कधी कधी आपल्या आयुष्यात अगदी सहजपणे एखादी फार महत्त्वाची गोष्ट आपल्याला मिळून जाते. मी असा सुखद अनुभव अनेक वेळा घेतला आहे. त्यातलाच एक अनुभव सांगतो. एकदा कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्याला गेलो होतो. दुपार रिकामी होती. सहजच संगीतकार आनंद मोडकांना फोन केला. त्यांच्यामुळेच ‘प्रभू-मोरे’ ही हिंदी भजनांची कॅसेट कशी बनली ते यापूर्वीच सांगितले आहे. पण त्यांच्याबरोबर मी कोणतेच काम केले नव्हते. माझा फोन घेताच ते म्हणाले, ‘अरे काय योगायोग आहे बघ? तुलाच फोन करणार होतो तर तुझाच फोन आला. ठाण्याहून लगेच निघ आणि पुण्याला येऊन मला तातडीने भेट.’ ‘अहे, मी पुण्यातच आहे,’ मी म्हणालो. ‘मग ताबडतोब माझ्या घरी ये की लेका!’ आनंद मोडकांचे बोलणे नेहमी असेच असायचे. मी त्याला नाव ठेवले होते. प्रेमळ दटावणी. तेव्हा त्यांच्या या प्रेमळ दटावणीनंतर तात्काळ त्यांच्या घरी गेलो.
“मी या दिवाळीत प्रकाश गीतांवर आधारित नक्षत्रांचे देणे करतोय. त्यात तुला गायचे आहे.’
मला भानावर यायला काही मिनीटे लागली. झी मराठीवर होणारा ‘नक्षत्रांचे देणे’ हा गाण्याचा अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम होता. या कार्यक्रमात आपल्याला गाणे मिळावे अशी अनेक दिवसांपासूनची माझी इच्छा होती. माननीय श्रीरंग गोडबोले यांच्या ‘इंडियन मॅजिक आय’ या कंपनीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन होत असे. या संदर्भात श्रीरंग गोडबोले यांची माझी भेटही झाली होती. कै. सुरेश भट यांच्या गझलवरील कार्यक्रमात मी गाणार होतो, पण काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही. त्यानंतर मात्र या कार्यक्रमात गाण्यासाठी मी कोणताच प्रयत्न केला नव्हता आणि आता आनंद मोडक या कार्यक्रमात गाण्यासाठी मला बोलावत होते. मी आनंदाने चक्क रडायला लागलो.
“अरे, झालं तरी काय? सगळं ठीक आहे ना? मग असा रडतोस काय?” आनंद मोडकांची प्रेमळ दटावणी सुरू झाली. मी त्यांना काय ” सांगणार? पण त्यांनी सर्व जाणले. मला पुन्हा दटावणीच्या स्वरात म्हणाले,
“अरे, आता संगीतक्षेत्रातील ज्या पातळीवर तू काम करतो आहेस ना, तिथे खूपच मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धात्मक पातळीवर काम करण्यासाठी खंबीर मनाने तयार हो. प्रत्येक ठिकाणी यश मिळेलच असे नाही. कधी कधी अपयशही पचवता आले पाहिजे. चल आता पटपट गाणी लिहून घे. प्रकाशाचे, दिव्यांचे वर्णन करणारी सगळी गाणी निवडली होती. अनेक रिहल्सलनंतर शेवटची ग्रँड रिहल्सल पुण्याला झाली. २४ ऑक्टोबर २००३ रोजी ‘प्रकाशोत्सव’ हा कार्यक्रम मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पहाटे सहा वाजता सुरू झाला. माझ्याबरोबर गायक कलाकार म्हणून रवींद्र साठे, उत्तरा केळकर, सुरेश बापट, मधुरा दातार आणि जयश्री शिवराम यांनी गाणी सादर केली. कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक आणि स्वाती चिटणीस यांनी केले. अगोदरच सांगितल्याप्रमाणे श्रीरंग गोडबोले आयोजित कसलीही काटछाट न करता हा संपूर्ण कार्यक्रम ‘नक्षत्रांचे देणे प्रकाशोत्सव’ या शीर्षकाने ऐन दिवाळीत झी मराठीवर दाखवण्यात आला. या कार्यक्रमाने माझ्या लोकप्रियतेत खूपच मोठी भर घातली. टेलिव्हीजन माध्यमाचा प्रचंड प्रभाव जनमानसात आहे. आजही आमच्या म्युझिक अॅकॅडमीत प्रवेश घेण्यासाठी आईवडील मुलांना घेऊन येतात. तेव्हा विचारतात, “आमचा मुलगा किंवा मुलगी तुमच्यासारखा टीव्हीवर गाताना कधी दिसणार?” त्यांना मी नेहमी सांगतो की एखादा कलाकार केवळ टीव्हीवर गाताना दिसला की तो मोठा कलाकार होत नाही. गाण्याचा रियाज, त्यासाठी घ्यावी लागणारी मेहनत याला दुसरा पर्याय नाही. एकदा तो कलाकार चांगला गायला लागल्यावर तो एकदा का, अनेकदाही टीव्हीवर गाणे सादर करेल. पण अनेकांना झटपट लोकप्रियता हवी असते आणि मग त्यांच्या पदरी निराशा येते. मग या क्षेत्रातील राजकारण, वशिलेबाजी, स्पर्धा यावर खापर फोडले जाते. हे सगळे करण्यापेक्षा गाण्याकडे आनंद मिळण्याचे साधन म्हणून पाहिले पाहिजे. त्यातून मिळणाऱ्या पैसा आणि प्रसिद्धीपेक्षा त्यातून मिळणारे समाधान, आनंद हा केवळ अवर्णनीय आहे. पण तो जे कलाकार गाण्याची साधना करतात त्यांनाच मिळतो.
– अनिरुद्ध जोशी
Leave a Reply