नवीन लेखन...

।। नामस्मरण भक्ती ।।

नाम स्मरे निंरतर । ते जाणावे पुण्य शरिर । महा दोषांचे गिरीवर । रामनामे नासती ।। ही ओवी दासबोधा मध्ये दशक ४ समास ३ नामस्मरणभक्ती या समासातील २२ वी ओवी आहे. संपूर्ण समासात नामस्मरण कसे करावे, कसे असावे याचे अत्यंत सुंदर विवरण श्री समर्थांनी केले आहे.

जेव्हा आपल्याला सद्गुरु कडून अनुग्रह मिळतो तेव्हा श्रीगुरु नामसाधने साठी एका दैवताचे नाम देतात तेंव्हा त्या शिष्याला प्रश्न पडतो. १) नाम म्हणजे काय? २) ते का घ्यायचे? ३) कुणी घ्यायचे? ४) कुठवर घ्यायचे ५) नाम कसे आणि केंव्हा घ्यायचे.

वरील सर्व प्रश्न प्रत्येक साधकाच्या मनात थोड्यफार फरकाने पडत असतात. “नामस्मरण” या शब्दात “नाम” आणि “स्मरण” असे दोन शब्द आहेत.

१) नाम म्हणजे काय? : – जेंव्हा निर्गुण परब्रह्म प्रत्यक्ष सगुणात येतो तेंव्हा म्हणजे अवतार धारण करतो तेंव्हा तो एका नामा सहीतच येतो. उदा श्रीराम, श्रीकृष्ण हे जेंव्हा मनुष्य रुप, देह धारण करतात तेंव्हा आपल्या सोयी साठी आपण त्यांचे नामकरण करतो. जन्मोत्सव साजरा करतो. पण परब्रह्म हे निर्गुणातून सगुणात अवतरतात ते त्यांच्या नामा सहितच. म्हणून भगवंत जो अवतार धारण करतो त्या नुसार त्यांचे नाम असते. जसे दशावतारा मध्ये भगवंताची वेगवेगळी रुपे आणि नामे आहे. पण सगुण रुप वेगवेगळी असली तरी निर्गुण परब्रह्म हे एकच आहे. भगवंताच्या नामा मध्ये एक अलौकीक
शक्ती आहे. त्याचे अवतार कार्य जो पर्यंत असते तेव्हा तो त्या नामानेच ओळखला जातो. आणि जेंव्हा अवतार कार्य संपते त्यानंतर सुद्धा ते नाम तसेच अबाधीत रहाते. ते नाम तुमच्या आमच्या साठी शिल्लक रहाते. तेथे “नाम”आणि “नामीचा” अभेद आहे.

२) नाम कुणी घ्यायचे? : – फक्त मनुष्यालाच नाम घेण्याचा अधिकार आहे. इतरेतर प्राण्यांना म्हणजे चार पायाचे प्राणी, श्वापदे, किटक यांना तो अधिकार नाही. त्यांना वाणी नाही. ते फक्त एका विशष्ट आवाजातच ओरडतात, त्यांना बुद्धी असते ती फक्त आहार, भय, निद्रा आणि मैथुन येवढ्या पुरतीच मर्यादीत असते. म्हणून मनुष्यालाच फक्त नाम घेण्याचा अधिकार आहे.

३) नाम कुठवर घ्यायचे? : – जोवर आपला श्वासोच्छवास चालू आहे तोवर आपण नाम घ्यावे. मरे पर्यंत आपण श्वास घेतो तसेच नमाचे आहे. श्वासोच्छवास थांबला की मरण येते. अगदी तसेच नाम थांबले की मरण आले असे वाटले पाहिजे. माझा “मी” पणा मरे पर्यंत नाम घ्यावे. शेवटी “मी” जातो आणि नाम तेवढेच शिल्लक रहाते.

४) नाम कसे आणि केव्हा घ्यायचे? : – नाम कसे घेऊ? म्हणजे पेढा कसा खाऊ असे विचारणे होईल. पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो. तसे नाम कसेही घेतले तरी ते आपले काम करतेच. जसे शेतात आपण “बी” पेरतो तेंव्हा त्याचे तोंड बरच्या बाजूला आहे की खालच्या बाजूला आहे ते पहात नाही, त्यास मोड आल की ते जमीनीतून बाहेर बरच्याच बाजूला येते अगदी तसेच नाम कसेही घेतले तरी ते आपल्याला योग्य मार्गावरच नेऊन सोडते. आता नाम केंव्हा घ्यायचे? श्री समर्थ म्हणतात…

नित्य नेम प्रात:काळी । माध्यानंकाळी सायंकाळी । नामस्मरण सर्वकाळी । करित जावे ।।

चालता बोलता धंदा करिता। खाता जेवीता सुखी होता । नाना उपभोग भोगीता । नाम विसरो नये ।।

तेंव्हा नाम केंव्हा घ्यावे हा प्रश्नच उरत नाही. मनाच्या कोणत्याही अवस्थेत नाम सोडू नये. समर्थ मनाच्या श्लोकात लिहीतात, प्रभाते मनी राम चिंतीत जावे. असे का म्हणतात. मन नाम घेते का? सांगीतलेले ऐकते का? अचपळ मन माझे नावरे आवरीता। यासाठी नामावतार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात… दानधर्म, तिर्थयात्रा, सगळी सत्कर्मे, पारायण या सर्व गोष्टी इंद्रिया सारखी आहेत आणि भगवंताचे नामस्मरण हा प्राण आहे. सर्व इंद्रिये आहेत पण प्राण नसेल तर त्या इंद्रियांचा काही उपयोग नाही. अगदी तसेच नामरुपी प्राण नसेल तर बाकी सर्व उपाधी असल्या तरी त्यांचा काही उपयोग नाही. नाम हा प्राण समजून कर्तव्यकर्म करावे आणि मुखाने नाम घेत प्रपंच करावे.

नामाचा प्रवास परा वाणीतून सुरु होतो. परा,पश्चंती, मध्यमा आणि वैखरी अशा चार वाणी आहेत. परा वाणीत फक्त स्फुरण होते. परा वाणीतून ते पश्चंती मध्ये येते. तेथे ते नाम शब्दरुपी आकार घेते तसेच ते नाम पश्चतीतून मध्यमे येते. आणि मध्यमा वाणी द्वारे वैखरी वाणी मध्ये शब्दरुपी नाम प्रत्यक्ष बाहेर येते. आणि असाच अखंड नामाचा अभ्यास करता राहीले की तेच नाम पुन्हा वैखरीतून मध्यमेत आणि मध्यमा वाणी वाटे पश्चंतीत येते आणि तिथेच ते नाम स्थिर होते. आणि हीच खरी नामसाधना.

नामसाघनेत नाम व नामी म्हणजे नाम व दैवत यात काहीच भेद नाही. असा दृढ निश्चय असावा. त्यामुळे नाम आणि नामी याबद्दल कोणताही भ्रम रहाणार नाही. ज्याक्षणी नाम त्याक्षणी राम असा निश्चय असला पाहीजे.

तुकाराम महाराज म्हातात. “मुखी नाम हाती मोक्ष। ऐसी साक्ष बहुतांची।।” प्रत्येकाला वाटते मला भगवंताचे दर्शन व्हावे पण तो मार्ग चालत जाण्याचा नाही. भगवंताची भेट व्हावी या शुभेच्छा मध्ये तो प्रवास आरंभ होतो आणि त्याच्याशी समरस होण्यात तो विराम पावतो. या प्रवासात मुख्या अडचण अशी आहे ती म्हणजे भगवंताच्या विस्मृतीची. भगवंताचे आज्ञान हे त्याचे मुख्य कारण आहे. भगवंताची विस्मृती नाहीशी करण्यास त्याचीच स्मृती ठेवणे हाच रामबाण उपाय आहे आणि ते फक्त नामानेच साध्य होते. विस्मृती दोन रुपाने येते. १) स्वरुपाची विस्मृती २) अस्तित्वाची विस्मृती भगवंताच्या अस्तित्वाची स्मृती स्थिर करण्यास भगवंताच्या नामा शिवाय दुसरा उपाय नाही.

अन्नमय आणि प्राणमय कोशा मध्ये वस्तुचे अथवा व्यक्तीचे स्मरण ठेवण्यास तिचे नाम पुन्हा पुन्हा आठवणे अतीशय उपयोगी पडते, म्हणून ज्या वैखरी वाणीने आपण दृष्ट्याशी व्यवहार करतो त्या वाणीने सारखे नाम घेणे हा भगवंताची आठवण ठेवण्याचा प्रथम उपाय आहे.

प्राणमय कोशा पर्यंत नाम चालते की ते श्वासा बरोबर चालते. श्वासावर नाम घेण्याचा अभ्यास केला तर नाम सतत श्वासावर चालेल. किंवा वैखरीने खुप नाम घेतले तर आपोआप श्वासावर बसेल. पण या क्रियेत यंत्रिकता येण्याची फार शक्यता असते. कारण देहाने व प्राणाने नाम घेतले तरी भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव सतत टिकेल याची खात्री नाही.

त्यासाठी नाम मनोमय कोशात शिरणे आवश्यक असते. पुर्व संस्कार, स्मृती, कल्पना, भावना, विकार व अवधान मिळून मनोमय कोश तयार होतो. आवड-नावड हा मनाचा धर्म आहे. मनाला ज्याची आवड असते त्याची स्मृती आपोआप रहाते. आवड असणे प्रेमाचे लक्षण आहे. म्हणून भगवंताची आवड उत्पन्न झाली म्हणजेच, भगवंतावर प्रेम करण्याची कला साधली तर त्याची स्मृती सहज टिकेल. सहवासाने प्रेम निर्माण होते. म्हणून मनाला सगुणोपासनेची जोड दिली तर नाम चालू असताना भगवंताची स्मृती टिकण्यास अडचण येणार नाही.

भक्ती म्हणजे काही दृष्य कर्म नाही, देहाचा प्रयत्न नाही. भक्ती मध्ये बाहेर धावणारे मन परतवून भगवंताला सन्मुख करायचे असते. पूर्व संस्कार बलाने मन जेंव्हा हातचे निसटते तेव्हा दृष्यामध्ये पुन्हा बुडी मारते. तेव्हा अशावेळी भगवंताची स्मृती जागी ठेवण्यास मनामध्ये नाम चालू ठेवण्या व्यतीरिक्त उपाय नाही. वास्तवीक नाम हा सच्चिदानंद वाणीरुप अविर्भाव आहे. माणूस नामाला चिकटला तर त्याचे मन क्रमाक्रमाने हळूहळू नामाचा आकार धारण करील. मग त्यमध्ये भगवंताच्या रुपाचा अविर्भाव आपोआप घडेल. म्हणजे माऊली म्हणते.

जे जे भेटे भूत। ते ते मानीजे भगवंत । अशा भगवंताच्या नामाने आणि रुपाने व्यापलेला मनात भक्तीरस निर्माण होतो. हा रस दास्य, सख्य, वात्सल्य अथवा मधूर भावाच्या रुपाने प्रकटतो. येथे भक्तांचा अहं क्षीण होतो. मग नाम निर्विशेष बनून विज्ञानमय कोशात शिरते. येथे अनाहत नामाचा साक्षात्कार होतो. हे खरे नामस्मरण आणि याच शरिराच्या स्थितीला समर्थ पुण्य शरिर असे म्हणतात. त्याचे दोष आपोआप नष्ट होतात. प्रारब्द व संचितही नष्ट होते. याच स्थितीला तुकाराम महाराज म्हणतात…

आनंदाचे डोही आनंद तरंग।
आनंदाचे अंगऽऽ आनंदाचं ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

सौ. पद्मजा श्री कुलकर्णी – डोंबिवली
मो. ९९८७८४३९८०

सौजन्य: गुरुतत्व
वर्ष २ रे, अंक ११ वा, (अंक २३) ठाणे,
मार्च – २०१९ पाने ४८, किंमत रुपये २५/-

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..