जीवनात जशा काही गोष्टी हव्याहव्याशा वाटतात, तशा काही नकोशा वाटतात.प्रत्येकाच्या बाबतीत दोन्हीही भिन्न असू शकतात.ज्याचे त्याचे ते स्वातंत्र्य असते. मतभिन्नता असतेच.
हल्ली औपचारिकता फार बोकाळली आहे.जिथे तिथे तीचा प्रार्दुभाव दिसून येतो.पूर्वी जे सहज सुंदर, अनौपचारिक होते त्याचे आता केवळ ढोंग होते.आता सर्व काही ठरलेले असते.त्यामधली सहजता पूर्णपणे नष्ट होऊन फक्त औपचारिकता पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात.सर्वकाही ठरलेले,पोकळ,भावहीन असे.शोकेसमध्ये ठेवलेल्या बाहुल्या सारखे
हुबेहूब मात्र प्राणहीन.सवंगता, ढोंगीपणा, नाटक आता मंचावरून प्रत्यक्ष जीवनात आले आहे.भावस्पर्श आता उरला नाही.डोळ्यातील चमक आता दिसत नाही.
एखाद्या नाटकाचे सादरीकरण व्हावे तसे संपूर्ण जीवन नाट्यमय झाले आहे.मायेचा ओलावा आणि नात्याचा गोडवा केव्हाच संपला आहे.नाते देखील आता औपचारिक झाले आहे.माणसे प्राणहीन पुतळे वाटत आहेत.लखलखाट आणि झगमगाट यामुळे सर्व काही झिंगाट झाले आहे.
हास्य देखील कृत्रिम.घरे मोठी झाली पण माणसांना, नातलगांना, मित्रांना तिथे जागा नाही.खाण्यापिण्याची कमी नाही परंतु अन्नाचा कण देखील कुणाला खाऊ घालण्याची दानत नाही.दिखाऊपणा,मोठेपणा, जीवघेणी स्पर्धा हेच जीवन बनले आहे.सर्वत्र सर्वांचे साजरे केले जाणारे वाढदिवस,त्या प्राणहीन शुभेच्छा नकोशा वाटतात.
लग्नमंडपात मुख्यद्वारावर ते केले जाणारे स्वागत. त्या पोरींकडून दिले जाणारे गुलाबाचे फूल नकोसे वाटते. लग्नामध्ये नेत्यांचे केले जाणारे सत्कार आणि बहारों फूल बरसाओं नकोसे वाटते. शाळेत मुलांना धाक दाखवून म्हणून घेतलेल्या प्रार्थना नकोशी वाटते.कुणा आलतू फालतू माणसाचे स्वार्थासाठी केले जाणारे स्वागत नकोसे वाटते.वाढलेले वय लपवण्यासाठी केस काळे करणे नकोसे वाटते.ओठांत एक आणि पोटात एक असे नकोसे वाटते. पैशांसाठी प्रेमाचे सोंग कुणी करते ते नकोसे वाटते. मेकअप करून उगीच नटणे नकोसे वाटते.
लहान मुलांना के.जी.मध्ये टाकणे नकोसे वाटते.मुलगी पसंद नाही,असे मुलांचे बोलणे नकोसे वाटते.नुसता पैसा बघून मुलगी कुणाला देणे नकोसे वाटते.फूकट कुणाचे काही खाणे, उगीच गुणगान गाणे नकोसे वाटते.कर्मकांड सारे नकोसे वाटतात.खुप काही नकोसे, तुर्तास इतकेच!
– ना.रा.खराद
Leave a Reply