दोघांना उभं करीत आणि मग आमच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करीत. मी त्यांना म्हणायचोही, मी काही खूप मोठा नाहीये. हा नमस्कार विचित्र वाटतो. त्या म्हणत, `आज एकादशी आहे. लक्ष्मी-नारायणाचं, विठ्ठल-रखुमाईचं दर्शन नको का घ्यायला. तुमच्या रूपानं तोच आशीर्वाद देतो.’ बाईंच्या पहिल्या नमस्काराच्या वेळी मी संकोचलो होतो. सारं शरीर आक्रसून घ्यावं की काय, असं वाटत होतं; पण पुढच्या वेळेला तसं झालं नाही. त्या वाकायच्या, माझ्या पायावर त्यांचं कपाळ असायचं अन् स्वाभाविक म्हणून मीही वाकायचो. हात त्यांच्या खांद्यावर जायचे. त्या उभ्या राहत त्या वेळी माझे हात जोडलेले असायचे, डोळे बंद असायचे. तो क्षणभर तरी तिच्या मनानतल्या विठ्ठलाचा मी विचार करायचो. वाकणं, नम्र होणं, नतमस्तक होणं याचा काय आणि कसा परिणाम होतो, हे मी त्या वेळी अनुभवत असायचो. नतमस्तक त्या होत असत आणि मीही. नमस्काराचा आनंद काय असतो ते कळायला लागलं होतं. आपण अनेक वेळा डोक्याजवळ हात नेऊन उडता नमस्कार करतो. त्याची प्रतिक्रियाही तशीच असते. रस्त्यानं जाताना दिसलेल्या किंवा न दिसलेल्या देवाला असा अनेक वेळा मी नमस्कार केला असेल; पण त्यातली व्यर्थता जाणवली ती या अशा नतमस्तक होण्यानं. पत्रकारितेत असल्याचे जसे काही लाभ असतात तसेच तोटेही. माणसं तुम्हाला आतून बाहेरून कळतात अन् मग एक वाक्य सहजी मनात येतं, `नमस्कार करावेत असे पायच आजकाल आढळत नाहीत.’ मी विचार करतो ज्या वेळी त्या बाईंनी मला नमस्कार केला तेव्हा तिच्या मनात का नाही हा विचार आला? मी तर काही सर्वगुणसंपन्न नव्हतो, नाही. तरीही तिच्या मनात दर्शनासाठीचे पाय योग्य आहेत का, हा प्रश्न आला नाही; कारण बहुधा तिचं मन माझ्यापेक्षा खूपच विशुद्ध असावं. मला नमस्कार करून तिला काय मिळालं याची कल्पना नाही मला; पण त्या नमस्कारानं काही काळ का होईना मी स्वच्छ होत राहिलो. मला वाटतं, नमस्काराचं हे बळ असावं. या घटनेपूर्वी मी घरात आई-वडिलांना नमस्कार करीत नव्हतो असं नव्हे; पण त्या नमस्कारात भावनांपेक्षा औपचारिकता अधिक असायची. एकदा आईच्या पायावर डोकं ठेवलं अन् चमत्कारच अनुभवला. आईच्या डोळ्यांतून अश्रुधारा होत्या आणि माझे डोळेही पाणावले होते. नागपूरला असताना एक जाणवलं, इथं कार्यालयीन कामासाठी येणारा माणूसही अनेक वेळा नतमस्तक होतो. त्याला सावरताना आपणही वाकतोच. माझ्यातला मी, माझ्यातला अहं क्षणकाळ तरी कमी होतो. यापेक्षा आणखी काय हवंय. परवाच्या इंडियन एक्प्रेसमध्ये ए. आर. रहेमान याची मुलाखत वाचत होतो. त्यानं म्हटलं होतं, `आपण अनेकांना भेटतो; पण त्या प्रत्येक भेटीत त्या माणसाच्या प्रतिमांचा विचार करतो; तो चांगला, वाईट अशी विभागणी करतो.’ असं जज्ज करीत राहिलो, तर माणसावर प्रेम करायला कधी आणि कसा अवधी मिळेल? एका नमस्कारानं मला नम्र व्हायला शिकविलं, प्रेम करायला शिकविलं. तुम्ही कधी कुणाला असा नमस्कार केलाय? तुम्हाला कोणी केलाय? सांगाल तुमचे अनुभव?
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply