कोरोनानं संपूर्ण जगाला गेले दोन वर्षं वेठीस धरलं.. परिणामी सरकारनं लाॅकडाऊन जाहीर केलं.. त्यामुळे मार्च ते आॅक्टोबर २०२० हे आठ महिने सर्वांनी घरात बसून काढले… सगळं सुरळीत होईपर्यंत पुन्हा दुसरी लाट आली.. सहाजिकच नवीन वर्षात पुन्हा लाॅकडाऊन लागलं.. त्यामुळे नाईलाजास्तव सगळ्यांनी स्वतःला घरात कोंडून घेतलं…
‘रोटी, कपडा और मकान’ची सोय झाली पण ‘मनोरंजना’चं काय? तो प्रश्र्न सोनी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ नं सोडवला.. कोरोनाच्या छातीवर दडपण आणणाऱ्या बातम्या पहाण्यापेक्षा ‘हास्यजत्रा’ पाहून असंख्य रसिक पोटभर हसून, तणावातून मुक्त राहिले..
२१ सप्टेंबर २०१८ पासून सोनी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ ने ‘अस्सल मराठी विनोदाचे भांडार’ तमाम रसिकांसाठी खुले केले.. या कार्यक्रमाचे दिग्दर्शक आहेत, सचिन गोस्वामी. सचिन गोस्वामी व सचिन मोटे या जोडीने ही विनोदाची धुरा सांभाळलेली आहे.
सुमारे वीस विनोदी कलाकार या जत्रेतून आपल्याला आलटून पालटून भेटत रहातात.. त्यातील काही जोड्या लोकप्रिय ठरलेल्या आहेत. जसं समीर चौघुले व विशाखा सुभेदार. गौरव मोरे व वनिता खरात. प्रभाकर मोरे व रसिका वेंगुर्लेकर आणि तमाम रसिकांनी डोक्यावर घेतलेली जोडी.. प्रसाद खांडेकर व नम्रता संभेराव!!
तुम्हाला कोणत्याही समस्येने नैराश्य किंवा उदासीनता आली असेल तर आपल्या मोबाईलवरील ‘यु ट्युब’वर जाऊन या ‘काॅमेडी शो’च्या क्लीप पहा.. उपलब्ध असलेल्या शेकडो क्लीपमधून जर तुमच्या हाती प्रसाद-नम्रताची क्लीप लागली तर दहा मिनिटात तुमचे हसून हसून पोट दुखेल व उदासीनता जाऊन मन नक्कीच आनंदीत होईल…
असं काय आहे? या नम्रता उर्फ ‘नमा’ किंवा ‘नमू’ मध्ये?…
ते पाहिल्याशिवाय तुम्हाला कदापिही कळणार नाही.. पूर्वाश्रमीची नम्रता आवटे व आत्ताची संभेरावांची ‘नमू’ हे एक ‘अजब रसायन’ आहे!!
१९८९ मधील आॅगस्ट महिन्यात, मुंबईतील लालबागच्या चाळ संस्कृतीत या ‘गोलमटोल’ मुलीचा जन्म झाला. ती लहानाची मोठी या चाळीतच झाली. त्यामुळे लहानपणापासून तिनं विविध तऱ्हेची हजारो माणसं पाहिली. कळत नकळत त्या माणसांचं चालणं, वागणं, बोलणं, पहाणं हे ती टिपकागदाप्रमाणे डोक्यात टिपून घेत होती. प्राथमिक शाळेत असताना स्नेहसंमेलनात भाग घेऊन तिच्या अंगी धीटपणा आला. माध्यमिक शाळेत, आपल्या मैत्रिणी विविध स्पर्धेत भाग घेऊन यश मिळवतात मग मी का मिळवू नये? अशा इर्षेने तिने अनेक स्पर्धांमधून यश खेचून आणले..
महाविद्यालयात गेल्यावर सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन तिनं नाव कमावले.. ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ अशा शो मधून अभिनयाची सुरुवात करुन नाटक, सिनेमा व टीव्ही मालिकांत काम करुन चौफेर यश मिळविले.
‘जागो मोहन प्यारे’ या सिद्धार्थ जाधवच्या नाटकाचे पोस्टर डिझाईन मी केले होते. त्या नाटकात नम्रताला मी पहिल्यांदा पाहिलं.. त्याचवेळी तिच्या सहजसुंदर विनोदी अभिनयाचं सामर्थ्य, मला जाणवलं होतं..
नंतर ती ‘फू बाई फू’ मध्ये दिसली. काही काळानंतर ‘काॅमेडीची बुलेट ट्रेन’ मध्ये तिला पाहिलं.. ‘बाबू बॅण्ड बाजा’ नंतर प्रियांका चोप्राच्या ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटात एका धमाल भूमिकेत ती दिसली..
‘जत्रे’त तिची जोडी प्रसाद खांडेकर बरोबर फिट्ट जमली. प्रसाद स्किटही उत्तम लिहितो व साकारतोही.. आतापर्यंत प्रत्येक भागात, नमानं वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत, त्यातील ‘लाॅली’नं अफाट लोकप्रियता मिळवलेली आहे.
कधी नमा, साधी गृहिणी असते तर कधी परीक्षेत नापास झालेल्या ओंकार भोजनेची ती आई असते. ओंकार नापास झाल्याने खवळलेला प्रसाद, त्याला मारु लागतो तेव्हा त्याची आई त्याला पाठीशी घालून वाचवते.. ओंकारने ‘अगं अगं आई’ म्हटलं की, पब्लिकमध्ये हास्याची लाट येते..
कधी नमा, आगरी भाषेत बोलू लागते, ते तिच्या तोंडून ऐकण्यातच मजा आहे.. कधी ती बिहारी भाषेत लक्झरी प्रवासाचं तिकीट बुक करायला येते.. तेव्हा यादवजीचं नाव घेताच, तोंडावर पदर घेऊन ती लाजवाब लाजते, ते पहाण्यातच मजा आहे..
कधी नमा, अस्सल गावरान भाषेत कशी बोलते हे तिला विचारल्यावर ती सांगते की, तिचं मूळ गाव जुन्नरमधील आळेफाटा आहे. ती जेव्हा कधी गावी गेली, तेव्हा ती भाषा तिनं लीलया अवगत केली..
जेव्हा ती ‘लाॅली’ ही सिने अभिनेत्री साकारते तेव्हा तिला पहाणं आणि ऐकणं हे ‘धम्माल’ असतं.. लाॅलीच्या डोक्यावरील ‘कुंडी’ हेअरस्टाईल, रंगीबेरंगी ब्लाऊज व साडी, तिचं बोलताना एका बाजूला सतत झुकणं आणि चेहऱ्यावरचा खट्याळपणा हा एक वेगळाच ‘अनुभव सोहळा’ असतो.. ती रंगमंचावर आल्या आल्या ओठांवर दोन बोटांचा V करुन प्रेक्षकांना ‘फ्लाईंग किस’ देते.. व ‘डोन्ट फ्लश्ड’ असं बोलून फोटो काढू नका असं बजावते..
या भूमिकेतील तिच्या इंग्रजीचा एक वेगळाच शब्दकोश काढता येईल.. ती प्रसादला तू ‘कच्चा’ आहेस असं म्हणताना ‘अनकुक्ड’ म्हणते.. ‘तेच ते’ म्हणण्याऐवजी ‘दॅट इज दॅट’ म्हणते.. ‘राॅंग टेलींग’, ‘डाय हार्ड’ अशा शब्दांचा ती भडीमार करते..
तिच्या आत्तापर्यंत मी अनेक भूमिका पाहिलेल्या आहेत.. प्रत्येक वेळी तिच्यातील अभिनयाचा कस लागतो.. हे सगळे विनोद प्रासंगिक असतात.. त्यामुळे त्यात ‘तोचतोपणा’ अजिबात नसतो..
तिला तिच्या घरचा पाठिंबा आहे म्हणूनच ती हे करु शकते. तिचे पती योगेश व सासू सासरे हे तिचा भक्कम आधार आहेत.. त्यामुळेच तिचा मुलगा तीन महिन्यांचा असतानाही, तिने सासूसह कोल्हापूरला जाऊन चित्रपटाचे शुटींग पूर्ण केले..
चितळे मिठाईवाल्यांच्या दुकानात गेल्यावर आपल्या नजरेस मिठाईचे असंख्य प्रकार भुरळ घालतात.. मात्र सर्वात मोठी रांग असते ती खुसखुशीत ‘बाकरवडी’ला! नमूचं तसंच आहे, ‘सोनी’च्या इतक्या विनोदी कलाकारांमधून ही नटखट ‘बाकरवडी’च सर्वांना हवीहवीशी वाटते…
‘नमू’ उर्फ नम्रता संभेराव हिला ही हास्य ‘जत्रा’ अशीच तुडुंब भरलेली रहाण्यासाठी हार्दिक शुभेच्छा!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१-१०-२१.
Leave a Reply