नवीन लेखन...

ललकारचे आपटे म्हणून प्रसिद्ध असलेले नानासाहेब आपटे

यशवंत सीताराम आपटे उर्फ नानासाहेब आपटे हे मुळचे साताऱ्याजवळील सायगावचे. त्यांचा जन्म २२ डिसेंबर १९०९ रोजी झाली. नानासाहेबांचे आईवडील प्लेगने गेले त्यामुळे पुण्यात आजोबांकडे आजोळी आले, शिक्षण पुण्यातच घेतले व पुणेकर झाले. नानासाहेब आपटे यांनी नोकरी कधीच केली नाही. पुण्यात बी.ए.पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुण्यातच डेक्कन जिमखान्यावर आज जिथे जिमखाना पोस्ट ऑफिस आहे त्याच्याच ओळीत एक दुकान घेऊन, स्टेशनरी सामानाचा व्यवसाय केला. नंतर ६०२ सदाशिव, या सदाशिव पेठ हौदाजवळच्या आपल्या राहण्याच्या ठिकाणी रस्त्यालगतच्या जागेत त्यांनी ‘रेकॉर्ड लायब्ररी’ हा अभिनव उपक्रम सुरू केला. तिथे हिंदी, मराठी रेकॉर्डस ऐकायला लोक यायचे. तिथे एका खोलीत बसून लोकांना आपल्या पसंतीची गाणी अल्पदरात ऐकायला मिळायची. त्या दुकानाच्या आतल्या बाजूला असलेल्या खोलीत रेडिओ-दुरुस्ती आणि विक्री ही कामे चालायची.

नानासाहेब आपटे यांना असल्या गोष्टींसाठी लागणारे तंत्रज्ञानही न शिकता अवगत होते. १९४० च्या दशकात काही काळ मा.नानासाहेबानी अमेरिकन मोटारसायकलींची एजन्सी घेतली होती. त्यांनी ‘म्युझिक’ या नावाची एक रेकॉर्ड लायब्ररी १९४३-४४ च्या सुमारास साताऱ्यातपण उघडली होती. नानासाहेब आपटे उपक्रमशील असल्यामुळे त्याची झेप रेकॉर्ड लायब्ररीपुरती मर्यादित राहिली नाही. त्यांनी सातारकरांसाठी साताऱ्यात बालगंधर्व, गजाननराव वाटवे, गोविंद कुरवाळीकर यासारख्या लोकप्रिय गायकांचे गाण्याचे कार्यक्रमही आयोजित केले होते. पुढे १९४२ मध्ये त्यांनी रेडीओची एजन्सी घेऊन त्यांचा तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेश केला. त्यासाठी त्यांनी रेडीओ सर्व्हीसिंगचा अमेरिकन पोस्टल कोर्स त्या काळी केला. त्यांनी रेडीओच्या तंत्राचा अभ्यास करून “आकाशवाणी “ नावाचे पुस्तक १९५० साली लिहून प्रसिद्ध केले.

दुसऱ्या महायुद्धामुळे रेडीओची आयात बंद झाल्याने पर्यायी व्यवसाय म्हणून भानुविलासमध्ये नाटकाचे वेळी आणि संभाजी उद्यानात मनोरंजनासाठी ग्रामोफोन रेकॉर्ड्स वाजवण्याचे कंत्राट घेतले व त्यातूनच रेकॉर्ड लायब्ररी आणि ध्वनिक्षेपण(लाउडस्पीकर) या व्यवसायाची मुहूर्तमेढ केली. त्याकाळी कार्यक्रमाच्या वेळी कर्णे वापरले जात. नानासाहेबांनी त्यात बदल करून बॉक्स स्पीकर वापरात आणले. नानासाहेब आपटे हे तंत्रज्ञानाचे पाईक होते. ते काळाच्या पुढे दोन पावले असत.

गजानन वाटवे, सुधीर फडके यांची व नानासाहेबांची रेकार्डसच्या निमित्ताने मैत्री होतीच, गजानन वाटवे, सुधीर फडके कार्यक्रमासाठी ध्वनी व्यवस्थेचे काम नानासाहेबांना मिळू लागले. या व इतर कलाकाराकडून कार्यक्रमासाठी ध्वनी व्यवस्था नानांचीच उत्तम असा विश्वास त्यांनी मिळवला. यामुळे १९५२ मध्ये सवाई गंधर्व पुण्यतिथी ची व्यवस्था साहजिकच नानासाहेबांकडे आली त्यानंतर १९५४ मध्ये खादी ग्रामोद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांचे हस्ते झाले, या कार्यक्रमासाठी ध्वनी व्यवस्थेचे काम त्यांच्या कडे आले व हे अत्यंत मोठे आणि जबाबदारीचे काम यशस्वी झाले. त्यानंतर ललकारची पुण्यातील सास्कृंतिक क्षेत्रात घोड दौड सुरु झाली. साहजिकच पुणेकर नानासाहेबांना ललकार”चे नानासाहेब आपटे या नावाने ओळखू लागली.

नानासाहेब आपटे यांना सर्वदूर लोकप्रियता आणि आर्थिक स्थैर्य दिले ते ध्वनिक्षेपण क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीमुळे. त्यांच्या लाऊडस्पीकर्सच्या व्यवसायाचे ‘ललकार’ हे नाव जवळजवळ शिकागो या ध्वनिक्षेपण व्यवसायातील दुसऱ्या एका प्रसिद्ध नावाइतकेच गाजले. सवाई गंधर्व महोत्सव, सुधीर फडके यांचे गीत-रामायणाचे कार्यक्रम, भीमसेन, वसंतराव देशपांडे यांचे गायनाचे कार्यक्रम, मोठमोठे समारंभ, भाषणे, असे कित्येक कार्यक्रम ललकारने पुरवलेल्या ध्वनिक्षेपण सेवेच्या साह्य़ाने झाले आहेत. ललकार म्हणजे निर्दोष, समाधानकारक सेवा असे समीकरणच झाले होते. जसजशी मोठी कामे येऊ लागली त्याबरोबरीने अधिक चांगल्या कामाची अपेक्षा होऊ लागली. नानासाहेबांना माणसाबरोबर तांत्रिकतेची पण ओढ होती. नानांनी नवीन मोठ्या शक्तीचे अम्प्लीफायार्स वापरायला सुरवात केली.

त्या बरोबरीने नवे मायक्रोफोन आणले. स्पीकर बॉक्सेस स्वतः बनवून घेत असत. त्यासाठी देवदार लाकूड वापरत. ते आपल्या सहकार्यांना ट्रेनींग देत असत. माईक सेट करताना वोल्युम कंट्रोल बंद करायची सवय सर्व ऑपरेटरना लावत असत. त्या काळी लाउड स्पीकर मधून शिट्या येणे हे नॉर्मल होते. प्रत्येक वेळी स्पीकरची व माईकची जागा याचा अंदाज घेऊनच सर्व व्यवस्था का करावी लागे की ज्यामुळे फीडब्याक/ शिट्या येणार नाहीत. पूर्वी एक /दोन माईक असले की पुरत पण मोठ्या कार्यक्रमासाठी ४/५ माईक लावणे, अवघड होते. अम्प्लीफायारला १/२ माईकचीच सोय असे. नानांनी ५ माईक लावता येणारे अम्प्लीफायार बनवून घेतले. राष्ट्रपती ,पंतप्रधान यांचे कार्यक्रमासाठी मुख्य वक्त्यासाठी २ माईक लागत. एकाच स्टॅडवर २ माईक त्यांनी एक आडवी पट्टी लावुन व्यवस्था केली आजही ती सर्वत्र वापरली जाते. त्या काळी पुण्यात नाटके मांडव वजा थेअटर मध्ये होत. संगीत नाटकांना व्यवस्था करताना अनेक क्लुप्त्या नानासाहेब वापरत.

मंदारमाला मध्ये शेवटच्या जुगलबंदीच्या जलशात राम मराठे व प्रसाद सावकार यांचे समोर पानदानात माईक ठेवून अत्यंत उत्तम प्रकारे सर्वांना ऐकण्याची व्यवस्था होई. सवाई गंधर्व महोत्सवासारख्या ठिकाणी वीज गेल्यावर लगेच बॅटरी वर स्पीकर चालू राहण्याची व्यवस्था करून नानासाहेबांनी सर्वांची व संयोजकाची वाहवा मिळवली होती. गीतरामायण गाताना बाबूजींना काटेकोर व्यवस्था लागे. माईक व दिवे यांची विशेष योजना नानासाहेब करुन देत. स्टीरीओ सिस्टीमचा पाया पुण्यात प्रथम नानासाहेबांनी महेशकुमार यांच्या ऑर्केस्ट्राचे वेळी घातला.

बालगंधर्व रंगमंदिरात किशोरकुमार यांच्या कार्यक्रमाचे आधी त्यांनी स्वतः येऊन ट्रायल घेऊन ललकारला शाबासकी दिली होती. या व्यवसायामुळे नानासाहेब आपटे यांचे गायन, वादन आणि इतर क्षेत्रातील अनेक दिग्गजांशी संबंध आला. त्याच्यापैकी अनेक जणांशी घरगुती संबंधही निर्माण झाले. संगीत नाटकासाठी गायक कॉर्डलेस माईकचा उपयोग हल्ली सर्वत्र केला जातो. नानासाहेबांच्या मनात हीच कल्पना १९६० पासून होती. पण त्या काळी तंत्रज्ञान इतके पुढारलेले नसल्याने ती त्यावेळी प्रत्यक्षात येऊ शकली नाही. नानासाहेबांनी घातलेला तंत्र ज्ञानाचा पाया त्यांचे अनेक शिष्य आजही पुढे नेत आहेत.त्यात प्रामुख्याने श्री वामन रहाळकर, प्रदीप माळी,खांबे बंधू जॉन पाटोळे इत्यादींचा उल्लेख करावा लागेल. ललकारच्या यशात दिग्गज कलाकार आणि रसिक यांच्या असलेल्या जिव्हाळ्या बरोबर नानासाहेबांनी अत्यंत कष्टाने वेळोवेळी आत्मसात केलेले तंत्रज्ञान पण तेवढेच महत्वाचे !!!
नानासाहेब आपटे यांचे २० मार्च २००० साली निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / आपटे परिवार

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..