2 जुलै 2004 (शुक्रवार)
सकाळी सकाळी ऑफिस मध्ये जाऊन टी काउंटरवर गेले. तिथे कळले, एक अटेंडंट माझा आणि अजून एकाचा व्हिसा काढण्यासाठी गेला आहे. मी सुटकेचा निश्वास टाकला. तो अटेंडंट बारा वाजेपर्यंत येणार होता आणि जर काही डॉक्युमेंट्स कम्प्लीट नसतील तर ऑफिसमध्ये फोन आला असता. उमेश च्या बाबतीत त्याला दोनदा परत पाठवले होते कारण त्याचे फोटो रिजेक्ट झाले होते. त्याच्या विसाचे काम चार-पाच दिवस रखडले होते आणि अटेंडंट हेही सांगितले की, फर्स्ट टाइम व्हिसा स्टँपिंग असेल तर इंटरव्यू ला बोलावतील. पण ते सोमवारी कळेल. सोमवारी फोन आला नाही तर मंगळवारी व्हिसा येईल.
मी हे सर्व ऐकून मनाची तयारी ठेवली होती की अजून दोन-चारदा तरी धावपळ करावी लागेल. कारण माझा आतापर्यंतचा अनुभव असा होता ही कोणतेही काम पटकन सरळ झाले नाही. ईव्हन हा जॉब मिळण्यासाठी पण मला तीन महिने वाट पहावी लागली होती. पण कदाचित देवाला माझी दया आली आणि अजून पुढे काही कॉम्प्लिकेशन्स न होता डायरेक्ट मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता माझा पासपोर्ट स्टॅम्प होवुन आला.
शनिवार- रविवार हा विकेंड पण असाच उत्सुकता गेला. रविवारी मी अरविंद ना (जिजाजींना) फोन केला. तेव्हा त्यांना थोडीशी कल्पना दिली. सांगितलं, व्हिसा काढायला दिला आहे. तर ते म्हणाले, तू नक्कीच जाशील. असं कंपनी ऊगीच कोणाचा व्हिसा काढून ठेवत नाही. त्यामुळे अजून थोडे हायसे वाटले
5 जुलै 2004 (सोमवार)
आज दिवसभरात फोन आला नाही. तेव्हा अटेंड नाही सांगितले, तुमचा उद्या व्हिसा येईल. मग मन एकदम शांत झाले. सकाळी सकाळी आमच्या प्रोजेक्ट मॅनेजरला भेटले. मिसेस नीलम कुमार!! एकदम चांगली छाप माझ्यावर पडली. दिसायला तर चांगली होतीच पण स्मार्ट, हुशार आणि एकदम लाघवी बोलणे. मला एकदम निलीमाची आठवण झाली. बहुदा एन एम एल् अक्षरी असलेल्या नावाच्या मुली अशाच असाव्यात. नीलम ने मला अतिशय प्रेमळ शब्दात सांगितले की, आपण दुपारी भेटू!!
अजूनही मला नक्की नव्हते कि, मी जाणार आहे का नाही. पण आता माझी उत्सुकता थोडी कमी झाली होती किंवा मन शांत झाले होते. नीलम दिवसभर खूप बिझी होती. मी दोनदा तिच्या समोरून गेले. दोन्ही वेळेला ती फोनवर आणि कॉम्प्युटर काम करण्यात बिझी होती. त्यामुळे आज तिच्याशी काहीही बोलणे झाले नाही. मी तशीच घरी आले. आई-बाबांना काही कळवू का नको या मनस्थितीत अजून एक दिवस थांबायचे ठरवले.
6 जुलै 2004 (मंगळवार)
सकाळी सकाळी व्हिसा आल्याची खबर आली. खूप खुश झाले. व्हिसा बघण्याची खूप घाई झाली. झेराला फोन केला. ती म्हणाली, झेरोक्स घेवून पासपोर्ट पाठवून देते. मग परेश ला ईमेल टाकली. म्हणाला, आता तू तयारीत रहा. कधीही ईकडे यावं लागेल. खूपच उत्साह आला. पण जोवर पीएम च्या तोंडून ऐकत नाही तोवर मला खात्री पटत नव्हती. पण तरीही उमेश बरोबर बसून काय न्यायाचं काय नाही अशी लिस्ट बनवली. संध्याकाळी चार वाजता झेराने डॉक्युमेंट्स आणून दिले. उत्सुकतेने पासपोर्ट उघडला. तर फर्स्ट पेजवर स्टॅम्प नव्हता. उमेश म्हणाला लास्ट पेजवर असतो.घाईघाईने लास्ट पेज उघडले. तिथे ही नव्हता. आता माझा हात जरा थरथरायला लागले. शेवटी उमेशने स्टॅम्प मारलेले पेज काढून दिले. डोळे भरून पाहिला. दहा वेळा हात फिरवून बघितला. आता मात्र धीर निघत नव्हता. कधी एकदा आई- बाबा, नरेन, शैलेश यांना दाखवते असं झालं. पण अजूनही माझ्या जाण्या बद्दलची खात्रीशीर न्यूज नव्हती. सकाळी येऊन नीलम सांगून गेली होती की, मी तुझ अपॉइंटमेंट लेटर चेक करते आणि पुढचं ठरवते. त्यामुळे परत मी जरा धीर धरायचे ठरवले. संध्याकाळी साडेसहा वाजता नीलम भेटली आणि फायनली, तिने डिक्लेअर केलं कि या विकेंडला तुला जायचे आहे.
Finally, from the Horse’s Mouth Now!!!!!!
पुढे म्हणाली, तू फर्स्ट टाइम जाणार आहेस का? तर मग मी तुला थोडे इनपुट देईन. तू मला उद्या भेट. तुझे फ्लाईट डिटेल्स आणि बाकी सर्व डिटेल्स उद्या सांगेन. आता जायचे तर नक्कीच आहे!! तसेच मी सुचेतात जाणार होते. पण घरी कामवाली बाई येऊन थांबली होती, म्हणून मी देवदर्शन ला आले. देवापुढे साखर आणि पासपोर्ट ठेवला. शैलेश ला सुद्धा व्हिसा बघून खूप आनंद झाला. त्या बाई गेल्या गेल्या, घरी आईला फोन लावला आणि फोनवर रडत रडतच आईला सांगितले, व्हिसा आला आणि बहुतेक या मला लंडनला जावे लागेल. तिकडे सर्वांना खूप आनंद झाला. मग दीदीला फोन केला. तिलाही खूप आनंद झाला. ती म्हणाली, चला! आईबाबांच्या कष्टाचे चीज झाले. अजून फ्लाईट डिटेल्स, तिकीट काही हातात नव्हते म्हणून इतरांना कोणाला कळले नाही.
7 जुलै 2004 (बुधवार)
आज ति. अनिल काकांचा वाढदिवस!! त्यांना सकाळी सकाळी बर्थडे विश करणार होते. मग नंतर विचार केला ही फ्लाईट डिटेल्स कळले की प्रत्यक्ष जाऊन नमस्कार करून येईन! सकाळी सुचेतात गेले. देवाला नमस्कार केला. आजी-आजोबांच्या फोटोला नमस्कार केला. आई बाबांचे आशिर्वाद घेतले साक्षीला व्हिसा दाखवला. तिने एक गोष्ट माझ्या लक्षात आणून दिली. ती म्हणाली, मागे तुम्ही म्हणाला होता- नुसताच रिकामा पासपोर्ट! त्यावर एक सुद्धा स्टॅम्प नाही. बघा आता लगेच स्टॅम्प सुद्धा आला. मला ही गंमत वाटली. नंतर आठवले मी असे पण मिळाले होते, आई-बाबा, नरेन- साक्षी, शैलेश, दीदी सगळेजण कुठल्या ना कुठल्या कारणाने प्लेन जर्नी करून आले होते. मी एकटीच आता प्लेन मध्ये बसायची राहिले होते. तेव्हा मी गमतीत म्हणाले होते, आता मी डायरेक्ट इंटरनॅशनल फ्लाईट मध्येच बसणार!! आणि आता माझं तेही स्वप्न पूर्ण होणार होतं. अशा वेळेला राहुल- आमचा मित्र, त्याचे एक वाक्य आठवले. तो म्हणत होता- सगळ्यांना सगळ मिळणार आहे फक्त थोडा वेळ लागेल!
असो! उत्सुकतेने ऑफिसमध्ये पोचले. उमेश बरोबर बसून त्याच्या कामाचे स्वरूप, कोडींग स्टाइल, प्रोजेक्ट मध्ये कुठला इंटरफेस युज केला आहे हे सगळे शिकून घेतले. त्याला अधून मधून कामातही मदत केली. हे सर्व मी कशासाठी केले की तिकडे गेल्यावर मला सगळेच नवीन नको.
दुपारी साडेबारा एकच्या सुमारास नीलम ने बोलावलं आणि तिने मला सगळे डिटेल्स सांगितले. तिने सांगितले, संडेला सकाळी पावणेदहा ची फ्लाईट आहे. दुबईला तुझा चार तासाचा हॉल्ट असेल. तर मी तुला आता सगळे खूप डिटेलमध्ये सांगते कारण, तू पहिल्यांदाच इंटरनॅशनल जर्नी करत आहे. तु मला संध्याकाळी सहा वाजता भेट.
लगेच साक्षी ला फोन लावून ही गोष्ट सांगितली. दुपारी चार वाजेपर्यंत तिकीट कन्फर्मेशन ची मेल सुद्धा आली. मी एकटीच जाणार असल्यामुळे आणि दुबईला होल्ट असल्यामुळे जरा टेन्शन आले होते. पण संध्याकाळी नीलम ने इतक्या व्यवस्थितपणे मार्गदर्शन केले की माझे टेन्शन दूर झाले. तिने मला अगदी दिशांसकट गाईड केले. लेफ्ट ला जा , राईट ला जा. जणू काही तिने माझ्यासमोर पिक्टरियल व्हू उभा केला. त्यामुळे मन बरेच शांत झाले. आनंदाच्या भरात मी सुचेतात आले आणि टू माय सर प्राईज मावशी ही तिथे आली होती.
तिला फोनवर आईने बातमी दिली. आणि तिला न रहावून ती डायरेक्ट भेटायला आली. सर्वांना मी तिकीट दाखवले. सामानाची यादी दाखवली. आई- बाबांचा उत्साह तर काही विचारूच नका. पटापट यादीचे सँग्रिगेशन झाले. आई-बाबा, शैलेश या लोकांनी त्यांच्या त्यांच्या परीने सामानाची जबाबदारी उचलली. ज्या गोष्टी केवळ माझ्या फिटिंग शिवाय घेता येणार नाही त्यात फक्त माझ्या वाट्याला आल्या.
मग मी प्रत्यक्ष आनंद आश्रमात जाऊन काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि माझी लंडनला जाण्याची वार्ता ऐकवली. दोघांनाही खूप आनंद झाला. काकूने लगेच लंडनच्या राणी साठी म्हणून गरम गरम शिरा केला. गप्पा गोष्टी झाल्या. घरच्या देवांचे दर्शन घेऊन, त्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही मग घरी गेलो आणि शांत मनाने झोपलो.
8 जुलै 2004 (गुरुवार)
नेहमीप्रमाणे ऑफिसला गेले. परेश बरोबर ई-मेल एक्सचेंज केलं, न्यायला आणायचं स्पॉट ठरवला. इतर काही जुजबी गोष्टी त्यांने सांगितल्या. संध्याकाळी नीलम ने सांगितले, तुला मी एक टेस्ट देणार आहे. ती उद्यापर्यंत सोडवून दे. दोन मिनिटे परत मला टेन्शन आलं. म्हणजे असे वाटले की टेस्ट क्लिअर नाही झाली तर जायचं नाही की काय. पण तिने लगेचच पुढे एक्सप्लेन केले, काही काळजी करू नकोस. हे जस्ट माझ्या रेफरंन्स साठी आहे. ह्याचा आणि तुझ्या जाण्याचा काही संबंध नाही. मग दिवसभर युके ची माहिती गोळा करणे, उमेश बरोबर त्याच्यावर डिस्कशन्स करणे असा वेळ घालवला आणि उत्साहात घरी आले.
9 जुलै 2004 (शुक्रवार)
नेहमीप्रमाणे ऑफिसला गेले. दोन वाजता टेस्ट लिहिली. टेस्ट अपेक्षेपेक्षा खूप चांगली गेली. दिवसभर परत टाईम पास, फ्रेंड बरोबर गप्पा, निरोपान- निरोपी चालू होती. संध्याकाळी सहा वाजता अटेंडंट आला तेव्हा जीव भांड्यात पडला. कारण मला फॉरेन करन्सी न्यायची होती ती त्याच्याकडे होती. दुपारी कंपनीतर्फे पाच हजार रुपये मिळाले होते क्लोदिंगसाठी. पहिल्यांदाच जाणाऱ्या सर्वांना कंपनीतर्फे ते देतात. साडेसहाला पुन्हा एकदा नीलमला भेटून आले. तिने आॉल द बेस्ट दिले. सात वाजले तरी झेरा चा फोन येईना. मला तिकीट, पासपोर्ट, फॉरेन करन्सी सर्व गोळा करायचं होतं. मला वाटलं, आता उद्या परत यावं लागेल. पण झेरा ने अँशुरन्स दिला की आजच सर्व गोष्टी मिळतील. त्याप्रमाणे सर्व डॉक्युमेंट घेऊन मी आठ वाजता ऑफिसमधून निघाले. उमेश सुद्धा माझ्या साठी थांबला होता. मग आम्ही डायरेक्ट ठाण्यापर्यंत टॅक्सी केली.
गुरुवार शुक्रवार या दोन दिवसात शैलेश ची बरीच धावपळ झाली. मी शुक्रवारी रात्री नऊ वाजता सुचेतात पोचले, तेव्हा बऱ्याच गोष्टी जमल्या होत्या. आई आणि शैलेश पॅकिंग च्या मागे लागले होते. नेमके नरेन आणि साक्षी तापाने आजारी होते. नाहीतर त्यांची बरीच मदत झाली असती. त्यातही दोघांनी जेवढे करता येईल तेवढे मदत केली. इकडे पुण्याहून मम्मी पण देवदर्शन मध्ये येऊन थांबल्या होत्या. रात्री सुचेतात पोहोचले आणि तयारी बघून मला सगळं खरं चाललय का स्वप्न आहे असं वाटलं. दहा वेळा पर्स उघडून तिकिटे, पासपोर्ट, करन्सी चाचपडून पाहिले. सगळी महत्वाची डॉक्युमेंट्स बाबांच्या ताब्यात दिली. अशा सगळ्या गोष्टी आमच्याकडे बाबाच हँडल करतात. आईचे चालले होते पुरणपोळ्या आपण कराव्यात. पण मी आईला म्हटले, पँकिंगसाठी पूर्ण शनिवार रिकामी पाहिजे. आधीच तिची खूप धावपळ चालू होती. तिचा जॉब, सामान खरेदी, चिवडा, लाडू, भोपळ घारगे करणे. त्यात पोळ्यांची दमछाक नको आणि पुण्याचे पॅकिंग असो वा लंडनचे पँकिंग मध्ये आईचा हात धरणारे कोणी नाही. म्हणून तिला पुरणपोळ्यांचा बेत कॅन्सल करायला लावला.
शनिवारी पॅकिंग करायचे ठरवून संमिश्र भावनेने शुक्रवारी रात्री देवदर्शन मध्ये झोपले. आता त्या घरात मी एकदम सप्टेंबर ला परत येणार. फेब्रुवारी 98 पासून गेल्या सहा वर्षात एवढे दिवस मी कधीच घरापासून लांब राहिले नव्हते. शैलेश म्हणाला, तसे काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागते.
— यशश्री पाटील.
Leave a Reply