दि. १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे या दरम्यान भारतातील पहिली रेल्वेगाडी धावली त्या घटनेना आता १७० वर्षे झाली. भारताच्या अर्थकारणात आणि नागरीकरणात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडण्यात रेल्वेचा मोठा वाटा आहे. स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश काळात भारतीय रेल्वेचा पाया रचण्यात नामदार नाना जगन्नाथ शंकरशेट हे अग्रेसर होते. त्यांच्या अफाट कार्याचा परिचय आजच्या पिढीला होणे आवश्यक आहे…
भारतात लोहमार्गाची योजना पध्दतशीररीतीने आखून तो सुरू करण्याचे अर्थात मुंबई ते ठाणे हा वीस मैलांचा पहिलावहिला लोहमार्ग जनतेसाठी खुला करण्याचे भाग्य मुंबानगरीच्या वाट्याला आले, या गोष्टीला कितीतरी महत्त्व आहे. या नगरीच्या वाट्याला हे भाग्य आले, याचे कारण नाना जगन्नाथ शंकरशेट यांच्यासारखे महाराष्ट्रीय सूज्ञ नेते लोककल्याणासाठी स्वार्थत्यागपूर्वक या शहरात वावरत होते, हे होय.
रेल्वे कंपनीची स्थापना झाली. कंपनीचा या देशातील कारभार चालवण्यासाठी एक वजनदार, कर्तव्यदक्ष व सर्वपरीने समर्थ असा डायरेक्टर बोर्ड नेमण्यात आला.
नानांच्या वाड्यांत रेल्वे कचेरी
या डायरेक्टर बोर्डातील नाना शंकरशेट यांचे स्थान विशेष महत्त्वाचे होते. कारण आरंभापासून लोहमार्गाची योजना नावारूपास यावी, ती जनतेच्या त्याचप्रमाणे सरकारच्या गळी उतरावी, यासाठी ते उत्साहपूर्वक झटत होते. आपल्या देशी व परदेशी मित्रांशी तसेच सरकारशी सहकार्यासाठी त्यांचे प्रयत्न अहर्निश चालू होते.
मुंबईत जी. आय.पी. रेल्वे कंपनीचा डायरेक्टर बोर्ड स्थापन झाला व त्याच्याकडे स्थानिक रेल्वे कंपनीचा कारभार सोपविण्यात आला. यावरून या बोर्डाचे अधिकारक्षेत्र समजून येईल.
आज रेल्वे कंपन्यांच्या मोठमोठाल्या व भव्य इमारती आपणास दिसत आहेत. परंतु कंपनीच्या कामकाजास सुरवात झाली तेव्हा निरनिराळ्या अधिकाऱ्यांना व विशेषत: येथील लोहमार्गाची आखणी करण्यासाठी इंग्लंडहून आलेल्या इंजिनियरांना आपापल्या कचेऱ्या थाटण्यासाठी जागेची अडचण भासू लागली. त्या काळात म्हणजे १८५० साली ह्या रेल्वे कंपनीची एक महत्वाची कचेरी नाना शंकरशेट यांच्या ठाकुरद्वार येथील वाड्यात थाटण्यात आली. एवढ्यावरून या अभिनव उपक्रमाशी नाना शंकरशेट हे किती एकजीव होऊन राहिले होते, याची सहज कल्पना करता येण्यासारखी आहे.
मुंबई ते ठाणे ह्या लोहमार्गाची आखणी व इतर कामे पूर्ण झाल्यावर हा मार्ग तयार करण्याची सुरवात दि. ३१ ऑक्टोबर १८५० रोजी शीव येथे करण्यात आली. त्या दिवशी सकाळी पहिली कुदळ मारून मातीची पहिली टोपली भरून ती बाजूस टाकण्याचा समारंभ राज्यपालांच्या मंत्रिमंडळातील एक प्रमुख मंत्री ना.जे.पी. विलोघबी यांच्या हस्ते झाला. हा समारंभ जाहीर स्वरूपाचा नव्हता. कंपनीचे डायरेक्टर नाना शंकरशेट, कर्सेटजी जमशेटजी तसेच इतर बड़े अधिकारी त्यावेळी हजर होते.
लोहमार्गाचे काम सुरू झाले. हा पहिला लोहमार्ग तयार करण्याची जबाबदारी घेण्यासाठी त्या काळी कोणीही भारतीय कंत्राटदार किंवा कंपनी पुढे आली नाही. ती कौशल्यपूर्वक पार पाडण्यासाठी विलायतेतील मेसर्स फॅवील अँड फाबलर ही कंपनी पुढे आली व ठरलेल्या मुदतीत त्या परदेशी कंपनीने एतद्देशीय कामगारांच्या मदतीने ही जबाबदारी यशस्वी रीतीने पार पाडून दाखविली. विलायतेत प्रसिध्दी पावलेले बुध्दिमान व आपल्या कामात तरबेज असे स्थापत्यशास्त्रज्ञ जेम्स बर्कले यांची मुख्य इंजिनियर या नात्याने कंपनीकडून नेमणूक करण्यात आलेली होती व ती शंभर टक्के यशस्वी झाल्याचे प्रत्ययास आले. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई ते ठाणे लोहमार्ग तयार झाला व त्याचे समारंभपूर्वक उद्घाटन करण्याचा सोनियाचा दिवस उजाडला.
तो सोनियाचा दिवस
दि. १६ एप्रिल ह्या दिवसाचे महत्व कोणत्या शब्दांनी वर्णन करावे? टेलिग्राफ अँड कुरियर या तत्कालीन वृत्तपत्राचा बातमीदार उद्घाटन समारंभाच्या वृत्तांतात म्हणतो, ‘शनिवार दि. १६ एप्रिल १८५३ रोजी पश्चिम भारतातील लोकांनी जो विजयसमारंभ पाहिला, त्याची तुलना आम्ही (इंग्रजांनी) संपादिलेल्या कोणत्याही विजयाशी करता येणार नाही. विविद ठिकाणच्या रणभूमीवर आम्ही जे विजय मिळविले, ते ते ऐतिहासिक विजय कालांतराने विसरले जातील, परंतु मुंबई ते ठाणे हा पहिला लोहमार्ग सुरू करून जी अभूतपूर्व सुधारणा भारतात घडवून आणण्यात आली ती चिरस्मरणीय होऊन राहील.
मुंबईतील नागरिकांनी तो दिवस सणवाराप्रमाणे पाळला. त्या दिवशी सर्व कचेऱ्यांना रजा देण्यात आली होती. शहरभर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरलेले होते.
ज्या गाडीला अनेक डबे जोडलेले आहेत, अशी गाडी वाफेच्या इंजिनाच्या सहाय्याने भरधाव सुरू व्हायची होती व एकाच वेळी शेकडो लोकांना सुखाने प्रवास करता यायचा होता. केवढी ही आश्चर्याची घटना होती. आज ह्या गोष्टीचे कोणाला आश्चर्य वाटणार आहे? परंतु त्या काळी ही घटना नव्या नवलाईची व आश्चर्याची वाटत होती. वाफेच्या इंजिनाच्या सहाय्याने चालणारी अगिनगाडी हे त्या काळातील एक अभूतपूर्व महान आश्चर्य होते. ते प्रत्यक्ष पाहून डोळ्याचे पारणे फेडण्यासाठी त्या दिवशी बोरीबंदर ते ठाणे ह्या लोहमार्गावर दुतर्फा हजारो स्त्री-पुरुषांचे थवे उभे होते. ही पहिली गाडी बोरिबंदर स्टेशनातून शनिवारी दुपारी साडेतीन वाजता सुटायची होती. गाडीला अठरा डबे व तीन इंजिने जोडण्यात आली होती. गाडीत पाचशे निवडक पाहुणे मंडळींची बसण्याची सोय करण्यात आली होती. नाना जगन्नाथ शंकर शेट यांच्या समवेत आगगाडीचा हा पहिला प्रवास ज्यांना घडला ते खरोखरच धन्य होते.
— संदर्भ : इंटरनेटवरुन नाना शंकरशेट यांच्याविषयीची माहिती.
Leave a Reply