कुणी नोंद घेतलीय की नाही हे कळायला काही मार्ग नाही, पण गेले काही दिवस एक जाहिरात इलेक्ट्राॅनिक मिडीयावर झळकतेय. ही जाहिरात आहे ‘सहारा श्री’ श्री. सुब्रतो राॅय सहारा यांची. तेच सुब्रतो राॅय सहारा, ज्यांच्यावर गुंतवणूकदारांचे हजारो करोड रुपये लुटल्याचा आरोप सिग्ध झालाय. त्यांचा गुन्हा सिद्ध होऊन त्यांना कारावासही भोगायला लागलाय. त्यातही त्यांचा आडमुठेपणा सुरुच होता. विविध कारणं दाखवून त्यांनी गुंतवणूकधारकांच्या पैशांतून खरेदी केलेल्या स्थावर मालमत्तांचा लिलाव टाळण्याचे त्यांचे उद्योग सरु आहेतच. याला माज म्हणतात आणि हा माज सुप्रिम कोर्टाने बरोबर ओळखून त्यांना काट्यावर पकडलंय आणि कोर्ट त्यांना वेळोवेळी फटकारतंयही.
त्यांचा गुन्हा नेमका काय आहे याची माहिती इंटरनेटवर मुबलकतेने उपलब्ध आहे, तो माझ्या लेखाचा विषय नाही. मला म्हणायचंय ते वेगळंच. मी ज्या हिन्दी वृत्त वाहिन्या नेमानं पाहातो, त्या, श्री. रजत शर्मांची ‘इंडीया टिव्ही’ आणि श्री. सुधीर चौधरींची ‘झी न्यूज’, या दोन्ही वाहिन्या देशभक्तीचे गोडवे गात प्रेक्षकांना देशभक्तीचे पाठ देत असतात. इतर वाहिन्यांवर काय चालतं, हे त्या पाहात नसल्यामुळे नीट्सं माहित नाही. पण इंडीया टिव्ही आणि झी न्यूज या दोन्ही देशभक्तीचे पाठ देणाऱ्या वाहिन्यांवर सहाराश्री सुब्रतो राय सहारा चांच्या ‘सहारा समुहा’च्या जाहिराती गेले काही दिवस मी सातत्याने पाहातोय. कोणी काय दाखवायचं आणि दाखवू नये हा मुद्दा कायद्याच्या कक्षेत येतो की नाही हे माहित नाही, मात्र ज्या व्यक्तीने देशवासीयांना लुबाडलंय, सेबीसारख्या संस्थेचे नियम बिनदिककत धाब्यावर बसवलेत आणि हे सर्व गुन्हे सिद्ध होऊन तिला शिक्षाही झालीय, वर ती शिक्षा टाळण्यासाठी सर्वप्रकारचे माजोरे बहाणेही करून झालेत, अशा व्यक्तींच्या वा त्यांच्या उपक्रमांच्या जाहिराती खाजगी चॅनेल्सनी दाखवणं कायद्यात कदाचित बसतही असेल, पण नैतिकतेच्या दृष्ट्यीने कितपत योग्य आहे, हा प्रश्न मला पडलाय. आपण देशद्रोहाच्या समकक्ष गुन्हेगाराला, देश लुबाडणाऱ्या एका सफेदपोश लुटारूला आपण पैसे घेऊन प्रतिष्ठा मिळवून देतोय याची जाणीव देशभक्तीचे धडे देणाऱ्या या चॅनेल्सना अाहे की नाही हे मला कळत नाही.
लोकशाहीचा हा चौथा टायर साफ पंक्चर झाला आहे आणि आपली महान वैगेरे असलेली लोकशाही रिक्शासारखी तिन पायांवर जमेल तशी चालते आहे. या तिन पायांमध्येही समन्वय आहे असं जाणवत नाही आणि रिक्शासारखीच ती कोणत्या दिशेने वळणार याचा अंदाजही येत नाही. रिक्शात बसल्यासारखी आपली हाडंच कशाला, जीवनही खिळखिळं होत चाललंय.
शहरं विद्रुप करणारे, नाक्या नाक्यांवर लागलेले, हाता-गळ्यात सोन्याच्या लडी घातलेले आणि डोळ्यांवर गाॅगल वैगेरे लावलेले आणि चेहेऱ्यावरील हास्य (मला हे हास्य ‘विकट’ वैगेरे प्रकारचं वाटतं), आणि मग्रुरीने जोडलेले हात, असे गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या नेत्यांचे दिसण्यात येणारे बॅनर्सही याच ‘पैशाने प्रतिष्ठा विकत घेण्या’च्या कॅटेगरीत मोडतात. यातील बरेचसे नेते विविध काळे धंदे, गुंडगीरी सुखनैवं करत असतात, हे जनतेला माहित असतं पण आंधळ्या कायद्याला दिसत नसतं आणि त्यामुळे ते ‘क्लीन’ वैगेरे व्यक्तीमत्व असतं. आंधळ्या कायद्याच्या हातात ठेवलेले कागद, पैशांचे आहे की पुराव्याचे, हे ही त्याला कळत नाही. अंधांच्या हातात आणि कानांत कमालीची संवेदनशीलता असते असं म्हणतात. आधळ्या कायद्याला हे लागू नसावं बहुदा किंवा कागदं हाताळून त्याच्या हातातली संवेदनशीलता मेली असावी. सुप्रिम कोर्टातलं वरील सहाराचं उदाहरण किंवा भुजबळ हे केवळ अपवाद म्हणून असावं. अंगावर येणारे बटबटीत बॅनर्स हा प्रतिष्ठा मिळवण्याचा सर्वात सोपा आणि नेता होऊ पाहाणाऱ्या कुणालाही सहज उपलब्ध असणारा पहिला राजमार्ग.
टिव्ही/सिनेमाचा मोठा प्रभाव समाजावर पडत असतो, ही दोन्ही माध्यमं समाज शिक्षणाचं आणि प्रबोधनाचं प्रभावी साधन आहे, असं सर्वच समजशास्त्रज्ञ म्हणतात. असं असताना दाऊदवर, त्याच्या बहिणीवर, आणखी काही नामचीन गुंडांवर केवळ पैसा कमीवण्यासाठी बायोपिक (आत्मचरित्रात्मक सिनेमे) करणारे निर्माते नेमक्या कुठल्या समाज प्रबोधनाचा प्रयत्न करत असतात, असा प्रश्न त्यांना नाही, पण किमान आपल्याला तरी पडतो का? बहुदा पडत नसावा, कारण आपणही तो सिनेमा किती कोटींच्या क्लबात बसतो याचं चर्वितचर्वण करत असतोच की..! निर्मात्यांच्या विकल्या गेलेल्या नैतिकतेला आपण विकत घेऊन हातभारही लावत असतो आणि गुंडांना आपल्याच पैशाने सोपी प्रतिष्ठाही मिळवून देत असतो, याचं आपलंही भान सुटलंय.
ज्यांची नैतिकता लयाला गेलेली आहे, अशांनाच प्रतिष्ठा विकत घेण्याची गरज पडते. नैतिकता विकल्याची आणि प्रतिष्ठा विकत घेतल्याची उदाहरणं तर सर्वच क्षेत्रात पावलोपावली सापडतात. पुर्वी निवडणूकांपर्यंत मर्यादित असलेलं नि आता आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेल्या राजकारणाबद्दल तर न बोललेलंच बरं. राजकारणातला हा रोग आता संसर्गजन्य होऊन सगळीच क्षेत्र काबिज करत सुटलाय. शिक्षण क्षेत्रातही तेच, पुरस्कार कुणाला द्यायचं ते ‘फिक्स’ करण्यातही तेच, खेळांत तेच, वैद्यकीय क्षेत्रातही तेच. इतकंच कशाला आपल्यापैकी कित्येकजण वेळप्रसंग पाहून नितिमत्त्ता विकत असतो किंवा दुसऱ्याची विकत घेत असतो. हा लेख वाचणाऱ्यांमध्ये अनेकजण सरकारी-निमसरकारी किंवा खाजगी नोकरीत असतील. यातील सर्वच नाहीत, पण काही जण नक्की रोजच्या रोज काही रुपड्यांसाठी आपली इज्जत विकत असतील आणि त्याच पैशाने गांवाकडे बॅनर वैगेरे लावून किंवा देवळाला घयघशीत मदत करून किंवा राहात्या घराजवळच्या एखाद्या फुटकळ मंडळाचे आश्रयदाते होऊन पुन्हा ती कमवतही असतील.
मोठ्ठं आलिशान घर, लांबलचक गाडी, वर्षातून दोनदा परदेश प्रवास वैगेरे गोष्टी असल्या, की प्रतिष्ठा, मान आपोआप मिळतो;मग ह्या गोष्टी विकत घेण्यासाठीचा पैसा स्वत:चं इमान विकून आलेला आहे किंवा दुसऱ्याचा लुबाडून आलेला आहे किंवा कसा, याचा विचार फार कोणी करत नाही. मला अनेक लोक माहित आहेत, ज्यांनी आपल्या सोबत काम केलेल्या लोकांचा कित्येक महिन्यांचा पगारही दिलेला नाही, मात्र स्वत:ची (आणि भाऊ-बहिणी, भाचे-पुतणे, लांबच्या-नजिकच्या नातेवाईकांचीही) घरं, गाड्या, परदेश प्रवास ह्यात जराही कमी नाही. वर हेच लोक उजळमाथ्याने जगाला नितीमत्तेचे धडे देतानाही दिसतात. लेखाच्या सुरुवातीस उल्लेख केलेले सहाराश्री सुब्रतो राॅय सहारा भविष्यात आपले आमदार-खासदार किंवा मंत्री म्हणून येण्याची दाट शक्यता आहे. ते तसे आले नाहीत, तरच मला आश्चर्य वाटेल. त्यांच्याकडे त्यासाठी लागणारी अहर्ता नक्की आहे.
खरंच, प्रतिष्ठा कमावणं किती सोपं झालंय ना? गाठीशी पैसा असला(अर्थात काळा. पांढरा पैसा अशा कामासाठी कुणी खर्च करत नसतं. त्याला अशा गोष्टींची आवश्यकताही नसते) आणि वरपर्यंत ओळखी असल्या की, इज्जत कुणालाही विकत घेता येते, असं वाटावं अशी परिस्थिती आहे. मान-सन्मान, प्रतिष्ठा कमवावी लागते, ती बाजारात विकत मिळत नाही, हे लहानपणी आम्ही शाळेत शिकलो होतो. हे सर्व खोटं होतं असं वाटावं अशी सारी परिस्थिती आहे.
सहाराची जाहिरात हे केवळ एक उदाहरण मात्र..! असे मोठेपणाचे तुरे कपाळावर राजरोस मिरवणारे महानुभाव ढिगाने मिळतील आपल्याकडे. चुक त्यांची नाही, चूक समाजाचीही म्हणता येणार नाही, कारण चांगल्या-वाईटाची जाणीव करून देणारी किंवा ज्यांना वचकून राहावं, अशा उंचीची माणसं समाजात राहीलेली नाहीत. जे असे आहेत असं वाटू लागतं, तोच त्यांचे पायही मातीचेच आहेत असं सांगणारी बातमी अचानक समोर येते. आपला समाज नक्की कोणत्या दिशेने वाटचाल करतोय, हे कळेनासं झालंय.
काय करावं? विरोधी दिशेने चालावं, की आपण ही ‘झिंदाबाद’ म्हणत, कमरेचं सोडून तोच झेंडा म्हणून हातात घेऊन सर्वांबरोबर चालत सुटावं? खरंच, नक्की काय करावं?
— नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply