श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी म्हणतात. या दिवशी हळदीने किंवा रक्तचंदनाने नागांच्या आकृत्या काढून त्यांची पूजा करतात.हे एक व्रतसुद्धा आहे. व्रतामध्ये श्रावण शुद्ध चतुर्थीला एकभुक्त राहून पंचमीचे दिवशी पाच फण्यांच्या नागाचे चित्र काढून त्यांच्यासोबत नागपत्यांचे सुद्धा चित्र काढतात. त्यानंतर संकल्प करून नागाची पूजा करतात. नागाला दूध -लाह्यांचा नैवेद्य दाखवतात.
नागपंचमीला अखिल भारतीय महत्त्व आहें. भारतात सर्वच भागात नागपंचमीचा सण साजरा केला जातो. काही ठिकाणी प्रत्येक पंचमीला अनंत, वासुकी वगैरे बारा नागांची पूजा करून वर्षभर व्रत करण्याचा प्रघात आहे.
पौराणिक कथेप्रमाणे नागाची उत्पत्ति कश्यप व कडू यांचेपासून झाली आहे. या दंपतीला जी सर्पसंतती झाली त्यातील प्रमुख आठ सर्प आहेत. अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक ,पद्म, महापद्म, शंख व कुलिक यांनाच उरष्टनाग असे म्हणतात.
भारतीय संस्कृतीत वृक्ष, वेली, झाडे, प्राणी वगैरे सर्वांनाच देवत्व दिले आहे. याचे कारण या सर्व गोष्टी मानवाला उपकारक आहेत. काही वेळा माणूस भीतीने सुद्धा आपल्यापेक्षा वरचढ असणाऱ्या गोष्टींची पूजा करतो. सर्प हे शेती व्यवसायाला देखील उपकारक ठरतात. (उंदीर वगैरे खाऊन) या दोन्ही कारणांनी नागपूजन आले असावे.
— विद्याधर करंदीकर
Leave a Reply