नवीन लेखन...

नामदार गोपाळ कृष्ण गोखले

नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म ९ मे १८६६ रोजी झाला. गोपाळ कृष्ण गोखले हे भारतामधील ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांपैकी एक होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारत सेवक समाज या संघटनांचे ते आघाडीचे नेते होते. रत्नागिरी जिल्ह्यातील कोतळूक या खेड्यात जन्मलेल्या गोखले यांचे बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षणही येथेच झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे वडीलबंधू गोविंदराव यांनी स्वतःचे शिक्षण सोडून आणि त्यांच्या वहिनींनी स्वतःचे दागिने विकून केलेल्या त्यागामुळे त्यांचे उच्च शिक्षण कोल्हापूरचे राजाराम कॉलेज व मुंबईचे एलफिन्स्टन कॉलेज येथे होऊ शकले. १८८४ मध्ये बी.ए. पदवी घेऊन जानेवारी, १८८५ मध्ये पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली. पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्यत्व, फर्ग्युसन कॉलेजमध्ये अध्यापन, १८९५ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर फेलो म्हणून नियुक्ती असा प्रवास सुरू असतानाच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून त्यांचा सार्वजनिक जीवनात प्रवेश झाला. सार्वजनिक सभेचे सचिव म्हणूनही त्यांनी काही काळ कार्य केले. शेतकऱ्यांचे कर्ज, दुष्काळ व सावकारांचा त्रास आदी विषयांचा सखोल अभ्यास करून सरकारकडे निवेदने पाठवणे, त्याबाबत पाठपुरावा करणे-अशा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांविषयक करण्यात येणाऱ्या कार्यात त्यांनी शिस्त निर्माण केली. त्यामुळे त्यांच्या निवेदनांना सर्वत्र मान्यता मिळाली.

बाळ गंगाधर टिळक आणि त्यांचा राजकीय प्रवास एकाच व्यासपीठावरून सुरू झाला. लोकमान्यांना जहालवादी राजकारण मान्य होते तर गोखलेंनी मवाळवादाचा मार्ग स्विकारला. त्यांनी लोकशिक्षण, अस्पृश्यता / जातीव्यवस्था निर्मूलन, स्त्रीशिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य यांच्या माध्यमातून समाजकार्य केले. तत्कालीन इंग्रजी शासकांना समजेल अशाप्रकारे त्यांनी समाज सुधारणा मांडल्या आणि त्या मान्य करून घेतल्या. १९०२ साली त्यांची निवड मध्यवर्ती कायदेमंडळावर झाली. या निवडीचा त्यांनी पूर्णपणे उपयोग केला आणि विविध समस्यांना तसेच प्रश्नांना वाचा मिळवून दिली. या दरम्यान त्यांच्यातील क्षमतेची दखल घेऊन तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांनी नामदारांना १९०९ सालच्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचा मसुदा तयार करण्यास सांगितले.

त्यासाठी ते इंग्लंड येथे वास्तव्य करून होते. त्या दरम्यान त्यांनी तेथील पार्लमेंटच्या सदस्यांना भेटून भारतातील समस्या आणि प्रश्न त्यांच्या कानी घातले आणि त्याकारणी त्यांचा पाठिंबा मिळविण्यात यशस्वी झाले. १८८९ मध्ये काँग्रेसच्या व्यासपीठावर केलेल्या पहिल्या भाषणापासून त्यांचा काँग्रेसशी संबंध प्रस्थापित झाला. आयुष्याच्या अखेरीपर्यंत ते काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. काँग्रेसचे ते राष्ट्रीय पातळीवरील नेते म्हणून गणले जात. डिसेंबर, १९०५ मध्ये बनारस येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांनी काँग्रेसचे कार्य भारतात व इंग्लंडमध्येही केले. भारताच्या सेवेसाठी तरुण त्यागी, निष्ठावान कार्यकर्ते घडवण्याच्या उद्देशाने १३ जून, १९०५ रोजी त्यांनी भारत सेवक समाजाची (The Servants of India Society) स्थापना केली. मुंबई प्रांताच्या विधिमंडळाचे सभासदत्व, सन १९०२ पासून मध्ये केंद्रीय कायदेमंडळाचे सभासदत्व अशी अनेक मानाची पदे त्यांनी भूषविली. ते प्रदीर्घ काळ केंद्रीय कायदे मंडळाचे सभासद होते. सभागृहात अर्थसंकल्पावरील भाषणे गाजविणे हा तर त्यांचा हातखंडा होता. ते भारतातील पहिल्या श्रेणीचे अर्थतज्ज्ञ होते. त्या काळी भारतातील ब्रिटिश राज्याच्या वाढत्या खर्चाची चौकशी करण्यासाठी लॉर्ड वेल्बी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या आयोगासमोर गोखले यांची साक्ष अतिशय महत्त्वाची ठरली होती.

या बुद्धिमत्तेच्या व गाढ व्यासंगाच्या आधारे दिलेल्या साक्षीमुळे त्यांचे नाव महाराष्ट्रात किंवा भारतातच नव्हे, तर परदेशातही प्रसिद्ध झाले. न्यायमूर्ती रानडे यांच्या आर्थिक व राजकीय विचारांचा गोखले यांच्यावर विशेष प्रभाव होता. ते न्यायमूर्ती रानडे यांना आपल्या गुरुस्थानी मानत; तर गोखले यांच्या अंगी असलेल्या शुचिता, नैतिकता, तत्त्वनिष्ठता, सौजन्यशीलता व नि:स्वार्थी सेवावृत्ती आदी गुणांनी प्रभावित होऊन महात्मा गांधीजी त्यांना (गोखले यांना) गुरुस्थानी मानत असत. गांधीजी त्यांना ‘महात्मा गोखले, धर्मात्मा गोखले’ म्हणत. भारतात सर्वप्रथम कायद्याचे राज्य, शांतता, सुव्यवस्थेचे प्रस्थापन, आधुनिक विचारांचे केलेले बीजारोपण, देशात केलेल्या अनेक सुधारणा यांमुळे इंग्रजी सत्तेविषयी त्यांचे धोरण मवाळ होते. कोणतीही चळवळ कायद्याच्या चौकटीतून करणे, स्वदेशीच्या वापरातून आपल्या देशातील उत्पादनास चालना देऊन आर्थिक उद्दिष्ट साध्य करणे असे त्यांचे विचार असत. गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केलेल्या ’सुधारक’ च्या इंग्रजी आवृत्तीची जबाबदारी नामदार गोखले यांनी काही काळ सांभाळली.

सार्वजनिक सभा, राष्ट्रसभा समाचार या वृत्तपत्रांतूनही त्यांनी लेखन केले. वृत्तपत्रातील लिखाणाद्वारे ते समाजसुधारणांचा सतत पाठपुरावा करत. ‘राजकारणाचे आध्यात्मिकरण’ ही अतिशय वेगळी (परंतु कोणत्याही स्तरावरील, क्षेत्रातील राजकारणात सर्वकाळ अत्यावश्यक असणारी) संकल्पना त्यांनी भारतात मांडली. राजकारण हे साधन शुचितेला महत्त्व देऊन, सेवाभावाने करायचे विशेष कार्य आहे , असे त्यांचे ठाम मत होते. चारित्र्य, नैतिकता, नि:स्वार्थी वृत्ती या सद्गुणांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, स्वतःचे आदर्श उदाहरणही तत्कालीन नेत्यांसमोर व जनतेसमोर ठेवले. १९०५ साली त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली.नामदार गोखले यांच्या स्मरणार्थ पुणे शहरात ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अॅन्ड इकॉनॉमिक्स’ नावाची संस्था स्थापन करण्यात आली. ते संपूर्ण आयुष्य राजकारणात राहूनही ’राजकारण’ न करता विशुद्ध सार्वजनिक जीवन जगले नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे १९ फेब्रुवारी १९१५ निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..