नवीन लेखन...

भारतीय चित्रपटसृष्टीचे एक आद्य शिल्पकार नानासाहेब सरपोतदार

भारतीय चित्रपटसृष्टीचे एक आद्य शिल्पकार नरहर दामोदर ऊर्फ नानासाहेब सरपोतदार यांचा जन्म ११ फेब्रुवारी १८९६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील नांदवली येथे झाला.

घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे नोकरी करत शिक्षण घेण्यासाठी नानासाहेब मुंबईला गेले, पण शिक्षणात त्यांचे मन रमले नाही. जन्मजात वाचनाची व अभिनयाची आवड असल्यामुळे वयाच्या तेराव्या वर्षीच घर सोडून ते महाराष्ट्र नाटक मंडळीत जाऊन राहिले. तिथे वत्सलाहरण, सैरंध्री, दामाजीमध्ये छोटया-मोठया भूमिका केल्या. आईच्या आग्रहाखातर, शिक्षणासाठी ते एका नातेवाइकाकडे इंदूरला गेले. तिथेही अभ्यासात त्यांचे लक्ष लागेना!

नटश्रेष्ठ गणपतराव जोशींच्या ओळखीने २१ ऑक्टोबर १९१९ रोजी नव्यानेच स्थापन झालेल्या कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीत दाखल झाले. महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या ‘सैरंध्री’ या पहिल्या चित्रपटाचे लेखक नानासाहेब सरपोतदारच होते.

नाना स्त्री कलाकारांच्या भूमिकाही हुबेहूब वठवत. ‘सैरंध्री’ने चांगले यश संपादन केले. महाराष्ट्र फिल्म कंपनीसाठी नानांनी ‘वत्सलाहरण’, ‘सिंहगड’, ‘कल्याण खजिना’, ‘सती सावित्री’, ‘दामाजी’, ‘शहाला शह’ आदी चित्रपट लिहिले. काही चित्रपटांत भूमिकाही केल्या. इथल्या पाच वर्षाच्या वास्तव्यात त्यांनी दिग्दर्शनातील बारकावेही शिकून घेतले.

छायालेखक पांडुरंग तेलगिरी यांनी मुंबईला ‘डेक्कन पिक्चर्स’ ही संस्था स्थापन केली. त्यांच्या ‘प्रभावती’ या मूकपटाचे दिग्दर्शन नानासाहेबांनी केले. दिग्दर्शक म्हणून नानांचा हा पहिलाच चित्रपट होता.पुढे तेलगिरीची पुण्यात खडकीला ‘युनायटेड पिक्चर्स’ ही संस्था स्थापन केली. नानासाहेबांनी या संस्थेसाठी दोन वर्षात ‘रायगडचे पतन’, ‘चंद्रराव मोरे’, ‘रक्ताचा सूड’ चित्रपट दिग्दर्शित केले. नाशिकजवळच्या येवळे गावातील अंबू सगुण मूकपटात बालकलाकाराची भूमिका करत असे. नानासाहेबांच्या ‘आर्यन फिल्म’ कंपतीत प्रथम ती नायिका झाली व पुढे ललिता पवार या नावाने प्रचंड लोकप्रिय झाली. ‘महाराची पोर’ हा चित्रपट नानांनी लिहून दिग्दर्शित केला होता. ऐंशी वर्षापूर्वी त्यांनी असा संवेदनशील सामाजिक विषय हाताळला होता. अंबू ऊर्फ ललिता पवारने महाराजाच्या मुलीची भूमिका केली होती. हा चित्रपट पाहायला सरोजिनी नायडू खास गिरगावातील मॅजेस्टिक सिनेमात आल्या होत्या. या चित्रपटाची महात्मा गांधी, मौलाना शौकत अली, बॅ. बाप्टिस्टा, अच्युत बळवंत कोल्हटकर आदींनी मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. मद्रासच्या ‘हिंदू’, ‘जस्टिस’ वृत्तपत्रांनी अग्रलेख लिहून नानांचे कौतुक केले होते.

१९२७ सालच्या विजयादशमीच्या मुहूर्तावर पर्वतीच्या पायथ्याशी, आदमबाग येथे एक रुपया भांडवलावर नानांनी ‘आर्यन फिल्म’ कंपनीची स्थापना केली. आठ आणे जमिनीचे भाडे व बाकी आठ आण्यांचे पेढे, नारळ, हार, फुले घेऊन मुहूर्त केला गेला. पुढे चित्रपट प्रदर्शक, मुंबईच्या ‘कोहिनूर’ थिएटरचे मालक बाबुराव कान्हेरे ‘आर्यन फिल्म कंपनी’च्या भागीदारीत आले.

नाना अनुभवी नट, लेखक, दिग्दर्शक होतेच याशिवाय ते छायालेखनही शिकले होते. आता ते निर्मातेही झाले होते. ‘हरहर महादेव’ हा आर्यनचा पहिला चित्रपट होता, पण चित्रपटाच्या नावावर ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाने हरकत घेतल्यामुळे त्यांनी नाव बदलून ‘निमक हराम’ केले. या चित्रपटाची जाहिरात त्यांनी मोठया कल्पकतेने केली होती. त्यानंतर मद्याचे दुष्परिणाम दाखवणा-या १९२८ साली ‘आर्य महिला’ चित्रपटाची निर्मिती केली. यामध्ये ललिता पवार नायिका तर ‘भारतमाता थिएटर’चे मालक भोपटकर नायक होते. या चित्रपट निर्मितीसाठी नानासाहेबांचा ‘बालगंधर्व’ व अच्युत बळवंत कोल्हटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. ‘आर्यन कंपनी’चा १९२८ सालचा ‘राजा हरिश्चंद्र’ हा मुख्य नायिका म्हणून भूमिका असलेला ललिता पवारचा यांचा पहिला मूकपट होता.

१९२८ ते १९३० या काळात नानानी, ‘मराठयाची मुलगी’, ‘गनिमी कावा’, ‘उणाडटप्पू’, ‘पतितोद्धार’, ‘पारिजातक’, ‘राजा हरिश्चंद्र’, ‘सुभद्राहरण’, ‘भीमसेन’, ‘भवानी, तलवार’ आदी चोवीस मूकपटांची निर्मिते व दिग्दर्शन केले. यातील सहा मूकपटांची नायिका अंबू ऊर्फ ललिता पवार होती. यातील बहुतेक मूकपट चांगले चालले. १९३१मध्ये बोलपटांचा जमाना चालू झाल्यावर नानासाहेबांनी चित्रपटनिर्मिती थांबवली.

अर्देशीर इराणी यांच्या इम्पिरियल कंपनीचा ‘रुक्मिणीहरण’ हा बोलपट नानांनी दिग्दर्शित केला. यामध्ये डी. बिलिमोरिया, पंडितराव नगरकर, भाऊराव दातार यांनी भूमिका केल्या. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘देवकी’ या बोलपटात भाऊराव दातार, मिस दुलारी व राजा सॅण्डो होते. चित्रपट व्यवसाय हा बिनभरवशाचा धंदा आहे, हे ओळखून नानासाहेबांनी १९३६च्या अनंत चतुर्दशीला लक्ष्मी रोडवरील सामान्यजनांना स्वस्तात पोटभर भोजन मिळावे, म्हणून केवळ दोन आण्यांत राइस प्लेट चालू केली.

स्वस्त आणि रुचकर अन्नपदार्थ, नानासाहेबांचा बोलका-मिश्कील स्वभाव यामुळे थोडयाच अवधीत ‘पूना गेस्ट हाऊस’ कलावंत आणि साहित्यिकांची आवडती मठी बनली. त्यानंतरही नानासाहेबांनी १९३८ साली ‘रवींद्र पिक्चर्स’साठी ‘संत जनाबाई’ व ‘सरस्वती सिनेटोन’साठी ‘भगवा झेंडा’ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात पहिला रौप्यमहोत्सव साजरा करण्याचा मान ‘सरस्वती सिनेटोन’च्या ‘श्यामसुंदर’ या बोलपटाला जातो. ‘आर्यन फिल्म’साठी नानासाहेब त्याची निर्मिती करणार होते. त्यासाठी शांता आपटे, शाहू मोडक, भाऊराव दातार आदी कलाकारांची निवडही करण्यात आली होती. तशी ज्ञानप्रकाशमध्ये जाहिरातही आली होती, परंतु त्यांच्या भागीदारांना ही कल्पना रुचली नाही, म्हणून त्यांना हा विचार सोडून द्यावा लागला. भालजी पेंढारकरांच्या ‘सरस्वती सिनेटोन’ने हेच कलाकार घेऊन ‘श्यामसुंदर’ यशस्वी करून दाखवला. मुंबईच्या ‘वेस्ट एंड’ (सध्याचे नाझ) थिएटरमध्ये तो सत्तावीस आठवडे चालला. नानासाहेबांना वाचनाचा नाद होता, साहित्याची आवड होती. त्यांनी ‘चंद्रराव मोरे’, ‘बाजीरावचा बेटा’, ‘उनाड मैना’ नाटके लिहिली. ‘मौज’मध्ये ते परखड लेख लिहिले. शाहू मोडक, ललिता पवार, राजा सँडो, रत्नमाला, भाऊराव दातार, पार्श्वनाथ आळतेकर, डी. बिलिमोरिया आदी कलाकारांना प्रथम संधी दिली.

पुण्याच्या आदमबाग रस्त्याला ‘नानासाहेब सरपोतदार पथ’ असे नाव देण्यात आले होते. नानासाहेबांचा हा यशस्वी वारसा त्यांच्या कुटुंबीयांनीही पुढे चालवला. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव बंडोपंत सरपोतदार यांनी ‘ताई तेलीण’ या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली. पुना गेस्ट हाउसचा कारभार चारुदत्त सरपोतदार सांभाळत असत. विश्वास सरपोतदार यांनी यशस्वी निर्माता व वितरक म्हणून नावलौकिक मिळवला. चित्रपट महामंडळाचे ते अध्यक्षही होते. गजानन सरपोतदार चित्रपट निर्मिती-लेखन व दिग्दर्शनही करत असत. कन्या उषा दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये अध्यापनाचे काम करत असत.

नानासाहेब सरपोतदार यांचे २३ एप्रिल १९४० रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..