पूर्वीच्या काळी खेडयातील संध्याकाळ म्हणजे गुरे… वासरे परत घरी येण्याची वेळ,पाखरांचे थवे परतीच्या मार्गावर… वेशीपाशी शहाडा वाजवला जायचा आता तर हा शहाडा म्हणजे काय हाच प्रश्न पडेल कारण जुन्या हया परंपरा आता लोप पावत चालल्या आहेत नव्याचे वारे वाहत आहे. शहाडा वाजवणे म्हणजे एक प्रकारची हलगी नित्यनेमाने सायंकाळी गावातील देवासमोर वाजवली जायची.अशा वेळी पारावर खेळणाऱ्या मुलांना आनंद व्हायचा अन ती आनंदानं नाचू लागायची,मग त्या हलगी वाजविणाऱ्या व्यक्तीच्या अंगात उत्साह यायचा अन तो जोरजोरात हालगी वाजवायचा. मग पारावर दिपमाला दिवे अंगावर लेऊन सजायच्या जसा जसा अंधार दाटून यायचा तशा तशा या दिपमाळा अधिकच उजळ होत जायच्या. असंच साधारण पणे खेडयामधून चित्र दिसायच.
परवा सहजच संध्याकाळच्या वेळी गावाहून येता येता गोदावरी काठी थोडा वेळ थांबलो.ताडकळस आणि पालम या दरम्यान धानोरा (काळे) या ठिकाणी गोदावरी नदीवर मोठा पूल बांधण्यात आला आहे. तिथे थोडा वेळ काम नसतांना ही रेंगाळलो पुलावरून खाली पाहिले असं काही मनोहर दृश्य दिसलं की मला पूर्वीच्या काळच्या दिपमाला ची आठवण झाली संध्याकाळ म्हणजे दिवे लागणीची वेळ, त्यातल्या त्यात त्यात दूरवरून झगमगणारे हे दिवे पाहिले जी माणसाला अधिकच आनंद होतो. खरं तर या प्रकाशात काय जादू असते हे कळत नाही पण अंधारात एकदम प्रकाश आला जी अगदी लहान थोरांना सुध्दा आनंद होतो. काही जण तर आपोआपच टाळ्या वाजवतात.तसाच मलाही हा झगमगीत प्रकाश पाहून आनंद झाला.
या पुलाच्या आजूबाजूला नदीच्या पात्रात काही मंडळीनी वीट भटट्या सुरू केलेल्या आहेत एक बाजू दूर पर्यंत अशी या विट भटटयानी व्यापली आहे. अन संध्याकाळ होताच येथिल दिवे लागलेले असतात लगेच बाजूच्या पाण्यात त्या दिव्याचे प्रतिबिंब पडल्यामुळे हे दृश्य अगदी मनोहारी दिसते. कारण अर्ध्या पात्रात हीच वसाहत निर्माण झालेली आहे पूर्वीच्या काळी असं काही दृश्य पाहिल्याचं आठवत नाही हल्ली विटाची मागणी अधिक वाढल्यामुळे की काय त्याचा हा परिणाम असावा एवढ्या मोठ्या प्रमाणावर हया विटभट्टया सुरू झालेल्या आहेत शहरामध्ये सिमेन्ट काँक्रीटचे जंगल तयार होत आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणावर विटभट्टया झालेल्या आहेत मोठमोठे पैसेवाले रोज या व्यवसायामध्ये उतरत आहेत. प्रचंड प्रमाणात नदीच्या परिसरातील माती वापरून या विटा तयार केल्या जातात.त्यामुळे नदीचे पात्र अगदी उथळ होत चालले आहे .त्याच्या जोडीला वाळू उपसा चालतो अन नदीचे पात्र हे पात्र रहातच नाही त्याचा सारा आकार बदलून तिथे एका भेसूर राक्षसासारखे भयान खडडे पडलेले दिसून येतात.
नदीचे पात्र म्हणजे आजपर्यंत सर्वांना सामावून घेणारे पात्र होय.कोणीही येवो जसाही येवो त्याला काहीच बंधन नाही.लोकांच्या अंत्यविधीपासून ते पिंड सोडण्यापर्यंत अन घर बांधण्यापासून ते नळाच्या पाण्यापर्यंत आपल्याला नदीच असते.संस्कृती मध्ये आपण नदीला खूप मोठे स्थान दिलेले असले तरी प्रत्यक्ष रूपात मात्र आपण नदीचा उपयोग सकाळची सुवासिक सुगंधी फुले काढण्यासाठी करत आहोत. ते ही क्षम्य मानले तरी नदीचे रूप बदलणारे हे विटांचे कारखाने एवढया मोठया प्रमाणावर चालू राहिले तर नदीला काठच राहणार नाही असे वाटते.कारण सारी माती मोठया प्रमाजावर खोदून वापरली जात आहे जेमतेम हिवाळयापर्यंत सुध्दा नदीच्या पात्रात पाणी रहात नाही.
माणसांचा सध्या निसर्गावर एवढा घाला चालू आहे का त्यामुळे माणसांचे अस्तित्व धोक्यात येत आहे याची पुसटशी कल्पना सुध्दा माणसांना येत नाही.हे नदीच्या पात्रातलं मोहक रूप सुरूवातीला जरी सुंदर वाटलं मनाला आनंद वाटला तरी परंतु जवळ जाऊन पाहिल्यास अगदी भकास आणि क्रूरतेने हे काम चालू असतं. याचा कोणीही विचार करत नाही केवळ स्वतःच्या क्षणिक सुखासाठी घडपड चाललेली आहे. रात्रीच्या वेळी पहायला जितकं चांगलं वाटतं तेवढंच दिवसाच्या उजेडात या ठिकाणी पाहिल्यावर अधिक दुःख वाटतं शेकडो मजूर गाव सोडून उदरनिर्वाहासाठी येथे विटा करतात त्यांच्या लहान लहान मुलांचं बालपण मात्र या पात्रातील पाण्याप्रमाणे आटून जातं.रात्री चमचम चमकणारे पाण्यात दुप्पट होऊन दिसणारे सर्व दिवे सकाळच्या उजेडात मात्र विझतांनाची फडफड करत असल्यचा क्षणभर भास होतो.शाळेत शिकणारी छोटी छोटी मुलं या कामावर विटा उचलायला राहतात सारं जीवन भकास होऊन जातं अन इकडे आपला चालू असतो ग्रामीण विकास.हा कसला विकास अन ही कसली आपली बांधकामाची हौस.आपण विटा अन वाळू नदीपासून घेतो अन त्या बदल्यात नदीला काय देतो तर आपल्या सांडपाण्याची गटारं,कचऱ्याचे मोठमोठाले ढिगारे ,मलमुत्रचं विसर्जन.एकेकाळी पवित्र असणारी गंगा आज मलिन आणि अपवित्र करून टाकली आहे माणसांनी. झाडं तर नदीकाठी राहिलीच नाहीत नदीच्या काठी नव्हे अगदी पात्रात सुध्दा वसाहती निर्माण करण्याची लोकांची तयारी आहे.असेच जर चालू राहिले तर या विटभट्टया मुळे नदीचे पात्र ओळखता सुध्दा येणार नाही.फक्त पाणी वाहून गेल्याच्या खुणा शिल्लक राहतील तेव्हा.
आजच परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी त्यावर बंधनं घालायला पाहिजे त्यावर नवनवीन पर्याय काढायला हवे विटानां सुध्दा अनेक पर्याय उपलब्ध आहेत त्याचा वापर वाढवणे गरजेचे आहे. या नदीपात्रात विटभट्ट्या टाकणं यावर सुध्दा बंधनं आणायला पाहिजे.याकडे लक्ष वेधलं गेलं पाहिजे आपल्या संस्कृती मधील पवित्र असणाऱ्या नदीचे रूप रंग आकार आपण जपायला हवे.तिची शुध्दता तिची स्वच्छता याकडे लक्ष पुरवले पाहिजे.ओळखता सुध्दा येणार नाही.फक्त पाणी वाहून गेल्याच्या खुणा शिल्लक राहतील तेव्हा. आजच परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी त्यावर बंधनं घालायला पहिजे त्यावर नवनवीन पर्याय काढायला हवेपण आज कुठेही असे घडत नाही वरून सुंदर वाटणारं हे नदीचं रूप अंर्तबाहय सुंदर झालं पाहिजे. तिच्या आसपास सारा आनंदी आनंद असावा . कुसुमाग्रजाची ती कविता अगदी सार्थ ठरेल.
नदीबाई माय माझी
डोंगरात घर
लेकरांच्या मायेपोटी
येते भूमीवर
नदी बाई जल साऱ्या
तान्हेल्यानां देई
कोणी असो कसा
असो भेदभाव नाही
संतोष सेलूकर ,परभणी
7709515110
Leave a Reply