(गझलनुमा गीत)
रंग तुझा सावळाच, नांव पांडुरंग कसें ?
लक्ष भक्त पाहतात लक्ष तुझे रंग कसे ?
हात कटीवर ठेवुन विटेवरी स्तब्ध उभा
रूप तुझें ठायिं ठायिं तरि भक्तांसंग कसें ?
रौद्र ऊन थंडी वा मुसळी पाऊस असो
दुर्लक्षुन ऋतु, नामीं वारकरी दंग कसे ?
नाचतात वैष्णवजन, देहभान विस्मरुनी
वेड असें लावतोस भक्तांना, सांग, कसें ?
फक्त स्वानुभवानेंच आकळतें हें मनुजा –
‘पांडुरंग’ नाम मना आणतसे झिंग कसे ।।
दामाजीचा ‘महार’, नाथांचा श्रीखंड्या
विठुराया, नित्यनवें वठवतोस सोंग कसें ?
पंढरिच्या भेटीनें भीमा बनते ‘गंगा’
नवल नसे – अमृत बनती तिचे तरंग कसे ।।
बह्मांडाहुन विशाल तूं, धूलिकणच मी
तरि वसशी मम हृदयीं, फेडूं तव पांग कसे ?
शीश तुझ्या चरण नत, पुरव हेंच मागणें –
शिकव – ‘जन्ममृत्युचक्र करायचें भंग कसे’ ।।
— सुभाष स. नाईक
पंढरीचा राणा
Leave a Reply