श्रावणाच्या महिन्यात आपण नाग पंचमीचा सण साजरा करतो. हल्लीच्या काळीं त्या उत्सवासाठी सर्प-नाग यांना कसें वागविलें जातें, हा एक सामाजिक तसेंच animal-rights चा विषय आहे. तो महत्वाचा आहेच, पण प्रस्तुत लेखात आपण तिकडे वळणार नाहीं आहोत. या लेखाचा focus आहे, या सणामागच्या पार्श्वभूमीसंबंधीची चर्चा करणे, हा.
- नाग ( Cobra) हे सरपटणारे प्राणी उंदरांना खातात. उंदीर हा शेतकर्यांचा शत्रू. तो धान्य खातो, धान्याची नासाडीही करतो. म्हणून, उंदराचा शत्रू नाग याची पूजा, असा समज आहे. तें योग्य असेलही. पण मग प्रश्न असा उठतो की फक्त नागच नव्हे, तर सापही उंदरांना खातात. मग, असें असूनही, फक्त ‘नाग-पंचमी’च कां, ‘सर्प-नाग-पंचमी’ , असें कां नाहीं ? कांहीं पक्षीही उंदरांवर झडप घालून त्यांना पकडून खातात; त्यांचा समावेश या सणात कां नाहीं ? यावर अधिक चिंतन करतांना, जें दिसून येतें, त्याची आपण येथें चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्याला बरेच मागें जावें लागतें, अगदी ‘आर्यां’च्या सुरुवातीच्या काळापर्यंत ; आणि आपण ‘नाग’ नामक जमातीबद्दलची माहिती पहाणार आहोत.
- ‘आर्य’ नांवाची कुठलीही एक जमात / टोळी ( tribe) नव्हती, हें आतां सर्वमान्य झालेलें आहे. प्राचीन भारतात, ‘आर्य’ हें संबोधन म्हणून वापरलें जात असे. पण, १९ व्या शतकापासून कांहीं विशिष्ट जमातींना ‘आर्य’ असें संबोधलें गेलें, व त्यामुळे ‘Indo-Aryans’ हा शब्दप्रयोग रूढ झाला. आजही वैदिक काळाबद्दल संशोधन करणारे व लिहिणारे लोक, ‘आर्य’ शब्दाचा वापर, ‘एक विशिष्ट जनसमूह’ या अर्थानें करतात ; आणि, तें म्हणजे, स्वत:चें विवेचन समजणें सोपें जावें म्हणूनच . त्यामुळे, व केवळ त्यामुळेच, आपणही या लेखात, ‘आर्य’ असा या जनसमूहाचा उल्लेख करणार आहोत.
- आर्यांचें मूलस्थान भारतच, की ते बाहेरून आले, हाही एक मोठा चर्चेचा विषय बनलेला आहे. आपण येथें त्याही प्रश्नात शिरणार नाहीं आहोत. मात्र, उत्तर-वैदिक काळात, ‘आर्य’ या नावांखाली गणले जाणारे ‘पुरु’, ‘यदु’, ‘इक्ष्वाकु’, ‘तुर्वसु’ , ‘अनु’, ‘द्रह्यु’, वगैरे अनेक ‘जनसमूह’ या भूभागात ( भारताच्या उत्तर भागात, वायव्य भागात, व कांहीं पूर्व भागापर्यंत ) वसत होते, हें खरें आहे. परंतु, त्याव्यतिरिक्त इतरही जनसमूह / टोळ्या या भूभागात , किंवा त्याजवळच वसत होत्या, जसें की Astro-Asian मुंडा जमाती, ‘नाग’ नामक जमाती वगैरे.
- रामायणाचा संदर्भ घेतला तर आपल्याला ‘शबर’ ( ‘भिल्ल’ या सारखी ) जमात दिसते, ‘वानर’, ‘ऋक्ष’ (अस्वल) , ‘गृध्र’ (गिधाड) , यासारख्या जमातीही दिसतात. हे सर्व प्राणी नव्हते, तर , (डी. डी. कोसांबी यांनी प्रतिपादन केलें आहे, त्याप्रमाणें), ही माणसेंच होती, आणि ‘नाग’ ‘वानर’ वगैरे त्यांचे Totems होते. सीताहरण करून चाललेल्या रावणाशी युद्ध करणारा जटायु हाही माणूसच होता. पुढे महाभारत-काळात, कृष्णाचें जांबुवंत या ऋक्षराजाशी २१ दिवस मल्लयुद्ध झालें होतें. हा जांबुवंतही एक माणूसच होता. त्याचप्रमाणें ‘नाग’जन म्हणजे माणसेंच होती.
- कद्रुपासून उत्पन्न झालेले कश्यपांचे वंशज ‘नाग’ म्हणून ओळखले जात. त्यांची ८ कुलें होती – वासुकी, तक्षक, कुलक, कर्कोटक, पद्म, महापद्म, शंखचूड , व धनंजय ; आणि हे नाग-जन हिमालयीन ( व उत्तर भारत) भागात वसत होते. ( संदर्भ – बृहत् प्रामाणिक हिन्दी कोश ) . याचा अर्थ असा की नागांच्या विविध टोळ्या होत्या, आणि त्यांतील कांहीं टोळ्या आर्यांच्या तत्कालीन वसतीस्थानांच्या आसपास वसत होत्या.
- महाभारत-कालात ‘नागांचा बराच उल्लेख आहे. याच काळात आर्यजन आणि नागजन यांचा अधिक संपर्क आला व संघर्ष झाला. त्या कालात, नगरांमध्ये ‘आर्यजन’ रहात होते , म्हणजेच, संस्कृतिक अर्थानें , ‘सुधारलेले’, ‘पुढारलेले’ असे लोक. आधुनिक युगात बंगालमध्ये ‘भद्र’ लोक म्हणून जसे उच्चभ्रू लोक गणले जातात, तसेंच, त्याकालीं हे ‘आर्यजन’. वनांमध्ये इतर जमाती / टोळ्या वसत होत्या. वन म्हणजे अरण्य नव्हे. वन म्हणजे, नगराच्या बाहेरील underdeveloped भूभाग, जिथें वृक्ष, वनस्पती, शेतें, कुरणें वगैरे असत. वनांमध्ये ऋषींचे आश्रमही असत, व मृगयेसाठी आलेले नृप त्यांना भेटतही असत. रामाचा ‘वनवास’ याचाही खरा अर्थ हाच होता. चित्रकूट हा भाग ‘वन’ होता, अरण्य नव्हे. नंतर, राम ‘दंडकारण्य’ या दक्षिणभागातील अरण्यात गेला. पांडवांचा वनवासही असाच होता. त्या कालात त्यांना हस्तिनापुरवासी भेटतही असत. दुर्योधनानें केलेली ‘घोषयात्रा’ ही अशा वनामधीलच होती, जिथें चित्रांगद गंधर्वाशी त्याचा संघर्ष होऊन ,दुर्योधनाचा पराभव झाला होता, व त्याच भागात ‘वनवासासाठी’ रहाणार्या पांडवांना त्याची मदतही करावी लागली होती. यक्ष, किन्नर, गंधर्व यासुद्धा अन्य जमातीच होत्या. ‘नाग’ ही जमात वनांमध्ये रहात असे. अर्जुन ‘नागलोका’त गेला, म्हणजे नाग-जनांची वस्ती असलेल्या भूभागात गेला ; त्यानें नागकन्या उलूपीशी विवाहही केला.
- महाभारतकाळात, जेव्हां नगरवासी आर्यजनांना expand करायचें होतें, तेव्हां साहजिकच त्यांचा ‘नागां’शी संघर्ष झाला, व त्यांत , अधिक पुढारलेल्या नगरजनांनी या ‘नागां’ना तेथून हुसकून लावलें.
कृष्णानें ज्याचें ‘मर्दन’ केलें, (त्याचा वध केला नाहीं), तो ‘कालिया’ हा असाच नागवंशीय होता. गोकुळातील गोपांचा व्यापारी-संबंध मथुरेतील नगरजनांशी होता. गोपांना आपल्या वाढत्या गुरांसाठी नवीन व हिरव्या कुरणांची गरज होती, व त्यामुळे तेथील नागवंशीयांना हुसकून लावणें क्रमप्राप्तच होतें. त्यामुळे कालिया ‘नाग’ व त्याची टोळी तो भाग सोडून निघून गेले. आणि, त्यामुळेच गोपांना अल्प काळानंतर गोकुळातून वृंदावन येथें स्थलांतर करणें शक्य झालें. वृंदावन या शब्दात ‘वन’ अंतर्भूत आहे, हें ध्यानीं घ्यावें. वृंदा म्हणजे तुळस. तेथें तुलसी-वन होतें. (आजही आपण ‘तुलसी-वंदावन’ हा शब्द वापरतो. त्यात अर्थातच, द्विरुक्ति आहे).
नंतर, जेव्हां पांडवांना हस्तिनापुर राज्यामधील अर्धा भाग मिळाला, तेव्हां त्यांना आपली नवी राजधानी वसविण्यासाठी विस्तृत जागेची आवश्यकता भासली. त्यामुळे, कृष्णार्जुनांनी खांडववन जाळलें व तेथील नागांना हुसकून दिलें. वन जाळण्याची कारणें दोन : एक म्हणजे तेथें वसणारे नाग-जन स्वत:च्या सुरक्षिततेसाठी व प्राण वाचवण्यासाठी आपोआपच तेथून बाहेर पडतील ; आणि दुसरें म्हणजे नगर वसवण्यासाठी वन जाळून, ‘रिकामा’ भूभाग तयार करणें आवश्यकच होतें. साहित्यात, हें कृष्णानें केलें, तें कृष्णार्जुनांनी केलें, असा जो उल्लेख असतो, त्याचा अर्थ असा की, त्यांच्या नेतृत्वाखालील चमूनें तें कृत्य पार पाडले.
महाभारतकाळातच, तक्षक या ‘नागा’नें ( म्हणजेच, तक्षक नामक टोळीतील एकानें) अर्जुनाचा नातू परीक्षित याचा ‘वध’ केला. त्यामुळे, परीक्षिताचा पुत्र जनमेजय यानें नागसत्र केलें, म्हणजेच, नागांचा उच्छेद (genocide) केला. ऋषि अगस्त्यानें जर मध्यस्थी केली नसती, तर त्या सर्व भूभागातील नागावंशीयांचा समूळ नाशच झाला असता, पण तसें सुदैवानें झालें नाहीं. कदाचित् अगस्त्यानें जनमेजयाला वचन दिलें असेल त्यामुळे , किंवा आपला सर्वनाश होऊं नये म्हणून, त्यानंतर नागवंशीय इतरत्र पांगले.
अशाच ‘पांगण्याच्या’, इतिहासकालीन अन्य घटनाही आपल्याला दिसतात. रोमनांनी गॅलिली-ज्युडिया या ज्यूंच्या भूभागावर कब्जा केल्यानंतर अनेक दशके, विविध ज्यू groups त्यांच्याशी संघर्ष करतच राहिले. परंतु इ.स. ७० च्या सुमारास जेव्हां त्यांना फार मोठी हार स्वीकारावी लागली, त्यानंतर ते इतरत्र पांगले, अन् तेही असे पांगले की जवळजवळ दोन हजार वर्षांनी, १९४८ सालीं, ते आधुनिक-काळात ‘ईस्त्राइल’ मध्ये पुन्हां एकत्र येऊं शकले.
अमेरिकन (USA) ‘सिव्हिल वॉर’नंतरच्या काळात, म्हणजे साधारणपणें १८६५-१८७० पासून ते २०च्या शतकाची सुरुवातीची एक-दोन दशके या काळात, अमेरिकेतील पश्चिमेकडील भागात, युरोपमधून स्थलांतरित व पूर्व भागातून पश्चिमेकडे मायग्रेट करणारे ‘व्हाइटस्’ व अमेरिकेतील ‘Native’ (मूळ रहिवासी) ‘रेड इंडियन्स’ टोळ्यांच्या (ज्यांना आतां ‘अमेरिकन इंडियन्स’ म्हणतात) बर्याच लहानमोठ्या लढाया झाल्या. अर्थातच सरकारचा पाठिंबा ‘व्हाइटस्’ना होता , व यामुळे अमेरिकन आर्मीही नेटिव्ह रेड इडियन्सशी लढली. शेवटी ‘रेड इंडियन्स’ना स्थलांतरित होऊन ‘रिझर्वेशन्स’वर रहायला जावें लागलें, स्वत:च्या मूळ-प्रदेशापासून ते दुरावले.
- ‘नाग-वंशीयांच्या संदर्भात इतिहासाचार्य राजवाडे सांगतात की (बरेच) नागवंशीय जन दक्षिणेत, आज ज्याला ‘महाराष्ट्र’ असें अभिधान आहे, त्या भूभागात येऊन वसले. त्या गोष्टीचें प्रमाण आहे, नागोठणें, नागपुर, नागझरी, नागाव, इत्यादि स्थलनामें ; व नागोजी, नागनाथ, नागेश, नागेशकर, नागे , नागवे, नागवेकर, वगैरे व्यक्तिनामें/ उपनामें. ‘वा’ हा उपसर्ग आपल्या ओळखीचा आहे, जसें की ‘जोगवा’, ‘भगवा’. ‘नागडा’ म्हणजे ‘वस्त्रहीन’ हा अर्थ कदाचित संदर्भानें आला असावा, कारण की हे स्थलांतरित नागजन आपलें सर्वस्व ( जें काय थोडेंफार होतें, तें) मागे सोडून आलेले होतें, त्यामुले त्याच्याकडे सगळ्या गोष्टींची वानवाच असणार. (आजही आदिवासी पुरुष केवळ लंगोटीवर असतात). (अर्थात्, इथें माझा, ही आडनांवें असलेल्या व्यक्तींचा उपमर्द करण्याचा ज़राही उद्देश नाहीं; मी फक्त पुरातनकालीन परिस्थितीचें विवेचन करत आहे). आजही मराठी-हिंदी वगैरे भाषांमध्ये ‘डा’ हा उपसर्ग तुच्छतादर्शक म्हणून वापरला जातो, जसें की ‘भिक्कारडा’. हिंदीतली एक म्हण पहा – ‘घर का जोगी जोगडा, बाहरका जोगी सिद्ध’. आजही वस्त्रहीन साधूंना ‘नागा साधू’ (म्हणजे ‘नंगा साधू’ म्हटलें जातें. ते वस्त्रहीन स्थितीतच रहातात) . हा ‘नागा’ शब्द ‘नाग’पासूनच उद्.भवलेला आहे, (सं. – उपरोक्त प्रामाणिक कोश ). डॉ. प. वि. वर्तक ( एका अन्य संदर्भात ) लिहितात की, त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, तमिळमध्ये ‘डा’ हा उपसर्ग कनिष्ठतादर्शक आहे.
आजही हिंदीभाषी प्रदेशात ‘नागा’ हा शब्द आणखी एका अर्थानें वापरला जातो. तो एक अर्थ आहे, ‘वह दिन जिसमें किसीने काम न किया हो, या काम पर उपस्थित न हुआ हो’. ( सं.- उपरोक्त प्रामाणिक शब्दकोश). अशा अर्थाचा हा ‘नागा’ शब्दसुद्धा ‘नाग’ या शब्दापासूनच आलेला आहे. याचा अर्थ आपल्याला असा घेतां येईल की, नागजनांचा जेव्हां सुरुवातीच्या काळात आर्यांशी संबंध आला, तेव्हां आर्यांना ते unreliable व कामचोर वाटले. ( खरें तर, त्या काळात नागजन आर्यजनांची कामें कां म्हणून करतील ? पण, आपल्या प्रतिद्वंद्व्याला, कमी लेखायची, ‘वाईट’ मानण्याची प्रवृत्ती असतेच).
- व्ही. एस्. आपटे यांची Sanskrit-English Dictionary ‘नाग’ या शब्दाचे जे बरेच अर्थ देते, त्यातील एक आहे, ‘A cruel or tyrannical person’ ; आणि दुसरा अर्थ आहे, ‘Any pre-eminent or distinguished person’. मला असें वाटतें की हा अर्थबदल कालौघात झालेला आहे.
असा अर्थबदल कालौधात शक्य आहे, हें आपल्याला आणखी एका उदाहरणावरून दिसून येते.ऋग्वेदाच्या सुरुवातीच्या काळातील ऋचांमध्ये ‘देव व असुर हे एकच आहेत, असुर हे देवांचे ज्येष्ठ बंधूच आहेत’ असे उल्लेख मिळतात ; पण ऋग्वेदातीलच नंतरच्या काळातील ऋचांमध्ये असुरांना वाईट म्हटलेलें आहे. याउलट, ‘अवेस्ता’ हा पारसांचा धर्मग्रंथ देवांना वाईट म्हणतो. ).( संदर्भ – Zarathrushtra and His Contemporaries – By S. K. Hodivala ). इथें, ‘देव’ म्हणजे एक जमात आहे. (‘देव’ म्हणजे ईश्वर , अथवा स्वर्गलोकात वसणारे देवजन, हा अर्थ भारतात ऋग्वेदीय रचनांच्या बर्याच काळानंतर निर्माण झालेला आदी) . याचा अर्थ असा की आधी ‘देव’ आणि ‘असुर’ या जनसमूहांचे आपसातील संबंध सौहार्दाचे होते, पण नंतरच्या काळात त्या दोघांत संघर्ष झाला. म्हणजेच, जसे सामाजिक संदर्भ बदलतात, त्याप्रमाणें एकाच (same) शब्दाचा अर्थ बदलूं शकतो, अगदी आधीच्या उलटही बनूं शकतो.
कुबेराचें धन ‘नाग’ सांभाळतो, या traditional belief च्या मागे हाच अर्थ दिसतो की, इतर समाजात सामावल्यानंतर, प्रथमत: नागजनांची ‘धनवानांचे रक्षक’ (रखवालदार) म्हणून नेमणूक झाली. त्यानंतरच्या कांहीं काळात नागजन स्वत:ही प्रतिष्ठित, धनवान बनून, धनदैवत कुबेराचे representatives झाले. हा बदल कालौघात झाला.
राजवाडे सांगतात की ९६ कुळी मराठ्यांची कांहीं आडनांवें नागवंशावरून आलेली आहेत. हरिवंश सांगतो की नागपुरात नागांची वस्ती होती. ऐतिहासिक काळातही, त्या भागात ‘आदिवासी’ राजांचें राज्य असल्याचे उल्लेख आहेत. याचा थोडक्यात अर्थ असा की, नागांच्या स्थलांतराच्या कांहीं काळानंतर, अशा (स्थलांतरित) भूभागांमध्ये , या नाग-जनांना संमिश्र समाजात प्रतिष्ठा प्राप्त झाली. अशोक पुरशुराम सावे लिहितात की, शिंदे ( सिंधे) शेषवंशी समाजात नागमूळ असण्याची शक्यता आहे. ( संदर्भ – ‘महिकावतीची बखर ऊर्फ मुंबई-साष्टी-ठाणें प्रांताचा मध्ययुगीन इतिहास’ ).
- इतरत्रही आपल्याला ‘नाग’ अशी नांवें सापडतात, जसें की स्थलनामें अनंतनाग, नागदा, नागार्जुनकोंडा. ( अनंतनाग या शब्दातच हें स्पष्ट आहे की, या भागात अनेक नाग-टोळ्या वसत होत्या). व्यक्तिनामें / उपनामें पाहिली तर, कर्नाटक व बंगालमध्ये आजही ‘नाग’ हे आडनांव प्रचलित आहे. नागराज / नागराजन् , नागेश्वर राव, अशी नांवेही प्रचलित आहेत. उत्तर भारतात ‘नागरथ’ असें आडनांव आहे. (संगीतकार रोशन यांचें आडनांव नागरथ होतें).
उत्तर भारतात नागौरी असें एक आडनांव आहे. शब्दकोश सांगतो की, तें ‘नगर’ या शब्दापासून बनलेलें आहे. ( ‘नगर’शी संबंधित शब्द ‘नागरी’ à नागौरी) , पण मला ही शक्यता वाटते की तें नांव ‘नाग’ शब्दाशी संबंधित असावें. (नाग + अरि = नागारि à नागौरी . जर ‘नागरी’चें नागौरी होऊं शकत असेल, तर ‘नागारि’ चें ‘नागौरी’ व्हायला कांहींच हरकत नाहीं). ‘अरि’ हा अंतिम प्रत्यय असलेली नांवें भारतात ऋग्वेदीय काळापासून दिसून येतात. तसेंच, शंकराचें ‘त्रिपुरारि’ हे नांवही प्रसिद्धच आहे.
भारताच्या सुदूर-पूर्व भागात ‘नागालँड’ राज्य आहे, व तेथील टोळीला ‘नागा’ , म्हणजेच ‘नाग’ हें नांव आहे. ( १८व्या -१९व्या शतकात, अंतिम ‘अकारा’चा पूर्ण उच्चार दर्शविण्यासाठी Latin लिपीत शब्दाच्या शेवटी ‘a’ जोडत असत, जसें की ‘Rama’, ‘Krishna’, ‘Ramayana’, Harivamsa’ वगैरे ; तसेंच हे, ‘नाग’चे Latin Script मध्ये इंग्रजांनी केलें ‘Naga’). हे सुदूर पूर्वेचे ‘नागा’ Mogoloid वंशाचे असून ब्रह्मदेश-भागातून आलेले आहेत ( इति इरावती कर्वे). पूर्वीच्या काळीं भारतीय संस्कृती ब्रह्मदेश, मलाया, कंबोडिया, लाओस, इंडोनेशिया वगैरे भागांमध्ये पसरलेली होती. त्यामुळे, सुदूर-भारतातील (‘नागालँड’मधील) या ‘टोळी’चें ‘नागा’ हें नांव असणें, ही नवलाची गोष्ट नव्हे.
जातां जातां , याचीसुध्दां नोंद घ्यावी लागेल की भारताबाहेर पश्चिमेकडेही हे ‘नाग’ महाभारतकाळानंतर पसरले. भारताचा, मध्यपूर्वेतील भूभाग, उत्तर-आफ्रिका वगैरेंशी व्यापारी संपर्क त्याकाळापूर्वीपासूनच होता, त्यामुळे ‘नागां’ना तिकडे स्थलांतर (immigration) करणें शक्य झालें. बाबाराव सावरकर यांनी त्यांच्या पुस्तकात, डॉ. भांडारकर यांचा दाखला देऊन, प्रतिपादलेलें आहे की बायबलच्या Old Testament (जुना करार) यामधील ‘नागाश’ चा अर्थ ‘नाग’ असा आहे. आपण याचा असा अर्थ घ्यायला हरकत नाहीं की, नाग हें Totem असलेले ‘नाग’वंशीय त्या भूभागात स्थलांतरित झालेले होते, व ते नंतर तेथील समाजात मिसळून गेले.
- या सर्व विवेचनाचा अर्थ नागपंचमीच्या संदर्भात आतां आपण पहाणार आहोत.
पुन्हां अमेरिकेचें (USA) उदाहरण पाहूं या. १९व्या शतकाच्या अखेरच्या कांहीं दशकांत जरी whites व पश्चिम-भागातील रेड इंडियन्स् यांच्यात संघर्ष झाला ; तरीही whites ही गोष्ट विसरलेले नाहींत की १६व्या शतकाच्या अखेरीस-१७व्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हां त्यांचे immigrant-पूर्वज अमेरिकेच्या पूर्व-किनार्यावर उतरले, त्या काळात पूर्व-किनार्यावरील native रेड-इंडियन्सनी त्यांना मदत केली होती, व दोन्ही गटांचे संबंध सौहार्दाचें होते. त्याची आठवण म्हणून अमेरिकेत आजही ‘Thanksgiving Day’ साजरा केला जातो. हे ‘व्हाइट’ अमेरिकनांनी रेड इंडियन्सना दिलेले ‘धन्यवाद’ आहेत.
अमेरिकेचा ( USA) इतिहास तर केवळ चारएक शतकांचा आहे. या काळातही जर असा सण मानला जायला लागूं शकतो, व साजरा होऊं शकतो, तर मग कांहीं सहस्त्रकांचा इतिहास असलेल्या भारतात (व त्यातील महाराष्ट्रात ) असा सण साजरा होणें ही नवलाची गोष्ट नव्हेच.
अर्थात्, भारतात अमेरिकेपेक्षा वेगळें घडलें, याचें कारण, भारताचा इतिहास हा काहीं सहस्त्रकांचा आहे. हे immigrant ‘नाग’वंशीय जन कांहीं काळानंतर महाराष्ट्रात , व इतर भागांमध्ये, समाजात मिसळून गेले (जसें की, भारतातील शक, कुशाण, हूण , व भारतात-राहिलेले ग्रीकसुद्धा मिसळून गेले), व संमिश्र समाज तयार झाला. या संमिश्र समाजात, कांहीं नागवंशीय तर अति-प्रतिष्ठितही झाले. आणि अशा संमिश्र बनलेल्या संस्कृतीत, नागवंशीयांचा सण , जो की त्यांचें Totem ‘नाग’ याची पूजा, म्हणजेच ‘नागपंचमी’, हा सण , सर्व तत्कालीन समाजानें स्वीकारला. अन्, तो आजही सर्व जनतेकडून उत्साहात साजरा केला जातो.
अशा प्रकारच्या बदलाचें एक महत्वाचें उदाहरण आहे, गौतम बुद्ध. बौद्धमत हें वैदिक पंथाच्या विरुद्धचें आहे. पुरातन काळीं, ‘नास्तिकदर्शनें’, (म्हणजे वेदांना प्रमाण न मानणारी दर्शनशास्त्रें) जी दिलेली आहेत, त्यांत बौद्धमताचा समावेश होतो. कांहीं शतकें तर वैदिकजन व बौद्धजन यांच्यात वितुष्ट होतें ; तें इतकें की अशोकाच्या काळीं बौद्ध-धर्माला राजाश्रय मिळाल्यानंतर अनेक वैदिक जनांनी मध्यदेशातून (western UP) इतरत्र, खासकरून महाराष्ट्र-भागात स्थलांतर केलें (इति राजवाडे). हें सगळें घडलेलें असतांनाही, आणखी कांहीं काळानंतर गौतम बुद्ध हा विष्णूचा ‘नववा अवतार’ मानला जाऊं लागला. ‘सनातन वैदिक धर्मा’नें स्वत:च्या-बाहेरील ‘मता’ला (बौद्ध-धर्माला) व त्या ‘मता’च्या अनुयायी-समाजाला स्वीकारल्याचें हें उत्तम उदाहरण आहे.
श्रीकांत तलगेरी त्यांच्या ‘The Rigveda and Avesta : The Final Evidence’ या ग्रंथात सांगतात,
‘… Hinduism itself represents …. a Pan-Indian religion which has Vedic tradition …. , but also incorporates elements and traditions from all the different parts of India, within itself, even when some of these elements may represent originally rival traditions. And all these elements and traditions are equally intrinsic parts of Hinduism, and totally acceptable as such to the traditional Hindu. इथें उल्लेखलेल्या, ‘Inclusive-परंपरां’चा अर्थ सामाजिक संदर्भात महत्वाचा आहे.
निष्कर्ष असा की, अशा प्रकारें ‘नागपंचमी’ या सणामागील अर्थ, प्रागैतिहासिक व ऐतिहासिक काळाच्या उदरात जाऊन, शोधतां येतो ; आणि तसेंच, across-the-board सर्व-समाजात या सणाला मान्यता कां आहे, हेंही आपल्याला समजतें.
— सुभाष स. नाईक
Subhash S. Naik
Leave a Reply