तालमी सुरु झाल्या पण म्हणावी अशी गती येत नव्हती. जसजसा गणेशोत्सव जवळ येऊ लागला. तसतसे वातावरण तापू लागले. शेवटी परीक्षा जवळ आल्या म्हणजे जसं आखलेलं वेळापत्रक बाजूला पडतं आणि दिवस रात्र अभ्यास चालू होतो तसंच झालं. आजपर्यंत हा नाही आला, तो नाही आला अशी टंगळमंगळ चालू होती. ती जाणवू लागली. ज्यांचे स्वतंत्र कार्यक्रम होते त्यांचा फारसा प्रश्न नव्हता. पण ज्यांचे सहकार्यक्रम होते. त्यांना एकत्र जमणे आवश्यक होते. नाटिका तयार करणाऱ्यांना तर आता एकत्र जमून तालमी करणे गरजेचे होते. आम्हाला आता वेळ कमी पडू लागला. तालमींची वेळ हळूहळू वाढत चालली होती. रात्री सात आठपर्यंत चालणाऱ्या तालमी आता दहा दहा बाराबारा वाजेपर्यंत आटपेनात. आता सगळ्यांनाच एक प्रकारची झिंग चढू लागली होती. अगदी झपाटून गेले होते सगळे.
कार्यक्रम ठरवताना उत्साहाच्या भरात आपण एक नाटिका बसवू असे सुनीता म्हणाली खरी पण येवढे मोठे आव्हान कसे झेपणार याचे तिला त्यावेळी भान राहिले नाही. आणि आता मात्र ही जबाबदारी सोपी नाही हे आमच्या लक्षात आले. पण सुनीताची जिद्द दांडगी. तिचे आकर्षक आणि लाघवी व्यक्तिमत्त्व आणि नेतृत्त्व गुण यामुळे तिची चांगली पकड बसली होती. आमचा ग्रुपही फार छान जमला होता. सोसायटीतील मंडळीही क्रियाशील होती. सेक्रेटरी, चेअरमन वगैरे मंडळींचा चांगला पाठिंबा होता. इतकेच नाही तर तालमी संपेपर्यंत अगदी कितीही उशीर झाला तरी त्यांच्यापैकी कोणीतरी आमच्या सोबतीला थांबत. त्यामुळे घरच्या लोकांनाही काळजी वाटत नसे. हसत खिदळत, थट्टा मस्करी करत आमच्या तालमी चालत.
एके दिवशी सुनीताने ठरवले की आज कितीही उशीर झाला तरी चालेल पण नाटिकेची एक तरी रिहर्सल सगळ्यांनी मिळून करायचीच. त्या इराद्याने सगळे झटत होते. रात्रीचे एकदोन वाजायला आले पण कोणाच्याही लक्षात आले नाही. शेवटचा प्रवेश ऐन रंगात आला, अशातच कानावर कर्कश आवाज आदळला! सगळे एकदम गप्प झाले! भ्यासिकेच्या फुटपाथच्या बाजूला दोन तीन मोटर सायकली थांबल्याचा तो आवाज होता.
आता यावेळी कोण आले? सगळे तिकडे पहात असतानाच तीन-चार माणसांचे मोठमोठ्याने हसणे खिदळणे ऐकू आले आणि त्या मागोमाग अभ्यासिकेचे दार ढकलून ती चार माणसे आत घुसली.
त्यांच्या देहबोलीवरून ते नशेत असावेत असे दिसत होते. त्यांच्या गळ्यांत राजकीय पक्षाचे पुढारी कार्यकर्ते घालतात तसे रंगीत उपरणे होते.
हो, ते स्थानिक पुढारीच होते! त्यांना पाहताच आज तालमीसाठी थांबलेले नंदनवन सोसायटीचे चेअरमन पानसेकाका एकदम खुर्चीवरून उठले आणि म्हणाले,”या, या नागेशराव या, बसा! बघा आपले मित्रमंडळ काय काम करतेय ते.”त्यांनी घाईघाईने आपली खुर्ची त्यांना बसायला दिली आणि विचारले.
“काय साहेब, आज कसे काय इकडे आलात?”
“पानसेकाका, रात्री क्लबवरुन मी नेहमी याच रस्त्याने जातो घरी. इथे काही दिवे बिवे नसतात. आज दिवे दिसले आवाज आले म्हणून म्हटले कोण आहे पहावे म्हणून आलो. काय चाललंय पोरांचं?”
“साहेब गणपतीचे कार्यक्रम बसवताहेत मंडळी. आज थोडा उशीर झाला.”
‘चालू द्या, चालू द्या.” असे म्हणून नागेशराव बसला. तसे त्याच्याबरोबरचे दोघं तिघंपण बसले. नागेशरावाने सगळ्यांवरुन नजर फिरवली आणि सुनीताकडे नजर जाताच ती तिथेच थबकली. तो एकटक तिच्याकडे पाहू लागला. मला त्याचे ते तसे पहाणे खटकले. माझे त्याच्याबद्दल प्रथम दर्शनी काही चांगले मत झाले नाही. सुनीताला पण अवघडल्यासारखे झाले. अचानक आलेल्या या व्यत्ययामुळे तालीम थांबली होती. नागेश म्हणाला, “या कोण? नवीनच दिसतात.’
“हो नवीनच आहेत. सुनीता साठे त्यांचे नाव. त्याच या वर्षीचे कार्यक्रम बसवत आहेत.आमच्याच शेजारी राहतात.”
“अरे वा छान! आम्ही बसलो तर चालेल ना थोडा वेळ?”
“हो, हो. बसा की साहेब.” पानसेकाका म्हणाले. पण मनातून त्यांना वाटत होते की ब्याद इथून लवकर कटेल तर बरे. नंतर मला त्यांच्याकडून समजले की हा नागेशराव इथला नगरसेवक आहे. भानगडबाज आहे. त्याच्या नादी फारसं कुणी लागत नाही. गुंड प्रवृत्तीचा आहे. त्यात उपद्रव मूल्य फार असल्यामुळे कुणी त्याच्या भानगडीत पडत नाही. शिवाय बायकांच्या बाबतीत त्याचा लौकिक फार चांगला नाही म्हणजे माझे प्रथम दर्शनी त्याच्याबद्दल जे मत झाले होते ते बरोबरच होते. नंतर मुलांकडे वळून काका म्हणाले.
“मुलांनो आता आटपा पाहू लवकर, चला, बाकीची तालीम उद्या करू. चला फार उशीर झाला आहे.”
पण त्यावेळी मला किंवा सुनिताला नागेशरावाची ख्याती ठाऊक नव्हती. अचानक आलेल्या व्यत्ययातून आम्ही आता सावरलो होतो. सुनीता म्हणाली, “काका प्लीज, फक्त पंधरा वीस मिनिटात आटपेल सगळे, प्रवेश होऊद्या मग थांबवू आपण.’
“काका, त्या म्हणताहेत तर थांबा थोडावेळ, हां सुनीताबाई चालू द्या तुमचं काम.” नागेशरावाने दुजोरा दिला. त्याचे ते आगंतुक बोलणे मला आवडले नाही. शिवाय तो सतत सुनीतालान्याहाळत होता ते मला बिलकूल पसंत नव्हते. त्याच्या त्या आगंतुक सल्ल्याने सुनीताला पण जरा अवघडल्यासारखे झाले. तिलाही आता हे काम झटपट संपवावे असे वाटू लागले. पण तेवढ्यांत नागेशरावाला काय वाटले कोणास ठाऊक तो एकदम उठला आणि म्हणाला, “बरं येतो आम्ही, तुमचं चालू द्या.’ असं आणि त्याचे दोस्त जसे आले तसे तडकाफडकी निघूनही गेले!
सगळ्यांनीच सुटकेचा श्वास सोडला! एखादे जनावर किंवा नाग पहिल्यावर जसे घाबरायला होते तशीच त्या चौघांना पाहून सगळ्यांची अवस्था झाली होती. न बोलताही एखाद्याच्या नजरेतून आणि देहबोलीतून दुष्टपणाचा दरारा जाणवतो तसे त्यांना पाहून वाटले मला.
आम्ही घाईघाईने आटोपते घेऊन निघणार एवढ्यात नागेशराव पुन्हा आला. पण एकटाच. तालीम आटोपली हे पाहून तो म्हणाला, “अरे, संपलं वाटतं तुमचं काम. बरे सुनीताबाई चला मी सोडतो तुम्हाला. कुठं नंदनवनमधेच ना? चला मी त्याच बाजूला चाललोय चला आपली गाडी आहे.”
त्याचे ते आगंतुक आमंत्रण मला विचित्रच वाटले मी म्हणालो,
“छे छे नागेशराव आपण कशाला त्रास घेता. मी तिचा भाऊ आहे ना
तिच्याबरोबर. शिवाय हे पानसेकाका आहेतच. ते आमचे शेजारीच आहेत. त्यामुळे काही “काळजी नाही.
“अहो त्यात कसला त्रास? मी गाडी घेऊन आलोय. चला, भाऊ तुम्ही आणि काका तुम्ही पण चला. अहो मी पण त्याच बाजूला रहातो. चला.”
आता अगदी नाईलाजच झाला. मी काकांकडे पाहिले. ते म्हणाले, “सुनील चल एवढा आग्रह करताहेत तर जाऊ.” आम्ही तिघेही निघालो, गाडी बाहेरच फुटपाथच्या कडेला उभी होती. पुढचे दार उघडून ते सुनीताला म्हणाले, “सुनीताबाई तुम्ही बसा पुढे. हे दोघे बसतील मागे.” पुढच्या सीटस् वेगळ्या होत्या. जवळच जायचे होते. थोडक्यासाठी नाराजी नको म्हणून त्याच्या म्हणण्याला मान देऊन सुनीता पुढे बसली. वेगळ्या सीटस् असल्यामुळे काही अडचण नव्हती.
नागेशरावाने जोरातच गाडी काढली. पुलावरुन वळताना चुकूनच झाले असे दाखवून त्याने सुनीताचा हात दाबला! अगदी एक क्षणभरच पण त्या स्पर्शाने तिच्या अंगावर सरसरून काटा आला. माझे लक्ष होतेच. तिथल्या तिथेच त्याला बुकलून काढावे असे मला वाटले. नागेशने तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहून हसून म्हटले, “ओ! आय अॅम सॉरी! फारच जोरात वळली नाही गाडी! पण काळजी करू नका. हे पहा आलेच घरा”
त्याची गाडी वाकड्या वळणावर चालली आहे असे का कुणास ठाऊक पण मला वाटायला लागले होते. गाडी घरासमोर उभी राहिली. आम्ही घरी आलो. फक्त पाचच मिनिटे पण सुनीताला ती पाच वर्षासारखी वाटली. घरी गेल्यावर तिने नागेशरावाचे लागट वर्तन मला सांगितले. आम्ही ठरवले की आता या तालमी काही झाले तरी रात्री दहाच्या पुढे घ्यायच्या नाहीत. ही पीडा टाळायचा तोच मार्ग आम्हाला ठीक वाटला. झालेही तसे. त्यानंतर नागेशराव भेटला तो थेट गणपतीच्या कार्यक्रमाच्या बक्षीस समारंभात त्याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले तेव्हा. बक्षीस समारंभात त्याने सुनीताचे खूप कौतुक केले. त्यानंतर ते प्रकरण तिथेच संपले. आता पुन्हा ह्या कार्यक्रमांच्या फंदात पडायचे नाही. नाही असे मी व सुनीताने ठरवून टाकले आणि रोजच्या दैनंदिन कार्यक्रमात आम्ही ती घटना विसरूनही गेलो.
–विनायक अत्रे
Leave a Reply