नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः ।
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः अणताः स्म ताम् ।।
अलिबाग जवळील नागाव या अष्टागरातील अलिबाग
-रेवदंडा रस्त्यावरील गावी सुप्रतिष्ठीत असलेले
दक्षिणाभिमुखी श्री महाकालीचे देवस्थान भक्तजनांना
अतिशय श्रध्देय असणारे जागृत देवस्थान आहे. देऊळ चौसोपी असून भक्तांच्या वंदन पूजन, अर्चन, भजन, किर्तन, पादसेवन आदि सेवांच्या परिपूर्तीसाठीच मुख्यत्वे बांधलेले असल्यामुळे त्याची रचना, उभारणी अतिशय साधी आहे. देवळाचा अलिकडेच जिर्णोध्दार करण्यात आला आहे. हे करताना देवळाच्या मूळ धाटणीत बदल करण्यात आलेला नाही. देऊळ आंग्रे कालीन (वा कदाचित त्या पूर्वीपासून) अस्तित्वात असावे असे पुरावे उपलब्ध आहेत. नागावातील आंग्रे कालीन मंदिरे झापांनी शाकारलेली असत. त्याप्रमाणे हे देऊळ त्या काळी झापांनी शाकारलेले असणार. त्यानंतर नळीच्या कौलांनी व आज मंगलोरी कौलांनी देऊळ संरक्षिलेले आहे.
दक्षिणेकडील दरवाजाने देवळात प्रवेश केल्यावर समोरच श्री महाकाली जगदंबेचे प्रसन्नवदन दर्शन घडते. मुख्य देवता श्री महाकाली व परिवार देवता यांची प्रतिष्ठापना देवळाच्या पश्चिमेकडील अंतर्भागात चार भरीव सागवानी कोरलेल्या सुशोभित खांबांनी परिवेष्टित चौकोनी दालनात उलट्या काटकोनी आकाराच्या उभ्या आडव्या चौथऱ्यावर करण्यात आली आहे. हा चौथरा दगड, सिमेंट, विटा यांनी बांधलेला व ग्रॅनाईट, ग्लेझिंग टाईल्स यांनी सुशोभित केला आहे. हे देवळाचे गर्भागार म्हणता येईल परंतु याचे स्वरूप इतर मंदिरात विशेषतः शिवमंदिरात असणाऱ्या गाभाऱ्यासारखे नाही. येथे मोकळ्या परिसरांत भरपूर उजेड व प्रसन्न वातावरणांत देव दर्शन, अर्चन भक्तांना होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
देवळातील मुख्य देवता श्रीमहाकाली ही दक्षिणाभिमुखी आहे. देवीची मुळ मूर्ती चतुर्भुज असून ती शेंदूरचर्चित आहे. तिचा एक हात वरद असून एका हातात वाटी आहे. पायाखाली मर्दन केलेला राक्षस आहे. आख्यायिका सांगतात देवीच्या मूर्तीची स्थापना प्रथम दक्षिण दिशेहून अन्य दिशा सन्मुख करण्यात आली होती. परंतु श्रीदेवीने पुन्हा पुन्हा दक्षिणाभिमुखी स्थापित होण्याचा सुस्पष्ट कौल दिल्यामुळे त्यानुसार तशी प्रतिष्ठापना करण्यात आली. हे दक्षिणाभिमुखी रुप अत्यंत जाज्वल्य मंगलमय व भक्तांच्या मनोकामना परिपूर्ण करणारे मानले जाते.
श्रीदेवीच्या उजव्या बाजूस अंबा, लिंबा, काळंबा व योगेश्वरी या लहान परिवारदेवता व श्रीमहालक्ष्मी ही प्रतिरुप देवता या प्रतिष्ठापित आहेत. परिवारात प्रथमस्थानी श्रीगणरायाची काळ्या संगमरवरातील सुबक मुर्ती व बाजूला काळ्या संगमरवरातीलच शिवपार्वतीचे मूर्तीयुग्म विराजमान आहेत.(श्री गणराया व श्री शिवपार्वतीच्या पूर्वीच्या शेंदूरचर्चित मूर्ती जीर्ण झाल्यामुळे त्यांच्या जागी या नव्या संगमरवरी मूर्तीची अलिकडेच प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.) श्री महाकाली श्री महालक्ष्मी यांचे नित्य दर्शन मळवट भरलेले मुखवटे साड्या फुले यांचा साज चढवून दिले जाते. आश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रौत्सवात श्रीगणराय श्री शिवपार्वती व परिवारदेवता यांच्यासह सर्व देवतायनास दर्शनासाठी अत्यंत सुबक कलात्मक रीतीने नाना प्रकारच्या सुंदर सुवासिक पुष्पांनी भरजरी पैठण्या नेसवून सजविले जाते. श्रीदेवी परिवाराचे हे साज चढविलेले रुप इतके देखणे व मोहक दिसते की त्याचे पुन्हा पुन्हा दर्शन घेऊनही समाधान होत नाही. हा अनेक भक्तांचा अनुभव आहे. रुप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी अशी भक्तांची स्थिती होते.
शारदीय नवरात्रौत्सवात देवळात वीधिपूर्वक घटस्थापना केली जाते. आंग्रे काळापासून नागावात पिढ्यानपिढ्या नांगावच्या चिटणीस परिवाराची श्री महाकाली कुलस्वामिनी असल्यामुळे चिटणीस परिवारात अन्यत्र वेगळी घटस्थापना केली जात नाही. देवस्थानाच्या स्वामित्वाचे व पूजा वहिवाटीचे हक्क चिटणीस परिवारांतील व्यक्तीच्या स्वाधीन आहेत. तसेच श्रीदेवी ही चिटणीसांची कुलस्वामिनी आहे. त्यामुळे घटस्थापना नवमीचे हवन, दसरा उत्सव, दीपोत्सव आदि देवळातील नैमित्तिक पूजा, उपचार धार्मिक कार्ये उपाध्याकरवी चिटणीस परिवारातील व्यक्तींच्या हस्ते सिध्द होत असतात. नित्य दर्शन, पूजन, अर्चन या सेवासांठी मात्र देऊळ मुक्तपणे सार्वजनिक आहे. मूळचे नागावचे मथुरे कुटुंबियही श्रीदेवीला आपली कुलदेवता मानतात या व्यतिरिक्त नागावातील खळे, डबीर, हटाळकर, कुळकर्णी, गुप्ते, पटवर्धन, महाजन, कुंटे, पुराणिक, वाड, मोडक, आढवले, बर्वे, आपटे, फडके, वैद्य, म्हात्रे, मोहिते, गुरव, राऊळ, नाईक, क्षीरसागर आदी कुटुंबेही श्रीदेवीला आपले उपास्य दैवत मानतात. किंबहुना, श्रीदेवी उपासना हा सर्वच नागावकरांचा कुळाचार झाला आहे. आजही नागावातील अनेक कुटुंबामध्ये श्रीदेवीला नैवेद्य दाखविल्याविना दुपारचे भोजन ग्रहण केले जात नाही.
देवळाच्या पूर्व भागातील सुशोभित कोरलेल्या खांबांनी परिवेष्टित चौकोनी दालन हे देवळाचे सभागार आहे. देवलातील किर्तन, भजन, भक्तीगीत गायन, गोंधळ यासारखे कार्यक्रम येथे याच दालनाच्या मध्ये हवनकुंड आहे. ते नित्य एका चौकोनी ग्रॅनाइटच्या लादीने बंद केलेले असते. हवनाच्या वेळी लादी दूर करून हवनकुंड सिध्द केले जाते. देवळात भजन, किर्तन यासारखे कार्यक्रम नित्य होत नसले तरी दर्शनासाठी भक्तांचा ओघ सतत चालू असतो. प्रतिदिनी देवळांत ब्राह्मणाकडून सप्तशतीच्या पाठाचे (जप) वाचन करविले जाते. दर मंगळवार, गुरूवार व एकादशी यांच्या रात्री स्थानिकांच्या भजनांचे कार्यक्रम होतात. पूर्वी दर मंगळवारी वैदिकांकडून मंत्रपुष्पांजली करविली जात असे. सांप्रत, ब्राह्मण उपलब्ध होत नसल्यामुळे होम नसल्यामुळे तसेच आस्थाही नसल्यामुळे हा परिपाठ बंद झाला आहे.
देवळांत आश्विनातील शारदीय नवरात्रौत्सव अतिशय उत्साहाने श्रध्दा, भक्तिपूर्वक साजरा केला जातो. देवळांत विधीपूर्वक घटस्थापना केली जाते. देऊळ सुंदरपणे कलात्मकरित्या सजविले जाते. सर्व देवतायनास भरजरी वस्त्रे लेववून, दागिन्यानी, विविध सुवासिक पुष्पांनी भूषवून दर्शनास सिध्द केले जाते. सकाळपासून रात्रीपर्यंत देऊळ व परिसर भक्तांनी फुलून गेलेला असतो. आंगणात पुजासाहित्य विक्रेतेही लहान प्रमाणावर भक्तांच्या सेवेसाठी उपस्थिती लावतात.
पूर्वी उत्सवात प्रतिपादेपासून एकादशीपर्यंत प्रतिरात्री स्थानिक किर्तनकाराकरवी सुश्राव्य कीर्तन करविले जात असे. आजकाल स्थानिक किर्तनकार उपलब्ध होत नसल्यामुळे हा कार्यक्रम केवळ एकादशीच्या लळिताच्या कीर्तनापुरता मर्यादित करावा लागला आहे. उत्सवात स्थानिक भजनी मंडळीचे भजनाचे कार्यक्रम दररोज होतात. अष्टमीच्या रात्री महालक्ष्मी पूजनाचा घागरी फुंकण्याचा कार्यक्रम सुवासिनी मोठ्या उत्साहाने करतात. नवरात्रौत्सवातील कार्यक्रमांना भक्तजनांची अलोट गर्दी उसळलेली असते. नवमीला घटस्थापना व सकलशास्त्रपूर्वक सप्तशतीचे हवन होऊन उत्सवाची सांगता होते. दिवाळीत देवळाच्या प्रांगणात दीपोत्सव व त्रिपुरारी पौर्णिमेस दीपमाळेवर त्रिपुरदीप प्रज्वलन केले जाते.
उत्सव काळात भक्तांच्या उत्साहाला, भक्तीभावाला अक्षरशः उधाण आलेले असते. व आसमंत नामघोषानी दुमदुमून गेलेला असतो.
देवी उपासना ही शक्तिची उपासना आहे. समाजांत चैतन्य निर्माण होण्यासाठी ती प्रोत्साहित प्रसारित व्हावयास पाहिजे. त्या परब्रह्मरुपीणी आदिशक्तीच्या कृपेने सर्वत्र सुख, शांती, समृध्दी नांदो अशी प्रार्थना आहे.
इन्द्रियाणामधिष्ठात्री भूजानां चाखिलेषु या ।
भूतेषु सततं तस्यै त्याद्यौ देव्यै नमो नमः ।।
चितिरूपेण या कृत्स्नमेतद्वयाप्य स्थिताजगत् ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमोनमः ।।
सुधाकर शां. चिटणीस,
नागांव, अलिबाग
कायस्थ वैभव 2011 या अंकातून संकलित
संकलक : शेखर आगसकर
Leave a Reply