जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग ९७
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक ११
जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग ५३
नमस्कार करताना आणखी एक उपचार केला जातो, तो म्हणजे प्रदक्षिणा.
नामस्मरण करीत देवाला, गाभाऱ्याला, किंवा संपूर्ण देवळाला प्रदक्षिणा घातल्या जातात.
या प्रदक्षिणा केंद्रानुवर्ती असतात. म्हणजे देवाला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या भोवती फिरायचे. काय असेल याचा उद्देश? केवळ पुण्यप्राप्ती ? चालणं आणि प्रदक्षिणा मारणं यात फरक आहे !
अगदी हज्जार प्रदक्षिणा सुद्धा घातल्या जातात. गणपती पुळ्याच्या गणेशाचा प्रदक्षिणा मार्ग म्हणजे अख्खा डोंगरच आहे. या पूर्ण डोंगर हाच एक प्रदक्षिणामार्ग आहे. केवढा व्यायाम होईल ? अशी एक प्रदक्षिणा झाली तरी पुरे !
सरळ चालणे हा व्यायाम म्हणून भारतीय शास्त्रात वर्णन केलेला नाही. चिकित्सा स्वरूपात चंक्रमण वगैरे शब्द आढळतात. पण सर्वमान्य व्यायाम प्रकारात चालणे हा व्यायाम नाही. पण प्रदक्षिणा घालणे हा उत्तम व्यायाम होतो.
चालणं तर चालणंच असतं. त्यात काय एवढं ? देवळात चाललं काय किंवा रस्त्यावरून चाललेलं काय, व्यायाम तर तेवढाच होईल ना ! अगदी तेवढेच किमी अंतर चालून जळणाऱ्या कॅलरीज सारख्या असतील ???
नक्कीच नाहीत.
सरळ चालणं आणि गोलाकार प्रदक्षिणा किंवा स्वतःभोवती गिरकी घेत घातलेली प्रदक्षिणा यात काही विशेष आहे का ?
हो नक्की आहे.
आपण पृथ्वीवर राहतो. ही पृथ्वी, ही भूमाता सूर्य देवाभोवती फिरते. आणि स्वतःभोवती फिरते. या भूमातेभोवती चंद्र फिरतो. हा चंद्र स्वतःचे गुरूत्वाकर्षण राखून पृथ्वी सभोवती फिरतो. जसा चंद्र, जशी पृथ्वी, तसा बुध, मंगळ, गुरू, शुक्र शनि या रवि भोवती फिरत असतात. आणि ते सुद्धा स्वतःचे गुरूत्वाकर्षण, एकमेकातील विशिष्ट अंतर आणि वेळ राखून ! या विश्वात आपली जशी ही एक सूर्यमाला आहे, तशा आणखी कितीतरी सूर्यमाला अस्तित्वात आहेत ( कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे…. )
या ग्रह ताऱ्यांच्या भ्रमणातून विश्वामधे एक विशिष्ट गतीज उर्जा तयार होत असते. ( पंख्याची गती कमी जास्त केली तर होणारा वेगवेगळा परिणाम आपण अनुभवतोच ना आपण ! तस्संच ग्रहताऱ्यांच्या या परस्पर फिरण्यातून या विश्वामधे एक उर्जा प्रक्षेपित होत असते. ) या गतीज उर्जेमधे स्वतःला सामावून घेणे, या गतीज उर्जेबरोबर स्वतःला जोडून घेणे म्हणजे ही प्रदक्षिणा!!
नुसत्या सरळ चालण्यातून हे साध्य होत नाही. आपण ज्या वाहानामधे असतो, ती गती आपल्याला नकळत प्राप्त होत असते. जसे लिफ्टमधे असताना वरखाली झाल्यासारखं वाटणं, रेल्वेमधे असताना ती गती आपल्या रक्ताभिसरणाला येते, जायंट व्हील किंवा रोलर कोस्टर, थ्री सिक्स्टी डिग्री रोटेटर मधे बसलो असताना आपले शरीर तसेच हलत राहाते. म्हणून आपल्याला हलल्यासारखे, गरगरल्यासारखे वाटते, कारण त्या गतीशी आपल्याला जुळवून घेता येत नाही.
प्रदक्षिणा घालताना मात्र आपण या विश्वगतीबरोबर, आपणाला फिरवले तर परस्परांच्या गतीला किंवा गुरूत्वाकर्षण शक्तीला छेद न जाता, त्या गतीशी एकरूप होऊन जातो.
ही प्रदक्षिणा देवाभोवती असो वा देहा भोवती,
जोडून घेतलं जातंय विश्वाशी.
ग्रह ताऱ्याच्या गतीशी
जीवनाचं उद्दिष्टच हे आहे की या विश्वाशी एकमेकांशी जोडून घेत, एकरूप होऊन जावं, हाच मोक्ष !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
17.07.2017
आजची आरोग्यटीप
Leave a Reply