सडपातळ बांधा, मात्र खणखणीत आवाज, चेहऱयावर अफाट तेज, मोठालं कपाळ, लक्षात राहण्याजोगी विशेष ठेवणीची दाढी, चमकदार डोळे, डोळ्यांवर नाजूकसा चष्मा, उठावदार रंगाचा सदरा आणि विजारीचा पेहराव, हळुवार बोलणं अन् हातात विलक्षण कला. नखाच्या सहाय्याने कागदावर कमीअधिक दाब देऊन आखीव-रेखीव असं नखशिल्प साकारणारा जादुई कलाकार. गेल्या तब्बल पाच दशकांहून अधिक काळ आपली ही नखशिल्प कला जिवापाड जपणारा सच्चा कलावंत. आपल्या कलेतून अनेक मनं जिंकणारे अन् जोडलेली मनं टिकवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेले अरविंद सुळे म्हणजे नखशिल्प कलेतलं दादा नाव.
साधारणपणे दहा-बारा वर्षांपूर्वी माझी आणि अरविंदजींची ओळख झाली ती त्यांच्या एका प्रदर्शनात. साधारणपणे पंधरा-वीस मिनिटे निवांत त्यांच्या प्रदर्शनाबद्दल आणि आपसूक त्यांच्या कलेबद्दल बातचित झाली. १९५९-६० साली ‘मित्र सहयोग’ या नाटय़ संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते. लायन्स क्लब ऑफ ठाणे इथले १९९२-९३ शाळांचे ते अध्यक्ष राहिले होते. या सामाजिक कार्याबद्दल त्यांना त्यांच्या कारकीर्दीबद्दल पाच आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे लायन्स क्लबने दिली होती. यानंतर 2006 साली ठाणे गुणिजन या पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले होते.
अरविंदजींची नखशिल्पं पाहण्याजोगी होतीच. मात्र ती साकारताना पाहणं हेदेखील तितकंच कुतुहलाचं होतं. पेन्सिलचं स्केच नाही, रंगांची बरसातही नाही. निव्वळ कोऱया कडांवर रेखाटलेलं रंगहीन परंतु भावपूर्ण, मोहक चित्र. पांढऱया कागदावर हाताच्या बोटांच्या नखाच्या सहाय्याने कमीअधिक दाब देऊन -एम्बॉस करून -अत्यंत कलाकुसरीने तयार केलेलं हे शिल्प. ही नखशिल्पं मंद प्रकाशात आपलं अस्तित्व अधिक दाखवतात. मंद प्रकाशात एका विशिष्ट कोनातून बघितल्यावर हे जादुई शिल्प बघणाऱयाला वेड लावतं.
अरविंदजींना हा कलेचा ठेवा १९५९-६० च्या काळात मिळाला. तोही योगायोगाने. ‘‘१९५९-६० साली मी एका एसटीतून प्रवास करताना एका प्रवाशाने मला ही कला शिकवली. काही तासांत मला ही कला समजली. पुढे त्याचा नित्याने सराव मी करू लागलो आणि गेली 58 वर्षे ही कला मी सातत्याने जोपासतोय’’ कलेविषयी ते सांगत होते.
प्रदर्शनाच्या निमित्ताने अरविंदजींचे काही फोटो मी टिपले. त्यांच्या प्रदर्शनासोबतचे हे फोटो होते. मात्र त्यांचे पोर्ट्रेट टिपण्याविषयी मी त्यांच्याशी एकदा बोललो. ठरल्याप्रमाणे त्यांचे हे पोर्ट्रेट टिपायला त्यांच्या राहत्या घरी गेलो. आधुनिकतेचा मॉडर्न टच, परंतु पारंपरिक पाय असलेलं त्यांचं घर होतं. त्या घरातच लाइट सेटअप करून त्यांचे पोर्ट्रेटस् टिपण्याचा मी प्रयत्न करत होतो. त्यांच्या चेहऱयाचे काही ब्लॅक अँड व्हाईट फोटो मी टिपले, तर त्यानंतर काही सेफिया कलर टोनमधले टिपले. काही कँडिड फोटोदेखील मला टिपता आले.
फोटो टिपत असताना अरविंदजींच्या सगळ्यात जवळच्या विषयाला मी हात घातला. समाजात असलेल्या गतिमंद मुलांसाठी विश्वास ही हक्काची शाळा. या शाळेत ते आजही नित्यनियमाने जातात. इथल्या सुमारे तीस मुलांमध्ये रमतात. त्यांच्यातला कलाकार शोधण्याची नेहमीच धडपड करतात. या मुलांनी साकारलेली चित्रं आणि शिल्पं हीदेखील तितकीच सुरेख आहेत. या मुलांनी साकारलेल्या छोटय़ा गुढय़ा, दिवाळीचे कंदील, त्यांनी तयार केलेल्या पिशव्या, ग्रीटिंग तसेच खाद्यपदार्थ हे सारं काही पाहण्याजोगंच आणि चवीने खाण्यासारखंच. या मुलांच्या कलेत रमलेले अरविंदजी मी अनेकदा पाहिलेत. शाळेचा विषय काढला आणि अरविंदजी काही काळ भावुक झाले खरे. मात्र त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी स्वतःला काही क्षणांतच सावरलं. शाळेतल्या मुलांची शैक्षणिक प्रगती, त्यांच्यासाठी सुरू असलेले प्रयत्न, संगीत, नृत्य, कला यातून त्यांची साधत असलेली बौद्धिक आणि मानसिक प्रगती या साऱयावर ते भरभरून बोलत होते. बोलता बोलता आम्ही पुन्हा मूळ मुद्दय़ावर आलो. त्यांनी आतून एक अर्धवट साकारलेलं नखशिल्प आणलं आणि त्या पांढऱया कागदावर त्यांची बोटं अलगद फिरू लागली. कागदाचं शिल्प साकारताना मी यावेळी प्रत्यक्ष पाहिलं. वयाची सत्तरी ओलांडलेल्या अरविंदजींनी साकारलेली नखशिल्पं ही तेव्हाही आणि आजही तितकीच बोलकी आणि जिवंत वाटतात हे विशेष.
— धनेश पाटील
dhanauimages@gmail.com
Leave a Reply