जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग ९९
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक ११
जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग ५५
तुळशीला प्रदक्षिणा घालणे हा प्रकार तर आता हद्दपारच झाल्यासारखा आहे. जिथे आम्हाला राहायला जागा इंच इंच लढवून मिळवली आहे, तिथे तुळशीला कुठे जागा ? शक्यच नाही. जमलंच तर गॅलरीतला एखादा कोपरा मिळेल.
गावाकडे या तुळशीभोवती फिरायला बऱ्यापैकी जागा असते. फक्त फेऱ्या घालणाऱ्या तुलसीच कमी झाल्या आहेत. सकाळी आंघोळ झाल्यावर तुळशीला तीन प्रदक्षिणा घालून त्याच्या एका फांदीला हळद कुंकू लावणारी ‘आई’ हरवली आहे. तुळशीच्या पानावरून पाणी ओतून पानाखाली हात धरून ते पाणी तीर्थ म्हणून पिणारी ‘ताई’ हरवली आहे.
वेळ जात नव्हता म्हणून या फेऱ्या मारल्या जात होत्या का ? का या साऱ्या अंधश्रद्धा म्हणायच्या ? तुळशीमधून फक्त ऑक्सीजनच नाही तर ओझोनसुद्धा मिळतो म्हणे ! असे आजचे विज्ञान देखील सांगते. कदाचित याच कारणासाठी पूर्वी रुग्णाच्या अंतिम अवस्थेमधे त्याला गंगाजल आणि तुळशीचे पान तोंडात दिले जाई. (तेवढंच प्राणवायु लावल्यासारखं )
पण काळाबरोबर गावे देखील बदलत गेली. रूढी परंपरा बदलत गेल्या, विज्ञान तंत्रज्ञान बदलत गेले. आपणही सकारात्मक बदललो आणि रोग देखील !
ज्या बिचाऱ्यांना अशा तुळशीला गोलाकार फेऱ्या मारायला जागा नाही, त्यांच्यासाठी एक मस्त उपाय आहे. स्वतःला प्रदक्षिणा!
प्रदक्षिणा घालताना कधीही पावलाच्या समोर पाऊल येत नाही. तर पावलाच्या जवळ पाऊल पडते.
कॅटवाक नावाचा चालण्याचा एक पाश्चात्य प्रकार आहे, वाघ फॅमिलीतील आमची मनीमाऊ जशी चालताना सुंदर आणि आकर्षक डौलदार दिसते, तसं चालण्याचा प्रयत्न म्हणजे कॅटवाॅक. प्रत्येक पाऊल टाकताना एका सरळ रेषेतच टाकायचे. म्हणजे त्यात, जमिनीवर स्थिर असलेल्या पावलाच्या बरोबर समोर उचललेले पाऊल कटाक्षाने टेकवले जाते. उजवे पाऊल उचलून उजव्या बाजूने आणि डावे पाऊल डाव्या बाजूने उचलून पुनः आतमधे घेत, पायात – पाय आत अशी ही चाल खेळली जाते. पायात लांब खडू धरला तर जमिनीवर अर्धवर्तुळाकार नक्षी तयार होत जाईल. भूमितीच्या भाषेत हे चालणे म्हणजे कंसगती. असे चालणे हा उत्तम व्यायाम पण आहे बरं. दोन्ही गुडघ्याच्या बाजूच्या स्नायुबंधनाना कॅटवाॅक करणे उत्तम व्यायाम आहे. अर्थात हाय हील्स घालून नव्हे, तर मोकळ्या पायानी….
जसा कॅट वाॅक करत चालणे हा उत्तम व्यायाम आहे, तसाच स्वतःभोवती गोल गोल फिरणे हा देखील एक उत्तम व्यायाम आहे. या गोलगोल फिरण्याच्या व्यायाम प्रकारात, टाचेजवळ टाच आणि अंगठ्याच्या जवळ अंगठा आणला जातो. कुठेही पाय ओव्हरलॅप न होता, फाॅरवर्ड बॅकवर्ड अॅक्शन न होता, पावले उचलून बाजूला फिरवली जातात, आणि गुडघ्याच्या दोन्ही बाजूच्या स्नायुंना व्यायाम घडतो.
हा व्यायाम गुडघा, मांड्या आणि कंबरेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. जो व्यायाम प्रदक्षिणा घालताना होतो तसा व्यायाम, तसे पाय फिरवणे, नेहमीच्या व्यवहारात कधीच होत नाही.
केवळ पायच नव्हे तर सोनूचा पूर्ण पाठीचा कणा देखील गोल गोल गोऽल गोऽल फिरवला जातो.
सोनू, तू स्वतःभोवती फिर गं
गोल गोल गोऽल गोऽल
आहे त्याचे मोल फार, अनमोल अनमोल
सोनू तुझं फिरण्याचं काम गं काम गं.
काम नव्हे होईल तो व्यायाम गं व्यायाम गं
सरळचालुन गुडघे तुझे दुखतील दुखतील
आजूबाजूऽला ते, वाकतील वाकतील.
सोनू तु प्रदक्षिणा घाल गं घाल गं.
जिमची दक्षिणाऽ, वाचेल गं वाचेल गं.
सोनू मला तुझी काळजी हाय ग हाय गं.
सोनू तू स्वतःभोवती फिर ग फिरगं
ए ऽ सोनूऽऽऽऽ
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
19.07.2017
आजची आरोग्यटीप
आजच्या आरोग्यटीपेला म्हणजे प्रदक्षिणेला आधारून माहिती.. (डॉ.विनया लोंढे यांच्याकडून)
प्रदक्षिणा करतानाचा मंत्र…..
“यानि कानि च पापानि
जन्मांतरकृतानि च।
तानि तानि विनश्यंति
प्रदक्षिणपदे पदे”॥
अर्थ…….
जो पाप मेरे द्वारा पूर्वजन्म मे भी किए गये हैं
वह संपूर्णतया इस प्रदक्षिणा सेवा द्वारा
पग पग से नष्ट होंगे।
Leave a Reply