नवीन लेखन...

नाबाद ५०० ….

१० मार्च २००१ ही गडकरी रंगायतनची तारीख कार्यक्रमासाठी नक्की केल्यावर अतिशय वेगाने कामाला सुरुवात झाली. अनेक नामवंत कलाकार कार्यक्रमाला येणार होते. त्यामुळे प्रायोजकही मिळाले. गिरीश प्रभू, अजय दामले, अमेय ठाकुरदेसाई, सागर टेमघरे आणि इतर वादक कलाकार मित्रांबरोबर रात्रीच्या रिहल्सल सुरू झाल्या. अनेक कार्यक्रमांच्या आठवणी आणि गिरीशचे हास्यविनोद यात अनेक रात्री रंगल्या. कार्यक्रमाची तारीख उजाडली. ज्येष्ठ संगीतकार दत्ता डावजेकर यांनी अध्यक्षस्थान भूषवले तर लोकप्रिय गायक अजित कडकडे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. संगीतकार यशवंत देव, प्रभाकर पंडित, कौशल इनामदार, गायक रविंद्र साठे, मिलींद जोशी, गायिका रंजना जोगळेकर, मनीषा पवार, विनायक जोशी, संगीतकार सलील सावरकर, अभिनेते प्रदीप पटवर्धन, अतुल परचुरे, आमच्या ठाणे भारत सहकारी बँकेचे अध्यक्ष मा.य. गोखलेसाहेब आणि उपाध्यक्ष उत्तमराव जोशी असे अनेक नामवंत कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. संगीतकार यशवंत देव यांनी नेहमीप्रमाणेच आपल्या खुमासदार शैलीत भाषण केले. ‘माझी पत्नी करुणा देव आणि मी अनिरुद्धला आमच्या घरचाच सदस्य मानतो. तो गाण्याचा अर्थ नीट समजून मग गातो. त्यामुळे माझ्या अनेक रचना त्याच्या आवाजात लोकप्रिय झाल्या आहेत.’ यशवंत देवांचे हे आपुलकीचे शब्द ऐकून माझे डोळे पाणावले. कार्यक्रमाचे निवेदन वासंती वर्तक यांनी केले. कार्यक्रमाला माझी आई उपस्थित होती. तिच्या प्रोत्साहनामुळे आणि मदतीनेच मी गाण्याच्या क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यामुळे आज ती अत्यंत आनंदात होती. भाऊंची अनुपस्थिती मात्र मला फार जाणवत होती. माझ्या पहिल्या कार्यक्रमाला सभागृहात प्रेक्षक किती असतील याची काळजी भाऊ करत होते. आज ५००व्या कार्यक्रमाला गडकरी रंगायतनच्या ११०० सीटस् हाऊसफुल असून अनेक रसिक प्रेक्षक आणि कार्यकर्ते दोन्ही बाजूला उभे होते. माझ्या गाण्याला रसिक प्रेक्षकांनी दिलेला हा उदंड प्रतिसाद पाहून ते नक्कीच सुखावले असते. पण त्याचबरोबर मला नक्की म्हणाले असते, अनिरुद्ध ५०० कार्यक्रम झाले म्हणून फार खूष होऊ नकोस. पुढील ५०० कार्यक्रमांच्या तयारीला केव्हा बसायचे?

५०० कार्यक्रम पूर्ण केल्यावर मला विश्रांतीसाठी एक दिवसही मिळाला नाही. कारण १० मार्च २००१ रोजी ५००वा कार्यक्रम केल्यावर दुसऱ्याच दिवशी, म्हणजे ११ मार्च २००१ रोजी ठाण्यातील सुप्रसिद्ध कर्नावट क्लासेसच्या श्री. कर्नावट यांच्यासाठी रेझॉर्ट हॉटेल, अक्सा बीच, मुंबई येथे गझलचा कार्यक्रम मी सादर केला. १५ मार्च २००१ रोजी लायन्स क्लबसाठी शांग्रिला रिसॉर्टस्, शहापूर येथे गझलचा कार्यक्रम झाला. एका आठवड्यातच २३ मार्च २००१ रोजी कवी कुसुमाग्रज यांच्या गाजलेल्या कवितांवरील ‘कुसुमांजली’ हा कार्यक्रम आम्ही सादर केला. कार्यक्रमाचे संगीत सलील सावरकर याने केले होते.

– अनिरुद्ध जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..