नवीन लेखन...

नागेश मोरवेकर – एक प्रतिभावान लोककलाकार

डोळे मिटून भूतकाळाच्या विश्वात शिरलं , की अनेक गोष्टी, आठवणी, व्यक्ती, प्रसंग डोळ्यांसमोर लख्ख उभे रहातात. त्यासोबत जोडलेल्या अनेक गोष्टी फेर धरून नाचू लागतात. आनंद, दुःख, समाधान, अशा संमिश्र भावभावनांना स्पर्श करत एक छानसा फेरा पूर्ण होतो आणि पुन्हा एकदा मी वर्तमानकाळात अवतरतो.
अशीच एक आठवण माझ्या लहानपणीची, आमच्या घरमालकांकडे येणाऱ्या गणपतीची. ती आठवण होताच, नजरेसमोर येतो तो मालकांचा दिवाणखाना, वरती झुलणारी काचेची हंड्या झुंबरं, टेबलावर विराजमान झालेली बाप्पाची सुंदर सुबक मूर्ती, मुर्तीमागे असलेला मोठा थोरला नक्षीदार आरसा , त्याच्या चारही बाजूंनी पेटलेले लहान लहान दिवे, बाप्पासमोरची सुंदर आरास, मूर्तीसमोर एका बाजूला असलेला लाकडी सोफा आणि दुसऱ्या बाजूला तीन गोल पाठीच्या खुर्च्या.
गणपतीच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत माझा जेवणखाण सोडलं तर मुक्काम तिकडेच असे. मग घरातली एकेक माणसं नजरेसमोर उभी राहतात. या सगळ्यातच त्या खुर्च्यांवर बसलेली दोन शाळकरी मुलं दिसू लागतात , आणि मी जरा आणखी निरखून पहातो तेव्हा एक माझीच लहानपणीची मूर्ती दिसते, आणि दुसरं कोण बरं ? मनात विचार येतो. दोघे एकमेकांशी हलक्या आवाजात गप्पा मारताना दिसतात. आणि एकदम ओळख पटते..
घरमालकांचे थोरले जावई मोरवेकर , गणेशचतुर्थिसाठी सासुरवाडीला सपत्नीक आलेले असतात. त्यांच्या सोबत आलेला त्यांचा धाकटा भाऊ ….. होय तोच तो. नागेशच तो. तोच माझ्या शेजारी बसलेला दिसतो. आता ओळख पूर्ण पटते. होय , तोच नागेश मोरवेकर , जो पुढे एक लोकनाट्य कलाकार आणि लोकसंगीत गायक म्हणून नावारूपाला आला. पण मी सांगतोय तो नागेश या प्रसिध्दीपूर्वीचा. माझ्यासारखाच एक शाळकरी, लाजरा, बुजरा, चष्मा लावणारा. तो आला की मलाही आनंद व्हायचा , कुणीतरी गप्पा मारायला समवयस्क मिळाल्याचा. मलाही आजूबाजूला तसे फारसे मित्र नव्हते. अर्थात तो आनंद फार काळ टिकत नसे, कारण फार तर दीड दोन तास नागेश तिकडे असायचा. मनमोकळा हसणारा, चेहऱ्यावर मोकळा भाव असणारा, मितभाषी. नागेशचा लहानपणीचा चेहरा आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे. त्या वयात एकमेकांशी गप्पा मारताना, आम्हा दोघांनाही कल्पना नव्हती की भावी काळात हा माझा बालमित्र महाराष्ट्रातील तमाम संगीत रसिकांच्या मनावर आपल्या आगळ्या दाणेदार बुलंद आवाजाने गारूड करणार आहे. आपल्या अंगभूत अभिनयाने लोकनाट्याचा रंगमंच उजळवून टाकणार आहे .
१९७१ साली आम्ही दादर सोडलं आणि ठाण्याला राहायला गेलो. त्यानंतर नागेशची भेटही तुटली आणी फोन, मोबाईल या सोयी तेव्हा नसल्याने बोलणही थांबलं. दादर सोडल्यावरही काही वर्ष आम्ही गणेशचतुर्थीला मालकांकडे येत होतो. पण नागेशची भेट मात्र कधीच झाली नाही.
मध्ये अनेक घडामोडी घडल्या. शिक्षण आटोपून मी ही नोकरीला लागलो , पुढे लग्न झालं, मुलं झाली. थोडक्यात पुलाखालून बरच पाणी वाहून गेलं. या काळात नागेशने लोकनाट्य, लोकसंगीत क्षेत्रात मिळवलेलं नाव कानावर पडत होतं. या माणसाची आपली ओळख आहे याचा अभिमानही वाटत होता. मी हे कौतुकाने सगळ्यांना सांगतही होतो. लोकसंगीत क्षेत्रातील पोवाडे, गौळणी, भारुडं, लोकसंगीताचे अल्बम , चित्रपटात पार्श्वगायन ते अभिनय अशी नागेशच्या संगीत अभिनय प्रवासाची घोडदौड सुरू होती. लोकनाट्याला गरजेची असलेली सहजता, उत्स्फूर्तता नागेशमध्ये उपजतच आहे. त्याचे मोठ्ठे , बोलणारे डोळे, देहबोली आणि संवादफेक यामधून एक लोककलावंत सर्वांगाने आपल्यासमोर उभा रहातो. नागेशचा सहज वरच्या पट्टीत जाणारा टीपेचा आवाज ही एक खरोखर जादू आहे. त्याच्या सामान्य बोलण्यातून हे जराही जाणवत नाही. पण जेव्हा तोच आवाज वरच्या पट्टीत झेप घेतो त्या आवाजाची रेंज आपल्याला थक्क करून सोडते. गातानाही तो संपूर्ण शरीराने त्या गिताशी एकरूप होऊन जातो.
नागेशशी पुन्हा जोडलं जाण्यासाठी २०२० साल उजाडावं लागलं. मी ही साहित्य, काव्य क्षेत्रात आपल्या परीने मुशाफिरी करत होतो. मनात घर करून राहिलेल्या लहानपणीच्या त्या वास्तुबद्दल लिहिताना काही संदर्भ लागणार होते. माझा मित्र राजीव जोशी याच्यामुळे नागेशचा संपर्क क्रमांक मिळाला , आणि अगदी आनंदाने मी त्याला फोन लावला. बोलताना जाणवत होतं की नागेशला ते जुने संदर्भ काहीच आठवत नव्हते. आणि ते बरोबरच होतं, कारण फार मोठा काळ मध्ये लोटला होता. तरीही मी सगळ्या आठवणीना उजाळा दिला. एक मात्र खरं, की आजही नागेशच्या बोलण्यात आपल्या प्रसिद्धीचा जराही दंभ जाणवत नव्हता. तोच मोकळेपणा, आणि तोच टोन त्याच्या बोलण्यात दिसला जो माझ्या मनावर आमच्या लहानपणी कोरला गेला होता. इतक्या वर्षांनी त्याच्यामुळे लहानपणच्या अनेक व्यक्ती पुन्हा एकदा जवळ आल्या. आणि पुन्हा एकदा नागेशशी मी जोडला गेलो. अर्थात फोनवर. प्रत्यक्ष भेटण्याची खूप मनापासून इच्छा आहे, त्या निगर्वी, सरळ मनाच्या , प्रतिभावान लोककलाकाराला..
प्रासादिक म्हणे,
— प्रसाद कुळकर्णी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..