्तरच्या पडलेल्या एम.एटीलं पाहुनं तेह्यलं घातपाताची शंका आली.
नानी मास्तर पाचुळ्याच्या ढिगाच्या आत निपचीत पडला व्हता.तो अंदाज घेतचं व्हता.कोल्हाट्यायचे गडी, फसाटे व संगचे मास्तरं त्या पाचुळ्याच्या ढिगाच्या आसपासच मास्तरलं ढुंडत व्हते. तेह्यच्या हालचालींवर रामज्या रामोशी वं दरोडेखोर झाडाच्याआड लपून नजर ठेवून व्हते.समोर शस्तहिन आठ दहाच माणसं पाह्यल्यावर रामज्याच्या इशार्यानं अचानकपणे तेह्यनं फसाटे आनं कोल्हाट्यायवरं हल्ला चढवला. दोन्ही बाजूनं जोराची झटापट चालू झाली. इकडं नाणी मास्तरन परिस्थितीचा अंदाज घेत हातातले पैजन छनऽऽऽ छन ऽऽऽ असे वाजवले. पैंजणाच्या आवाजानं सगळे चिडीचूप झाले… दोन मिनिटं भयंकर शांतता पसरली आन अचानक त्या पाचोळ्यातून साडी अंगाभवती गुंडाळलेल्या नानी मास्तरनं पाचचळ्याच्या ढिगातुनं जोराची किंकाळी मारत ढिगार्यातून आययेएएएएएएएऽऽऽ बाहेर उडी मारली…..पाचुळ्यातं लपल्यामुळं नानी मास्तरचे केसं पिंजारले व्हते.ते पिंजारलेले केस,नेसलेली साडी,मळवटभर कुंक आसा अवतार पाहून सगळेचं थरथरायलं लागले. तेवढ्यात त्यांच्या मागावरचं लपून बसलेले पोलीस तिथं आले. तेह्यनं रामज्या रामोशी व टोळीलं हातकड्या घातल्या.लय दिवसापासून चकवा देणारी रामोश्याची टोळी पकडण्यात पोलिसांयलं आखीरकार यश आलं व्हतं. पोलिसांयन दरडावून फसाटे, नाणीमास्तर व सगळ्यांयलं ईचारलं की,“एवढ्या रातीचं तुम्ही इकडं जंगलातं काय करतायं?” सगळेच कोल्हाटनीच्या वस्तीवर पार्टी करायलं गेलतो ही खबर जरं गावातं अन घरी कळली तं नाचक्की तर होईलचं पण बायका लेकरायलंबी तोंड दाखवायलं जागा राहणारं नाही मनुन सगळेचं चपापले व्हते.तेवढ्यात फसाटेनं इन्स्पेक्टर वीरा राठोड यांना सांगितलं की,“एकदा त्याच्या भावालं या दरोडेखोरायनं अडवून लुटलं होतं आणि चांगलं चोपलबी व्हतं.तव्हापसून या रामोश्यायलं अद्दल घडवण्यासाठी ते या गॅंगच्या मागावर व्हते. नानी मास्तराच्या मार्गदर्शनाखाली या गॅंगलं पकडायलं आम्ही इकडं आलतो. आम्ही या गॅंगलं पकडलंच व्हतं की तेवढ्यात तुम्ही आले.”फसाटे सराईतपणे इतका सफाईदार खोटं बोलला की पोलिसायलंबी ते खरं वाटलं.नानी मास्तरं व संगच्या मास्तरायनबी पोलिसांयलं फसाटेच्या बोलण्यालं हो लं हो लावलं. आज सगळ्यायलच फसाटेच्या खोटं बोलण्याचा अभिमान वाटला. इन्स्पेक्टर वीरा राठोडनं नानी मास्तरचं व तेह्यच्या टिमचं कौतुक केलं. दुसऱ्या दिवशी पेपरात नानी मास्तर,फसाटे व संघटचे दोन-तीन मास्तर यायचे फोटो छापून आले व्हते.सगळं गांव तेह्यचं कौतुक करत व्हतं. नानी मास्तर,फसाटे व संगच्या मास्तरायलं सरकारकडून बक्षीस मिळालं.तेह्यनं दाखवलेल्या शूरपणाबद्दल शिक्षण मंत्र्याच्या हातानं तेह्यचा सत्कारही झाला.
आता गावात नाणीमास्तरचा वकुबं वाढला व्हता . सगळे त्याह्यच्याकडं आदरानं पाहत व्हते.नानी मास्तर जरी दिसायला गबाळा आसला तरीबीकं लय धाडसाचा हाये असं गावातले लोकं मणायचे . इकडं घरातल्या बंगईवर बसून मास्तरीन बाई पेपरातला नानी मास्तराचा फुटू प्रेमानं न्याहाळत व्हत्या.त्या खुप खुशीत व्हत्या.चार बायांतं त्या आता ठसणीतं वावरत व्हत्या.आपल्या नवऱ्याच्या कर्तुत्वावर आणि हिंमतीवर तेह्यलं लय अभिमान वाटत व्हता.
© गोडाती बबनराव काळे
9405807079
Leave a Reply