२१ डिसेंबर २०२३ आजचा हा दिवस गोखले परिवारासाठी अत्यंत आनंदाचा दिवस. कारणच तस आहे, आज नलिनी पुंडलिक गोखले यांच्या वयाला शंभर वर्षे पूर्ण झाली. माझ्या सख्ख्या सासूबाई. माझे पती अनिल गोखले यांची आई. नवल का वाटतं एक व्यक्ती विशेषतः स्त्री, जगाशी संघर्ष करीत, संसार पुढे पुढे रेटत असते, कठीण परिस्थितीतून मार्ग काढत असते तेव्हा तिचं कौतुकच करावं तेवढे थोडेच ! या शंभर वर्षांचा त्यांनी कथन केलेला त्यांच्या इतिहास चित्रपटासारख्या माझ्या डोळ्यां समोर तारळतो आहे..
नलिनीचा, अर्थात आमच्या आजींचा जन्म २१ डिसेंबर १९२३ रोजी नगर जिल्ह्यातील ‘कोतुळ’ येथे झाला . त्या माहेरच्या कुसुम दत्तात्रय दाते. ठाकूरद्वारमधील कमळाबाई वैद्य गर्ल्स हायस्कूल मधून इंग्रजी माध्यमातून त्या १९४२ साली मॅट्रिक पास झाल्या. दाते परिवारातील त्यांच्या लहान बहिणी व भाऊ अत्यंत हुशार. तल्लख बुद्धी. सासुबाईंचा मेंदू तर चक्क कॉम्प्युटर. एकदा ऐकलं की कधीच विसरायचं नाही. इंग्लिश माध्यमातूनमध्ये शिक्षण झाल्यामुळे आज सुद्धा इंग्रजीतून अस्खलित बोलतात. वर्तमानपत्र अगदी रोजच्या रोज वाचतात.
व्यायाम आणि आयुष्यभर सकस, सात्विक आहार, अन्न खाल्ल्यामुळे त्यांची अशी तब्येत आहे का ? असं सर्वांना च वाटतं. नो हॉटेलिंग, नो अरबट -चरबट. फळं खायला आवडतात, पण वयाप्रमाणे आता मोजकच खातात.
वयाच्या विसाव्या वर्षी १९४३ साली पुंडलिक गोखले म्हणजे माझ्या सासर्यांची त्यांचा विवाह झाला. संगमनेरवरून मुंबईला आल्यावर दाते कुटुंब प्रथम गिरगाव, मुंबई, जगन्नाथाची चाळ, फणसवाडी येथे राहत असे. लग्न झाल्यावर त्या सासऱ्यांबरोबर दोन अडीच वर्ष, सासऱ्यांच्या बहिणीकडे शांती देवघर यांच्याकडे, केशवजी नाईक चाळीत राहू लागल्या. १९४५ – ४६ च्या सुमारास सासू सासर्यांनी पार्ल्याला देवधर बंगल्याच्या मागील बाजूस आऊट हाऊस मध्ये आपले बिऱ्हाड थाटले . कौतुकाची गोष्ट म्हणजे सासूबाईंनी पाच ते सहा महिने ग्रॅन्टरोडच्या रेशनिंगच्या ऑफिसच्या कार्यालयात नोकरी केली आणि त्यानंतरच पुढील वास्तव्य कायमस्वरूपी पार्लेश्वर सोसायटीमध्येच.
आजी म्हणजे किरकोळ लहान मूर्ती, लाल गोऱ्या, हसऱ्या , उत्साही आणि सर्वच बाबतीत अत्यंत हौशी . प्रथम त्या नऊवारी साडी उजव्या खांद्यावरून पुढे पदर अशा पोशाखात असायच्या. नऊवारी साडीचा भार पेलवत नाहीसा झाल्यावर पाचवारी साडी नेसू लागल्या.
त्यांचे केस तर इतके लांबसडक होते की पलंगावर झोपल्यानंतर केस मागे सुटे करून सोडले तर खाली जमिनीपर्यंत टेकत असत. एकदा अशीच गंमत झाली. माझी मुलं दोन-चार वर्षाची असताना घडलेली गोष्ट. आजी, त्यांना आपल्या बरोबरीचीच वाटायची. एकदा शाळेतून आल्यानंतर त्यांनी तिचे जमिनीवर विसावलेले, सहा इंच लांबीचे केस कात्रीने कापून टाकले आणि ती उठण्याची वाट बघत बसले.
मोठ्या मुलावर तिचा अतिशय जीव आहे. त्याला हे लहानपणी बरोबर समजलं होतं. तो सुद्धा गमतीने लहर आली की तिला आजी न म्हणता, ‘नलिनी’ अशी हाक मारत असे. आज सुद्धा त्यांना या आठवणीने हसायला येते.
त्यांच्या आयुष्यातील त्यांना अभिमान वाटणारी गोष्ट म्हणजे त्यांचे यजमान भारतात आणि काही प्रमाणात अंतर राष्ट्रीय स्तरावर सुद्धा उत्कृष्ट ‘ब्रिज’ प्लेअर म्हणून प्रसिद्ध होते आणि त्यांच्या खेळाचा इंग्रजी वर्तमानपत्रात उल्लेख नाही असा एकही दिवस जात नसे. तरुणपणी खाण्याच्या बाबतीत अत्यंत खोड्याळ आणि तितक्याच चोखंदळ होत्या. अतिशय स्वादिष्ट, रुचकर स्वयंपाक करायचा. कोणतेही लाडू आणि नाना प्रकारच्या वड्या करणे हा तर त्यांचा हातखंडाच होता. त्यांचा आवडता रंग आकाशी आहे. सासू-सासरे मराठी चित्रपट बघत असत. कुंकू आणि ब्रह्मचारी हे त्यांचे आवडते चित्रपट होते आणि रमेश देव- सीमाची जोडी त्यांना नेहमीच आदर्श वाटत असे.
मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथिविमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची… पर्वा बी कुनाची
‘कुंकू’ सिनेमातील हे त्यांचं अतिशय आवडत गाणं होते आणि त्या नेहमी गुणगुणत असत.
त्यांना वाचनाची जबरदस्त आवड होती अगदी शेंगदाण्याची पुडी उलगडून कागदावरील मराठी- इंग्रजी दोन-चार ओळी वाचल्या खेरीज तो कागद टाकत नसत. हे मी सुद्धा मी अनुभवले आहे. एस. एन. डी. टी. कॉलेजात त्या एक वर्ष जात होत्या. पण परीक्षेला मात्र बसल्या नाहीत व तिथेच त्यांनी शिक्षण सोडले.
माझ्या सासूबाईंना त्यांच्या लग्नानंतर त्यांच्या ‘उज्जैनला’ राहणाऱ्या ‘सासऱ्यांच्या’ सहवास काही काळापुरताच मिळाला कारण, लग्नानंतर सासरे अल्पावधीत निधन पावले आणि त्यांची मुंबईला येऊन राहण्याची तयारी नव्हती. माझ्या सासऱ्यांनी सासूबाईंचे लाड असे केले नाही पण घरात खाण्यापिण्यात कोणतेही , काही कमी नव्हते. नाही म्हणायला त्यांनी एकदा आपण होऊन त्यांना दोन साड्या आणल्या होत्या
मुलुंड येथील ‘गोल्डन केअरचे’ डॉ. शाम मोरे आणि डॉ. सौ. शामा मोरे त्यांच्या स्टाफच्या सहकार्याने त्यांची अतिश योग्य अशी काळजी घेतात आणि म्हणूनच त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटत नाही. आज त्या १०१ (एकशे एक) वर्षात पदार्पण करीत आहेत. आज त्यांची मुले, नातवंडे आणि पंतवंडे या प्रसंगाला आनंदाने त्यांना शुभेच्या देत आहेत.
तरी आजींना निरामय आयुष्य लाभो हीच प्रार्थना.
– सौ वासंती गोखले
17/12/2023
आजींना खूप खूप शुभेच्छा !छान आदरणीय व्यक्तिमत्त्व!