नाना शिरगोपीकर यांचा जन्म २ एप्रिल १९२० रोजी झाला.
नाना शिरगोपीकर हे पौराणिक नाटकांचे हमखास यशस्वी नाटक देणारे आणि आपल्या ट्रीक सीन्सने प्रेक्षकांना अचंबित करणारे हे मराठी रंगभूमीवरचे वेगळेच व्यक्तिमत्व होते. नाटयलेखक, दिग्दर्शक , चित्रपट व रंगभूमीवर चमत्कृती दृश्ये मांडणारे कलाकार म्हणून नानासाहेब शिरगोपीकर यांची ओळख होती. नानासाहेब शिरगोपीकरांना नाट्यकलेचा वारसा आपल्या वडिलांकडूनच मिळाला होता. त्यांचे वडील आण्णासाहेब शिरगोपीकर यांनी ऑक्टोबर १९२३ मध्ये ‘बालनटांची आनंद संगीत मंडळी’ स्थापन केली. ‘सोन्याची द्वारका’ व ‘गोकुळचा चोर’ या नाटकांचे त्या काळात अनुक्रमे २००० ते ३००० प्रयोग झाले. विविध कलांचा नानांचा अभ्यास होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते वडिलांना ‘आनंद संगीत मंडळी’ मध्ये दाखल झाले. त्यांच्या नाटक मंडळीचे ते उत्तम व्यवस्थापक होते. चोख हिशेब व त्याच्या नोंदी हे त्यांचे वैशिष्ठ्य. १९५६ साली वडिलांच्या निधनानंतर ‘आनंद संगीत मंडळी’ची धुरा हाती घेतली. आगीत कंपनीचे सामान जळून गेल्यानंतरही मोठ्या उमेदीने ते उभे राहिले. ‘गोकुळचा चोर’ या नाटकाचे तीन हजार प्रयोग व्हावेत ही वडिलांची इच्छा नानासाहेबांनी १९६१ मध्ये पूर्ण केली. १९६२ नंतर कंपनीचे स्वरूप बदलत त्यांनी ‘एखाद्याचे नशीब’, ‘नवमीची रात्र’ व ‘चंदनाची पेटी’ सारखी नाटके रंगभूमीवर आणली. परंतु त्यांच्या संस्थेच्या एक विशिष्ठ प्रतिमेच्या या नाटकांचा फायदा झाला नाही. नानासाहेब परत पौराणिक नाटकाकडे वळाले. ३० मे १९६४ रोजी ‘भाव तोचि देव’ हे नाटक रंगभूमीवर आणले. नाटक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.
ट्रीक सिन्स ही नानासाहेबांची खासियत. ते त्यांच्या नाटकाचे वेगळेपण आणि वैशिष्ट्य असे. ‘परीक्षेपूर्वीच्या सात रात्री’ सारखे, वेगळ्या विषयावरचे देखील नाटक त्यांनी रंगभूमीवर आणले. १९७० पर्यंत त्यांचा या व्यवसायात जम बसला.
त्यानंतर ‘ललित कलादर्श’ संस्थेबरोबर ‘शाबास बिरबल शाबास’ हे नाटक सहयोगाने रंगभूमीवर आले. ‘सोन्याची द्वारका’ परत एकदा ‘चंद्रलेखा’ या नाट्यसंस्थेशी सहयोगाने रंगभूमीवर आणले. १९८३ मध्ये तोंडवलकरांच्या संस्थेच्या सहयोगाने ‘पतिव्रता’ हे नाटक रंगभूमीवर आणले.
नानासाहेब शिरगोपीकर यांचे १४ ऑक्टोबर १९९४ रोजी निधन झाले.
Leave a Reply