जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग १०१
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक ११
जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग ५७
गणपती आणि कार्तिकेयाची गोष्ट सर्वानाच माहिती आहे. फक्त आठवण करून देतो. सर्वात मोठी प्रदक्षिणा कार्तिकेयाने आपल्या शक्तीने प्रत्यक्ष घातली होती. संपूर्ण पृथ्वीला बाहेरून प्रदक्षिणा ! आणि बुद्धीमान गणेशाने प्रदक्षिणा घातली होती, आपल्या मातापित्यांनाच. आणि मोदकावर आपला हक्क सांगितला होता.
विश्वातील आद्य कुटुंब म्हणून शिवपार्वतीचं नाव घेतलं जातं. त्यांची शक्ती आणि युक्ती ही दोन लेकरं आहेत. आपली ही जी सर्व दैवतं आहेत, ती समजून घेण्यासाठी देखील आपल्याला तीन प्रकारचे मार्ग सांगितलेले आहेत. भक्तीमार्ग, कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग. जो जे वांछिल तो ते लाहो.
ही दैवतं समजून घेण्यासाठी काही वेळा रूपक कथा सांगितलेल्या आहेत. त्या कथा, कथा म्हणूनच समजून घ्यायच्या असतात. कथाभाग महत्वाचा !
इसापनीतीच्या कथांमधून आपण काय शिकतो, कसं शिकतो ?
” …. तर कावळा म्हणाला, अस्वल म्हणाले, कोल्हा म्हणाला….”,
हे गोष्टी मधे ठीक आहे, पण प्रत्यक्षात असं कावळा, अस्वल, कोल्हा कधीच बोलत नाही, हे सर्वानाच माहिती आहे. माॅरल ऑफ द स्टोरी समजण्यासाठी ती गोष्ट.
बुद्धिमान लोकांना ज्ञानयोग, कर्ममार्गी लोकांकरीता कर्म योग तर माझ्यासारख्या भक्तीमार्गाने जाणाऱ्या मंडळींना भक्तीयोगातून जगण्याची सूत्रे आणि जगण्याची मर्मे सांगितले आहेत. हे बुद्धीवाद्यांना पटत नाही. पटवून घेत नाहीत. मग वैचारिक गोंधळ निर्माण होतो. गैरसमज वाढतात. एखादी गोष्ट सोपी करून सांगितली तर जे सांगायचं आहे, ते पटकन समजेल. बाकीचा फापटपसारा सोडून देऊ. पण आम्ही त्या फापटपसाऱ्यातील फक्त केर गोळा करणार. जे सोडून द्यायचे आहे, तेच कर्मकांड लक्षात ठेवणार, आणि शब्दच्छल करीत नुसते विचारांचे बुडबुडे सोडत राहणार…..
महत्त्वाचे काय ? जीवनातील मर्म समजणे.
आईवडिलांचे आपल्या जीवनातील स्थान काय आहे, हे समजून सांगण्यासाठी गणपती आणि कार्तिकेयाची ती प्रदक्षिणेची गोष्ट!!
“मग तुमचा कार्तिकेय मोरावर बसूच कसा शकला, आणि पिसारा सांभाळत जास्तीत जास्त पंधरा ते वीस फूट उडू शकणारा मोर, पृथ्वी प्रदक्षिणा कशी घालू शकेल, आणि गणपती बाप्पा, उंदरावर कसा बसेल ? त्या उंदराचा आकार केवढा, गणपती केवढा, तो त्याच्यावर बसू कसा शकेल.? आम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवा. ??? तरंच आम्ही विश्वास ठेवू. नाहीतर याला थोतांड म्हणा ! ”
असंल काहीतरी शब्दच्छल करत, गोष्ट सांगण्याचा मूळ उद्देश राहतो बाजूलाच, विषय एवढा भरकटतो, की गाडी शेवटी हिंदु धर्मावर येऊन थांबते. आणि त्याला वरून फोडणी द्यायची ती जातीयवादाची ! ज्ञानमार्गातील विषय, भक्तीमार्गाने सोडवता येत नाही. किंवा भक्तीमार्गातील विषय ज्ञानमार्गाने सोडवता येणार नाही. अशा बुद्धीभेद करणाऱ्या मंडळींना वेळीच ओळखावे आणि तांदळातील खड्यासारखे बाजूला ठेवावे. तर समाज एकसंध राहील.
जीवन जगण्याचं मर्म सोडून देऊन एकमेकांचं वर्म काढल्यामुळे समाज दुभंगला जातोय, याकडे कोणाचंच लक्ष नाही. प्रदक्षिणा कोणाला आणि का घालायची आहे, त्यातून शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक लाभ प्रत्येक स्तरावर वेगवेगळे मिळणार आहेत. हे लक्षातच घेतले जात नाही. आणि विचारांचे घोटाळे वाढवले जातात. असे होऊ नये.
“माॅरल ऑफ द स्टोरी” महत्त्वाचे.
बाहेरून जगाला कितीही मोठ्या प्रदक्षिणा घाला, त्यापेक्षा आतमधे आत्मारामाला प्रदक्षिणा घडवणे जास्त महत्त्वाचे, प्रदक्षिणा घातल्याने व्यायाम घडतो आणि अनेक रोग कमी होतात. हा ज्ञानयोग.
नुसतं सांगून बोलून, आणि भाषणं ठोकून उपयोगी नाही, प्रत्यक्षात त्या प्रदक्षिणा, साष्टांग नमस्कार, वाकून नमस्कार, लोटांगण घातले पाहिजे. ( आफळे बुवा सांगतात त्याप्रमाणे, बुवा आपल्याला घरी जेवायला बोलवायचं मनात आहे. नुसती इच्छा व्यक्त करून बुवांचं पोट भरणार आहे का ? प्रत्यक्ष जेवू घालण्याचे कर्म करणार का ? ते जास्ती महत्त्वाचे. ) हा झाला कर्मयोग.
आणि प्रदक्षिणा घातल्याने पुण्य मिळते, हा झाला भक्तीयोग.
आपल्यापुढे मांडून ठेवलेलं आहे. ज्याला जे हवंय, जसं हवंय तसं घ्यावं , आपण सुखी व्हावं, इतरांना सुखी करावं.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
21.07.2017
आजची आरोग्यटीप
Leave a Reply