सुनीता माझी धाकटी बहीण. माझ्यापेक्षा फक्त दोन वर्षांनी लहान. लहानपणापासून दादा दादा म्हणून सारखी माझ्यामागे असते. आता ती दहावीला आणि मी बारावीला आलो तरी तिला माझ्याशिवाय करमत नाही. भांडेल, रुसेल पण शेवटी सुनीलदादा म्हणून लाडीगोडी करायला येणारच.
माझ्या वडिलांची फिरतीची नोकरी. दर दोन तीन वर्षांनी बदल्या ठरलेल्या. मग नवीन गाव, नवीन शाळा, नवीन मित्र अशी मजा असायची. पण या बदल्यांमुळे आम्हांला मित्र असे फारसे कुणी मिळालेच नाहीत. जरा ओळख होते ना होते तो बाबांची बदली. मग सुनीताला आणि मला आम्हीच एकमेकांना मित्र मैत्रीण, भाऊ-बहीण सगळं शाळेत किंवा घरी, गल्लीत खेळताना तिला कुणी बोललं तर मला खपत नसे. मुळात मी डबल हाडापेराचा. वयाच्या मानानं जरा मोठा दिसणारा. सुनीताची कुणी खोडी काढली तर मी त्याला चांगला बुकलून काढीत असे. सुनीतावर माझे जिवापाड प्रेम आहे.
आता आम्ही मोठे झालो. त्यामुळे लहानपणी सारखे मारामारी वगैरे करीत नाही. पण सुनीताला कुणी काही त्रास दिला तर मला अजूनही खूप संताप येतो.
आम्ही दोघेही हुशार. सतत मेरिटमध्ये, सुनीताने तर पहिला क्रमांक कधी सोडला नाही. शिवाय वक्तृत्त्व, गाणी, संगीत, नाट्य, नृत्य या सर्व प्रकारांची तिला आणि मलाही फार आवड. शाळेच्या सर्व स्पर्धामध्ये आम्ही बहीण-भाऊ हमखास बक्षिसं पटकावणार हे ठरलेलं. पण आमच्या या हुशारीचं आणि कलागुणांचे चीज व्हायचं तर पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरातच होणार. त्या दृष्टीने बाबांची पुण्या-मुंबईला बदली व्हावी म्हणून खटपट चालली होती. आईपण आता या सततच्या बदल्यांना कंटाळली होती. आणि एके दिवशी बाबा घरी आले तेच पेढ्यांचा पुडा घेऊनच! आमचा आनंद तर गगनात मावेनासा झाला. आमच्या डोळ्यांसमोर नवीन कॉलेज, नवीन करिअर यांची सुंदर स्वप्ने तरळू लागली.
बाबा लगेचच मुंबईला रुजू झाले. एका मित्राकडे तात्पुरती सोय झाली, तो डिसेंबर महिना होता. आमच्या परीक्षा एप्रिल अखेर आटोपणार होत्या. तोपर्यंत मुंबईला जागेची खटपट करायचे ठरले तशी त्यांची शोध मोहिम चालू झाली. सरकारी जागा मिळण्याची आशा नव्हती. कारण प्रतिक्षा यादीच खूप मोठी होती. मुंबईला खाजगी जागा भाड्याने मिळणे अवघड होते. ज्या मिळत होत्या त्या पसंत नव्हत्या आणि ज्या पसंत होत्या त्यांची भाडी परवडण्यासारखी नव्हती. आम्ही त्यांच्या फोनची आणि पत्रांची आतुरतेने वाट पहात असू.
मार्च महिना संपत आला. पण अजून जागा मिळण्याचे लक्षण दिसेना. आमची बेचैनी वाढत होती आणि पुन्हा बाबांना नशिबाने हात दिला. त्यांच्या ऑफिसमधल्याच एका ओळखीच्या माणसांकडून त्यांना समजले की ठाण्याला एक चांगली जागा भाड्याने मिळते आहे. त्यांच्यासारख्याच एका सरकारी नोकराची. त्याने आपल्या मुलासाठी ती घेतली होती. पण मुलाला परदेशांत चांगली ऑफर आल्यामुळे तो तिकडे गेला होता आणि चार-पाच वर्ष तरी परत येणार नव्हता. त्यामुळे ते गृहस्थ चांगल्या ओळखीच्या भाडेकरूच्या शोधात होते. बाबांनी लगेच आम्हाला बोलावून घेतले. जागा सगळ्यांनाच पसंत पडली आणि एप्रिलमध्ये आम्ही ठाण्याला नवीन जागेत दाखल झालो.
कॉलनी फार छान होती. सात आठ सोसायट्यांची मिळून एक छोटी कॉलनी
होती. चांगली वस्ती, सर्व सोयी सुविधा जवळ, शांत वातावरण, मेन रोडपासून थोडी आत, जवळ एक देऊळ, एक महिलामंडळ आणि एक छोटीशी बागही होती समोरच. विशेष म्हणजे कॉलनीचे एक मित्र मंडळ होते. आणि ते गणेशोत्सव, दिवाळी इयर ऐंड असे कार्यक्रम करत. मला आणि सुनीताला अशा कार्यक्रमांची खूप आवड. आम्ही लगेचच मित्र मंडळाचे सभासद झालो. बाबांचे रुटीन चालू झाले, दुकानदार कामवाली, गॅस वगैरे सर्व सुरळीत चालू झाले. आम्हालाही आता कॉलेजमध्ये अॅडमिशन्स मिळाल्या. आता पुन्हा बदली झाली तरी ठाणे सोडायचे नाही. इथेच स्थायिक व्हायचे असे आई बाबांनी ठरवून टाकले. बदली झालीच तर बाबा एकटे जाणार. आता त्यांची नोकरी पण चार पाच वर्षच राहिली होती. सगळं अगदी मनासारखं झालं.
कॉलनीच्या समोरचा छोटा रस्ता आणि मेनरोड यामधे एक चिंचोळा जागेचा पट्टा होता. मेनरोड पुढे जाऊन रेल्वे पुलाला आणि हायवेला जाऊन मिळत. हायवेकडे जाताना पुलाच्या उंचीमुळे वर जात होता. त्यामुळे या चिंचोळ्या पट्ट्याच्या एका बाजूस छोटा कॉलनी रस्ता आणि दुसऱ्या बाजूस मेनरोडची उतरती भिंत यामुळे एक प्रकारची बंदिस्तता आली होती. याचाच उपयोग करुन नगरपालिकेने तिथे एक छोटी बाग तयार केली होती. या बागेच्या एका कोपऱ्यात एक चौथरा केला होता. त्यावर पत्र्याची शेड टाकली होती. हेच मित्रमंडळाचे स्टेज. शिवाय उतार भिंतीच्या बाजूला बागेच्या सामानाची कोठी खोली होती. तिचे छप्पर उतार भिंतीच्या कठड्याच्या उंचीवर म्हणजे मेनरोडच्या फुटपाथपासून सुमारे तीन फुटावर येत होते. या कॉक्रिटच्या छतावरच एक पत्र्याची शेड करुन एक खोली केली होती. ती आजूबाजूच्या गरजू मुलांसाठी अभ्यासिका म्हणून वापरीत. ही खोली आणि स्टेज नागेशराव म्हणून स्थानिक नगरसेवकाने त्याच्या फंडातून बांधून दिले होते. फुटपाथवरुन तीन चार पायऱ्या चढून या अभ्यासिकेत जाता येत होते. तसेच खालच्या बागेतूनही वर यायला एक लोखंडी जिना होता. मित्र मंडळ ही खोली कार्यक्रमांच्या तयारीसाठी काही दिवस वापरत असे. रात्री बारानंतर ती बंद करीत.
गणेशोत्सव जवळ आला तशी मित्रमंडळाने एक बैठक बोलावली. मी आणि सुनीताही आवर्जून गेलो. वयाच्या मानाने मी थोराड दिसायचो. सुनीताचेही व्यक्तिमत्त्व आकर्षक आणि अंगात नेतृत्त्व गुण. शिवाय अशा कार्यक्रमाची आम्हाला सवय त्यामुळे पहिल्याच बैठकीत आमची चांगली छाप पडली आणि आमच्या उत्साहाने कार्यक्रमाची जबाबदारी भंडळाने आमच्यावर सोपविली.
नव्या नवलाईचा उत्साह आणि सुनीताची हौस यामुळे मीही तिला पाठिंबा दिला. आता सुनीताची जबाबदारी ती माझीच झाली. सुनीतावर माझे जिवापाड प्रेम. हा कार्यक्रम गाजवायचाच असे मी ठरवले.
कार्यक्रमांची रुपरेखा, कलाकारांची नावे, वेळापत्रक, सामानाची जुळवाजुळव अशा एक ना अनेक गोष्टींचे तपशील ठरले. सुनीताने या वर्षी एक चांगली एकांकिका करायचे ठरवले. कार्यक्रमाची आखणी पूर्ण झाली आणि तालमी सुरु झाल्या. सगळ्यांचीच महत्त्वाची वर्ष असल्यामुळे रोज थोडी थोडी तयारी करायची, शनिवार -रविवार जास्त वेळ द्यायचा असे ठरले. प्राथमिक तयारीत काही दिवस गेले.
–विनायक अत्रे
Leave a Reply