उल्लेख जरी हाती न लागणाऱ्या, उच्चास्थनावरील नक्षत्रांचा करणार असलो तरीही आज ” ” फक्त भोयांसाठी आहे.
नक्षत्रे आपापल्या स्थानी असतात- त्यांचे चमकणे, उदयास्त सारे ठरलेले असते. एकाचवेळी नभी असंख्य नक्षत्रे झळाळत असतात- थोडी मागेपुढे. त्यांतील काही एकत्र येणे आणि त्यांनी आपल्याला रिझवणे हे आपले गतजन्मीचे सुकृत असते.
पुरुषोत्तम दारव्हेकर (लेखन), पं. जितेंद्र अभिषेकी (संगीत), पं. वसंतराव देशपांडे, भार्गवराम आचरेकर, फैय्याज, बकुळ पंडित, प्रसाद सावकार (नंतर प्रभाकर पणशीकर) अशी कलावंत/गायक मंडळींची मांदियाळी एका सुमुहूर्तावर एकत्र आली आणि ” कट्यार ” इतिहास घडला. त्याची पुनरावृत्ती “नटसम्राट ” ने केली.
दीनानाथांनी उदयाला आणलेलं स्वरांचं आभाळ त्यांच्या मंगेशकरी अवकाशात अजूनही मावत नाही.
१९६०-७० च्या काळात सिने संगीतकारांची अशीच सुरेल नक्षत्र जत्रा भरली होती- नौशाद, एसजे, मदनमोहन, नय्यर, एसडी ,सलील चौधरी, रवी,रोशन आणि ही यादी न संपणारी आहे. त्यांनी सुरांनी आपलं भावविश्व संपन्न करून टाकले आहे. गीतकारही एकसे एक होते. मात्र सर्वांच्या रचनांचे तोंडवळे स्वायत्त होते आणि कानी पडल्यावर मिटल्या डोळ्यांनीच त्यावर शिक्कामोर्तब करता येई. अशाच याद्या गायक/गायिका, खेळाडू, साहित्यिक इत्यादींच्या सहजी करता येतील.
राहुल देशपांडे, शौनक अभिषेकी, राहुलदेव बर्मन, श्रीधर फडके आणि बरीच अशी ताजी कलावंत मंडळी (आरडी त्यामानाने जुना, पण संगीतकलेचा सरस वारस असलेला स्वयंप्रकाशी) आनंदाने भोईपण मिरवताहेत. आजही ते कानाला हात लावूनच पूर्वसूरींबद्दल आदराने बोलताना, त्यांच्या आठवणी सांगताना कॅमेऱ्यासमोर येतात. त्यांची नम्रता नयनसुखद असते आणि विहंगमही ! याला आडनांव तेच असलं तरी मी ” घराणेशाही ” मानत नाही. हे भोई सन्माननीय वारस आहेत आणि त्यांना परंपरांचे, गुरूंचे भान आहे.
घराणेशाहीचे (काही अपवाद वगळता) फार निसरडे दृश्य फक्त राजकारणात दिसते आणि अलीकडे शिक्षणक्षेत्रही दुर्दैवाने त्याच वाटेने भरधाव निघालेले दिसते.
अर्थात काही भोयांना खांद्यावरील भार पेलत नाही आणि ते पालखीतील नक्षत्रांना अवमानित करीत असतात हेही प्रत्यही दिसते. अमितकुमार, नितीन मुकेश, कुमार गौरव अशी पटकन तोंडावर येणारी काही नांवे.
पण मला आपल्या सर्वांच्या भाग्याचं कौतुक वाटतं – आपण नक्षत्रांनाही पाहिलं आहे आणि भोयांनाही !
आणखी एक -समहाऊ साहित्य क्षेत्रात भोई दिसत नाहीत. कां कुणास ठाऊक? कदाचित साहित्यिकांचा घरातील वारस वगैरे संकल्पनांवर फारसा विश्वास नसावा. हे आपलं नुकसान की —– !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply