अनघा दिवाळी अंक २०२० मध्ये सौ. वंदना ढवळे यांनी लिहिलेली ही कथा.
नवरीच्या वेषात तिच्याकडे पाहून माझे डोळे डबडबले. तिचे माझ्याकडे लक्ष गेले. ती पटकन माझ्याजवळ आली आणि म्हणाली, “काय रे दादा, अशी कितीक दूर चालली मी? पाच कोसावर तर दिलं मला.’ पण बोलताना तिचा कंठ चांगलाच दाटून आल्याचं जाणवलं. मी तोंड लपवत म्हणालो, “नाही गं सुमे, तुझे गाव जरी जवळ असले तरी फरक तर पडतोच ना! बरं ते जाऊ दे, पण खरं सांगू, किती गोड दिसतेस गं तू या नवरीच्या वेशात.” “हं. आज नकटी चपटी नाही दिसत तुला” भावावस्थेतही आम्ही दोघं हसलो. तिला मी काय सांगणार? गमतीत मी तिला काहीही चिडवत असलो तरी तिच्या चेहऱ्यात मला आईचा चेहरा दिसत असे.
मी जेमतेम पाच वर्षांचा होतो. शेजारपाजारच्या काकू, आजी, आत्या म्हणायच्या, ‘या वक्ताला पोर्गी होऊ दे मंजी शिवा ले राखी बांधाले भन भेटल.’ मलाही ते ऐकून वाटायचं की आपल्या घरात लहान बाळ आलं की किती मज्जा येईल. मला ती राखी बांधेल, भाऊबीजेला ओवाळेल, असा विचार मनात आला की सतत आईभोवती फिरायचो. माझ्या मनात येणारे अनेक प्रश्न मी आईला विचारत असायचो. तीही मोठ्याने प्रेमाने मला जवळ घेऊन समजावून सांगत असे. “”काय प्रेम उतू चाललंय मायऽऽलेकराचेऽऽ समान असे म्हणून आजी आम्हाला चिडवत असे. दिवस कसे मजेत चालले होते. पण एक दिवस असा उजाडला की त्या दिवशी कसं होत्याचं नव्हतं झालं. सुमीच्या जन्माची वेळ आली. आईला खूप त्रास होत होता. “बाळ पोटात आडवे आहे. जिल्ह्याच्या दवाखान्यात ताबडतोब जा. असा सल्ला तालुक्याच्या डॉक्टरांनी दिला. आई गाडीत बसण्यासाठी उठून उभी राहिली आणि अचानक सुमीचा जन्म झाला व आईच्या कुठल्यातरी नसेला धक्का बसला व खूप रक्तस्त्राव झाला. तिला जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. पाच बॉटल रक्त दिले पण काही उपयोग झाला नाही. तिला सुमीला मन भरून, डोळे भरून पाहता देखील आले नाही आणि तिने आम्हाला पोरके करून या जगाचा निरोप घेतला. आम्ही सारे दु:खाने रडत होतो. सर्वांनी हंबरडा फोडला. बायाबापड्या “ए ऊठ वं’ असे म्हणत तिच्या चेतनाहीन शरीराला हलवत होत्या, माझे बाबा सुन्न झाले होते. ते मटकन खालीच बसले. हसताखेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाला होता. या सगळ्या गोंधळात सुमीकडे कुणीही बघत नव्हतं. भुकेने नवजात बाळ मरून जाण्याची वेळ आली होती. कोणीतरी लक्षात आणून देत म्हणाले, “अरे, त्या बाळासाठी दुधाची बाटली आणा.” मग जननिंदेला जुमानत म्हणा किंवा सुमीच्या नशीबाने म्हणा सुमीला दूध पाजण्यात येई. त्यामुळे सर्वांना नकोशी असलेली ती सुमी कशीबशी जगली. तिचे कधीच कोणी लाड केले नाहीत. एका पोत्यावर तिला टाकून दिलेले असायचे. ‘जलमताच मायला गिळलं माय इन’ असं सर्वच म्हणायचे. मला बिनमायचं लेकरू म्हणून जास्तच सहानुभूती मिळत होती. दोन्हीकडच्या आजी आजोबांकडून माझे लाड व्हायचे.
सुट्ट्यामध्ये मामाकडे जावं तर तिच्या वाट्याला तिथेही सुख नव्हते. कारण आपली तरणीजवान पोरगी हिच्या वाईट पायगुणाने गेली असे आजीला वाटे. माझ्याही मनात या गोष्टी लहानपणात भरवण्यात आल्या होत्या. पण सावत्र आई आल्यानंतर हळूहळू मोठा होत असताना मला समजू लागलं की ही माझी लहान बहीण आहे. आईच्या जाण्यात तिचा काय दोष? तिचा चेहरा माझ्या आईसारखाच असल्याने मला तिच्यातच माझी आई दिसू लागली. मी तिच्यावर मनापासून प्रेम करू लागलो. म्हणून तिचे कष्ट कमी करण्यासाठी तिला सांगितलेल्या कामात तिला मदत करू लागलो.
बाबांनी तर तिला प्रेमाने जवळ घेतलेच नाही पण साधी हाकदेखील कधी मारली नाही, बापाच्या प्रेमासाठी, आसुसलेले मन मला तिच्या डोळ्यातून कळत होतं पण मी हतबल होतो. बिकट परिस्थितीतून तिने जेमतेम बारावीपर्यंतच शिक्षण पूर्ण केले. उपरं जीवन लाभलेल्या सुमीचं व्यक्तिमत्त्व पार दबलेलं बनलं. कधीतरी कौतुक, गोड शब्द कानी पडावेत म्हणून प्रत्येकाचे शब्द झेलायला सुमी ओंजळ करून सुमा समोर उभी असायची. काम चांगलं केलं तर कौतुक तर नाहीच पण काम नीट न केल्यावर शब्दाचा भडीमार तिच्यावर व्हायचा. “पांढऱ्या पायाचीले यक काम धड करता येत न्हाई’ असं म्हटल्यावर तिचा हिरमुसला चेहरा पाहिल्यावर माझं मन गलबलून जायचं. एकदा मी मला, मिळालेला खाऊ लपवून ठेवला व सुमीला एकटीला गाठून खाऊ घातला तेव्हा तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, “दादा, माझ्यावर इतकं प्रेम करू नको रे! मला त्याची सवय नाही.” आणि पुढे म्हणाली, “देवाने मला जन्माला का घातले हेच कळत नाही.’ तिचे अश्रू पुसत मी म्हणालो, “ए वेडाबाई, मी आहे ना तुझा दादा. तू चिंता करू नकोस. हे दिवस जातील.’
एकदा आजी बाबांना म्हणाली, “अरे. पोरा, सुमीचे हात पिवळे कर, मोठी झाली ती. किती दिस घरात ठुतो?” बाबांनी नुसतं हो म्हटलं. सुमीला पाहुणे पाहायला येऊ लागले. तेव्हा मी स्वत: लक्ष घालून स्थळं बघत होतो कारण दु:खात जगलेल्या माझ्या बहिणीचे भावी आयुष्य सुखाचे असावे असे मला वाटत होते. त्यातलं एक स्थळ आमच्या नात्यातलंच म्हणण्यापेक्षा माझ्या मित्राचं आलं. त्याला सुमी पसंत होती. मी त्याच्याशी बोललो. “माझ्या बहिणीचे आयुष्य दु:खात गेले. आता तिला सुखात ठेवेल अशा मुलाशी तिचं लग्न करून द्यावं असं मला वाटतं.” त्यावर तो म्हणाला, “अरे शिवा, तू चिंता करू नकोस. तुझ्या बहिणीला अगदी सुखात वागवीन. मी सासुरवास हा शब्दही तिच्या परिचयाचा राहणार नाही.” त्याच्या अशा बोलण्याने मी पुढाकार घेऊन हे स्थळ पक्कं केलं आणि आता लग्नघटीका जवळ येऊन ठेपली. इतक्यात माईकवरून आवाज आला, “नवऱ्या मुलीला मांडवात आणा.’ मी डोळे पुसले आणि सुमीला घेऊन मांडवात निघालो, लाऊडस्पीकरवर गाणं वाजत होतं, “बहेना ओ बहेना तेरी डोली मै सजाऊंगा।”
– सौ. वंदना ढवळे
राधिका हॉटेलजवळ, बुलढाणा
मो. ८०८०३३९०७७
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०२० मधून)
Leave a Reply