ही घटना खूप जुनी. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या काळातली. अजूनही मनात ताजी असलेली. त्या वेळी पुण्यातल्या एका दैनिकाचा प्रतिनिधी म्हणून मी महाराष्ट्राच्या विधानसभेत वृत्तांकनासाठी हजर होतो. 27 जुलैचा तो दिवस. महाराष्ट्र विधिमंडळात त्या दिवशी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यायचा ठराव संमत झाला. शरद पवार मुख्यमंत्री होते. मला आठवतं, त्या दिवशी विधानसभेत या ऐतिहासिक घटनेचं कौतुक करणारी भाषणं होत होती. पत्रकारितेत तसा मी जुना झालो नव्हतो. भाषणांनी भारावून गेलो होतो. एका सदस्यानं सांगितलं, “आपण इतिहास घडविला आहे; पण आज आपण सर्वांनी मराठवाड्यात जाण्याची गरज आहे. तेथील जनतेला शासनाच्या निर्णयाची पार्श्वभूमी, भूमिका सांगण्याची गरज आहे.” कौतुकाच्या भाषणात हे आवाहन, हा इशारा मागे पडला. त्याच दिवशी अधिवेशनाचं सूप वाजलं. मी पुण्यात येऊन माझ्या कामाला लागलो.
त्यानंतर मराठवाड्यातून येणाऱया बातम्या पहात होतो. त्या भागात कमालीची अस्वस्थता होती. सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या होत्या. दोन दिवसांतच त्याला उग्र रूप आलं आणि सारा मराठवाडाच पेटला आहे की काय, असं वातावरण निर्माण झालं. माझी अस्वस्थता वाढत होती. माझ्यातला पत्रकार मला स्वस्थ बसू देत नव्हता. मी थेट संपादकांना भेटलो. त्यांना म्हणालो, “मला मराठवाड्यात जायचं आहे. रोज प्रत्यक्ष माहितीवर वृत्तांत पाठवीन.” आजच्यासारखी त्या वेळी संवादसाधने विपुल नव्हती. फोन, तार, टेलेक्स असा तो जमाना होतो. संपादक म्हणून त्या वेळी श्री. ग. मुणगेकर होते. ते म्हणाले, “तू जाऊ नयेस. ते धोक्याचं आहे. स्वतंत्र गाडी घेऊन जाणं अधिकच धोक्याचं आहे. स्थानिक पातळीवर आपले वार्ताहर आहेत, ते पाठवतील त्या बातम्या चांगल्या वापरा. वृत्तसंस्थांच्या बातम्या आहेतच.” मी नाराज झालो; पण निराश नव्हे. मी म्हणालो, “मला आठवडाभराची रजा द्या. मी बातम्या पाठवीन त्या वापरा. दुर्दैवानं काही घडलच, तर ती माझी जबाबदारी असेल. मी सुखरूप परत आलो, तर माझा दौरा अधिकृत समजा.” माझ्या या प्रस्तावावर संपादक अधिक नाराज झाले. म्हणाले, “तुम्ही तुमच्या जिवावर उदार झाला म्हणून काय झालं. माझ्याही काही जबाबदाऱया आहेत. तुम्हाला परवानगी देता येणार नाही.” मी परतलो. त्या दिवशी रात्री झालेली घटना पत्नीला सांगितली. मी जावं, असंच तिलाही वाटत होतं. रात्रीचे अकरा वाजले असतील. माझा एक सहकारी घरी आला होता. त्या वेळी घरात फोन नव्हता. तो म्हणाला, “तुला मराठवाड्यात जायला संपादकांनी परवानगी दिलीय. तुझ्या सोयीनं तू जा. हा दौरा अधिकृत असेल.” आनंद आणि उत्साह कशाला म्हणतात, त्याचा अनुभव घेतला मी अन् औरंगाबादकडे पहाटेच रवाना झालो. मजल-दरमजल करीत औरंगाबादेत पोहोचलो. परिस्थिती वाटत होती त्यापेक्षा गंभीर होती. महामार्गावर ठिकठिकाणी पूल कापण्यात आले होते. तारा बांधून रस्ता बंद करण्यात आला होता. रेल्वे जाळण्यात आल्या होत्या. आंदोलनाचा वणवा वाढत होता. औरंगाबादेत माझी भेट झाली `टाईम्स’चे प्रतिनिधी पडियार यांच्याशी. आज ते हयात नाहीत; पण अत्यंत शिस्तबद्ध पत्रकार. मला एकट्यानं नांदेडपर्यंत जाणं कठीण होतं. एसटी वाहतूक बंद होती. टॅक्सीही नव्हत्या. त्या वेळी औरंगाबादेत शहा नावाचे एक एजंट होते. त्यांची एक गाडी नांदेडकडे अंक नेण्याचा प्रयत्न करणार होती. त्यात मुंबईच्या मोठ्या दैनिकाचे म्हणून पडियार यांना नेण्याचं ठरलं होतं. मोठ्या हिकमतीनं पडियार यांना चिकटलो आणि आमचा दौरा सुरू झाला. घटना मोठी होती. टाईम्सनं स्वतंत्र फोटोग्राफरही दिला होता. टाईम्स या इंग्रजी दैनिकाची आणि आमच्या दैनिकाची स्पर्धा नाही, असं सांगत मी त्या छायाचित्रकाराकडून फोटो मिळण्याची व्यवस्था केली. त्या वेळी औरंगाबादेत नागनाथ फटाले नावाचे ज्येष्ठ पत्रकार काम पहात होते. आमच्यासाठीही ते बातम्या पाठवत. विशेष म्हणजे, एसटीच्या हमाल संघटनेचे ते अध्यक्ष होते. याचाच अर्थ, माझ्या अंकात फोटो प्रसिद्ध होण्यासाठी सायंकाळपर्यंत तरी ते औरंगाबदला पोहोचणे आवश्यक होते. पुढची जबाबदारी फटालेंची होती. काम सुरू झालं. वृत्तांत, मुलाखती, घटना, प्रतिक्रिया, असा रोजच्या रोज मजकूर जमा होत होता आणि फोन-तार या माध्यमातून जातही होता. टाईम्सचा फोटोग्राफर खऱया अर्थानं व्यावसायिक छायाचित्रकार होता. त्याचे फोटो उत्तम असत. ते मी पाठवीत होतो आणि आश्चर्य म्हणजे, माझ्या दैनिकात ते फोटो रोजच्या रोज ठळकपणे प्रसिद्ध होत असत. तेच फोटो टाईम्समध्ये दुसऱया दिवशी पहिल्या पानावर प्रसिद्ध होत असत.
वृत्तपत्रात मग ते कोणत्याही भाषेतलं असो, स्पर्धा ही असतेच. आजही आहे; पण त्या काळी अत्यल्प साधनसामग्रीत टाईम्सच्या आधी ठसठशीत छायाचित्र प्रसिद्ध करण्याचा मान माझ्या वृत्तपत्राला मिळाला आणि समाधान मला मिळालं.
मी जे काही केलं ते योग्य की अयोग्य, असा प्रश्न त्या वेळीही मला कोणी केला नाही. आज तो कोणी करील, अशी स्थिती नाही.
म्हणतात ना, प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं!
तसंच काहीसं हे असावं
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply